You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
चंद्राबाबू नायडूंच्या कार्यक्रमादरम्यान पुन्हा चेंगराचेंगरी, तीन जणांचा मृत्यू
काही दिवसांपूर्वीच तेलुगु देसमचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडूंच्या रॅलीमध्ये चेंगराचेंगरी होऊन आठ जणांचा मृत्यू झाला होता.
आज पुन्हा ( 1 जानेवारी) त्याच प्रकारच्या घटनेची पुनरावृत्ती त्यांच्याच दुसऱ्या सार्वजनिक कार्यक्रमात घडली आहे. आंध्र प्रदेशातील गुंटूर या ठिकाणी ही घटना घडली.
चंद्राबाबू नायडू या चेंगराचेंगरीवेळी घटनास्थळी हजर नव्हते. ते तिथून निघाले आणि त्यानंतर आयोजकांनी संक्रांती निमित्त कपडे वाटण्यास सुरुवात केली तेव्हा ही चेंगराचेंगरी झाली.
28 डिसेंबरला झाली होती चेंगराचेंगरी
तेलुगू देसम पक्षाचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांच्या रॅलीत चेंगराचेंगरी होऊन त्यांच्याच पक्षाच्या आठ कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला आहे.
ही घटना नेल्लोर जिल्ह्यात कंडुकरू गावात घडली. 28 डिसेंबरच्या रात्री चंद्राबाबू नायडू या गावात त्यांच्या ‘इडेम खर्मा मना राष्ट्रनिकी’ (या राज्यावर काय दुर्दैव ओढवलंय) या मोहिमेअंतर्गत एक रॅली काढण्यात आली होती.
बीबीसी तेलुगूचे सहयोगी पत्रकार शंकर वडीसेट्टी यांनी दिलेल्या माहितीनुसार पक्षाचे कार्यकर्ते नायडू यांच्या गाडीवर चढण्याचा प्रयत्न करत होते आणि त्यामुळे चेंगराचेंगरी झाली. त्यातच काही लोक बाजूच्या नाल्यातही पडले.
जखमी कार्यकर्त्यांना नेल्लोर जिल्ह्यातील कंडकुरू आणि कावेली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यापैकी काही जणांची प्रकृती गंभीर आहे.
या घटनेत सात कार्यकर्त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे, असं पक्षाने दिलेल्या एका निवेदनात म्हटलं आहे.
नायडू यांना या प्रकरणी मोठा धक्का बसला आहे. त्यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची चौकशी केली.
मृतांच्या नातेवाईकांना पक्षातर्फे 10 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
19 नोव्हेंबर पासून नायडू यांनी ‘इडेम खर्मा मना राष्ट्रनिकी’ ही मोहीम राबवत आहेत.
45 दिवस चालणाऱ्या या मोहिमेत टीडीपी पक्षाचे कार्यकर्ते प्रत्येक शहरातील प्रत्येक घरात जाणार असून लोकांना जगनमोहन रेड्डी सरकारच्या अपयशाचा पाढा वाचणार आहे.
त्याचाच भाग म्हणून राज्यभर प्रवास करत सभा घेत आहेत.
दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांची नावं
- देविनी रविंद्र बाबू
- कालकुरी यांडी
- यातगिरी विजय
- काकुमणी राजा
- मरालपती चिनाकोंडिया
- पुरुषोत्तम
पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस नारा लोकेश यांनी या दुर्घटनेवर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, अतिशय धक्कादायक घटना आहे.
“पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मृत्यू हा आमच्यासाठी खूप मोठं नुकसान आहे. आम्ही त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहोत. जे जखमी झाले त्यांच्या योग्य उपचाराची व्यवस्था करत आहोत. ते लवकरात लवकर बरे व्हावेत अशी मी कामना करतो. ज्या कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबियांना योग्य ती मदत करण्यात येईल.”
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)