You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पर्यटन : 'जिथे तीन दिवसांपूर्वी आमची माणसं बुडून मेली, तिथे आता टुरिस्ट पोहतायत'
- Author, लॅरी ब्लेईबर्ग
- Role, बीबीसी ट्रॅव्हलसाठी
हा अनुभव तुम्हाला आलाच असेल. तुम्ही जोडून सुट्ट्या आल्या की फिरायला निघता. कुटुंबाची किंवा मित्रमैत्रिणींची एकत्र मोट बांधायला खटपटी लटपटी करता. सरतेशेवटी तुम्ही ठरलेल्या ठिकाणी पोचता.
तिथे एखादा गड-किल्ला, पुराणवास्तू, शिल्प, लेण्या, मंदिरं यातलं काहीही दैदिप्यमान इतिहासाची साक्ष देत उभं असतं आणि अचानक तुम्हाला दिसतं... धारदार वस्तूने ओरखडे काढलेत आणि लिहिलंय – ‘सोनू दिल मेरी जान’
कचकन दाताखाली खडा आल्यासारखं वाटतं. तिथल्या सगळ्या सौदर्यांला तिथे येणाऱ्या पर्यटकांनी कुरूप करून टाकलंय असं जाणवतं. भारतात कुठेही गेलं तरी पर्यटकांच्या बेताल वागण्याची ही कुरूपता आपल्या वाटेला येतच राहाते.
पण आताशा हा प्रश्न भारतापुरता मर्यादित नाहीये. जगभरात सगळ्याच ठिकाणी जाणारे पर्यटक बेशिस्त आणि बेताल झालेत.
त्यांना ना वास्तूंच्या सौदर्यांशी देणंघेणं आहे, ना स्थानिक लोकांच्या भावनांनी किंवा तिथल्या संस्कृतीशी.
गेल्या काही दिवसांत जगातल्या वेगवेगळ्या वृत्तपत्रात आलेल्या बातम्या पहा.
- दोन अमेरिकन पर्यटक दारूच्या नशेत आयफल टॉवरच्या निषिद्ध भागात शिरले आणि तिथेच झोपले.
- एका फ्रेंच महिलेने इटलीच्या झुलत्या मनोऱ्यावर धारदार वस्तूने ओरखडे मारतं हार्ट काढलं आणि स्वतःचं नाव लिहिलं.
- एका कॅनेडिनय किशोरवयीने मुलाने 1200 वर्षं जुन्या जपानी मंदिराची विटंबना केली.
- एका ब्रिटिश माणसाने रोमच्या कलोसियमवर दोन नावं कोरली.
- आणि सगळ्यात थोर म्हणजे एका जर्मन पर्यटकाने बालीच्या मंदिरात अक्षरशः ‘नंगानाच’ केला. म्हणजे त्याने अनेक हॉटेल्सचे पैसे बुडवले, या मंदिरात गेला, कपडे काढले, पूर्ण नग्न झाला आणि नाचायला लागला.
जणू काही जगातले सगळे लोक एकमेकांकडे पाहूणे म्हणून गेल्यावर कसं वागायचं हे विसरलेत. पण हे आताच घडतंय का? की दुसऱ्याच्या घरात, देशात, समाजात गेल्यावर विचित्र वागायला पण आपण आपल्या पूर्वजांकडून शिकलोय?
इटलीतल्या पॉम्पेपासून इजिप्तच्या पिरॅमिड्सपर्यंत जगातल्या सगळ्या मानवनिर्मित वास्तूंना ओरखड्यांचा आणि त्यावर पर्यटकांनी काहीही लिहिण्याचा शाप आहे. हे आजच होतंय असं नाही, गेली हजार वर्षं हे सुरू आहे.
जुन्या काळातही लोक तिथे गेले की आजच्या धर्तीवर ‘बंटी इथे आला होता’ असं काहीसं लिहून यायचे. अगदी ख्रिस्तोफर कोलंबस आणि हर्नन कोर्ट्स यांच्यासारखे थोर समजले जाणारे प्रवासीही याला अपवाद नाहीत. उलट त्यांनी तर या बाबतीत मोठमोठे गुन्हे केलेत.
लंडनच्या ग्रीनविच विद्यापीठात पर्यटन आणि इव्हेंट या विषयाच्या प्राध्यपक असणाऱ्या लॉरेन सिगल सांगतात की 18 व्या आणि 19 व्या शतकात ब्रिटिश उमराव कुटुंबांसह युरोपच्या सफरीवर जायचे, पण तिथल्या वास्तू खराब करणं आणि स्थानिकांचा अपमान करणं हा त्यांचा मुख्य हेतू असायचा.
पण कोव्हिडनंतर पर्यटनाचा ओघ जसा वाढला तसा बेशिस्त वागणाऱ्या पर्यटकांचाही. ही एका परीने चांगली गोष्ट आहे असंही काहींना वाटतं. निदान आता जागतिक पातळीवर या प्रश्नाकडे लोकांचं लक्ष जाऊन त्यावर उपाय शोधून काढता येईल.
सिगल यांना वाटतं की पर्यटकांचं बेताल आणि बेशिस्त वागणं सोशल मीडियाचा परिपाक आहे.
त्या म्हणतात, “इंस्टाग्राम आणि टिकटॉकवर लाईक्स मिळवण्यासाठी लोक वाट्टेल ते करत आहेत. स्थानिक लोकांचा अपमान करत आहेत, त्याचे व्हीडिओ सोशल मीडियावर टाकत आहेत. गंमत म्हणजे काही पॅसेंजर शेमिंगसारखे अकाउंट्स या लोकांच्या असंवदेनशील आणि अपमानकारक व्हीडिओवर लोकांना जागरूक करत आहेत, तेही सोशल मीडियावरच.”
डेव्हिड बेरमॅन सिडनी तंत्रज्ञान विद्यापीठात संशोधन करतात. ते म्हणतात की 2019 मध्ये जवळपास 1.5 अब्ज लोकांनी आंतरराष्ट्रीय प्रवास केला. तो आकडा आता अजूनच वाढला आहे.
ते म्हणतात, “पर्यटन कित्येक पटींनी वाढल्यानंतर आता काही गोष्टी टाळता येणार नाहीत. त्यामुळे हे नग्न नाचणारे, किंवा एखाद्या इस्लामिक पवित्र स्थळी दारू पिऊन जाणारे किंवा नाझी छळछावणीच्या पुढे नाचणारे टुरिस्ट आपल्याला पहायला मिळणार.”
गेल साल्झ ‘हाऊ कॅन आय हेल्प’ या पॉडकास्टच्या निवदेक आहेत. त्या आणखी एक मुद्दा मांडतात- ‘रिव्हेंज ट्रॅव्हलचा.’
त्या म्हणतात, “पॅनडेमिकच्या काळात लोक घरात अडकून पडले होते, अनेकांना नैराश्याने घेरलं होतं. त्याचा बदला म्हणून लोक आता पर्यटनाला जातात आणि तिथे जाताना त्यांची इच्छा असते की लॉकडाऊनच्या काळात मला जेजे करता आलं नाही ते मी सगळं इथे करणार. आता मी माझ्याच मर्जीने वागणार, का वाट्टेल ते करणार. लोक परदेशात जाताना आपण एका मोठ्या पार्टीला चाललोय अशा भावनेने जातात आणि मग त्यांचं वर्तन बेताल होतं.”
पर्यटक महत्त्वाच्या स्मारकांवर आपली नावं कोरत असतात याचंही साल्झ यांना आश्चर्य वाटत नाही. त्या म्हणतात, “असं केल्याने आपण अमर होऊ असं त्यांना वाटतं.”
पण पर्यटकांची मानसिकता कशीही असली तरी ते परदेशात जसे वागतात, तिथल्या लोकांना जसे वागवतात ते क्षम्य असू शकत नाही.
याचंच एक उदाहरण म्हणजे हवाई.
या अमेरिकन बेटावर काही काळापूर्वी अमेरिकेच्या इतिहासातल्या सर्वात मोठ्या वणव्याने हाहाकार माजवला होता. तिथल्या माऊई या भागात प्रचंड विध्वंस झाला. तरीही हवाईला येणाऱ्या पर्यटकांचे लोंढे थांबले नाहीत. त्या लोंढ्यांपैकी अनेक जण बेताल वागत होते, आणि अनेकांना तिथल्या स्थानिक लोकांना झालेल्या त्रासाशी काहीही देणंघेणं नव्हतं.
एका स्थानिक व्यक्तीने बीबीसीशी बोलताना सांगितलं, “तीन दिवसांपूर्वी आमची माणसं जिथे बुडून मेली, तिथे हे टुरिस्ट आज पोहतायत.”
हे जग किती सुंदर आहे हे तुम्हाला फक्त पर्यटनामधून कळू शकतं. पण मग ते सौदर्य टिकवण्यासाठी आपण कटीबद्ध असायला हवं, भले ते आपल्या स्वतःच्या गावात, राज्यात, देशात का नसेना.
याचा एक किस्सा नुकत्याच ओपनहायमर या चित्रपटात दाखवला आहे. अमेरिकेचे युद्धमंत्री हेन्री स्टिम्सन अणूबॉम्ब टाकायच्या शहरांच्या यादींमधून क्योटोचं नाव काढून टाकतात.
ते म्हणतात की, ही प्राचीन जपानची राजधानी होती आणि त्यात अनेक सुंदर मंदिरं, मॉनेस्ट्री आहेत. हे शहर अण्वस्त्र टाकून नष्ट करण्यासाठी नाही, खूप मौल्यवान वारसा आहे हा.
पुढे हे पात्रं म्हणतं की, ‘मला माहितेय कारण मी तिथे हनिमूनला गेलो होतो.’
चित्रपटात हे वाक्य विनोदी वाटत असलं तरी यात दिलेला संदेश गंभीर आहे – जे सुंदर, अद्भूत आणि आपल्याला आनंद देणारं आहे, ते आपण नष्ट करता कामा नये.
त्यामुळेच आता अनेक पर्यटनस्थळांनी पर्यटकांसाठी नवीन नियम काढले आहेत. बाली आणि आईसलँडसारखे देश आता त्यांच्या पर्यटकांना अधिकृतरित्या वचन द्यायला सांगतात की ते त्या देशांची संस्कृती, तिथलं वातावरण आणि निसर्ग यांचा आदर करतील.
पलाऊला भेट देणाऱ्या पर्यटकांना एका पर्यावरण प्रतिज्ञेवर सही करावी लागते. ऑस्ट्रेलियात जाणाऱ्या पर्यटकांना उलुरू पर्वतावर चढण्यास बंदी घातली आहे. हा पर्वत तिथल्या मुलनिवासींसाठी पवित्र आहे.
अॅमस्टरडॅमने नुकतीच ‘स्टे अवे’ ही मोहीम राबवली. हे मोहीम दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्या ब्रिटिशांना समर्पित होती.
सिगल म्हणतात की पर्यटकांचं वाढतं बेताल वागणं पाहाता अशा नियमांची गरज आहे. त्या इंस्टाग्रामवर प्रसिद्ध झालेल्या ‘इंस्टाग्राम व्हर्सेस रिएलिटी’ या ट्रेंडकडेही लक्ष वेधतात.
या ट्रेंडमध्ये लोक मुद्दाम एखाद्या पर्यटनस्थळाची खरी परिस्थिती दाखवतात, तिथे असणारी गर्दी, गोंधळ दाखवतात जे इंस्टाग्राम इंफ्लुएन्सर दाखवत नाहीत आणि मुद्दाम एडिट केलेले फोटो किंवा व्हीडिओ दाखवतात.
सिगल यांना वाटतं की अशा ट्रेंडची गरज आहे.
असं झालं तर आंतरराष्ट्रीय पर्यटन सुरक्षित होईल आणि स्थानिक लोकांचा, संस्कृतीचा सन्मान होईल.
(लेखक अमेरिकन ट्रॅव्हल रायटर्स सोसायटीचे माजी अध्यक्ष आहेत.)
हेही वाचलंत का?
बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.