You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ही लक्षणं असतील तर बाळाच्या जन्माआधी किंवा जन्मानंतर महिलांना येतं नैराश्य : संशोधन
- Author, ऑरेलिया फॉस्टर
- Role, आरोग्य प्रतिनिधी, बीबीसी न्यूज
महिलांच्या आरोग्याविषयी अजूनही समाजात पुरेशी जागरुकता नाही. अनेक आजारांबद्दल खासकरून मानसिक आरोग्याबाबत उदासीनता दिसून येते. महिलांना मासिक पाळीशी निगडित समस्यांना तोंड द्यावे लागतं. यात अनेकदा नैराश्य येण्यासारखे आजार असतात. पेरिनेटल डिप्रेशन हा त्यातील एक आजार आहे.
ज्या महिलांना मासिक पाळीयेण्यापूर्वी अतिशय अस्वस्थ आणि अनुत्साही वाटतं त्यांना गरोदरपणात किंवा प्रसूतीनंतर 12 महिन्यांच्या आत नैराश्य येण्याची शक्यता असते, असं एका अभ्यासातून आढळून आलं आहे.
स्वीडनमधील 9 लाखांपेक्षा अधिक महिलांच्या माहितीवर हा अभ्यास आधारलेला आहे.
ज्या महिलांना गंभीर स्वरुपाच्या प्रीमेंस्ट्रअल सिंड्रोम (PMS) किंवा प्रीमेंस्ट्रअल डीसफोरिक डिसऑर्डर (PMDD) या मासिकपाळीपूर्वीच्या गंभीर विकारांची समस्या आहे त्यांना पेरिनेटल डिप्रेशन होण्याची शक्यता पाच पट अधिक असते.
पेरिनेटल डिप्रेशन म्हणजे गरोदरपणात आणि बाळाला जन्म दिल्यानंतरच्या काही आठवड्यात येणारं नैराश्य.
ज्यांना पेरिनेटल डिप्रेशनची समस्या आहे त्यांना PMS किंवा PMDDचा त्रास होण्याची शक्यता दुप्पट असते.
हा अभ्यास करणाऱ्या संशोधकांनी यावर अधिक संशोधन होण्याची आवश्यकता असल्याचे म्हटलं आहे.
स्टॉकहोम येथील कॅरोलिंस्का इन्स्टिट्यूटमधील प्रोफेसर डोंघाओ लू म्हणतात, याआधीच्या अभ्यासांमध्ये मासिक पाळीपूर्वीचे विकार आणि पोस्टनेटल डिप्रेशन यांचा एकमेकांशी असलेला संबंध यावर लक्ष केंद्रित करण्यात आलं होतं. हार्मोनमधील बदलांमुळे एकंदरितच दिसून येणारी लक्षणं हे त्यामागचं कारण होतं.
''मात्र मासिक पाळीपूर्वीचे विकार आणि अॅंटेनेटल डिप्रेशन (गरोदरपणातील नैराश्य) यातील संबंध देखील आम्ही दाखवून दिला. यातून हार्मोन बदलांचा संबंध अॅंटेनेटल डिप्रेशनच्या एक प्रकाराशी असण्याच्या शक्यतेकडे लक्ष वेधण्यात आलं आहे.''
''ज्या रुग्णांना मासिक पाळीपूर्वीच्या विकारांची समस्या आहे त्यांना गरोदरपणाआधीची काळजी घेताना पेरनेटल डिप्रेशनचे धोके आणि संभ्याव्य प्रतिबंधक उपायांबाबत माहिती दिली पाहिजे.''
आईसलॅंड विद्यापीठाबरोबर संयुक्तपणे हा अभ्यास करण्यात आला आहे. 2001-18 दरम्यानच्या आकडेवारीचा वापर करून एकाच वयाच्या, आरोग्य असणाऱ्या आणि मानसिक स्थितीची पार्श्वभूमी असणाऱ्या महिलांची तुलना यात करण्यात आली आहे.
ज्यांना पेरिनेटल डिप्रेशनची समस्या आहे अशांपैकी जवळपास 3 टक्क्यांना गर्भधारणेआधी प्रीमेंस्ट्रुअल विकारांचा त्रास होता. त्या तुलनेत इतरांमध्ये हे प्रमाण 0.6 टक्के होते.
- PMSमध्ये अनुत्साही वाटणं, निराश वाटणं, अस्वस्थ असणं आणि एकाग्रता कमी होणं यासारख्या समस्या उद्भवतात. 30 टक्क्यांपर्यत महिलांना या लक्षणांना तोंड द्यावे लागू शकतं.
- PMDDमध्येदेखील याच प्रकारच्या समस्या आढळतात फक्त त्यात लक्षणांची तीव्रता अधिक असते. 5-8 टक्के महिलांना हा त्रास होऊ शकतो. तर पेरिनेटल डिप्रेशनची समस्या 10-20 टक्क्यांमध्ये होऊ शकते.
या लक्षणांवर किंवा आजारावर होर्मोनचे संतुलन साधणारी औषधे, अॅंटी-डिप्रेसंट औषधे किंवा थेरपीच्या मदतीने उपचार केले जाऊ शकतात.
डॉ. पॉला ब्रिग्स या लिव्हरपूल महिला हॉस्पिटलमध्ये प्रजननाशी निगडित आरोग्य सल्लागार किंवा तज्ज्ञ आहेत. त्या वुमन्स हेल्थ कन्सर्न या समाजसेवी संस्थेच्या त्या अध्यक्षा आहेत. त्या म्हणतात या प्रकारच्या आजारांचा एकमेकांशी संबंध आहे आणि त्यासंदर्भात अधिक जागरुकतेची आवश्यकता आहे.
त्यांना आशा वाटते की PLOS मेडिसिन या जर्नलमधील अभ्यासातून या संदर्भातील जागरुकता वाढेल. विशेषकरून मदतनीस महिला तसेच इतर महिलांमध्ये या बाबतीत अधिक जागरुकता वाढेल आणि त्यातून महिलांच्या आरोग्यावर अधिक योग्यरित्या लक्ष देता येईल आणि मार्गदर्शन करता येईल.
'काही महिलांमध्ये पीएमडीडीची समस्या असते आणि त्याला जितक्या गांभीर्याने घ्यायला हवं तितक्या गांभीर्याने घेतलं जात नाही,' असं डॉ. ब्रिग्स म्हणतात.
'यासंदर्भात कोणतेही अधिकृत उपचार नाहीत मात्र या समस्येमुळे महिलांना उद्भवणारा त्रास कमी करण्यासाठीचे मार्ग नक्कीच आहेत.'
'मला वाटतं आत्महत्या करणं धोकादायक आहे.' असं त्या म्हणतात.
या समस्यांमधून मार्ग काढण्यासाठी मानसिक आरोग्यासंदर्भातील माहिती आणि मदत उपलब्ध आहे.