You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'What's Wrong With India?' भारत विरोधी ट्रेंड मोदी सरकारने का वापरला?
मंगळवारी(12 मार्च) एक्स म्हणजेच पूर्वीच्या ट्विटरवर 'What's Wrong With India?' हा ट्रेंड सुरु होता. सुरुवातीला या ट्रेंडचा वापर करून भारतावर टीका करणाऱ्या पोस्ट केल्या जात होत्या.
पण त्यानंतर मात्र भारतीय नेटकऱ्यांनी याच ट्रेंडचा वापर करून भारताच्या समर्थनार्थ मजकूर लिहायला, इतर देशांमध्ये घडणाऱ्या गुन्ह्यांचा प्रचार करायला सुरूवात केली.
सोशल मीडियाच्या या ट्रेंडचा वापर करण्यात भारत सरकारही मागे राहिलं नाही.
भारताच्या अर्थव्यवस्थेची प्रगती दाखवणाऱ्या मथळ्यांबाबतची पोस्ट करून भारत सरकारनेही या ट्रेंडच्या लाटेवर स्वार होत स्वतःचा प्रचार करण्याची संधी गमावली नाही.
माय गव्हरमेंट इंडिया या ट्विटर हँडलवरून वेगवेगळ्या वृत्तसंस्थांच्या बातम्यांच्या हेडिंगचा आधार घेत सरकारने पोस्ट टाकली आहे.
पण 'What's Wrong With India?' हा ट्रेंड नेमका कधी सुरु झाला? सुरुवातीला या शब्दांचा वापर करून केल्या जाणाऱ्या पोस्ट कशा होत्या आणि नंतर सोशल मीडिया अल्गोरिदमच्या साहाय्याने याच ट्रेंडचा वापर कसा केला गेला? आणि एक्सवर धुमाकूळ घातलेल्या या ट्रेंडचा वापर करून कोणकोणत्या पोस्ट केल्या जात आहेत? हे आपण समजून घेऊया.
'What's Wrong With India?' ची सुरुवात कशी झाली?
2 मार्चला एका स्पॅनिश तरुणीने इंस्टाग्रामवर पोस्ट करून झारखंडमध्ये तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची माहिती दिली. त्यानंतर या प्रकरणात चार आरोपींना अटक केली गेली.
झारखंडच्या दुमका जिल्ह्यातील कुरमाहाट (कुंजी) येथे घडलेल्या या दुर्दैवी घटनेनंतर हा ट्रेंड सुरु झाला होता. सोशल मीडियावर मोठा संताप व्यक्त केला जाऊ लागला होता.
अनेक परदेशी पर्यटकांनी भारतात आलेले वाईट अनुभव एक्सवर पोस्ट केले होते.
काही लोकांनी मात्र चुकीच्या पद्धतीने, भारताविरुद्ध प्रचार करण्यासाठी 'What's Wrong With India?' हा ट्रेंड वापरायला सुरुवात केली. यामध्ये इतर देशांचे व्हीडिओ भारतातीलच असल्याचा दावा करण्यात आला आणि भारताची एक नकारात्मक प्रतिमा उभारण्याचा प्रयत्न केला गेला. बातम्यांचे स्क्रिनशॉट पोस्ट करून हा ट्रेंड चालवला जात होता.
या प्रकारानंतर काही भारतीयांनी ट्विटरवर आरोप करायला सुरुवात केली. त्यांचं असं म्हणणं होतं एक्स 'What's Wrong With India?' चा वापर करुन केलेल्या पोस्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवत आहे.
ट्विटरने अल्गोरिदमचा वापर करून भारताची नकारात्मक प्रतिमा उभी केल्याचा आरोपही काही जणांनी केला.
12 मार्चला मात्र हे चित्र बदललं. ट्विटरवर हा ट्रेंड पुन्हा एकदा सुरु झाला. 24 तासात तब्बल 2.5 लाख पोस्ट करण्यात आल्या.
मात्र या पोस्ट करताना भारतात कोणकोणत्या चांगल्या गोष्टी आहेत, इतर देशांमध्ये कसे गुन्हे घडतात हे सांगणारे व्हीडिओ आणि मजकूर पोस्ट केला जाऊ लागला.
भारताविरोधातला मजकूर लिहिण्यासाठी वापरल्या गेलेल्या ट्रेंडचा उलट वापर करून भारतीय नेटकऱ्यांनी भारताच्या प्रचारासाठी हाच ट्रेंड वापरला.
अशीच एक मजेशीर पोस्ट आपण पाहूया
हा ट्रेंड वापरून पोस्ट केल्यामुळे खूप कमी फॉलोअर्स असणाऱ्या लोकांनी केलेल्या पोस्टही खूप व्हायरल झाल्या. यापैकी काही पोस्ट आक्षेपार्ह होत्या.
असं असलं तरी सोशल मीडियावर तयार केले जाणारे ट्रेंड्स आणि आता त्या ट्रेंड्सचा वापर करून केला जाणारा प्रचार हा अभ्यासाचा विषय आहे.
डिजिटल जगात सुप्त प्रचार करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने सोशल मीडियाचा कसा वापर केला जातो? याबाबत माहीत असणं आणि अशा ट्रेंड्सचा वापर करता येणं हे एक नवीन कौशल्य बनलं आहे, हे मात्र नक्की.