You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नेदरलँड : देशाचा 'तो' इतिहास, ज्यामुळे 300 वर्षांनंतर खुद्द राजानेच मागितली माफी
- Author, मॅट मर्फी
- Role, बीबीसी न्यूज
गुलामांचा व्यापार करण्याचा इतिहास आणि त्याच्या संबंधित नेदरलँडची भूमिका या मुद्द्यावरून देशाचे राजे विलेम-अलेक्झांडर यांनी माफी मागितली आहे.
देशाच्या इतिहासात हा गुलामीचा मुद्दा अतिशय गंभीर असून आपल्याला त्याबाबत प्रचंड संवेदना आहेत, असंही राजेंनी म्हटलं आहे.
नेदरलँड हा देश म्हणजे 17 व्या शतकातील एक मोठं वसाहतवादी सत्ताकेंद्र होतं. जगभरातील विविध प्रदेशांवर ताबा मिळवून त्यांनी तेथील सत्ता नियंत्रणात घेतली होती. यादरम्यान डच व्यापाऱ्यांनी 6 लाखांपेक्षा अधिक लोकांचा मानव तस्करी केली होती.
हा एक अत्यंत भयानक प्रकार होता. डच राजघराण्याने ते थांबवण्यासाठी काहीही केलं नाही, असं विलेम-अलेक्झांडर यांनी म्हटलं.
नेदरलँडमधील गुलामगिरी निर्मूलनाच्या 160व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात राजे माफी मागणार आहेत किंवा नाही, हे स्पष्ट नव्हतं.
पण अचानक राजेंनी गुलामीसंदर्भात शाही कुटुंबाच्या भूमिकेबद्दल माफी मागून सर्वांना आश्चर्यचकित केलं. राजेंच्या या पुढाकाराबद्दल त्यांचं कौतुक होत आहे.
नेदरलँडमध्ये जून महिन्यात एक संशोधन करण्यात आलं होतं. यामध्ये असं दिसून आलं की डच राज्यकर्त्यांना 1675 ते 1770 या कालावधीत गुलामगिरी लागू असलेल्या वसाहतींमधून प्रचंड मोठा पैसा मिळाला. या रकमेचं आजचं मूल्य तब्बल 545 मिलियन युरो (595 मिलियन डॉलर) इतकं होतं.
अॅमस्टरडॅम येथे आपल्या भाषणादरम्यान राजे विलेम-अलेक्झांडर यांनी कबूल केलं की ‘हाउस ऑफ ऑरेंज’मधील राज्यकर्त्यांनी गुलामगिरीविरोधात कोणतीही पावले उचलली नाहीत.
ते पुढे म्हणाले, “मी आज तुमचा राजा म्हणून आणि सरकारचा एक भाग म्हणून तुमच्यासमोर उभा आहे. आज मी स्वतः तुमची माफी मागत आहे. ”
राजे विलेम-अलेक्झांडर यांच्या भाषणादरम्यान त्यांच्या पत्नी राणी मॅक्सिमा यासुद्धा उपस्थित होत्या.
“बहुसंख्य डच नागरीक हे रंगभेद किंवा सांस्कृतिक भेदभाव न करता सर्वच नागरिकांच्या समानतेच्या लढ्याला पाठिंबा देतात. त्यामुळे मी संपूर्ण राष्ट्र म्हणून बोलत नसून एक राजा म्हणून मी माफी मागतो.”
यावर तोडगा काढून भविष्यात सौहार्द आणि सलोखा राखण्यासाठी आपण एकत्र काम करूया, असंही राजेंनी म्हटलं.
केटी कोटी महोत्सवातील गुलामगिरी निर्मूलन दिनादिवशीच्या भाषणात राजे विलेम-अलेक्झांडर यांनी अशा पद्धतीची वक्तव्ये करून उपस्थितांचं मन जिंकलं. त्यांच्या भाषणाला उपस्थितांनी जल्लोष करत दाद दिली.
नेदरलँडने 17 व्या शतकात सध्याचे इंडोनेशिया, दक्षिण आफ्रिका, कुराकाओ आणि पश्चिम पापुआ या देशांच्या मोठ्या भूभागावर कब्जा केलेला होता. यानंतर, मानव तस्करी क्षेत्रातील गुलामांच्या व्यापारात त्यावेळच्या प्रमुख व्यापाऱ्यांपैकी ते एक बनले.
1863 मध्ये गुलामी प्रथेवर बंदी येण्यापूर्वी हजारो लोकांची तस्करी आफ्रिकेतून कॅरेबियन आणि दक्षिण अमेरिकेतील डच वसाहतींमध्ये करण्यात आली होती.
त्यावेळी त्याचं प्रमाण हे ट्रान्स-अटलांटिक क्षेत्रातील गुलाम व्यापाराच्या 5 टक्के इतकं होतं. पुढे सुरीनाम देशातही पुढील 10 वर्षे हा व्यापार सुरू होता. यादरम्यान गुलामांवर अतोनात अत्याचार करण्यात आले होते.
नेदरलँड्सने याच गुलामांच्या व्यापारातून प्रचंड संपत्ती निर्माण केली. येथील हॉलंड प्रांतात डच संशोधन परिषदेने केलेल्या अभ्यासात असं आढळून आलं आहे की 1738 ते 1780 या कालावधीत मानव तस्करीच्या बळावर 40 टक्क्यांची घसघशीत आर्थिक वाढ नेदरलँडमध्ये पाहायला मिळाली.
300 वर्षांपूर्वीच्या नेदरलँडच्या या इतिहासाबाबत आजही चर्चा केली जाते. गुलामी निर्मूलन करण्यात आल्याच्या स्मरणार्थ देशात एक कार्यक्रमही आयोजित करण्यात येतो. याला केटी कोटी महोत्सव असं संबोधण्यात येतं.
गेल्या वर्षी नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रुट यांनीही गुलामांच्या व्यापारासंदर्भातील देशाच्या इतिहासाबाबत माफी मागितली होती.
हेग येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी म्हटलं होतं की हा एक मानवतेविरुद्धचा गुन्हा होता, हे स्पष्ट शब्दांत मान्य केलं पाहिजे.
यापूर्वी, नेदरलँडमधील अॅमस्टरडॅम आणि रॉटरडॅमसह इतर अनेक डच शहरांतील संबंधितांनीही गुलामीच्या व्यापारातील त्यांच्या भूमिकेबद्दल दिलगिरी व्यक्त केलेली आहे.
परंतु, नेदरलँडने आपल्या वसाहतवादी इतिहासाचा स्वीकार करण्यात प्रचंड वेळ घेतला, हे वास्तव आहे. 2006 पर्यंत नेदरलँडने आपल्या शैक्षणिक पुस्तकांमध्ये डचांचा गुलामगिरी इतिहास याविषयी माहिती दिलेली नव्हती. अखेर, विलंबाने का होईना, देशातील प्रमुख व्यक्ती याबाबत कबुली देऊन माफी मागत आहेत, याचं स्वागत लोकांकडून केलं जात आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)