'या' पुणेकर तरुणामुळे 3 न्यूज चॅनेल्सना दंड; 'लव्ह जिहाद' बद्दल त्याचं काय म्हणणं आहे?

    • Author, प्राची कुलकर्णी
    • Role, बीबीसी मराठी, पुणे

एखाद्या वृत्तवाहिनीवर केली जाणारी वक्तव्यं आक्षेपार्ह आहेत आणि त्याचा आशय लोकांमध्ये गैरसमज पसरवू शकतो का? तसंच याप्रकारच्या वक्तव्यांमधून जाणीवपूर्वक एखाद्या धर्माविरुद्ध किंवा एखाद्या व्यक्तीविरुद्ध बायस (भेदभाव) तयार केला जातो का? असे प्रश्न कधी तुम्हाला पडले आहेत का?

पुण्यातल्या 32 वर्षीय इंद्रजीत घोरपडे यांना असेच प्रश्न पडले. नुसते प्रश्नच नाही तर त्यावर कार्यवाही करण्याचं त्यांनी ठरवलं आणि थेट अशा पद्धतीनं वार्तांकन करणाऱ्या वृत्तवाहिन्यांविरोधात केस दाखल केली.

इंद्रजीत यांनी स्वत: ती केस लढली आणि या लढाईतून अशा वृत्तवाहिन्यांवर कारवाई करण्याचे आदेश निघाले.

इतकंच नाही तर या वृत्तवाहिन्यांना आक्षेपार्ह मजकूर आणि कार्यक्रम वेबसाईट आणि इतर समाज माध्यमांवरुन काढण्याचे आदेश देण्यात आले.

तक्रारी नेमक्या काय?

कोरोनाच्या साथीदरम्यान देशभरात लॉकडाऊन असताना पुणे-मुंबईसारख्या शहरांना 'कोव्हिड बॉम्ब' म्हणून संबोधलं जात होतं. या शहराकडे तसंच इथून आलेल्या माणसांकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलत होता.

इंद्रजीत घोरपडे यांना हे आक्षेपार्ह वाटलं आणि त्यांनी त्याविरोधात दाद मागायची ठरवली आणि त्यातून त्यांनी 'कोव्हिड बॉम्ब' असं संबोधन करण्याच्या विरोधात पहिली केस दाखल केली.

न्यूज ब्रॅाडकास्टिंग डिजिटल स्टॅण्डर्ड्स अथॅारिटीकडे ही केस दाखल करण्यात आली. यानंतर जेव्हा कधी त्यांना असा आक्षेपार्ह मजकूर, कार्यक्रम किंवा संज्ञा वापरलेली आढळायची, तेव्हा तेव्हा तो तक्रार दाखल करायचे. या प्रत्येक सुनावणीला ते स्वत: हजर राहून आपली बाजू मांडायचे.

श्रद्धा वालकर प्रकरण झालं तेव्हा अनेक वृत्तवाहिन्यांनी 'लव्ह जिहाद' या संज्ञेचा सातत्याने वापर केला. श्रद्धा वालकर प्रकरण क्रूर आणि भयंकर असलं तरी त्यातून एका विशिष्ट धार्मिक समुदायाला टार्गेट केलं जाणं हे इंद्रजीत यांना आक्षेपार्ह वाटलं. त्यातून त्यांनी याविरोधात तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला. न्यूज ब्रॅाडकास्टिंग डिजिटल स्टॅण्डर्ड्स अथॅारिटीकडे त्यांनी ही तक्रार दाखल केली.

याबाबतची आपली भूमिका स्पष्ट करताना इंद्रजीत म्हणाले, “लव्ह जिहाद ही संज्ञा आहे जी अनेक न्यूज चॅनल वापरतात. यातून असं सूचित करतात की, हजारो हिंदू मुलं आपलं नाव बदलून हजारो मुस्लीम मुलींना फसवतात आणि त्यांच्याशी लग्न करुन धर्म परिवर्तन करतात. ही माहिती खोटी आहे. गृह खात्याने स्वत: सांगितलं आहे की असं काही होत नाहीये. पण दोन वेगवेगळ्या समाजांमध्ये द्वेष पसरवण्यासाठी न्यूज माध्यमं आणि बरेच नेते हे 'लव्ह जिहाद' हा शब्द वापरत असतात.

"श्रद्धा वालकरचा खून झाला त्यावेळी पुन्हा ही माहिती पसरवण्याला सुरुवात केली. त्यावेळी मी तीन वृत्तवाहिन्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. न्यूज ब्रॅाडकास्टिंग असोसिएशनकडे तक्रार दिली."

हे का केलं या प्रश्नावर इंद्रजीत सांगतात , "याला एक असं काही कारण नाही. मी पूर्वीपासून अशा तक्रारी करत आलो आहे. पुणे मुंबईला कोव्हिड पसरू नये यासाठी सगळे प्रयत्न करत होते. मात्र त्यावेळी राष्ट्रीय वृत्तवाहिन्या या शहरांना कोरोना बॅाम्ब म्हणत होत्या. एकप्रकारे तेव्हा आपल्या इथल्या कामगारांना, बाहेरून आलेल्या लोकांना टार्गेट करण्याचा प्रकार होता. तेव्हा मी तक्रार दाखल केली होती.

"या प्रकरणात मला केस फाईल करावी वाटली कारण पूर्वी इतकं उघडपणे आपल्याला दिसत नव्हतं की मुस्लिम समाजाविरोधात द्वेष पसरवला जातो आहे. पण सध्या मात्र विविध माध्यमातून वृत्तवाहिन्यांवर हे होताना दिसत आहे. कधी मुस्लिम जेवणात थुंकण्याचा दावा करणारा व्हीडिओ असेल तर कधी ते पूर्ण भारतावर कब्जा करणार असल्याचे दावे, हे असे व्हीडिओ द्वेष पसरवण्यासाठी वापरले जातात. माझ्या मनात असलेल्या सहानुभूतीमुळे आणि जागरुक नागरिक म्हणून मला तक्रार करावी असं वाटलं.”

समलिंगी व्यक्तींबाबतही दाखल केली होती तक्रार

इंद्रजीत यांनी या प्रकरणासोबतच समलिंगी संबंधांबाबत देखील जी वक्तव्य केली गेली त्याविरोधात दाद मागितली होती.

तेव्हा दाखल केलेल्या तक्रारीबाबत ते सांगतात, मी पूर्वी एका वृत्तवाहिनीविरोधात तक्रार केली होती. त्या वृत्तवाहिनीने एका नॅचरोपॅथीच्या डॅाक्टरांना बोलावले होते. ते असा दावा करत होते की, "नॅचरोपॅथीच्या माध्यमातून मी एखाद्या व्यक्तीचे सेक्शुअल ओरिएंटेशन बदलू शकतो. हे खोटं आहे असं होऊ शकत नाही. मेडिकल असोसिएशनशिवाय अनेक आंतरराष्ट्रीय संघटनांनीही हे स्पष्ट केले आहे की, असं सेक्शुअल ओरिएंटेशन बदलता येत नाही. त्यामुळे मी त्या वृत्तवाहिनी विरोधात केस केली होती."

"त्या वृृत्तवाहिनीेने ऐकलं नव्हतं. मग मी दिल्ली उच्च न्यायालयापर्यंत गेलो होतो. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने मला माझी बाजू मांडण्याची संधी दिली होती. त्या चॅनलला हा कार्यक्रम डिलीट करुन अॅानलाईन माफीनामा द्यायला लावला होता."

न्यूज ब्रॅाडकास्टर्स आणि डिजिटल असोसिएशन नेमकं काय करतं?

न्यूज ब्रॅाडकास्टर्स आणि डिजिटल असोसिएशन ही खासगी वृत्तवाहिन्या आणि डिजिटल ब्रॅाडकास्टर्स यांच्याशी संबंधित आणि त्यांच्याकडूनच दिल्या जाणाऱ्या निधीच्या माध्यमातून चालणारी संघटना आहे.

2007 मध्ये या संघटनेची स्थापना झाली. सध्या 27 संस्थांच्या 125 वृत्तवाहिन्या या संघटनेचा भाग आहेत. या संघटनेअंतर्गत न्यूज ब्रॅ़ाडकास्टिंग अॅण्ड डिजिटल अथॅारिटीची स्थापना करण्यात आली आहे. एखाद्या वृत्तवाहिनीविरोधात काही तक्रार आली की, त्याची सुनावणी घेऊन त्यावर ही अथॅारिटी निकाल देते.

निवृत्त न्यायाधीश हे या अथॅारिटीचे अध्यक्ष म्हणून काम बघतात. याशिवाय यात चार अशा सदस्यांची नियुक्ती केली जाते जे विविध क्षेत्रातील तज्ञ आहेत. त्याच बरोबर वृत्तवाहिन्यांसोबत काम करणारे चार संपादक देखील याचा भाग असतात.

वृत्तवाहिन्या निष्पक्षपणे कोणता कार्यक्रम दाखवत नसतील, तसेच त्यांनी काही आक्षेपार्ह मजकूर दाखवला आहे का? याबाबतच्या तक्रारींची सुनावणी करणे हे या अथॅारिटीचे काम.

आक्षेपार्ह मजकुरासह कार्यक्रमाची माहिती आणि पुराव्यांसह हिंदी किंवा इंग्रजीमध्ये या अथॅारिटीकडे तक्रार दाखल करता येते.

या प्रक्रियेविषयी सांगताना इंद्रजित म्हतात, "आधी आपल्याला त्या संबंधित वृत्तवाहिनीकडे तक्रार करावी लागते. त्यानंतर त्यांचा प्रतिसाद आल्यावर आपल्याला न्यूज अथॅारिटीकडे तक्रार करावी लागते आणि स्पष्टीकरण द्यावं लागतं की, संबंधित वृत्तवाहिनीचा प्रतिसाद आपल्याला का अमान्य आहे. त्यानंतर सुनावणी होते. त्यावेळी आपल्याला आपला आक्षेप नेमका काय आहे हे मांडण्याची पुन्हा संधी मिळते.

"त्यानंतर त्यांची ऑर्डर येते. या प्रक्रियेला सहासात महिने लागतात. त्यांना जे अधिकार आहेत त्यानुसार हे कार्यक्रम ऑनलाईन उपलब्ध असतील तर ते डिलीट करायला सांगितलं जाऊ शकतं. तसंच संबंधित वृत्तवाहिनीला एक लाख रुपयांपर्यंतचा दंड देखील केला जाऊ शकतो. याशिवाय तिसरा अधिकार त्यांना आहे, तो म्हणजे एखाद्या चॅनलचे लायसन्स रद्द करा, असं ते थेट प्रसारण खात्याला सांगू शकतात."

आदेशात काय म्हटलं आहे?

या प्रकरणांची सुनावणी जेव्हा होते तेव्हा तुम्ही स्वत: देखील तुमची बाजू मांडू शकता. इंद्रजीत यांनी आजपर्यंत दाखल केलेल्या सर्वच तक्रारींबाबत स्वत: आपली बाजू मांडली आहे.

समोर वृत्तवाहिन्यांचे कायदेशीर सल्लागार असताना त्यांच्यासमोर आपली बाजू स्पष्ट करत पुरावे सादर करत इंद्रजीत यांनी आपल्या बाजूने मिळवलेला निकाल यामुळेच महत्वाचा ठरतो.

इंद्रजीत सांगतात, “आता तीन निकाल आले आहेत. एका प्रकरणात समलिंगी समाजाविरोधात गैरसमज पसरवत होते. दुसरं प्रकरण होतं श्रद्धा वालकर बाबतचं ज्यात मुस्लीम बांधवांना बदनाम करण्याचा प्रयत्न होता.

तिसऱ्या प्रकरणात ज्या परिसरांमध्ये मुस्लीम परिवार राहतात ते भाग हे भारत-पाकिस्तान बॉर्डर आहे, त्या भागात जाता येणार नाही आणि मुस्लीम समाजाकडून भारतावर कब्जा केला जाणार आहे अशा पद्धतीच्या बातम्या दाखवल्या जात होत्या. या तीनही प्रकरणात अॅार्डर आल्या आहेत.

"यात एका वृत्तवाहिनीला 1 लाख रुपयांचा दंड झाला आहे. तसंच दुसऱ्या चॅनलला 50 हजारांचा दंड आकारण्यात आला आहे, तर तिसऱ्या प्रकरणात 75 हजारांचा दंड करण्यात आला आहे.

तसेच या तिन्ही वृत्तवाहिन्यांना हे कार्यक्रम त्यांच्या सर्व ऑनलाईन प्लॅटफॅार्मवरुन काढून टाकायला सांगण्यात आले आहेत.

"पण, यातली सर्वांत मोठी आणि महत्वाची बाब मला ही वाटते की, या अथॅारिटीने आणि त्यातही अध्यक्षपदी असणाऱ्या निवृत्त न्यायाधीशांनी हे स्पष्ट सांगितलं आहे की, प्रत्येक आंतरधर्मीय संबंध हे फसवणूक करुन होत नाहीत.

प्रत्येक संबंधामध्ये मुलीचा धर्म बदलण्याचा त्यांचा उद्देश नसतो. त्यामुळे लव्ह जिहाद सारख्या संज्ञा विचारपूर्वक वापरल्या जायला हव्यात,” इंद्रजीत पुढे सांगतात.

अर्थात मुख्य प्रवाहातील सर्व वृत्तवाहिन्या या संघटनेचा भाग नाहीत. तसंच समाजमाध्यमांवरुन पसरवल्या जाणाऱ्या अशा पद्धतीच्या पोस्टबाबत अद्यापही पूर्णपणे असा कंटेट काढण्याची यंत्रणा नसल्याचं मत इंद्रजीत नोंदवतात.