You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सुरतमध्ये एकाच कुटुंबातील 7 जणांची आत्महत्या
गुजरातमधील सुरत जिल्ह्यात शनिवारी एकाच कुटुंबातील सात जणांनी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
स्थानिक पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, सुरतमधील पालनपूर जकात नाका परिसरातील सिद्धेश्वर अपार्टमेंटमधील सोलंकी कुटुंबातील सहा जणांनी विष पिऊन तर एकाने गळफास लावून आत्महत्या केली.
आत्महत्या केलेल्या या कुटुंबातील मृतांमध्ये कंत्राटदार मनीष सोलंकी (37 वर्षे), त्यांची पत्नी रिता सोलंकी (35), वडील कनुभाई (72), आई शोभना (70) आणि सहा ते तेरा वर्ष वयोगटातील दीक्षा, काव्या आणि कुशल सोलंकी या तीन मुलांचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, सोलंकी कुटुंबीयांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
पोलिसांना सोलंकी कुटुंबाच्या घरी चिठ्ठी ही सापडली.
आर्थिक तंगीमुळे सोलंकी कुटुंबीयांनी आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कुटुंबाचा फर्निचरचा व्यवसाय होता. त्यांच्या हाताखाली 30 ते 35 लोक कामाला होते.
या घटनेबाबत अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितलं की, चिठ्ठीतील मजकूर पाहता त्यांना कोणा एका व्यक्तीकडून त्यांना पैसे येणे होते मात्र ते पैसे मिळत नव्हते. मात्र चिठ्ठीत कोणाचेही नाव लिहिलेले नाही.
या घटनेची प्राथमिक माहिती गोळा केली असून याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सुरतचे डीसीपीएस राकेश बारोट यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं की, "या कुटुंबीयांनी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. यामागची कारणे आम्ही तपासत आहोत. मुख्यतः ही आर्थिक समस्या आहे. पुढील तपास सुरू आहे."
शनिवारी दुपारी दीड वाजता पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली होती.
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मनीष सोलंकी यांचे कामगार सकाळपासून त्यांच्याशी व त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते, मात्र कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी घरी जाऊन माहिती घेतली. सर्व कुटुंबियांनी आत्महत्या केल्याचे कळताच पोलिसांना बोलावण्यात आले.
(ही बातमी अपडेट केली जात आहे)
हे वाचलंत का?
बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)