एक चोरी ज्यामुळे 15 वर्षांपूर्वीची मृत प्रेमिका जिवंत झाली आणि थेट तुरूंगात पोहोचली...

फोटो स्रोत, JAYESH CHAUHAN
- Author, भार्गव पारीख
- Role, बीबीसी गुजरातीसाठी
बनासकांठा जिल्ह्यातल्या थारा इथे 20 लाखांची चोरी झाली. पोलिसांनी मुख्य सूत्रधार विजुभा राठोडला अटक केली. त्याने चोरी केल्याची कबुली दिली.
या चोरीबरोबरच पोलिसांनी 15 वर्षांपूर्वी झालेल्या हत्येचा उलगडा केला.
बनासकाठा पोलीस अधीक्षक प्रदीप सेजूल यांनी बीबीसीला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितलं की, 20 लाखांची चोरी करणारा माणूस आमच्या हातात आला तेव्हा सराईत गुन्हेगाराप्रमाणे तो गुन्हा कबूल करायला तयार नव्हता.
त्याच्या घरी तपासासासाठी पोहोचलो तेव्हा त्याने सगळं सांगितलं. 20 लाखांच्या चोरीचा उलगडा केला. बाकी गुन्ह्यांविषयीही सांगितलं.
जेव्हा त्याच्या पत्नीच्या चौकशीची वेळ आली, तेव्हा त्याने चक्रावून टाकणारा एक गुन्हा कबूल केला.
एसपी प्रदीप सेजूल यांनी बीबीसी गुजरातीशी बोलताना सांगितलं की, "आम्हाला शिहोरीमधल्या खिमना गावातून वीस लाख रूपयांच्या चोरीची तक्रार मिळाली. आम्ही दोन महिन्यांपूर्वी या चोरीच्या मास्टर माइंडला पकडलं."
"विभुजा राठोड हा चांगलाच सरावलेला होता. आम्ही त्याची जबानी घेण्यासाठी जंगजंग पछाडत होता, पण तो काहीच बोलत नव्हता.
रिमांड संपायच्या एक दिवस आमच्या लक्षात आलं की, तो एरव्ही सराईत असला, तरी पत्नीचं नाव आल्यावर तो घाबरायचा, काहीतरी लपवायचा."
त्यांनी पुढे सांगितलं की, ती तीर्थयात्रेला गेलीये. घरी कोणी नाही असं सांगून तो बोलणं टाळायला लागला. तेव्हा आम्हाला काहीतरी संशयास्पद वाटलं.
जेव्हा आम्ही त्याच्या बायकोला हजर व्हायला सांगितलं तेव्हा त्याने 20 लाखांच्या व्यतिरिक्त दुसऱ्या गोष्टींबद्दल सांगायला सुरूवात केली, त्याने अशा गोष्टी कबूल केल्या ज्यांचा या चोरीशी काहीच संबंध नव्हता.
तो आपल्या बायकोबरोबर मेहसाणा इथे 15 वर्षांपासून राहत असल्याचं कळलं. पण त्यात वेगळं असं काहीच नव्हतं.
पण त्याची बायको घरीच होती. विजुभा मात्र ती जत्रेला गेल्याचं सांगत होता. तेव्हा सगळं संशयास्पद वाटू लागलं.
तू चोरलेले दागिने तुझ्या बायकोच्या नातेवाईकांच्या घरी लपवले आहेस. आम्ही तिथे धाड टाकणार आहोत, अशी धमकी त्याला दिल्याचं प्रदीप सेजूल यांनी सांगितलं.
बायकोच्या नातेवाईकांचा उल्लेख करताच तो गयावया करु लागला.
प्रदीप सेजूल यांनी म्हटलं की, त्याने 15 वर्षांपूर्वी मृत्यूमुखी पडलेल्या भिखीबेन पांचाळ यांचा उल्लेख केला आणि त्यातून एका हत्येचं रहस्य उलगडलं.
नक्की काय घडलं होतं?

फोटो स्रोत, JAYESH CHAUHAN
भिखीबेन पांचाळ बनासकांठातल्या खिमना गावात राहत होत्या.
विजुभा राठोड आणि मुथेडा गावातले भिखीबेन यांच्यात प्रेम जुळलं. भिखीबेनच्या आई सुमीबेह पांचाळ यांना हे कळलं. तिने मुलीचं लग्न प्रकाश पांचाळ नावाच्या स्वजातीय मुलाशी ठरवलं. बलवा गावात तो राहत असे.
2003 मध्ये लग्न झाल्यानंतर भिखीबेन आणि विजुभा हे गूपचूप शेतावर भेटत असत. एकमेकांशिवाय राहू शकत नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं.
पोलीस कस्टडीत विजुभाने सांगितलं की, "आमचं प्रेम खरं होतं. आम्हाला वेगळं व्हायचं नव्हतं. पण भिखीचं लग्न झालेलं".
विभुजाने पुढे त्यांची योजना विस्ताराने सांगितली.
टीव्ही चॅनेलवरच्या एका क्राईम शोमध्ये एक माणूस खून करतो. त्या माणसाचे कपडे घालून तो पळून जाण्यात यशस्वी ठरतो. त्याच्या बायकोला विम्याचे पैसे मिळतात.
त्यावरून माझ्या मनात एक कल्पना आली. मी माझा मित्र जिनाजी ठाकोरला याविषयी सांगितलं.
जिनाजीने सांगितलं की, गावात शारदा नावाची एक बाई होती. ती गावातून कधीही पळून जात असे.
मानसिकदृष्ट्या अस्थिर शारदाला आम्ही जीपमध्ये बसवलं आणि बलवा गावात घेऊन आलो. आधी सांगितल्याप्रमाणे भिखी केरोसिन, साडी, मंगळसूत्र आणि बांगड्या घेऊन आली.
भिखी येण्यापूर्वीच आम्ही शारदा रावळला मारलं. भिखी आल्यानंतर आम्ही मंगळसूत्र आणि बांगड्या तिला घातल्या. शारदाचा चेहरा ओळखूही येणार नाही एवढा जाळला.
विजूभाने पुढे सांगितलं, मृतदेह तिथेच टाकून आम्ही पळालो. तिथे भिखीचे फिंगरप्रिंट असलेला केरोसिन कॅन ठेवला. जिनाजी खिमना या त्यांच्या गावी गेला. मी आणि भिखी पळालो.
जिनाजीने सुमीबेन यांना सांगितलं की सासरच्यांच्या छळाला कंटाळून त्यांच्या मुलीने आत्महत्या केली.
जिनाजी आणि भिखीबेन हे एकाच गावचे होते.

फोटो स्रोत, JAYESH CHAUHAN
हे समजल्यावर सुमीबेनने भिखीच्या सासूसासऱ्यांविरुद्ध तक्रार दाखल केली. भिखीचे सासरे अमरित पांचाळ, सासू बाहूबेन पांचाळ, नणंद कोकिळा पांचाळ आणि नवरा प्रकाश पांचाळ यांच्याविरोधात तक्रार करण्यात आली.
सासूला 15 दिवसात जामीन मिळाला. कारण त्या ज्येष्ठ नागरिक होत्या. भिखीचे सासरे सप्टेंबर 2005 मध्ये वारले.
भिखीचा नवरा जो जामीनावर सुटला त्याने बलवा गाव सोडलं आणि तो अन्यत्र कुठेतरी गेला.
भिखीचं नाव बदलून भावना राठोड केलं
आम्ही तिथून निघालो आणि मेहसाणाला गेलो. भिखीचं नाव भावना राठोड ठेवलं, असं विजुभाने पोलिसांना सांगितलं.
जिनाजी ठाकोर, शलतसिंग ठाकोर अशी आमची गँग होती. आम्ही चोऱ्या करायचो आणि पळून जायचो.
भिखी आणि मी 15 वर्ष एकत्र राहत होतो. आम्हाला देवराज नावाचा मुलगा झाला.
पाटण न्यायालयात भिखी बाईची केस चालली. प्रकाश आणि त्याची बहीण यांना 2007 मध्ये सोडण्यात आलं. प्रकाशने बलवा कायमस्वरुपी सोडलं.
भिखीच्या हत्येच्या आरोप झालेला प्रकाश इतरांशी बोलणंही टाळू लागला.

फोटो स्रोत, JAYESH CHAUHAN
त्याने बीबीसीला सांगितलं की, न्यायालयाने सुटका केल्यानंतर मी पुन्हा लग्न करण्यासाठी तयार होतो पण माझ्याशी लग्नाला कोणी मुलगी तयार होईना. गावातले लोक मला खूनी म्हणून टोमणे मारतात.
"मी माझ्या आईवडिलांच्या फोटोसकट देवाचे फोटो दारावर लावले आहेत. खिडकीजवळ बायकोचो फोटो आहे. गावी गेलो तर या फोटोंकडे बघतो आणि परत येतो."
12 वर्षात मी फक्त तीनदा गावी गेलो. घरच्यांचे आणि देवादिकांचे फोटो स्वच्छ करुन मी परतलो, असं प्रकाशने सांगितलं.
"मला निनावी आयुष्य जगायचं आहे. मला कोणीही नातेवाईक नकोत. मला कुणाला भेटावंसं वाटलं तर बहिणीला भेटतो. पण मी तिच्या गावाला जात नाही."
प्रकाशने त्याचा फोटो घेण्यास नकार दिला. भिखीबरोबरचा फोटो पाहिल्यानंतर त्यानं सांगितलं, आम्ही लग्न केलं आणि आम्हाला मुलगाही आहे.
हा फोटो ठेवला जेणेकरुन मुलाला आईचा फोटो दाखवता येईल आणि ती देवाघरी गेली, असं सांगेन.

फोटो स्रोत, JAYESH CHAUHAN
पण मला आता हा फोटोही ठेवायचा नाहीये.
मी माझ्या मुलासह अज्ञातवासात राहीन. पुन्हा लग्न करण्याचा विचारही करणार नाही.
दुसरीकडे आत्महत्येचं नाटक करणाऱ्या भिखी बाईने पोलिसांना सांगितलं, की माझं आणि विजुभाचं प्रेम खरं होतं. मी जे केलं त्याचा मला पश्चाताप नाही.
विजूभा आणि मी निर्णय घेतला की जगूया किंवा मरुया पण एकत्र. त्यामुळे आम्ही तुरुंगात एकत्रच जाऊ. आम्ही अनेक गुन्हे केले, अनेक ठिकाणी चोरी केली. आम्ही आमचा जीव एकत्रच धोक्यात घातला.
"तुरुंगात जायचं काही वाटत नाही. मी 15 वर्ष मृतच होतो. या चोरीमुळे मला जीवन मिळालं."
(ही बातमी बीबीसी गुजरातीने 2019 साली प्रथम प्रकाशित केली होती.)
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








