You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
चंद्राबाबूंना पत्नीबाबत अपशब्द ऐकून कोसळलं रडू; म्हणाले, आता विधानसभेत परतेन तर...
आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना शुक्रवारी (19 नोव्हेंबर) पत्रकार परिषदेत माध्यमांसमोरच रडू कोसळलं. विधानसभा अधिवेशनात पत्नीबाबतच्या वक्तव्यांनी व्यथित झाल्याचं चंद्राबाबूंनी यावेळी म्हटलं.
'राज्यातील सत्ताधारी पक्षाचा विरोधी पक्षांकडं पाहण्याचा दृष्टिकोन अत्यंत वाईट आहे. अशा प्रकारचं वर्तन सभागृहात कधीही पाहिलं नाही,' असं चंद्राबाबू म्हणाले.
विधानसभेत कुटुंबातील महिलेचं चारित्र्य हनन झालं. त्याच्या निषेधार्थ विधानसभेत 2024 पर्यंत पाय ठेवणार नाही. आता मुख्यमंत्री होऊनच विधानसभेत परत येईल, असं चंद्राबाबू म्हणाले.
अमरावतीच्या मंगलदिरी येथील तेलुगु देसम पक्षाच्या कार्यालयात चंद्राबाबू यांनी पत्रकार परिषद घेतली. तिथे ते ढसाढसा रडल्याचं पाहायला मिळालं.
विधानसभा नव्हे कौरवसभा!
सत्ताधारी वायएसआर काँग्रेसच्या मंत्र्यांनी पत्नीचा जो अपमान केला, त्यामुळं चंद्राबाबू व्यथित झालेले दिसून आलं. त्यामुळंच आंध्रप्रदेशच्या विधानसभा सभागृहाची तुलना त्यांनी थेट कौरव सभेशी केली.
'मी सत्तेत असेल किंवा विरोधी पक्षात असलो तरी मला माझ्या पत्नीनं केवळ पाठिंबा दिला आहे. मात्र तिनं प्रत्यक्ष राजकारणात कधी सहभाग घेतला नाही. मुख्यमंत्री असतानाही, प्रोटोकॉलशिवाय इतर कार्यक्रमात कधी ती आली नाही,' असं चंद्राबाबू म्हणाले.
'माझ्या पत्नीचे वडील मुख्यमंत्री होते, मीही मुख्यमंत्री राहिलो तरीही माझी पत्नी यापासून दूर राहिली. अशा व्यक्तीबाबत जेव्हा अशाप्रकारे गलिच्छ राजकारण केलं जातं तेव्हा ते असह्य होतं,' असंही चंद्राबाबू म्हणाले.
विधानसभेचे सभापत्ती तम्मिनेनी यांनी यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पावलं उचलायला हवी होती अथवा आक्षेप घ्यायला हवा होता. पण त्यांनी तसं केलं नाही, अशा आक्षेपही त्यांनी व्यक्त केला.
हे चूक आणि बरोबर यांच्यातील युद्ध आहे आणि त्याचा निकाल प्रजेच्या न्यायालयातच लागेल, असं चंद्राबाबू म्हणाले. राजकारणातील चढउतार माझ्यासाठी नवीन नाही, असंही ते यावेळी म्हणाले.
'पत्नीला लक्ष्य केलं'
आंध्र प्रदेशच्या विधानसभेमध्ये महिला सबलीकरणाच्या विषयावर चर्चा सुरू होती. त्यावेळी सत्ताधारी वायएसआर काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी चंद्राबाबूंच्या पत्नीविरोधात अपशब्दांचा वापर केल्याचं, चंद्राबाबू म्हणाले.
"गेल्या अडीच वर्षांपासून मला अपमानाचा सामना करावा लागत आहे. मात्र आता त्यांनी माझ्या पत्नीला लक्ष्य केलं आहे. आता मी सहन करू शकत नाही," असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री होईपर्यंत सभागृहात न परतण्याची शपथ घेतली.
कौरव सभेमध्ये पांडवांच्या उपस्थितीमध्ये द्रौपदीचा अपमान झाला होता. त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने तिचं रक्षण केलं. त्यानंतर काय झालं ते सर्वाना माहितीच आहे, असंही यावेळी नायडू म्हणाले.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)