You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
डीपसीक: अमेरिकन कंपन्यांची झोप उडवणारे चीनचे चॅटबॉट काय आहे?
- Author, पीटर हॉसकिन्स आणि इमरान रहमान-जोन्स
- Role, बिझनेस आणि तंत्रज्ञान रिपोर्टर्स
आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रातील वर्चस्व राखण्यासाठी अमेरिकन कंपन्या भली मोठी गुंतवणूक करत आहेत. अलीकडेच चॅटजीपीटी आणि इतर काही अमेरिकन कंपन्यांनी यात प्रचंड गुंतवणुकीची घोषणा केली.
या पार्श्वभूमीवर डीपसीक या आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रातील चिनी कंपनीनं अमेरिकन कंपन्यांच्या तुलनेत कमी खर्चात नवे मॉडेल विकसित करून खळबळ उडवून दिली आहे.
डीपसीक आणि त्यामुळे बाजारात निर्माण झालेल्या खळबळीविषयी जाणून घेऊया.
डीपसीक (DeepSeek) हे चिनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI)अॅप, चॅटजीपीटी (ChatGPT) आणि या क्षेत्रातील इतर प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत अमेरिका, युके आणि चीनमध्ये अॅपलच्या अॅप स्टोअरवर आघाडीचं मोफत अॅप बनलं आहे.
डीपसीक (DeepSeek) अॅपच्या लोकप्रियतेत वाढ झाल्यामुळे अमेरिकेतील आर्टिफिशियल इंटेलिजन्सशी संबंधित कंपन्यांच्या शेअर्सची विक्री झाली. सोमवारी (27 जानेवारी) सकाळी एनव्हिडिया (Nvidia), मायक्रोसॉफ्ट (Microsoft) आणि मेटा (Meta) या कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत घसरण झाली. याचा परिणाम होत युरोपियन कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीतदेखील घसरण झाली.
डीपसीक अॅप लाँच झाल्यापासून त्याची लोकप्रियता वाढली आहे. हा काही फक्त एका कंपनीचं अॅप लोकप्रिय झालं एवढाच मुद्दा नाही. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात अमेरिका आणि अमेरिकन कंपन्यांचा दबदबा किंबहुना मक्तेदारी असल्याचं चित्र जगभरात निर्माण झालं आहे.
मात्र आता या चिनी अॅपच्या लोकप्रियतेमुळे अमेरिका हा देश आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रातील अजिंक्य देश आहे, या जगभरात असलेल्या समजालाच आव्हान मिळालं आहे.
त्याचबरोबर अमेरिकन कंपन्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात ज्या प्रचंड प्रमाणावर गुंतवणूक करण्याच्या योजना आखत आहेत, त्यासंदर्भात देखील प्रश्न उपस्थित झाले आहेत.
डीपीसीक कंपनीचं अॅप डीपीसीक-व्ही 3 मॉडेल (DeepSeek-V3 model)वर आधारित आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रातील डीपसीकच्या प्रतिस्पर्धी कंपन्या, या प्रकारची अॅप, मॉडेल विकसित करण्यासाठी अब्जावधी डॉलर्सचा खर्च करत आहेत.
तर या अॅपच्या संशोधकांचा मात्र दावा आहे की हे अॅप 60 लाख डॉलर्सपेक्षाही कमी रकमेत विकसित करण्यात आलं आहे.
मात्र आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रातील इतरांनी या दाव्याबद्दल शंका व्यक्त केल्या आहेत.
अमेरिकन कंपन्यांच्या तोडीस तोड डीपसीक
आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी आवश्यक असलेलं अत्याधुनिक चिप तंत्रज्ञानाची विक्री चीनला करण्यावर अमेरिका बंधनं घालत असताना डीपसीकच्या अॅपचा उदय झाला आहे.
अमेरिकेकडून आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी अत्याधुनिक चिपचा सातत्यपूर्ण पुरवठा होत नसताना, या क्षेत्रातील काम सुरू ठेवण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात काम करणाऱ्या चिनी कंपन्यांनी त्यांच्या कामाची माहिती एकमेकांना दिली आहे. तसंच या तंत्रज्ञानाच्या विकासासाठी नवीन मार्गांचा प्रयोग केला आहे.
या प्रयोगांमुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे असे मॉडेल्स समोर आले आहेत ज्यांना पूर्वीपेक्षा कितीतरी कमी संगणकीय शक्तीची (computing power) आवश्यकता आहे.
याचाच अर्थ त्यामुळे आधी विचार केला जात होता त्यापेक्षा खूपच कमी खर्च या तंत्रज्ञानाच्या विकासासाठी येतो आहे. त्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या उद्योगावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
या महिन्याच्या सुरुवातीला डीपीसीक-आर1 (DeepSeek-R1) लाँच करण्यात आलं होतं.
गणित, कोडिंग आणि मानवी भाषा समजून त्यातून निष्कर्ष काढण्याच्या संगणकीय प्रणालीची क्षमता यासारख्या कामांमध्ये वापर केला असता डीपसीकच्या अॅप चॅटजीपीटी विकसित करणाऱ्या ओपनएआय या कंपनीच्या नव्या एआय मॉडेल्सच्या "तोडीस तोड कार्यक्षमतेचं" असल्याचा कंपनीला अभिमान आहे.
आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रातील 'स्पुटनिक क्षण'
मार्क अँड्रीसेन अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅलीतील भांडवली गुंतवणुकदार आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार आहेत. मार्क यांनी डीपीसीक-आर1 चं वर्णन "आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रातील स्पुटनिक क्षण" (AI's Sputnik moment)असं केलं.
1957 मध्ये तत्कालीन सोविएत युनियननं स्पुटनिक हा मानवाच्या इतिहासातील पहिला कृत्रिम उपग्रह अवकाशात सोडून अमेरिकेसह सर्व जगाला धक्का दिला होता. अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रात तेव्हा रशियानं अमेरिकेला मागे टाकलं होतं.
तेव्हापासून एखाद्या क्षेत्रातील अतिशय धक्का देणाऱ्या आणि त्या क्षेत्राचं स्वरुप बदलून टाकणाऱ्या घटनेला 'स्पुटनिक क्षण' (Sputnik moment) असं म्हटलं जातं.
त्यावेळेस सोविएत युनियनच्या तंत्रज्ञानातील कामगिरी हा अमेरिकेसाठी धक्काच होता. अमेरिका त्यासाठी तयार नव्हती. तसंच काहीसं आता डीपसीक-आर1 च्या माध्यमातून आर्टिफिशयल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात झाल्याचं मार्क अंड्रीसेन यांचं म्हणणं आहे.
अमेरिकन कंपन्यांचे शेअर्स गडगडले
डीपसीकच्या लोकप्रियतेनं बाजारात खळबळ उडाली आहे. एएसएमएल (ASML)या डच चिप उपकरण उत्पादक कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीत त्यामुळे अचानक 10 टक्क्यांहून अधिकची घसरण झाली.
सिमेन्स एनर्जी (Siemens Energy) ही कंपनी आर्टिफिशयल इंटेलिजन्सशी संबंधित हार्डवेअर म्हणजे उपकरणांचं उत्पादन करते. या कंपनीच्या शेअर्स देखील तब्बल 21 टक्क्यांनी कोसळले.
"आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात कमी किंमतीच्या चिनी अॅपची कल्पना तशी आघाडीवर नव्हती. त्यामुळे डीपीसीकच्या यशामुळे बाजाराला थोडासा आश्चर्याचा धक्का बसला आहे," असं फिओना सिनकोटा म्हणाल्या. त्या सिटी इंडेक्समध्ये वरिष्ठ बाजार विश्लेषक आहेत.
"जेव्हा अचानक अशा प्रकारचं कमी किमतीचं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं मॉडेल समोर येतं, तेव्हा त्यातून त्या कंपनीच्या प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या नफ्याबद्दल चिंता निर्माण होते. विशेष करून या कंपन्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या अधिक खर्चिक पायाभूत सुविधांमध्ये आधीच केलेल्या गुंतवणुकीच्या रकमेचा विचार करता ही चिंता असते," असं त्या म्हणतात.
सिंगापूरस्थित तंत्रज्ञान क्षेत्रातील इक्विटी सल्लागार वे-सर्न लिंग यांनी बीबीसीला सांगितलं की "यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या संपूर्ण पुरवठा साखळीतील (या क्षेत्रातील विविध उपकरणं, उत्पादनांवर काम करणाऱ्या कंपन्या) गुंतवणूक रुळावरून घसरू शकते किंवा त्यावर विपरित परिणाम होऊ शकतो."
मात्र वॉल स्ट्रीटवरून बॅंकिंग क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेल्या सिटीनं इशारा दिला की आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रातील ओपनएआयसारख्या अमेरिकन कंपन्यांच्या वर्चस्वाला डीपसीक आव्हान देऊ शकत असतानाच, चिनी कंपन्यांसमोर असणाऱ्या समस्या आर्टिफिशियल इंटेलिजन्समधील त्यांच्या प्रगतीत अडथळा निर्माण करू शकतात.
"या क्षेत्रातील अपरिहार्यपणे अधिक प्रतिबंधात्मक वातावरणात, अमेरिकेला असणारा अधिक अत्याधुनिक चिप्सचा पुरवठा ही एक फायद्याची बाब आहे," असं त्यांच्या विश्लेषकांनी एका अहवालात म्हटलं आहे.
गेल्या आठवड्यात अमेरिकन तंत्रज्ञान कंपन्या आणि परकी गुंतवणुकदारांच्या एका गटानं द स्ट्रारगेट प्रोजेक्टची (The Stargate Project)घोषणा केली.
आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रातील चॅटजीपीटी आणि इतर भागीदारंनी स्थापन केलेली ही नवी कंपनी असून ती टेक्सासमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या पायाभूत सुविधांसाठी तब्बल 500 अब्ज डॉलरची गुंतवणूक करते आहे.
डीपसीक कंपनीची स्थापना कोणी केली?
डीपसीक कंपनीची स्थापना 2023 मध्ये लिआंग वेनफेंग यांनी चीनच्या आग्नेय भागातील हांगझाऊ शहरात केली.
लिआंग वेनफेंग 40 वर्षांचे असून ते माहिती आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअर आहेत. डीपसीकला भांडवली मदत करणाऱ्या हेज फंडाचीही स्थापना त्यांनी केली होती.
त्यांनी एनव्हिडिया ए 100 (Nvida A100) चिपचं एक स्टोअर उभारलं होतं. एनव्हिडियाच्या चिपची चीनला निर्यात करण्यावर आता बंदी आहे. चिपच्या या संग्रहामुळे लिआंग यांना डीपसीक लॉंच करता आली.
तज्ज्ञांच्या मते त्या चिपची संख्या जवळपास 50,000 इतकी होती. स्वस्त आणि कमी दर्जाच्या चिप्सबरोबर जोडलेल्या या चिप्स अजूनही आयातीसाठी उपलब्ध आहेत.
अलीकडेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रातील तज्ज्ञ आणि चीनचे पंतप्रधान ली किआंग यांच्यातील बैठकीत लिआंग दिसले होते.
जुलै 2024 मध्ये 'द चायना अकॅडमी'ला दिलेल्या एका मुलाखतीत लिआंग म्हणाले होते की त्यांच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स मॉडेलच्या आधीच्या आवृत्तीवरील प्रतिक्रियेमुळे त्यांना आश्चर्य वाटलं.
"या मॉडेलची किंमत हा इतका संवेदनशील मुद्दा असेल असं आम्हाला वाटलं नव्हतं," असं ते पुढे म्हणाले.
"आम्ही आमच्या गतीनं वाटचाल करत होतो, मॉडेलच्या विकासासाठी होणाऱ्या खर्चाचं आकलन करत होतो आणि त्यानुसार किंमत ठरवत होतो," असं लिआंग म्हणाले.
जोआओ दा सिल्व्हा आणि डिअरबेल जॉर्डन यांच्या अतिरिक्त वार्तांकनासह.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)