फूड डिलिव्हरी करणारा सूरज बनणार उप-जिल्हाधिकारी, अशी आहे संघर्षाची गोष्ट

    • Author, मोहम्मद सरताज आलम
    • Role, रांचीहून बीबीसी हिंदीसाठी

शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी स्विगी डिलिव्हरी बॉय आणि रॅपिडोमध्ये काम करणारे सूरज यादव सध्या चर्चेत आहेत.

झारखंड लोकसेवा आयोगाच्या (JPSC) परीक्षेत त्यांनी 110 वा क्रमांक मिळवला. त्यामुळे सूरज यादव आता उपजिल्हाधिकारी होणार आहेत.

सूरज झारखंडमधील गिरिडीह जिल्ह्याच्या कपिलो पंचायतीतील रहिवासी आहेत. त्यानंतर जेपीएससी परीक्षेच्या दुसऱ्या प्रयत्नात हे यश मिळवलं.

पण कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत कमकुवत असल्यानं, आव्हानात्मक परिस्थितीत त्यांनी यश मिळवलं हे विशेष आहे.

आर्थिक अडचणी, साधनांचा अभाव आणि जीवनात अनेक अडचणी असतानाही सूरज यांनी 2017 मध्ये पदवी मिळवली. त्यानंतर त्यानं कॉल सेंटरमध्ये काम करण्यास सुरुवात केली.

तेव्हा गंगाधर यादव त्यांच्या मुलीच्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन सूरजकडं आले होते. त्यांनी सूरज यांना, 'तू पुढं काय करणार आहेस?' असं विचारलं.

त्यावर सूरज यांचे उत्तर होते, "मला डीएसपी व्हायचे आहे. त्यासाठी मी जेपीएससी परीक्षा देईन."

सूरजच्या बोलण्यानं प्रभावित होऊन गंगाधर यादव यांनी त्याचवर्षी त्यांची मुलगी पुनम कुमारी आणि सूरज यांचा विवाह लावला.

सूरजला स्पर्धा परीक्षेची तयारी करायची होती. पण लग्न झालेलं असल्यानं त्यांनी पत्नी पूनमला विचारलं की, "मी पैसे कमावण्यासाठी नोकरी करू की परीक्षेची तयारी करू."

याबाबत पूनम म्हणाल्या की, "त्यावर मी म्हणाले, ठीक आहे तुम्ही जाऊन अभ्यास करा, खर्चाची काळजी करू नका. मी त्याबाबत माझ्या वडिलांशी बोलेन."

त्यानंतर 2020 पर्यंत सूरज यांना त्यांचे सासरे गंगाधर यादव यांच्याकडून आर्थिक मदत मिळत होती. त्याच्या मदतीनंच सूरजनं रांचीच्या एका कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये 2020 पर्यंत जेपीएससी परीक्षेची तयारी केली.

पण 2020 मध्ये कोरोनामुळं जेपीएससी परीक्षा झाली नाही. त्यामुळं सूरजला गावी परतावं लागले. सूरजनं तिथंही अभ्यास सुरू ठेवला आणि परीक्षेची वाट पाहू लागला.

सूरजला 2021 मध्ये सूरजला वडील बनला. मुलाच्या जन्मामुळं त्याला जबाबदारीची जाणीव झाली. पण तरीही पत्नी पूनमनं त्याला अभ्यासावरच लक्ष केंद्रित करायला सांगितलं.

"अखेर 2022 मध्ये जेपीएससी परीक्षा झाली, पण मुख्य परीक्षेत 7 गुण कमी पडल्यानं मी उत्तीर्ण होऊ शकलो नाही," असं सूरज सांगतात.

सूरजसाठी 2022 हे वर्ष एक नवीन आव्हान घेऊन आलं. जेपीएससीमध्ये पहिल्या प्रयत्नात तो अपयशी ठरला. त्यावर्षी सूरजच्या पत्नीच्या धाकट्या बहिणीचं लग्न होतं. त्यामुळं सूरजला सासरकडून मिळणारा आर्थिक आधार बंद झाला.

सूरजचे वडील द्वारका यादव सांगतात की, "तेव्हाच माझ्या धाकट्या मुलीचंही लग्न ठरलं. त्यामुळं बहिणीच्या लग्नाची जबाबदारीही सूरजच्या खांद्यावर आली."

गवंडी काम करणाऱ्या सूरजच्या वडिलांनी प्रकृती बिघडल्यानं कामही सोडलं होतं.

सूरज सांगतात की, त्यांच्याकडं एक म्हण आहे. त्यानुसार यादवांच्या मुलीची लग्नंही जमीन विकल्यानंतरच होतात.

यापूर्वीही सूरजच्या तीन बहिणींची लग्नंही वडिलोपार्जित जमीन विकूनच करावी लागली होती.

त्यामुळं यावेळीही सूरज यांनी शिल्लक राहिलेल्या जमिनीचा काही भाग विकून 3 लाख रुपये मिळवले आणि उर्वरित खर्च भागवण्यासाठी नातेवाईकांकडून आर्थिक मदत मागितली.

"लग्नाला सुमारे 16 लाख रुपये खर्च आला होता. त्यामुळं सर्व नातेवाईकांनी मिळून 13 लाख रुपये दिले," असं सूरज यांच्या बहीण वैजयंती कुमारी यांनी सांगितलं.

बहीण वैजयंतीच्या लग्नाची जबाबदारी पार पाडल्यानंतर कर्जबाजारी सूरजकडे दोन पर्याय होते. एक कुठेतरी पैसे कमवायला जायचं किवा परत पुढील जेपीएससी परीक्षेची तयारी करायची.

आर्थिक अडचणींमुळं सूरजला रांचीला परत जाणं शक्य नव्हतं. त्यामुळं त्यांच्या मोठ्या बहिणीनं त्यांना हजारीबागला त्यांच्या घरी बोलावलं.

सूरज तिथं रात्रीच्या वेळी परीक्षेची तयारी करायचे आणि दिवसा स्थानिक कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये जेपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवायचे.

त्यामोबदल्यात सूरज यांना महिन्याला पाच हजार रुपये मिळू लागले. त्यातून सूरज अभ्यास आणि कुटुंबाचा खर्च भागवायचे.

जेपीएससी परीक्षेत आदिवासींच्या जमिनीच्या हक्कांचं संरक्षण करण्यासाठी 'छोटानागपूर कास्तकारी अधिनियम 1908 आणि संथाल परगणा कास्तकारी अधिनियम 1949' संदर्भात दहा प्रश्न विचारण्यात आले होते.

जेपीएससी परीक्षेतील याचं महत्त्वं लक्षात आल्यानं सूरज यांनी हजारीबागमध्ये राहत असताना या विषयावर 'झारखंड सीएनटी-एसपीटी कायदा' नावाचं पुस्तक लिहिलं.

"या पुस्तकातून मला सोळा हजार पाचशे रुपये रॉयल्टी म्हणून मिळाले, ते माझ्यासाठी वरदान मिळण्यापेक्षा कमी नव्हते," असं सूरज सांगतात.

"पण माझं लक्ष पुढच्या जेपीएससी परीक्षेवर होतं, असं ते म्हणाले.

हजारीबागमधील कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये शिकवत असतानाच सूरज यांनी जेपीएससीची प्राथमिक परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर जून 2024 मध्ये मुख्य परीक्षा दिली.

पण, कोचिंग कोर्सेस पूर्ण झाल्यानंतर, सूरज यांना हजारीबागच्या कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये परत शिकवण्याची संधी मिळाली नाही.

पूर्णपणे बेरोजगार असलेल्या सूरजला त्याच्या मित्रांनी रांचीला बोलावले. त्या ठिकाणी अशा अनेक कोचिंग इन्स्टिट्यूट असल्यानंतर तिथं शिकवण्याचं काम मिळू शकतं असं त्यांनी सांगितलं.

रांची येऊन जुलैपासून सप्टेंबरपर्यंत वाट पाहूनही सूरजला कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये नोकरी मिळू शकली नाही.

शेवटी सूरजची चिंता पाहून त्यांचे जवळचे मित्र राजेश नायक आणि संदीप मंडल यांनी त्यांना डिलिव्हरी बॉय म्हणून काम करूनही पैसे कमवता येतील, असं सुचवलं.

सूरज 2024 मध्ये दिलेल्या जेपीएससी परीक्षेच्या निकालाची वाट पाहत होता. त्यामुळे त्याला हा सल्ला आवडला.

पण डिलिव्हरी बॉय म्हणून काम करण्यासाठी बाईक हवी होती.

सूरज सांगतात, "मी आधीच कर्जबाजारी होतो. अशा परिस्थितीत, बाईकसाठी कर्ज घेण्याच्या स्थितीत नव्हतो."

त्यावेळी राजेश नायक आणि संदीप मंडल यांनी त्यांच्या शिष्यवृत्तीच्या पैशातून सूरज यांच्यासाठी एक बाईक खरेदी केली.

ऑक्टोबर 2024 पासून सूरज रोज सायंकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत गिग वर्कर म्हणून काम करत होते. त्यातून त्यांना दररोज 300 ते 400 रुपये मिळत होते.

"गिग वर्कर म्हणून काम करणाऱ्या उत्पन्नामुळे माझा आत्मविश्वास वाढू लागला," असं सूरज सांगतात.

"पुढील जेपीएससीची तयारी करतच मी एफआरओ आणि एसीएफची परीक्षाही देखील दिली. पण माझ्या मनात कुठंतरी 2024 च्या जेपीएससी मेन्सचा निकालाबाबत आस लागलेली होती," असं ते सांगतात.

मे 2025 मध्ये जेपीएससी मेन्सचा निकाल जाहीर झाला आणि सूरज यांची मुलाखतीसाठी निवड झाली.

जुलै 2025 मध्ये होणाऱ्या मुलाखतीची तयारी करण्यासाठी मित्रांनी त्यांना डिलिव्हरी बॉयचं काम सोडण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्यांनी काम सोडलं आणि मुलाखतीची तयारी सुरू केली.

"मुलाखतीदरम्यान मी डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो हे सांगितलं तेव्हा बोर्ड सदस्यांना वाटलं की, मी कदाचित सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळं त्यांनी मला डिलिव्हरीशी संबंधित तांत्रिक प्रश्न विचारले, " असं सूरज सांगतात.

पण सूरज यांनी त्यांच्या प्रश्नांची अचूक उत्तरं दिली आणि बोर्ड सदस्यांच्या सगळ्या शंका दूर केल्या.

त्यानंतर 25 जुलै 2025 रोजी जेपीएससीचा अंतिम निकाल जाहीर झाला.

सूरज यादव म्हणतात की, "निकाल पाहून माझ्या डोळ्यातून अश्रू तराळले. मी ते आवरण्याचा प्रयत्न केला आणि कुटुंबातील सर्व सदस्यांना एकापाठोपाठ उपजिल्हाधिकारी पदासाठी निवड झाल्याची बातमी देऊ लागलो."

सूरज नुकतेच पंतप्रधान घरकुल योजनेअंतर्गत बांधलेल्या नवीन घरात राहायला गेले आहेत. ते त्यांच्या यशाचं श्रेय कुटुंबाला देतात.

"कुटुंबातील प्रत्येक सदस्यानं वेळोवेळी योगदान दिलं. विशेषतः माझी पत्नी, आई आणि सासू यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे," असं ते सांगतात.

त्यांच्या आई यशोदा देवी म्हणाल्या की, "2022 पासून आतापर्यंत, जेव्हा जेव्हा सूरजला कोणत्याही सणाला घरी राहा म्हटलं तेव्हा तो परत जाऊन अभ्यास करायचा आहे, असं म्हणायचा. त्यावरून यापरीक्षेसाठी त्याने किती झोकून दिलं होतं, हे लक्षात येऊ शकतं."

सूरजने मिळवलेल्या यशाने त्यांच्या पत्नी पूनम कुमारी खूप आनंदी आहेत.

"आम्हाला आधी कोणीही फार जास्त आदर देत नव्हतं. पण सध्या आम्हाला असे अनुभव येत आहेत, ज्याचा आम्ही स्वप्नातही विचार केला नव्हता," असं पुनम म्हणाल्या.

"भविष्यासाठी माझं कोणतंही मोठं स्वप्न नाही, मी जे काही स्वप्नं पाहिलं होतं ते आज पूर्ण झाले आहे," असं त्या म्हणाल्या.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)