तणाव आणि नैराश्यात फरक काय? दोन्हींचं निदान कसं करावं?

    • Author, सिराज
    • Role, बीबीसी तामिळ

एखादी व्यक्ती जर असं म्हणत असेल की, "मला बरं वाटत नाहीये, मला ताप आहे, सतत खोकला, सर्दी होत आहे", तिला लगेचच डॉक्टरांना भेटण्याचा सल्ला दिला जातो. गोळ्या, औषधं, इंजेक्शन घेऊन बरं वाटेल असं सांगितलं जातं.

पण तीच व्यक्ती असं म्हणाली की, "मला उदास वाटतंय, माझा मूड खराब आहे", तर...? लोक किंवा समाज त्याला काय सल्ला देतील?

इंडियन जर्नल ऑफ सायकियाट्रीने मानसिक आरोग्य समस्यांबद्दल लोक काय विचार करतात यावर एक अभ्यास केला आहे.

यात 47 % लोकांना असं म्हटलंय की, मानसिक आजार असलेले लोक हिंसक असतात, तर 60 % लोक असं मानतात की मानसिक आजार असणारे लोक मनाने कमकुवत असतात.

आजच्या घडीला ताणतणाव किंवा नैराश्य यांसारखे शब्द सामान्य झालेत. पण याला कोणीही गंभीर मानसिक समस्या मानत नाही. शाळकरी मुलं असो वा एखादा निवृत्त अधिकारी, सगळ्यांसाठी हा प्रचलित शब्द झाला आहे.

बरेच लोक या समस्यांसाठी डॉक्टरांकडे जाणं टाळतात. एखादी सहल किंवा चित्रपट पाहून किंवा चांगलंचुंगलं खाऊन तणाव टाळता येतो असं त्यांचं म्हणणं असतं.

पण या गोष्टी करून तणाव टाळता येतो का? तणाव आणि नैराश्य यात नेमका फरक काय? मनोचिकित्सकाचा सल्ला कधी घ्यावा? या सर्व प्रश्नांची उत्तरं या लेखात पाहूया.

तणाव आणि नैराश्य

भारतातील तरुणांमध्ये मानसिक आरोग्याच्या समस्या वाढत असल्याचं एका अभ्यासातून दिसून आलं आहे. इंटरनॅशनल जर्नल ऑफ मेंटल हेल्थ सिस्टीम्सच्या अभ्यासानुसार, 13 ते 17 वर्षे वयोगटातील 7.3 % मुलांना मानसिक आरोग्याच्या समस्या आहेत.

यावर मानसोपचारतज्ज्ञ राजलक्ष्मी सांगतात की, "याचं मुख्य कारण तणाव आहे. या तणावाचं नैराश्यात रुपांतर होतं. तणाव हा तात्पुरता असतो आणि तो परिस्थितीनुसार विकसित होऊ शकतो. उदाहरणार्थ, परीक्षेत कमी गुण मिळणे, कार्यालयात अंतिम मुदतीत काम पूर्ण न होणे किंवा आर्थिक संकटात सापडणे म्हणजे तणाव. पण नैराश्य दीर्घकाळ असतं."

"नैराश्याच्या लक्षणांमध्ये झोप न लागणे, सतत दुःखाची भावना, कशातही रस नसणे, अपराधीपणाची भावना, निर्णय घेण्यात अडचण, आपले विचार व्यक्त करण्यास असमर्थता यांचा समावेश होतो. जर एखाद्याला दीर्घकाळापर्यंत हे होत असेल तर त्याने निश्चितपणे मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा."

"काही चाचण्यांद्वारे एखादा व्यक्ती नैराश्याच्या कोणत्या टप्प्यात आहे हे जाणून घेता येतं आणि डॉक्टरांकडून आवश्यक ती औषधे घेता येतात."

'मद्यपान, धूम्रपान, पर्यटन हा नैराश्यावरचा उपाय नाही'

बरेच लोक तणाव आणि नैराश्य या एकाच गोष्टीचा विचार करतात. परंतु तीव्र नैराश्य ही एक गंभीर समस्या आहे आणि अशा नैराश्यग्रस्त लोकांना वैद्यकीय मदतीची गरज असल्याचं राजलक्ष्मी सांगतात.

त्या म्हणतात, "मानसिक आरोग्याच्या समस्यांबद्दल लोक दहा वर्षांपूर्वीच्या तुलनेत अधिक जागरूक झाले आहेत. हल्ली अनेकजण डिप्रेशन हा शब्द वापरतात. काहीजण आपल्या जवळच्या लोकांशीही याबद्दल बोलतात."

पण मानसोपचार तज्ज्ञांकडे जाण्यास काहीजण अजूनही कचरतात. काही गंभीर समस्या असतील तरच डॉक्टरकडे जावं असं लोकांना वाटतं. दैनंदिन जीवनात तणाव किंवा नैराश्य येऊ शकतं.

काही लोकांना असं वाटतं की बिर्याणी खाल्ली, धुम्रपान किंवा मद्यपान केलं की बरं होता येतं. काहीजण एकटे किंवा मित्रांसोबत प्रवास करतात. पण हे तात्पुरते उपाय आहेत.

पण जेव्हा हाच तणाव नैराश्यात बदलतो तेव्हा हे तात्पुरते उपाय

देखील काम करणं बंद करतात आणि अशा परिस्थितीतही तुम्ही वैद्यकीय मदत घेत नसाल तर ते तुमच्यासाठी खूप धोकादायक आहे. त्यामुळे आपण जसं आरोग्याच्या समस्यांसाठी डॉक्टरांकडे जातो, अगदी तसंच तीव्र नैराश्याची लक्षणं आढळल्यास मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा असं मानसोपचारतज्ज्ञ राजलक्ष्मी सांगतात.

'नैराश्यामुळे आत्महत्येचे विचार येऊ शकतात'

किलपौकच्या सरकारी मनोरुग्णालयाच्या प्राध्यापक डॉ. पूर्णा चंद्रिका सांगतात, "दीर्घकालीन तणावामुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. जसं की, पचनाच्या विकारांपासून ते हृदयविकारापर्यंत."

त्या पुढे सांगतात, "तुम्ही नैराश्यात आहात म्हणून थेट आरोग्याच्या समस्या उद्भवतील असं नाही. पण नैराश्याने ग्रासलेले लोक नेहमी दुःखी असतात. त्यांना कशातही रस नसतो, त्यांना जेवू वाटत नाही, त्यांच्या सर्व भावना संपल्यात जमा असतात."

यामुळे अपराधीपणाची भावना निर्माण होऊ शकते. छोटीशी चूक झाली तरी ते स्वतःला दोष देतात. शेवटी त्यांच्या मनात आत्महत्येचे विचार येऊ लागतात.

आत्महत्या करणारे लोक रातोरात असा निर्णय घेत नाहीत. बरेच दिवस ते नैराश्याने त्रस्त असतात. पण ते कुणाला न सांगता किंवा सांगायला कुणी नसल्यामुळे हा निर्णय घेतात. त्यामुळे तणाव आणि नैराश्य या दोन्ही गोष्टी समजून घ्या आणि त्यासाठी मदत घ्या, असं डॉ. पूर्णा चंद्रिका सांगतात.

मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेण्यासही अनिच्छा

डॉ पूर्णा चंद्रिका म्हणतात, "आजकाल सेलिब्रिटी देखील त्यांच्या मानसिक आरोग्याच्या समस्यांबद्दल खुलेपणाने बोलतात. लोकांचा असा समज आहे की, पैसे असले की तुम्हाला तणाव किंवा नैराश्य येत नाही. पण हा समज पूर्णपणे चुकीचा आहे. नैराश्य कोणालाही येऊ शकतं."

त्या पुढे म्हणतात की, "त्यामुळे मानसिक आरोग्यासाठी उपचार घेणं ही एक सामान्य गोष्ट मानली पाहिजे."

यात धार्मिक अंधश्रद्धाही महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं ते म्हणतात.

"एखाद्याला मानसिक समस्या असल्यास त्याला मंदिर किंवा दर्ग्यात नेलं जातं. पण या गोष्टी केवळ शिक्षण आणि जागरूकतेने बदलता येतात."

योग आणि ध्यानधारणेची मदत होऊ शकते

अनेक लोक मानसिक आरोग्याच्या समस्यांसाठी योग आणि ध्यान करण्याची शिफारस करतात. याविषयी राजलक्ष्मी यांना विचारलं असता त्या सांगतात, "योग आणि ध्यानधारणा शरीर आणि मनासाठी चांगल्या गोष्टी आहेत, पण नैराश्यावर हा उपाय नक्कीच नाही."

"मी आधी म्हटल्याप्रमाणे, हा फक्त तात्पुरता उपाय आहे. जर तुम्ही वैद्यकीय मदत घेतली नाही आणि फक्त तात्पुरते उपाय शोधले तर नैराश्य आणखी वाढण्याची शक्यता असते."

राजलक्ष्मी सांगतात, तीव्र नैराश्याने ग्रस्त लोक जर मानसोपचार तज्ज्ञाला भेटले नाहीत तर ते त्यांची ओळख गमावण्याचा धोका असतो.

"एका ठराविक टप्प्यानंतर ते आत्महत्येचे विचार टाळू शकणार नाहीत. अशा तात्पुरत्या उपायांचा फायदा होणार नाही हे लक्षात घेऊन त्यांना चुकीचे निर्णय घेण्यास भाग पडेल."

मानसिक आरोग्याच्या उपचारासाठी जास्त खर्च येतो का?

मानसोपचार तज्ज्ञ हे महागडी गोष्ट आहे, ती केवळ उच्चभ्रू लोकांसाठी आहे असा एक समज आहे.

मात्र, सरकारी रुग्णालयांमध्ये मानसोपचारासाठी स्वतंत्र विभाग कार्यरत आहेत. सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये ही सुविधा असून लोक त्याचा लाभ घेऊ शकतात.

"माझ्या आजूबाजूला काहीही ठीक नाही, जग मला फसवतंय, माझं भविष्य अंधारात आहे असा विचार मनात येत राहतो. असे लोक जीवनातील अनेक चांगल्या संधी आणि लोक गमावतात.

"मानसिक आरोग्याच्या समस्यांमुळे आपल्याला वाटतं त्यापेक्षा जास्त नकारात्मक परिणाम होतात. त्यामुळे तुम्हाला किंवा तुमच्या प्रियजनांना अशा समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेण्यास अजिबात संकोच करू नका. त्या समस्यांमधून बाहेर आल्यानंतर तुम्हाला आयुष्य किती सुंदर आहे हे नक्कीच जाणवेल," असं डॉ. पूर्णा चंद्रिका सांगतात.