इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूबाबत महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं

इब्राहिम रईसी

फोटो स्रोत, REUTERS

इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी आणि परराष्ट्र मंत्री हुसैन अमीर-अब्दुल्लाहियन यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला आहे. रविवारी राष्ट्राध्यक्षांच्या ताफ्यातील एक हेलिकॉप्टर कोसळलं होतं.

इराणच्या सरकारी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार दुर्घटनाग्रस्त झालेल्या हेलिकॉप्टरमध्ये एकही माणूस वाचल्याचे संकेत मिळाले नाहीत. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार हे हेलिकॉप्टर पूर्णपणे जळालं आहे.

इराणच्या रेड क्रेसेंट सोसायटीचे प्रमुख पिरहोसेन कोलीवंद यांनी या वाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत असं म्हटलं आहे की घटनास्थळाची परिस्थिती 'चांगली' नाही.

हा अपघात जिथे घडला त्या परिसरात खराब वातावरण असल्यामुळे बचाव कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पोहोचताना अडचणी येत होत्या. अखेर सोमवारी (20 मे) सकाळी हे कर्मचारी तिथे पोहोचल्याचं इराणच्या सरकारी माध्यमांनी सांगितलं.

अनादोलू या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, तुर्कस्तानने राष्ट्राध्यक्ष रईसी यांच्या हेलिकॉप्टर अपघाताच्या शोध मोहिमेत मदत करण्यासाठी ड्रोन पाठवले होते.

या वृत्तसंस्थेने जारी केलेल्या ड्रोन फुटेजमध्ये रात्रीच्या वेळी एका टेकडीवर काळ्या खुणा दिसल्या आहेत. या फुटेजमधून जी काही माहिती मिळाली आहे ती इराणच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली.

एखादं हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर त्या ठिकाणी स्फोट झाला असेल किंवा आग लागली असेल तर अशा ठिकाणच्या वाढलेल्या तापमानाचा शोध घेण्याचं काम तुर्कीचे ड्रोन करतात. याच ठिकाणाला 'हिट ऑफ सोर्स' असं म्हणतात.

अनादोलूने या ड्रोनने केलेला काही व्हिडिओ देखील प्रकाशित केले. या व्हिडिओमध्ये एका ठिकाणी आग लागल्याचं बघता येतं. आता या संपूर्ण अपघाताबाबत जर तुमच्या मनात काही प्रश्न निर्माण झाले असतील तर त्यांचीच उत्तरं आपण या बातमीतून मिळवणार आहोत.

हेलिकॉप्टरमध्ये कोण कोण होतं?

इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी, परराष्ट्र मंत्री हुसैन अमीर-अब्दुल्लाहियन, इराणच्या पूर्व अझरबैजान प्रांताचे गव्हर्नर मलिक रहमाती, हेलिकॉप्टरचे पायलट आणि सुरक्षारक्षक प्रवास करत होते.

बचावकार्य

फोटो स्रोत, REUTERS

हा अपघात नेमका कुठे झाला आणि इब्राहिम रईसी कुठे जात होते?

इराण आणि अझरबैजानच्या सीमेवर बांधण्यात आलेल्या किज खलासी आणि खोदाफरिन या दोन धरणांच्या उदघाटनासाठी इब्राहिम रईसी अझरबैजानला गेले होते. या उद्घाटनानंतर ते तबरेझ शहराकडे निघाले होते.

तबरेझ ही इराणच्या पूर्व अझरबैजान प्रांताची राजधानी आहे. यादरम्यान वाटेत एका ठिकाणी हेलिकॉप्टरचा अपघात झाला. ज्या ठिकाणी या हेलिकॉप्टरला हार्ड लँडिंग करावी लागली ते ठिकाणी इराणच्या वर्जेकान शहरापासून 50 किलोमीटर अंतरावर आहे.

हेलिकॉप्टरचे अवशेष मिळायला उशीर का झाला?

ज्या ठिकाणी हे हेलिकॉप्टर कोसळलं होतं तिथे धुकं असल्याची माहिती आहे. शोधपथकासोबत गेलेल्या एका वार्ताहराने अशी माहिती दिली होती की त्या भागात अत्यंत घनदाट जंगल असून फक्त पाच मीटर अंतरावर असणाऱ्या गोष्टीच दिसू शकत होत्या.

बचावकार्यात कोणकोणत्या देशांनी मदत केली?

तुर्कीने ड्रोन पाठवून अपघाताचे ठिकाण शोधायला मदत केली. रशियाच्या सरकारी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी या कामासाठी 47 विशेषज्ञांची एक टीम आणि एक हेलिकॉप्टर पाठवलं होतं.

संयुक्त अरब अमिरातीने देखील मदतीची तयारी दाखवली होती.

या हेलिकॉप्टर अपघातामागे काही षड्यंत्र आहे का?

अमेरिकेच्या संसदेत डेमोक्रॅटिक पक्षाचे खासदार असणाऱ्या चक शूमर यांनी म्हटले आहे की, हेलिकॉप्टर अपघातामागे कोणतेही षड्यंत्र आहे असे आत्ताच म्हणता येणार नाही.

शूमर म्हणाले की, "आतापर्यंत असे कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत ज्याच्या आधारे हेलिकॉप्टर अपघातामागे कट होता असं म्हणता येईल."

बचावकार्य

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अपघात झालेल्या ठिकाणी धुक्यामुळे दृश्यमानता खूपच कमी आहे.

"उत्तर-पश्चिम इराणमध्ये हवामान खूपच खराब होते जेथे हेलिकॉप्टर क्रॅश झाले. हे अपघातासारखं दिसत आहे. मात्र या अपघाताची संपूर्ण चौकशी अद्याप बाकी आहे," अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना या अपघाताची माहिती देण्यात आली आहे.

पण इराणच्या काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर प्रश्न विचारले जात आहेत की राष्ट्राध्यक्षांच्या ताफ्यात एकूण तीन हेलिकॉप्टर असतात त्यापैकी एकाच अपघात होतो आणि इतर दोन हेलिकॉप्टर अगदी सहीसलामत राहतात. हे असं कसं होऊ शकतं?

इब्राहिम रईसी शेवटचे कुणासोबत दिसले होते?

टेक ऑफ करण्यापूर्वी राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी आणि अझरबैजानचे राष्ट्राध्यक्ष इल्हाम अलीयेव यांनी दोन्ही देशांच्या सीमेवरील धरणाचे उद्घाटन केले होते. या दोघांचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत.

संकटाच्या या काळात इराणला सर्वतोपरी मदत करण्यास अझरबैजान तयार असल्याचे राष्ट्राध्यक्ष अलीयेव यांनी सांगितलं आहे.

भारताने काय प्रतिक्रिया दिली आहे?

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून या घटनेबद्दल लिहिलं आहे की, “राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या निधनाच्या बातमीने धक्का बसला आणि दु:ख झाले.

भारत-इराण संबंध दृढ करण्यात त्यांनी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील. मी इराणमधील लोक आणि रईसी यांच्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त करतो. या दु:खाच्या काळात इराण भारताच्या पाठीशी उभा आहे."

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रईसी

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रईसी यांचा हा फोटो ऑगस्ट 2023 मधला आहे.

पाकिस्तानने काय म्हटले?

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाझ शरीफ म्हणाले की, "माननीय राष्ट्राध्यक्ष सय्यद इब्राहिम रईसी यांच्या हेलिकॉप्टर अपघाताबाबत बातमी ऐकली. सर्व काही ठीक आहे या चांगल्या बातमीची मी मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहे. आमच्या प्रार्थना राष्ट्राध्यक्ष रईसी रायसी आणि संपूर्ण इराणसोबत आहेत."

रईसी आणि शाहबाज शरीफ

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, रईसी या वर्षी एप्रिलमध्ये पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेले होते. रईसी आणि शाहबाज शरीफ

अमेरिकेची प्रतिक्रिया काय?

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्याने सांगितले आहे की ते या अपघाताच्या अहवालावर लक्ष ठेवून आहेत.

इराण आणि अमेरिकाचा झेंडा

फोटो स्रोत, Getty Images

इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी काय म्हणाले?

इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांनी या दुर्घटनेचा इराणच्या प्रशासनावर कोणताही परिणाम होणार नसल्याचं सांगितलं आहे. लोकांनी चिंता करू नये असंही ते म्हणाले.

यासोबतच या अपघातानंतर आयातुल्ला अली खामेनी यांनी इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेसोबत एक तात्काळ बैठक आयोजित केलेली होती.

आयातुल्ला अली खामेनी

फोटो स्रोत, EPA

रईसी यांच्या निधनाचा इराणवर काय परिणाम होईल?

बीबीसीच्या आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी लाईस ड्युसेट यांनी लिहिलं आहे की इब्राहिम रईसी यांच्याबाबत सध्या काहीही ठोस माहिती नसली, या अपघातात त्यांचा मृत्यू झालेला असला तरीही इराणच्या परराष्ट्र किंवा देशांतर्गत धोरणावर त्याचा परिणाम होईल हे म्हणणं धाडसाचं ठरेल.

राष्ट्राध्यक्ष रईसी हे इराणचं दैनंदिन कामकाज बघत असले तरी त्यांचा प्रभाव खूपच कमी होता. इराणमध्ये त्यांचे सर्वोच्च नेतृत्वच देशाचं धोरण ठरवतं आणि त्यांचाच निर्णय अंतिम असतो.

राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या कार्यकाळात कोणतेही मोठे धोरणात्मक बदल झालेले नाहीत त्यामुळे त्यांच्यानंतर काय असा प्रश्न फारसा निर्माण होत नाही असं दुसे यांनी लिहिलं आहे.

मोहम्मद मुखबर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, उपाध्यक्ष मोहम्मद मुखबार

सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांचा वारसदार म्हणून इब्राहिम रईसी यांच्याकडे बघितलं जात होतं.

बीबीसी पर्शियनचे पत्रकार जियार गोल म्हणतात की, "इराणी नागरिक रईसी यांना गांभीर्याने घेत नसत, म्हणूनच 2022 मध्ये जेव्हा निदर्शने झाली तेव्हा त्यांच्या विरोधात घोषणा क्वचितच ऐकू आल्या. तेव्हा खोमेनी हे आंदोलकांचे लक्ष्य होते."

मिडल-ईस्ट प्रकरणांचे तज्ज्ञ जेसन यांच्या मते, रईसी यांच्या मृत्यूनंतर सर्वोच्च नेते खोमेनी या पदावर राहतील.

इराणच्या संविधानाच्या कलम 131 नुसार, जर राष्ट्राध्यक्ष मरण पावला किंवा त्यांनी पदत्याग केला, तर अशा परिस्थितीत उपराष्ट्रपती (मोहम्मद मुखबर) निवडणूक होईपर्यंत राष्ट्रपती होतील. नवीन राष्ट्राध्यक्षांची निवड 50 दिवसांच्या आत करावी लागणार आहे.

इब्राहिम रईसी नेमके कोण होते?

इब्राहिम रईसी हे 63 वर्षांचे होते.

त्यांचा जन्म 1960 मध्ये ईशान्य इराणमधील मशहद या पवित्र शहरात झाला. या शहरात शिया मुस्लिमांसाठी सर्वात पवित्र मानली जाणारी मशीद देखील आहे. लहान वयातच ते मोठ्या पदावर पोहोचले होते.

रईसी यांचे वडील मौलवी होते. रईसी केवळ पाच वर्षांचे असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले. ते एक धार्मिक विद्वान आणि वकील देखील होते.

शिया धार्मिक नेत्यांच्या पदानुक्रमात, ते सर्वोच्च धार्मिक नेते अयातुल्लाह खोमेनी यांच्या खालोखाल होते.

इब्राहिम रईसी

फोटो स्रोत, AFP

इब्राहिम रईसी यांनी जून 2021मध्ये इराणमध्ये सत्ता हाती घेतली तेव्हा त्यांना देशांतर्गत अनेक आव्हानांचा सामना करावा लागला.

आपल्या वडिलांच्या मार्गाचा अवलंब करून, त्यांनी वयाच्या 15व्या वर्षी कोम शहरातील शिया संस्थेत शिक्षण घेण्यास सुरुवात केली.

वयाच्या अवघ्या 20व्या वर्षी, तेहरानजवळील काराजचे अभियोजक जनरल म्हणून त्यांची नियुक्ती झाली.

रईसी 1989 ते 1994 दरम्यान तेहरानचे अभियोजक जनरल होते आणि त्यानंतर 2004 पासून पुढील दशकासाठी न्यायिक प्राधिकरणाचे उपप्रमुख होते.

2014 मध्ये ते इराणचे प्रॉसिक्युटर जनरल बनले. इराणच्या न्यायव्यवस्थेचे प्रमुख असलेल्या रईसी यांची ओळख एक कट्टरतावादी राजकीय नेता अशी होती.

जून 2021 मध्ये उदारमतवादी हसन रुहानी यांच्या जागी रईसी यांना इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणचे अध्यक्ष म्हणून निवडण्यात आलं होतं.