You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
एखादा फोटो खरा की खोटा, असं ओळखा
- Author, जान्हवी मुळे
- Role, बीबीसी प्रतिनिधी
एक आई आणि तिची तीन मुलं. म्हटलं तर साधासा वाटणारा फोटो.पण ब्रिटनची युवराज्ञी म्हणजे प्रिन्सेस ऑफ वेल्स कॅथरीननं पोस्ट केलेल्या या फोटोवरून सध्या वादळ उठलं आहे आणि त्या सोबत अमेरिका आणि भारतातल्या निवडणुकांचीही चर्चा होते आहे.
कारण हे फोटो मॅनिप्युलेट केल्याचं म्हणजे फोटोमध्ये काही फेरफार केल्याचं समोर आलं आहे.
नेमके या फोटोत काय बदल केले होते, त्याचा निवडणुकांशी काय संबंध आणि फेक फोटो किंवा बदल केलेले फोटो कसे ओळखायचे, जाणून घेऊयात.
10 मार्च 2024 रोजी, युकेमधल्या मदर्स डेच्या निमित्तानं युवराज्ञींनी हा फोटो जारी केला होता. त्यावर बरीच चर्चा झाली, कारण कॅथरीन गेल्या काही आठवड्यांत लोकांसमोर आल्या नव्हत्या.
त्यांच्यावर जानेवारी महिन्यांत एक शस्त्रक्रिया झाली होती आणि तेव्हापासून त्यांनी राजपरिवाराकडून अपेक्षित कामांतून रजा घेतली आहे.
साहजिकच त्यांच्या तब्येतीविषयी जाणून घेण्यात ब्रिटनच्या लोकांना रस आहे. पण हा फोटो प्रकाशित झाला आणि अवघ्या काही तासांत त्यातल्या काही गोष्टींवर लोकांनी प्रश्नचिन्ह उभं केलं.
कॅथरीन यांच्या जॅकेटची चेन, राजकुमारी शार्लोट यांच्या स्वेटरची बाही, मागच्या झाडाच्या पानांचा रंग इत्यादी गोष्टींत विसंगती दिसली. फोटोत कॅथरीन यांचा उजवा हातही काहीसा अस्पष्ट होता.
ही विसंगती समोर येताच एपी, एएफपी, रॉयटर्स, गेट्टी या जगभरातल्या प्रमुख वृत्तसेवांनी हा फोटो किल केला म्हणजे मागे घेतला.
त्यावर मग जगभरातल्या सोशल मीडियातही बरीच चर्चा झाली. मग स्वतः कॅथरीन यांनीही आपण फोटोमध्ये काही बदल केल्याचं मान्य करत माफी मागितली आणि फोटो डिलीट केला.
एका उच्चपदावरील व्यक्तीनं फोटो मॅनिप्युलेट करणं आणि तो सोशल मीडियावर अधिकृत फोटो म्हणून पोस्ट करणं योग्य आहे का, असा प्रश्न त्यावर आता विचारला जातो आहे. कारण मग एखाद्या नेत्यानं असा कुठला खोटा फोटो टाकला, तर त्यातून चुकीची माहिती पसरू शकते.
असे खोटे फोटो आणि चुकीची माहिती ही अनेक देशांत मोठी समस्या बनली आहे. अमेरिकेतही सध्या खोट्या, मॅनिप्युलेटेड आणि AI वापरून तयार केलेल्या फोटोंविषयी चर्चा होते आहे.
याचं कारण म्हणजे यंदा अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका होतायत. त्यात विद्यमान राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन आणि माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्यात पुन्हा लढत होण्याची चिन्हं आहेत.
या दोघांचेही फेक (खोटे) फोटो व्हायरल होत असून ते मतदारांमध्ये गैरसमज पसरवू शकतात, याविषयी निरीक्षकांनी चिंताही व्यक्त केली आहे.
असे तयार केलेले किंवा बदल केलेले फोटो एखाद्या व्यक्तीच्या प्रतिमेला, त्या व्यक्तीच्यावरच्या लोकांच्या विश्वासाला धक्का पोहोचवू शकतात.
शिवाय चुकीच्या फोटोंमुळे किंवा फोटोतून चुकीचा अर्थ निघत असल्याने द्वेष आणि जातीय तणावातही भर पडू शकते, हे भारतातही अलीकडे मणिपूर आणि पश्चिम बंगालमधल्या दंगलींमध्ये दिसून आलं होतं.
आता निवडणुकांच्या प्रचाराच्या काळात भारतातही फेक न्यूजबरोबरच अशा फेक फोटोंचा आणि धोका आणखी वाढण्याची शक्यता आहे.
पण मग फोटो खरा की खोटा हे कसं ओळखायचं?
फोटो खरा की खोटा, हे कसं ओळखायचं?
सर्वांत पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठलाही फोटो पाहिल्यावर तुमच्या मनात शंकेची पाल चुकचुकली, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.
फोटोतली एखादी गोष्ट खटकली तर तो पुन्हा नीट पाहा, बारकाईनं तपासा. अनेकदा फोटोवर झूम केलं, तर त्यातल्या चुका स्पष्ट दिसू लागतात.
उदाहरणार्थ, वर्ल्ड कपच्या वेळी व्हायरल झालेल्या एका फोटोत ग्लेन मॅक्सवेल सचिनला नमस्कार करताना दिसतो.
पण झूम करून पाहिलं तर सचिनचा हात मॅक्सवेलच्या पाठीवर नसल्याचं आणि काहीसा विचित्र पद्धतीनं ठेवलेला असल्याचं लक्षात येईल, तसंच या फोटोतल्या इतर चुकाही स्पष्ट दिसतात
AI वापरून तयार केलेल्या फोटोतही अशा चुका असतात, एखादा शरिराचा भाग कापला गेल्यासारखा वाटतो.
कुठल्याही अशक्य वाटणाऱ्या फोटोमध्ये प्रकाश कसा दिसतोय, सावल्या कशा दिसतायत याकडेही जरूर लक्ष द्या. लोकांचे डोळे, प्रतिबिंब, रंगातली विसंगती या गोष्टी बारकाईनं तपासून पाहा.
फोटोचं लोकेशन आणि बॅकग्राऊंड म्हणजे फोटो कुठे काढला आहे, त्यात मागे काय दिसतंय यात काही विसंगती आहे का, हे तपासून पाहा. फोटोत काही लिहिलं असेल तर ते तपासून पाहा.
फोटोतील वस्तूंचा आकार तपासून पाहा. जिथे फोटो काढला आहे, त्या घटनेचे इतर फोटो तपासून पाहा.
काहीवेळा एखादा फोटो जी भावना दाखवतो, ती विसंगत असू शकते.
जसं की दिल्लीत पैलवानांच्या आंदोलनादरम्यानचा हा फोटो, ज्यात पोलिसांनी ताब्यात घेतल्यावरही ते हसताना दिसतात. प्रत्यक्षात मूळ सेल्फीमध्ये त्यांच्या चेहऱ्यावर गंभीर भाव आहेत.
एखाद्या फोटोविषयी कुठलीही शंका आली, तर त्या फोटोची मूळ प्रत किंवा स्रोत शोधा. त्यासाठी रिव्हर्स इमेज सर्चची मदत घेता येते.
गुगल, टिन आय, यॅन्डेक्स यासारख्या सर्च इंजिनवर संबंधित फोटो अपलोड करून सर्च केल्यावर त्या फोटोसारखे इतर फोटो, त्याच्याशी निगडीत लिंक्स येतात. त्या तपासल्यावर फोटो खरा आहे की खोटा हे कळू शकतं.
एखादा फोटो डाऊनलोड केला असेल तर त्याचा मेटाडेटाही तुम्ही तपासून पाहू शकता. त्यात हा फोटो कोणी काढला आहे, कुठे काढला आहे कधी काढला आहे अशी फोटोशी संबंधित माहिती सापडू शकते.
मेटाडेटा कसा शोधायचा? विंडोज कंप्युटर वापरत असाल, तर संबंधित फोटोवर राईट क्लिक करा. प्रॉपर्टीजमध्ये जा आणि डिटेल्स टॅब तपासा. मॅकबुक वापरत असाल तर फोटो उघडा, टूल्समध्ये जा आणि शो इन्स्पेक्टरवर क्लिक करा.
शेवटी सर्वांत महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे आलेले फोटो, विशेषतः संवेदनशील फोटो तपासल्याशिवाय तसेच फॉरवर्ड करू नका.