हिटलरने ‘टायटॅनिक’वर स्वतःच सिनेमा बनवला आणि स्वतःच बंदी आणली, कारण...

    • Author, फर्नान्डो ड्यूरेट
    • Role, बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस

टायटॅनिक जहाज बुडाल्याचं सिनेमातलं दृश्य आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. त्या दुर्घटनेवर आधारित दिग्दर्शनक जेम्स कॅमरून यांचा सिनेमा 1997 मध्ये प्रदर्शित झाला होता. लियोनार्डो डी कॅप्रिओ आणि केट विंसलेट यांची मुख्य भूमिका असलेल्या टायटॅनिक सिनेमाने अनेक ऑस्कर पुरस्कार जिंकले होते.

परंतु समुद्रात 80 वर्षांपूर्वी झालेल्या दुर्घटनेवर नाझींची सत्ता असलेल्या जर्मनीनेही एक सिनेमा बनवला होता. पण तो सिनेमा काही मोजक्या लोकांनीच पाहिला.

या सिनेमाबद्दल आत्ता जाणून घेण्याचं कारण म्हणजे सिनेमात ‘टायटॅनिक’ म्हणून वापरण्यात आलेलं जहाज टायटॅनिकहून भयंकर दुर्घटनेत उद्ध्वस्त झालं होतं.

भव्य आणि सर्व लक्झरी सुविधा उपलब्ध असलेलं ते जहाज होतं ‘एसएस कॅप एर्कोना.’ 1942 च्या सुरुवातीपर्यंत या जहाजाला ‘क्वीन ऑफ साऊथ अटलँटीक’ असंही म्हटलं जात होतं.

बाल्टिक समुद्राच्या जर्मनीतील नौदलाच्या बेसमध्ये हे जहाज होतं. हिटलरच्या नौदलाने जहाजाचं बॅरेक केलं होतं. पण त्याच वर्षी या जहाजाला एका मोठ्या सिनेमात मोठी भूमिका मिळाली.

योगायोगाने जहाजाचा आकार आणि इतर बाबी 1912 साली समुद्रात बुडालेल्या ‘आरएमएस टायटॅनिक’शी मिळत्या जुळत्या होत्या. त्याचवेळी हिटलरच्या सरकारने टायटॅनिकच्या दुर्घटनेवर सिनेमा तयार करण्याचा निर्णय घेतला होता.

सिनेमासाठी पाण्यासारखा पैसा खर्च केला

खरंतर टायटॅनिक दुर्घटनेवर 1912 साली सिनेमा बनला होता. आपल्या पहिल्या समुद्रातील प्रवासादरम्यान टायटॅनिक जहाज उत्तर अटलँटीकच्या बर्फाळ परिसरात एका हिमखंडाशी धडकल्यानंतर बुडालं.

त्यामुळे 30 वर्षांनंतर या दुर्घटनेवर सिनेमा बनवणं मोठी गोष्ट नव्हती. पण हिटलर सरकारमधील प्रचारमंत्री जोसेफ गोबेल्स यांना टायटॅनिक दुर्घटनेबाबत एक अशी गोष्ट हाती लागली ज्यामध्ये एक नवीन पैलू उकरून काढण्यात आला.

या कहाणीमध्ये दाखवण्यात आलं की, ही भयंकर दुर्घटना ब्रिटन आणि अमेरिकेच्या ‘लालची’पणामुळे झाली.

‘नाझी टायटॅनिक’ नावाचं पुस्तक लिहिणारे अमेरिकेतील इतिहासकार प्राध्यापक रॉबर्ट वॉट्सन यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं,

गोबेल्स यांच्या देखरेखी अंतर्गत त्यांनी अनेक प्रपोगंड चालवणारे सिनेमे बनवले होते. यावेळी त्यांना नवीन काहीतरी करायचं होतं.”

प्राध्यापक वॉट्सन सांगतात, “1942 सालच्या दुसऱ्या महायुद्धादरम्यान जर्मनीला अनेक पातळ्यांवर पराभावाचा सामना करावा लागला. तेव्हाच गोएबल्सने विचार केला की दुष्प्रचाराचा आधार घेत काहीतरी मोठं केलं जाऊ शकतं.”

1942 साली ‘कासाब्लँका’ हा हॉलीवूडचा एक सिनेमा प्रदर्शित झाला होता. नाझी विरोधी नरेटिव्हवर आधारित हा रोमँटिक सिनेमा इतका लोकप्रिय झाला की हिटलरच्या अधिकाऱ्यांनाही आश्चर्य वाटलं. या सिनेमाच्या यशानंतर त्यांना आणखी एक प्रपोगंडा सिनेमा बनवण्यासाठी प्रेरणा मिळाली.

गोबेल्स यांचा हेतू होता की टायटॅनिक दुर्घटनेवर एक मोठा सिनेमा तयार करून पश्चिमी देशांना त्यांच्याच भाषेत उत्तर देणं.

प्राध्यापक वॉट्सन म्हणाले, “नाझी विरोधी कासाब्लँका सिनेमाला उत्तर देण्यासाठी तयार होणाऱ्या सिनेमासाठी गोबेल्स पूर्ण तयारी करत होते. यात जर्मनीने तयार केलेलं टायटॅनिक सारखं ‘ते’ जहाज होतं.”

“टायटॅनिक जहाज आणि एर्कोना या जहाजात केवळ एका चिमणीचा फरक होता. टायटॅनिकमध्ये चार चिमण्या होत्या. तर एर्कोनामध्ये तीन चिमण्या होत्या. बाकी दोन्ही जहाज एकसमान होते. परंतु सिनेमाच्या शूटींगदरम्यान एर्कोनाची चर्चा बनावटी जहाज अशी होऊ लागली,” असंही प्राध्यापक सांगतात.

त्यावेळी जर्मनी अनेक पातळ्यावर पराभवाचा सामना करत होतं. पण सिनेमासाठी गोबेल्स यांनी मोठी रक्कम जमा केली.

प्रा.वॉट्सन आपल्या पुस्तकात लिहितात, “त्यावेळी 40 लाख रुपयांचं बजेट होतं. आजच्या अमेरिकन डॉलरनुसार 18 कोटी रुपये. या रकमेनुसार हा सिनेमा जगातील सर्वांत महाग सिनेमांपैकी एक होता.”

या सिनेमात काम करण्यासाठी जर्मन सैनिकांना युद्धाच्या कार्यातून मुक्त करून आणलं गेलं. तसंच ‘सिबिल श्मिट’ यांच्यासारख्या त्यावेळच्या लोकप्रिय जर्मन अभिनेत्यांनाही सिनेमाशी जोडलं गेलं.

सिनेमा तयार होताना मात्र अनेक आरोप झाले. शूटींगदरम्यान सैनिकांनी महिला कलाकारांचं शोषण केल्याच्या बातम्या समोर आल्या.

तसंच भव्यदिव्य सेट पाहून मित्र राष्ट्र बॉम्बहल्ला करू शकतील अशीही शक्यता कायम होती.

याशिवाय सिनेमाचे दिग्दर्शन हरबर्ट सेल्पिन यांना अटक झाली. गोबेल्स यांनीच त्यांची चौकशी केली. त्यानंतर काही दिवसांनी हरबर्ट यांनी तुरुंगात फाशी लाऊन आत्महत्या केल्याचं समोर आलं.

मूळ कहाणीशी छेडछाड

सिनेमा अखेर तयार झाला पण तोपर्यंत सिनेमात अनेक बदल झाले होते. या सिनेमात टायटॅनिक जहाजाच्या दुर्घटनेमागे ब्रिटिश मालकांचा लालचीपणा असल्याचं दाखवलं होतं.

जेव्हा की खऱ्या कहाणीमध्ये जहाजावरील ज्या कर्मचाऱ्याने अटलांटिकच्या बर्फाळ प्रदेशात टायटॅनिकचा वेग कमी करण्यासाठी सांगितलं तो जर्मन होता.

सिनेमात शेवटी म्हटलं होतं की, “टायटॅनिक दुर्घटनेत 1500 लोकांचा मृत्यू झाला याचं कारण ब्रिटिशांची अधिकाधिक फायदा कमवण्याचं धोरण होतं.”

जर्मन इतिहासकार एलेक्स वी. लुनेने सांगतात, “नाझी दुष्प्रचाराचे संदेश असेलेले अनेक सिनेमे इथे बनवण्यात आले. त्यांचा टायटॅनिक सिनेमा हे दर्शवतो की त्यांच्या प्रपोगंडाबाबत त्यांना किती गैरसमज होता. त्यावेळी ते विचार करत होते की अशाप्रकारे लोकांना आपल्याकडे आकर्षित करून युद्ध जिंकू शकतील. त्यानंतर या सिनेमासोबत जे झालं ते आणखी रोमांचक आहे.”

एलेक्स सांगतात की, या सिनेमासाठी पुढाकार घेतलेले आणि त्यासाठी अमाप पैसा खर्च करणाऱ्या गोबेल्स यांनी सिनेमा पाहिल्यानंतर त्यांना धक्का बसला आणि त्यांनी हा सिनेमा जर्मनीत बॅन केला.

सिनेमा पाहिल्यानंतर नाझी अधिकाऱ्यांना वाटलं की, यात जहाज बुडाल्याचं दृश्य इतकं खरं वाटतं की हे पाहिल्यानंतर आधीच वायू हल्ल्यामुळे घाबरलेल्या जर्मनीतील लोकांमध्ये आणखी भीतीचं वातावरण पसरेल.

सिनेमाबाबत अधिक सांगताना एलेक्स म्हणाले, “आणखी एक समस्या होती. ती म्हणजे, टायटॅनिक जहाजाचे क्रू मेंबर्स ज्यापद्धतीने जर्मन अधिकारी आपल्या वरिष्ठांचे आदेश अनैतिक ठरवतात हा संदेश नाझी अधिकारी आपल्या सैनिकांना देऊ इच्छित नव्हते.”

सुरुवातीला हा सिनेमा जर्मनीने काबीज केलेल्या काही भागांतच दाखवला गेला. नाझी अर्काईव्ह्जकडून या सिनेमाचे प्रींट्स मिळवल्यानंतर 1949 नंतर हा सिनेमा दाखवला गेला असंही आपल्या पुस्तकात प्राध्यापक वॉट्सन लिहितात.

“राजकीय हेतू सोडला आणि तांत्रिकदृष्ट्या हा सिनेमा पाहिला तर तो उत्कृष्ट आहे. याचं एक उदाहरण म्हणजे1958 साली प्रदर्शित झालेला ब्रिटिश सिनेमा ‘अ नाइट टू रिमेंबर.’ या सिनेमातील अनेक दृश्य नाझींच्या टायटॅनिकमधून प्रेरित होती.”

सिनेमा फ्लॉप झाल्यानंतर त्यासाठी वापरण्यात आलेलं जहाज सुद्धा आधी होतं त्या जागेवर पुन्हा जायला हवं होतं. पण आगामी काळात जहाज अधिक चर्चेत आलं.

या जहाजाला युद्धादरम्यान रशियन सैन्यापासून वाचवण्यासाठी 25 हजार जर्मन सैनिक आणि नागरिकांना परत आणण्यासाठी वापरण्यात आलं. 1945 पर्यंत हे जहाज हजारो सैनिकांसाठी एक भयानंक तुरूंग होतं. नाझी अधिकाऱ्यांनी आपली चूक लपवण्यासाठी दुसऱ्या बॅरेकमधून हजारो कैद्यांना आणून इथे लपवलं होतं.

प्राध्यापक वॉट्सन यांच्यानुसार दोन्ही बाजूंच्या कागदपत्रांनुसार 3 मे 1945 रोजी ब्रिटिश लष्कराने जहाजावर बॉम्बहल्ला केला त्यावेळी तिथे पाच हजार लोक होते.

हा हल्ला एका गुप्त सूचनेनंतर केला होता. कॅप एर्कोना आणि जवळपासच्या दुसऱ्या जहाजांवर हिटलरच्या विशेष लष्करातील अधिकारी अटकेपासून वाचण्यासाठी पळून जाण्याच्या प्रयत्नात होते.

प्राध्यापक वॉट्सन सांगतात, “त्या पाच हजार लोकांपैकी केवळ 300 लोक वाचले. ही घटना जगातील सर्वाधिक भयंकर बॉम्बहल्ल्यांपैकी एक आहे.”

याच उद्देश्याने आणखी दोन जहाजांवर बॉम्बहल्ला केला गेला होता. यासगळ्या हल्ल्यात 7 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.”

याहून दु:खद गोष्ट म्हणजे कॅप एर्कोनावर करण्यात आलेला बॉम्बहल्ला जर्मनीने आत्मसमर्पण केल्यानंतर 4 दिवसांनी करण्यात आला होता.

यानंतर युरोपात युद्ध संपलं. आणि अशाप्रकारे कॅप एर्कोना जहाजावर मृत्यू झालेल्यांची संख्या प्रत्यक्षात टायटॅनिक दुर्घटनेतील मृतांच्या संख्येपेक्षा दुप्पट होती.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)