You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'मनू जर जिंकू शकते तर माझी मुलगी का नाही? माझ्या पदकामुळे आयांना हा विश्वास मिळेल’
- Author, विनायक दळवी
- Role, बीबीसी मराठीसाठी, पॅरिसमधून
मनू भाकर पॅरिस ऑलिंपिकमध्ये भारतीय महिलांचे प्रतिनिधित्व करते आहे.
यंदा आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने ऑलिम्पिकमधील पुरुष आणि महिलांचा सहभाग समान व्हावा यासाठी महिलांचा समावेश असणाऱ्या अनेक खेळांचा ऑलिंपिकमध्ये नव्याने समावेश केला.
परंपरा आणि संस्कृतीच्या पडद्याआड वावरणाऱ्या अनेक महिलांना या स्पर्धेत समाविष्ट केले. अनेक अरब, मुस्लीम आणि परंपरावादी देशांनी ऑलिंपिकमधील खेळांसाठी महिलांना नव्या विचार किरणांच्या ऑलिम्पिक प्रवाहात सामावण्याची मुभा दिली.
या नव्याने वाहणाऱ्या जागतिक क्रीडाविश्वाच्या विचारप्रवाहात मनू भाकर नव्याने जगाला भारताचीही ओळख करून देतेय.
एक अल्लड, अवखळ, किशोर वयीन परी टोकियो ऑलिंपिकमधील अपयशाने पूर्णपणे बदलून गेली. स्वत:चे म्हणणे निर्भिडपणे मांडणारी ती नव्या भारताची प्रतिनिधी आहे.
स्वभावाने अगदी मोकळी-ढाकळी. मनात आले ते बोलून टाकायचे. जबाबदारीने तिची ही ओळख बदलली.
भारताच्या नेमबाजीतील आव्हानाची ती सेनानी बनली. तिच्यातील नारिशक्तीला तिने ऑलिंपिक 10 मीटर्स आणि 25 मीटर्स पिस्टल प्रकारात गुंतविले.
वर्ल्ड चॅम्पियनशिप, एशियन मेडल्स आदी ‘सब कुछ झूट’ आहे. आपल्या गळ्यात ऑलिंपिक पदकच हवे, हे स्वप्न ती सतत पाहात राहिली.
म्हणूनच आता पॅरिसमध्ये गळ्यात दुसरे कांस्य पदक पडताच म्हणाली की, माझ्या स्वप्नपूर्तीचा हा तर छोटासा ‘तुकडा’ आहे. अजून बरंच काही मिळवायचं आहे.
मनूला देशातील युवतींसाठी आदर्श बनायचे आहे. ती सांगते, “माझ्या या पदकाने देशातील महिलांना आत्मविश्वास मिळेल. पुरुषांचे वर्चस्व असलेल्या या खेळातील माझे पदक महिलांमध्ये विश्वास निर्माण करील की आपणही जिंकू शकतो. आयांना त्यांच्या मुलीच्या अस्तित्वाबाबत त्यांच्या भवितव्याबाबत काळजी वाटणार नाही. कारण मनू जर जिंकू शकते तर माझी मुलगी का नाही, हा विश्वास या पदकामुळे मिळणार आहे.”
संघर्ष आणि आत्मविश्वासाची वाटचाल
मनूची कहाणी बरंच काही शिकवणारी आहे. तशी ती एक अल्लड, अवखळ युवती. जी कराटेपासून कबड्डीपर्यंत आणि घोडेस्वारीपासून टेनिसपर्यंत सर्वच खेळात रस घ्यायची.
लंडन ऑलिम्पिकमधील मेरी कोमच्या कांस्य पदकाने प्रेरित होऊन बॉक्सिंगमध्ये करिअर करण्याचा विचार करायला लागली. पण मनूचे करिअर नेमबाजीतच व्हायचे होते.
वडिल रामकृष्ण यांनी तिला शूटिंग रेंजवर नेले आणि जसपाल राणा यांना छायाछत्राखाली घेण्याची विनंती केली. रामकृष्ण यांची गुंतवणूक होती एक एअर पिस्तुल आणि आपल्या पोरीवरचा अमर्याद विश्वास. याच विश्वासाने ती शूटिंग रेंजवर कायम टिकून राहिली.
इतिहासाच्या सुवर्णक्षणांपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. महिला म्हणून अपेक्षित असणाऱ्या संकटांचा सामना ती करीतच होती. मात्र त्या संघर्षाने एका महिलेच्या जिद्दीची नवी ओळख जगाला दिली.
टोकियो ऑलिंपिकमधील अपयशाने ती खचून गेली नाही. मात्र अपयशी ठरणाऱ्यांच्या मागे हात धुवू लागणाऱ्यांचा ससेमिरा तिच्यापाठी लागला.
अपेक्षांच्या दडपणाखाली भले भले खेळाडू खचून जातात. मनूचे मात्र वेगळे आहे. दडपण तिला अधिक चांगली कामगिरी करण्यासाठी प्रवृत्त करते.
रविवारी कांस्य पदक जिंकल्यानंतर पत्रकारांशी बोलताना अगदी सहज बोलून गेली की, मला ‘प्रेशर’ आवडते, ते आव्हानच माझ्यासाठी मोटिव्हेशन असते. विचारांची स्पष्टता तिच्यात आहे.
स्वभाव बिनधास्त, तसेच वागणेही बिनधास्त. एखादी गोष्ट पटली नाही तर समोरच्याला तसं स्पष्टपणे सांगेल. यामुळेच या खेळात तिने अनेकांना दुखावले. स्वभावातला आक्रमकपणा खेळातही उतरला. मात्र वयपरत्वे ती बदलली.
टोकियो ऑलिंपिकच्यावेळची मनू पॅरिसमध्ये पॅरिसमध्ये राहिली नाही. काही वेळी गप्प राहायला ती शिकली. त्याचा परिणाम म्हणजे नेमबाजीतील गुणवत्तेला तिला न्याय देता आला.
नेमबाजीचे कौशल्य पदकात रुपांतरीत करता आले. स्वतंत्र भारतासाठी एकाच ऑलिंपिकमध्ये दोन पदके पटकाविणारी ती पहिलीच खेळाडू आहे.
तिच्या या पदकांचा रंग कोणताही असो, त्यांनी भारतातील संपूर्ण महिला वर्गाला नवा हुरूप दिला आहे.
मनू सांगते, “माझ्या यशानंतर या खेळासाठी मदतीचे ओघ सुरू झाले की अनेकांना आपल्या मुलींबद्दल “सेल्फ बिलिफ” वाटायला लागेल. माझ्या आधीच्या महिला नेमबाजांच्या वाट्याला आलेले कटू अनुभव आमच्या वेळेपर्यंत कमी कमी होत गेले. परिस्थिती हळूहळू सुधारत गेली. या पदकानंतर आणखी बदलेल.”
अंजली, सुमा ते मनू भाकर
एकेकाळी खेळात महिलांचा सहभाग नाममात्र असायचा. शिक्षण आणि संसार करीतच भारतीय महिला ऑलिंपिक पटलावर यायच्या. नेमबाजीचे क्षेत्राही या गोष्टीला अपवाद नव्हते.
आपल्याकडच्या गन्स इतरांच्या तुलनेत कमी दर्जाच्या असायच्या. मुख्य स्पर्धेसाठीही गोळ्यांचा पुरेसा साठा मिळायचा नाही तेथे सरावासाठी गोळ्या (बुलेट) उपलब्ध होणे दूरच.
2000 साली सिडनी ऑलिंपिकमध्ये 10 मीटर रायफल या प्रकाराची अंतिम फेरी गाठणारी अंजली भागवत ही पहिली भारतीय महिला ठरली होती. त्यानंतर तब्बल 24 वर्षांनी मनू भाकर अंतिम फेरीपर्यंत पोहोचली आणि तिने पदकही पटकावले.
24 वर्षापूर्वी अंतिम फेरीपर्यंत पोहोचलेल्या अंजली भागवत यांची व्यथा वेगळीच होती. अंजली सांगते, “सिडनीला ऑलिंपिकसाठी मला बरोबर बुलेट ही घेऊन जाता आल्या नव्हत्या. तेथे पोहोचल्यावर उधार उसनवारीने गोळ्या घ्याव्या लागल्या होत्या. अन्य स्पर्धकांनी मदत केल्यामुळेच ते शक्य झाले होते.”
पण आज परिस्थिती कमालीची बदलली आहे. अंजली भागवत यांच्या शब्दात “360 अंशात हा बदल झाला आहे.”
सर्व शूटर्सना, सरकारने हवी ती परदेशी साहित्ये, अत्याधुनिक गन्स बुलेट्सचा प्रचंड कोटा, परदेशी प्रशिक्षकांची सोय आणि पाहिजे तेवढे सरावाचे परदेश दौरे आणि स्पर्धांमधील सहभाग करण्याची संधी दिली आहे.
तसा शूटिंग हा खेळ खर्चिक. पण गेल्या वीस वर्षांत या खेळातील पदकांनी देशातली विचार करण्याची वृत्ती बदलली.
राज्यवर्धन राठोडच्या अथेन्स ऑलिंपिकमधल्या रौप्यपदकानं नेमबाजी या खेळाला नवी उर्जा दिली. नंतरच्या बिजिंग ऑलिंपिकमध्ये अभिनव बिंद्राचे सुवर्णपदक, भारतीयांच्या वैयक्तिक ऑलिंपिक सुवर्णपदकांचा दुष्काळ संपविणारे होते.
त्यानंतर आर्थिक आघाडीवर सरकार, पुरस्कर्ते आणि खाजगी संस्था नेमबाजीसाठी पुढे झाल्या. नेमबाजी या खेळावरचा भारतीयांचा विश्वास अधिक दृढ झाला जेव्हा लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताला नेमबाजीत चक्क दोन पदके मिळाली.
यशाची ही चढती कमान रिओ व टोकियो ऑलिंपिकमध्ये कायम राहिली नाही, पण ‘टारगेट ऑलिंपिक पोडियम स्कीम’ (TOPs) सारख्या योजनांनी नेमबाजांमधील उत्साह कायम ठेवला. हा कार्यक्रम राबविताना क्रीडा मंत्रालयानंही आर्थिक तरतूदींच्या बाबतीत कुठेही हात आखडता घेतला नाही.
स्थानिक पातळीवर आणि सुरुवातीला संघर्ष करावा लागत असला, तरी खेळाडू एकदा राष्ट्रीय स्तरावर पोहोचले की सरकारी पातळीवरची सर्व मदत त्यांना उपलब्ध होताना दिसते. राज्य सरकारांच्याही खेळाडूंना निधी उपलब्ध करून देण्यासाठी योजना आहेत.
राष्ट्रीय पातळीवर फक्त नेमबाजच नव्हे तर अन्य खेळाडूही जे काही मागतात ते तत्काळ उपलब्ध करून दिले जाते. त्यासाठी सरकारची यंत्रणा, क्रीडाखाते, स्पोर्ट्स अॅथोरिटी ऑफ इंडिया (साई) या आस्थापनांसोबतच ऑलिंपिक गोल्ड क्वेस्ट(ओजीक्यू) यासारख्या क्रीडाप्रेमींच्या सहकार्याने चालणाऱ्या संस्थांचे प्रचंड पाठबळ भारतीय खेळाडूंना उपलब्ध होते आहे.
याबाबत उदाहरणच द्यायचे तर ट्रॅप शूटिंगमधील राजेश्वरी व अन्य काही खेळाडूंसाठी अमेरिकेतील एका निष्णात डोळ्यांच्या डॉक्टरांची सेवा घेतली जाते. त्याची एकावेळची फि सुमारे लाखभर रुपये आहे.
सांगायचा मुद्दा हा की खेळाडूंच्या गरजेसाठी आता पैशांकडे पाहिले जात नाही. अशा या छोट्या छोट्या गोष्टींमुळेच खेळाडूंचा उत्साह वाढीला लागतो, असं अंजली सांगत होती. त्यांच्या काळात असे चोचले पुरवले जायचे नाहीत.
तेव्हा सरावासाठीचे अॅम्युनेशन आयात करतानाही अनेक समस्या उद्भवायच्या. आत्ता परदेशी गन्स, अत्याधुनिक शस्त्रे, अॅम्युनेशन (दारू गोळा) परदेशातून चाचणी करून आणून दिला जातो. त्यामुळेच चुका होण्याच्या शक्यता अतिशय कमी झाल्या आहेत.
पण वीस वर्षांपूर्वी शूटिंग खेळात असणाऱ्या महिला स्पर्धकांपुढची आव्हाने यापेक्षाही मोठी होती. अंजली भागवत यांच्यानंतर अंतिम फेरी गाठणाऱ्या सुमा शिरूर यांच्या व्यथाही जवळपास अशाच होत्या.
सुमा शिरूर म्हणत होत्या, “राज्य स्पर्धेत त्यावेळी पाच-सहा महिला स्पर्धक असायच्या आणि राष्ट्रीय स्पर्धेतही यापेक्षा थोडी अधिक संख्या.” पण अंजली आणि सुमा यांनी ऑलिंपिक अंतिम फेरीत प्रवेश केल्याच्या वार्तेने भारतातील महिलांना या खेळाविषयी कुतूहल वाटायला लागले.
ऑलिंपिक शूटिंगमध्ये महिलांची नावे झळकायला लागली आणि मग राष्ट्रीय स्पर्धांमधला सहभाग अचानक हजाराच्या संख्येने वाढायला लागला.
सुमा सांगतात, “आत्ता सारं काही सहज मिळते आहे; त्याकाळी काहीही नव्हते. स्वत:च्या पैशानेच बऱ्याच गोष्टी कराव्या लागायच्या. चांगल्या गन्स आणि अन्य साहित्यावर इम्पोर्ट ड्यूटी प्रचंड होतीच, शिवाय किंमतीही प्रचंड होत्या.
“बऱ्याचवेळा बुलेट्स नसल्यामुळे आम्ही सराव बुलेटशिवाय (ड्राय प्रॅक्टिस) करायचो. मी ऑलिंपिकला सहभागी व्हायच्यावेळी ऐन स्पर्धेच्या तोंडावर नव्या ‘इलेक्ट्रॉनिक टार्गेट’चे आगमन झाले. आम्हाला त्याची कल्पना नव्हती, सराव नव्हता. त्या ‘टार्गेट’ची किंमत त्याकाळी अडीच लाख रुपये होती. एवढे पैसे आणायचे कुठून?’
सुमा शिरूर यांच्यापुढचे दुसरे आव्हान होते, त्या एकीकडे संसार करीत होत्या. दोन वर्षांचा मुलगा होता. घर चालवायचे होते. तरीही हिकमतीने त्यांनी ऑलिम्पिक अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती.
भारतीय खेळांचं बदलतं रूप
आज परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. आज शूटर्सना काय मिळत नाही ते सांगा?
भारतीय संघात आलात की तुम्हाला खर्चासाठी खासगी पुरस्कर्ते तयारच असतात. सरकारकडून साहित्य, अत्याधुनिक बंदुका, पिस्तुल, सरावापासून स्पर्धेपर्यंत हव्या तेवढ्या बुलेट्स (अॅम्युनेशन) मिळत असते. प्रत्येक खेळाडूला दिवसाचा भत्ताही मिळत असतो.
‘खेलो इंडिया’ सारख्या योजनेमुळे युवा खेळाडूंना सारं काही मोफत मिळते. चांगल्या गन्स मिळतात, अॅम्युनेशन मिळते. अन्यही योजनांमुळे मदतीचे अनेक मार्ग उपलब्ध झाले आहेत.
अभिनव बिंद्राची संस्था भारतात खेळाला विज्ञानाची साथ मिळेल यासाठी प्रयत्न करते आहे. सुमा शिरूर आणि गगन नारंग अनेक माजी नेमबाज प्रशिक्षणाकडे वळले आहेत. नव्या पिढीचे नेमबाज घडवत आहेत.
सुमा शिरूर यांनी स्वत: जे भोगले ते इतर मुलींच्या वाट्याला येऊ नये म्हणून त्यांच्या ‘लक्ष्य अकॅडमीनं ‘ने 13 ते 19 वयोगटातील मुलींसाठी गो स्पोर्ट्स आणि इन्फोसिसच्या पाठिंब्यानं ‘गर्ल्स फॉर गोल्ड’ ही योजना सुरू केली.
थोडक्यात, भारतीय क्रीडाविश्वातलं वातावरण गेल्या वीस वर्षांत नेमबाजीला पोषक असंच बनत गेलं आहे. सुमा शिरूरना विश्वास आहे की भारताला आता महिलांकडूनच अधिक ऑलिम्पिक पदके मिळतील.
आता नेमबाजीत महिलांनाही पदके मिळतात हे मनु भाकरने सिद्ध केल्यामुळे भारतात नजिकच्या काळात क्रांती होईल अशी आशा वाटते.
ऑलिंपिकच्या पदकांची खरी किंमत काय? हा प्रश्न नेहमीच विचारला जातो. शेकड्याने पदके जिंकणाऱ्या अमेरिका, चीन, जपान, जर्मनी, ब्रिटन आदी देशांसाठी ही पदके क्रीडाक्षेत्रातील त्यांची क्षमता दाखवितात.
पण ऑलिंपिकमध्ये सहभागी होणाऱ्या दोनशेहून अधिक देशांपैकी पन्नासहून अधिक देशांना आजतागायत एकही पदक मिळाले नाही. तरीही हे देश सहभागी होत असतात. कारण ते आशावादी आहेत. भारतासाठी मिळणारी अल्प पदके संपूर्ण देशाला मोठा आत्मविश्वास देत असतात.
क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरच्या यशाचा परिणाम तमाम पालक वर्गावर झाला. अनेकांना ठाऊक होतं की आपला पाल्य दुसरा सचिन तेंडुलकर होणार नाही. तरीही मुलाला क्रिकेट खेळायला पाठविण्याची इच्छा त्यांच्यात सचिनच्या यशाने निर्माण केली.
मनू भाकरची दोन कांस्य पदके त्यापेक्षाही अधिक मोठा विश्वास स्त्री वर्गामध्ये निर्माण करणारी आहेत. भारतातील प्रत्येक आई-वडिलांच्या मनात या दोन पदकांनी आशेचे किरण निश्चितच निर्माण केले असेल.