श्रेयस अय्यर : डान्सर, जादूगार ते क्रिकेटमधला चमकता तारा

फोटो स्रोत, Getty Images
काही महिन्यांपूर्वी झालेल्या आशिया कप स्पर्धेत भारतीय संघात अपघाताने आलेल्या श्रेयस अय्यरने वर्ल्डकपमध्ये कमाल केली आहे.
भारतासाठी चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना सलग दोन सामन्यांमध्ये शतक झळकावून श्रेयस अय्यरने चमकदार कामगिरी केली.
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्ध खेळताना श्रेयस अय्यरने सलग दुसरं शतक झळकावलं.
वर्ल्डकपमध्ये सलग शतकं झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत श्रेयसने आता त्याचं नाव समाविष्ट केलंय.
याआधी 2019 च्या वर्ल्डकपमध्ये रोहित शर्माने सलग तीन शतकं झळकावली होती. 1999 मध्ये सध्या भारतीय संघाचा प्रशिक्षक असणाऱ्या राहुल द्रविडनेही वर्ल्डकपमध्ये सलग दोन शतकं झळकावली होती.
श्रेयसच्या कारकीर्दीचा घेतलेला आढावा.
आयपीएलमधील चमकदार कामगिरी
दोन वर्षांपूर्वीचा हा प्रसंग. तारीख- बुधवारची दुपार. आयपीएलचा हंगाम सुरू होता. दिल्ली कॅपिटल्स संघाने पत्रकार परिषद आयोजित केलेली. आयपीएलमध्ये एकामागोमाग एक मॅचेस सुरू असतात.
खेळाडूंचं हॉटेल, विमानतळ, स्टेडियम अशी कसरत सुरू असते. यामध्ये पत्रकार परिषद कशाला असा प्रश्न अनेकांना पडला.
या पत्रकार परिषदेत व्यासपीठावर गौतम गंभीर, रिकी पॉन्टिंग आणि श्रेयस अय्यर होता. गंभीरने वैयक्तिक प्रदर्शन लौकिकासारखं होत नसल्याने कर्णधारपद सोडून देण्याचा निर्णय जाहीर केला.
श्रेयस अय्यर संघाचा नवा कर्णधार असेल असंही त्या परिषदेत घोषित करण्यात आलं. त्यावेळी दिल्लीची गुणतालिकेत तळापर्यंत घसरण झाली होती.
गंभीर आणि पॉन्टिंग या दोन माजी अनुभवी खेळाडूंनी श्रेयस कर्णधारपदाची जबाबदारी योग्य प्रकारे हाताळू शकतो असं सांगितलं. गंभीरने हंगामाच्या मध्यात कर्णधारपद सोडणं ही मोठी बातमी होती. कारण तांत्रिकदृष्ट्या गंभीरच्या नेतृत्वासंदर्भात कुठेच काही चर्चा नव्हती.
टीम इंडियाचा माजी सलामीवर, भरवशाचा बॅट्समन, आयपीएल विजेता कर्णधार अशी सशक्त गोष्टी गंभीरच्या नावावर होत्या. मात्र गंभीरने स्वेच्छेने बाजूला होण्याचा निर्णय घेतला.
मात्र श्रेयससारख्या युवा खेळाडूकडे कर्णधारपदाचा काटेरी मुकूट सोपवणं ही त्याहून मोठी बातमी होती. पण दिल्लीने हा धाडसी निर्णय घेतला होता.

फोटो स्रोत, ICON SPORTSWIRE
सातत्याने खेळाडू, कर्णधार आणि सपोर्ट स्टाफ यामध्ये घाऊक बदल करणारा संघ अशी दिल्लीची ओळख होती. दिल्लीचं नेतृत्व करणारा श्रेयस हा बारावा कर्णधार होता. श्रेयसने अनुभवी आणि नवे, विदेशी आणि भारतीय अशा खेळाडूंची मोट बांधली.
गंभीरकडून श्रेयसकडे नेतृत्वाची धुरा आली तरी दिल्लीच्या नशिबात मोठा बदल झाला नाही. 2018 हंगामात दिल्लीने 14 मॅचेसमध्ये 5 विजय आणि 9 पराभवांसह 10 गुण मिळवले. दिल्लीला गुणतालिकेत तळाचं स्थान मिळालं. फरक हा झाला की श्रेयस कर्णधारपद सांभाळू शकतो हे सिद्ध झालं.
श्रेयसने त्या हंगामात 411 रन्स केल्या. त्याचा स्ट्राईकरेट होता 132.58. त्याच्या नावावर चार अर्धशतकंही होती. कर्णधारपदाने त्याच्या बॅटिंगवर परिणाम होत नाही हेही सिद्ध झालं.
श्रेयसला रिकी पॉन्टिंगच्या रुपात खंबीर मार्गदर्शक लाभला. याची परिणती म्हणजे श्रेयसच्या नेतृत्वात दिल्लीचा संघ जेतेपदाचा दावेदार झाला. सलग दोन वर्ष त्यांनी बाद फेरी गाठण्याची किमया केली.
2019 हंगामात दिल्लीने 14 पैकी 9 मॅच जिंकत 18 गुण मिळवले आणि तिसरं स्थान पटकावलं. दिल्लीने एलिमिनेटर मॅचमध्ये हैदराबादला नमवलं परंतु क्वालिफायर 2 मॅचमध्ये अनुभवी चेन्नईने त्यांची वाट रोखली.
दिल्लीने तिसरं स्थान पटकावलं यातून श्रेयसचं महत्त्व अधोरेखित झालं. स्वत: श्रेयसने 463 रन्स करत कर्णधारपद आणि बॅटिंग ही कसरत यशस्वीपणे सांभाळता येते हे दाखवून दिलं.

फोटो स्रोत, ROBERT CIANFLONE
कर्णधारपद हे मैदानावरच्या हारजीत यापेक्षाही व्यवस्थापकीय कौशल्याचं काम आहे. मॅन मॅनेजमेंट म्हणून विविध संस्कृतीचं प्रतिनिधित्व करणाऱ्या, अनेकविध भाषा-खाणंपिणं-आचारविचार असणाऱ्या खेळाडूंची मोट बांधण्याचं काम आयपीएल संघाच्या कर्णधाराला करावं लागतं.
संवाद कौशल्य सहज असावं लागतं. संघातल्या खेळाडूंचा विश्वास जिंकावा लागतो. श्रेयसने हे केल्याचं दिसून आलं.
IPL 2020 च्या हंगामादरम्यान श्रेयसच्या खांद्याला दुखापत झाली. दुखापत गंभीर नसली तरी थ्रो करताना त्याला त्रास जाणवतो. मात्र तरीही तो खेळत राहिला.
हैदराबादविरुद्धच्या महत्त्वपूर्ण लढतीत त्याच्या खांद्यात त्रास जाणवू लागला. पण आपण उपचारांसाठी मैदानाबाहेर गेलो तर संघाच्या मनोधैर्यावर परिणाम होईल हे ओळखून श्रेयस मैदानावरच थांबला. 30 यार्ड वर्तुळात फिल्डिंगला उभा राहिला. संघाला विजय मिळवून दिल्यानंतरच तो पॅव्हिलियनमध्ये परतला.
विशेष म्हणजे श्रेयस मुंबईतल्या मैदानांवर कर्तृत्व गाजवून मोठा झालेला खेळाडू आहे. दिल्ली कॅपिटल्सचं नेतृत्व करत असलेल्या श्रेयसने डोमेस्टिक क्रिकेटमधली दादा टीम असलेल्या मुंबईचं नेतृत्व केलेलं नाही.
नकला, नृत्य, व्यायाम आणि जादू
कर्णधारपदाचा काटेरी मुकूट डोक्यावर असला तरी श्रेयसने त्याच्या वैयक्तिक स्वभावाला मुरड घातलेली नाही. कोरोना काळात, घरी बहिणीबरोबर त्याने केलेला डान्स व्हायरल झाला होता.
युएईत टीम हॉटेलमध्ये पृथ्वी शॉबरोबर तो नाचताना दिसतो. प्लेऑफच्या महत्त्वपूर्ण मॅचआधी काही तास श्रेयसचा सहकारी स्टॉइनसची हुबेहूब नक्कल करतानाचा व्हीडिओ व्हायरल झाला होता.
त्याआधी काही दिवस सहकारी शिमोरन हेटमायर मुलाखतकाराशी बोलत असताना त्याच्या मागे उभा राहून त्याची नक्कल करताना दिसला होता.

फोटो स्रोत, DELHI CAPITALS
कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊनमध्येही स्वत:ला फिट ठेवलेल्या मोजक्या भारतीय खेळाडूंमध्ये श्रेयसचा समावेश होतो. जिममधले त्याचे फोटो आणि व्हीडिओ सोशल मीडियावर दिसतात. फोटोंप्रमाणे मैदानावरही त्याचा फिटनेस दिसतो हे त्याहून महत्त्वाचं आहे.
श्रेयसच्या घरी त्याचा लाडका कुत्रा आहे. त्याच्यासोबत खेळतानाचे अनेक व्हीडिओ इन्स्टाग्रामवर वारंवार दिसतात. असंख्य प्रकारच्या शूजचं कलेक्शन त्याच्या घरी दिसतं.
अशी झाली होती दिल्ली संघात एंट्री
2015 मध्ये आयपीएल लिलावावेळी घडलेला किस्सा तत्कालीन परफॉर्मन्स अॅनालिस्ट प्रसन्न यांनी शेअर केला आहे. श्रेयसचं नाव लिलावकर्त्यांनी घेताच प्रसन्न यांनी कर्स्टन यांना त्याला संघात समाविष्ट करून घेण्याचं सुचवलं.
डोमेस्टिक क्रिकेटमध्ये चांगलं प्रदर्शन केलं असलं तरी आंतरराष्ट्रीय पातळीवर श्रेयसची तेव्हा ओळख नव्हती. हा दिल्लीचा भविष्यातला कर्णधार असू शकतो असं प्रसन्न यांनी कर्स्टन यांना म्हटलं.

फोटो स्रोत, DELHI CAPITALS
श्रेयसने 2014-15 रणजी हंगामात 50.56च्या सरासरीने रन्स करताना दोन शतकं आणि सहा अर्धशतकं झळकावली होती. 2015-16 रणजी हंगामातही श्रेयसने हा फॉर्म कायम राखला.
त्याने 73.39च्या सरासरीने 1321 रन्स केल्या. हंगामात सर्वाधिक रन्सचा विक्रम त्याच्या नावावर होता. फायनलमध्ये श्रेयसने शतकी खेळी साकारत मुंबईच्या 41व्या रणजी जेतेपद मिळवून निर्णायक भूमिका बजावली होती.
2015 आयपीएल हंगामानंतर श्रेयसची इमर्जिंग प्लेयर ऑफ द इअर अर्थात सर्वोत्तम उदयोन्मुख खेळाडू पुरस्कारासाठी निवड झाली होती. याआधी हा पुरस्कार पटकावणाऱ्यांपैकी रोहित शर्मा, संजू सॅमसन, सौरभ तिवारी, मनदीप सिंग, अक्षर पटेल आयपीएल संघांसाठी सातत्याने चांगली कामगिरी करत आहेत.
प्रसन्न गेली अनेक वर्ष दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रीय संघाचे परफॉर्मन्स अॅनालिस्ट म्हणून काम करत आहेत. त्यांचा शब्द प्रमाण मानून कर्स्टन आणि दिल्ली संघव्यवस्थापनाने श्रेयसला 2.6 कोटी रुपयांची बोली लावत ताफ्यात समाविष्ट केलं. त्यावेळच्या त्या संभाषणाची फळं दिल्ली चाखत आहेत.
वनडेत आणि ट्वेन्टी-20 प्रकारात कामगिरी
2017 मध्ये श्रेयसने श्रीलंकेविरुद्ध धरमशाला इथे वनडे पदार्पण केलं. भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी असलेली चुरस आणि दुखापती यामुळे श्रेयस चार वर्षात 22 वनडेच खेळू शकला. मात्र यामध्येही त्याने आपल्या नैपुण्याची झलक सादर केली.

फोटो स्रोत, MICHAEL BRADLEY
22 वनडेत 42.78च्या सरासरीने खेळताना श्रेयसच्या नावावर 813 धावा असून यामध्ये एक शतक आणि 8 अर्धशतकांचा समावेश आहे. 5 फेब्रुवारी 2020 रोजी न्यूझीलंडविरुद्ध हॅमिल्टन इथे श्रेयसने पहिलंवहिलं शतक झळकावलं.
भारतासाठी 32 ट्वेन्टी20 सामन्यात श्रेयसने 132.11च्या स्ट्राईकरेटने 580 धावा केल्या आहेत. यामध्ये 3 अर्धशतकांचा समावेश आहे.
डोमेस्टिक क्रिकेटमध्ये मुंबईसाठी खेळताना श्रेयसने 54 सामन्यात 52.18च्या सरासरीने 4592 धावा केल्या असून, यामध्ये 12 शतकं आणि 23 अर्धशतकांचा समावेश आहे.
हेही नक्की वाचा
हा व्हीडिओ पाहिलात का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








