मिरची, हळदीसारखे मसाले आरोग्यासाठी चांगले की वाईट?

    • Author, जेसिका ब्राऊन

मिरची, हळद आणि तत्सम मसाले हे आरोग्यासाठी लाभदायक असतात, असा दावा अनेकदा केला जातो.

अनेक लोक मिरची आणि हळदीसारख्या मसाल्यांमुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते, असंही म्हणतात. पण हे दावे कितपत खरे आहेत? अन्नात मसाले टाकल्याचे खरंच इतके फायदे आहेत का? आजार बरे होण्यासाठी या मसाल्यांचा खरंच उपयोग होतो का?

हजारो वर्षांपासून मसाले हे आपल्या जेवणाचा अविभाज्य भाग आहेत. चिप्स बनवल्यानंतर त्यावर काळी मिरी पावडर टाकणे असो की आलं घालून चहा बनवणं किंवा जेवणात तिखट मिरचीचा समावेश करणं मसाले हे आपल्या आहारात वेगवेगळ्या स्वरूपात समाविष्ट होतात.

जेवाणातील चव अथवा ठसका वाढवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या या मसाल्यांमध्ये औषधी गुणधर्म देखील असतात, असे अनाधिकृत दावे हल्ली मोठ्या प्रमाणावर केले जात आहेत. अगदी तयार अन्नांच्या पाकिटांवरही अशा जाहीराती आजकाल मोठ्या प्रमाणावर झळकलेल्या पाहायला मिळतात.

2016 च्या अध्यक्षीय प्रचारादरम्यान आलेलं आजारपण घालवण्यासाठी उमेदवार हिलरी क्लिंटन रोज काळी मिरी खात असल्याची बातमी गाजली होती.

हळद ही औषधी असल्याचं तर आशियात हजारो वर्षांपासून मानलं जातं. आता तर जगभरात हळदीमध्ये औषधी गुणधर्म असल्याचा समज प्रचलित झाला आहे. म्हणून पाश्चात्य देशातील कॉफी शॉप्समध्ये देखील हळदयुक्त कॉफी "गोल्डन लाटे" या नावानं विकली जाते.

कोरोनाकाळात रोगप्रतिकारक क्षमता वाढवून कोव्हीडवर मात करण्यासाठी हळद कामी येईल, असा संदेश मोबाईल आणि इंटरनेटवरून व्हायरल झाला होता.

"हळदीला लोकांनी तिच्या औषधी गुणधर्मांसाठी इतकं डोक्यावर घेतलेलं आहे की जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात कुठल्याही हॉटेलला जाऊन कुठलाही अन्नपदार्थ खायला घेतल्यास त्यात हळद असण्याची शक्यता जवळपास 100 टक्के असते," असं ब्रिटनमधील सेलिब्रिटी शेफ आणि खानपानावर लेखन करणाऱ्या सुप्रसिद्ध लेखिका परवीन अश्रफ मिश्कीलपणे म्हणतात.

2013 साली अमेरिकन पॉप गायिका बियोन्सेनं वजन घटवण्यासाठी पुरस्कार केलेला आहार "बियोन्से डायट" या नावाने गाजला. या आहारात लाल मिरची, मेपल सिरप, लिंबू आणि पाण्याचा समावेश होता.

गरोदरणानंतर स्टेजवर पदार्पण करण्याआधी गरोदरपणात वाढलेलं वजन घटवण्यासाठी बियोन्सेनं या आहाराचं काही दिवस सेवन केलं होतं.

तिच्या घटलेल्या वजनामुळे आणि तिच्या प्रचंड लोकप्रियतेमुळे हा आहारही तितकाच गाजला. पण नंतर आहारतज्ञांनी तो धुडकावून लावत हा आहार अशास्त्रीय असल्याचा निष्कर्ष काढला. पण सांगायचा मुद्दा हा की लाल मिरचीचा पुरस्कार खुद्द बियोन्सेनं देखील केलेला आहे.

मसाले आरोग्यासाठी लाभदायक असल्याचे सगळे हे दावे कितपत खरे आहेत? मसाल्यांमुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढून झालेला आजार बरा होतो का? या दाव्यांना काही शास्त्रीय आधार आहे का? याचा शोध घेण्याचा प्रयत्न बीबीसीने केला.

मिरची आरोग्याला कितपत लाभदायक?

मसाल्यांमध्ये सर्वात जास्त वापरला जाणारा आणि लोकप्रिय असलेला पदार्थ म्हणजे हिरवी आणि लाल मिरची. आरोग्याला मिरची फायदेशारी आहे की नाही ते तपासणारे अनेक प्रयोग झालेले आहेत. यामधून मिरचीच्या सेवनाचे शरीरावर होणारे अनुकूल आणि प्रतिकूल असे दोन्ही परिणाम समोर आले.

कॅप्ससीन हा मिरचीमध्ये आढळणारा प्रमुख घटक पदार्थ आहे. जेव्हा आपण मिरचीचं सेवन करतो तेव्हा हे कॅप्ससीनचे मॉलिक्युल्स तापमान नियंत्रित करणाऱ्या रिसेप्टर्सवर प्रक्रिया करायला सुरुवात करतात. कॅप्ससीनमधील घटक पदार्थांमुळे मेंदूकडे सिग्नल्स जातात आणि शरीरात उष्णता निर्माण होत असल्याचा भास होतो.

कॅप्ससीनमुळे दीर्घायुषी व्हायला मदत होते, असा निष्कर्षही काही प्रयोगांमधून काढला गेलेला आहे.

आठवड्यातून किमान 4 वेळा मिरचीचा समावेश असलेला आहार घेणाऱ्या लोकांमधील मृत्यूदर कमी असल्याचं 2019 सालच्या इटलीमधली एका प्रयोगातून समोर आलं होतं. यासाठी मिरची जास्त प्रमाणात खाणाऱ्या व न खाणाऱ्या लोकांचे दोन वेगवेगळे गट पाडून त्यांचा अभ्यास करण्यात आला.

अर्थात या अभ्यासात सहभागी असलेल्या लोकांमंधील खानपानाच्या इतर सवयींचा (जसे की धुम्रपान, मद्यपान, व्यायाम इत्यादी) देखील विचार केला गेला. 2015 साली चीनमध्ये पार पडलेल्या संशोधनातून देखील हाच निष्कर्ष समोर आला.

या प्रयोगासाठी 50,000 चीनी लोकांच्या आरोग्य मापकांचा अभ्यास केला गेला. या लोकांनी केलेलं मिरचीचं सेवन आणि त्यांच्या आरोग्य निर्देशकांवर देखरेख ठेवली गेली‌. यातून असं लक्षात आलं की आठवड्यातून एकदा तिखट जेवणाऱ्या लोकांच्या तुलनेत रोज तिखट आहाराचं सेवन करणाऱ्या लोकांमधील मृत्यूचा धोका 14 टक्क्यांनी कमी झालेला होता.

लु कुयी हे हार्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ मध्ये आहारतज्ज्ञाचे प्राध्यापक आहेत. "मसाले युक्त अन्नाचं सेवन केल्यानं मृत्यूची शक्यता कमी होते, हे अभ्यासातून आढळून आलेलं आहे. विशेषत: कर्करोग, हृदय विकार आणि श्वासोच्छ्वास निगडीत विकारांमुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या यामुळे कमी झाल्याचं दिसून आलंय," असं त्यांनी सांगितलं.

अर्थात याचा अर्थ अचानक जास्त प्रमाण मिरची खायला सुरुवात केली की लगेच आरोग्य सुधारतं, असा अजिबात नाही. ही एक दीर्घकालीन प्रक्रिया आहे. कमी प्रमाणात पण रोज दीर्घकाळासाठी आहारात मिरचीचा समावेश असल्यावर हे अनुकूल परिणाम पाहायला मिळतात.

चीनमधील हे संशोधन जवळपास 7 वर्ष चालू होतं. सहभागी असलेल्या लोकांचे आरोग्य निर्देशांक 7 वर्ष अभ्यासले गेले आणि नंतर हा निष्कर्ष निघाला.

संशोधक लु कुयी यांना फक्त मिरचीच्या सेवनाचे परिणाम अभ्यासायचे होते. त्यामुळे त्यांनी सहभागी लोकांचे आरोग्य निर्देशक मोजताना इतर घटकांचा देखील विचार केला. जसे की वय, लिंग, शैक्षणिक पात्रता, वैवाहिक स्थिती, आहार, धुम्रपान, मद्यपान आणि व्यायामाच्या सवयी इत्यादी.

मिरची खाणाऱ्या लोकांमध्ये आजार बळकावण्याची शक्यता कमी होण्यामागचं प्रमुख कारण कॅप्ससीन असल्याचं कुयी मानतात.

"मसाले युक्त पदार्थांमधील कॅप्ससीन या घटक पदार्थामुळे चयापचय स्थिती सुधारल्याचंही आढळून आलेलं आहे. लिपिड प्रोफाइल, रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण आणि शरिराच्या आत आलेली सूजही यामुळे कमी होते. हे सगळं आम्ही केलेल्या प्रयोगात दिसून आलंय", असं कुयी म्हणाले.

कॅप्ससीनमुळे भूक कमी होते आणि शरीरातील कॅलरीज सुद्धा अधिक प्रमाणात खर्ची होतात. ज्याचा फायदा शेवटी वजन घटवण्यासाठी होतो, असंही काही प्रयोगांमधून आढळून आलेलं आहे.

झुमिन शी या कतार विद्यापीठातील मानवी आहार विज्ञान विभागात सहाय्यक प्राध्यापिका म्हणून काम करतात. मिरचीच्या सेवनामुळे लठ्ठपणा आणि उच्च रक्तदाबाचा धोका कमी होतो, असं त्यांना आपल्या अभ्यासातून आढळून आलंय.

मिरचीचे आरोग्यासाठी इतके सगळे फायदे दिसल्यानंतर मेंदूची वाढ आणि विचार क्षमता विकसित होण्यातही मिरची प्रभावी ठरते का?, याचा शोध घ्यायचं त्यांनी ठरवलं. या निकषांवर समोर आलेले निकाल त्यांच्यासाठी सुद्धा एक आश्चर्याचा धक्का होता.

चीनमध्ये झालेल्या प्रयोगाची आकडेवारी शी यांनी अभ्यासायला घेतली. तेव्हा त्यांना कळालं की मेंदूच्या आणि वैचारिक क्षमतेच्या वाढीवर मिरचीचा परिणाम सकारात्मक नव्हे तर नकारात्मक होता. आहारातून मिरचीचं सेवन जास्त करणाऱ्या लोकांची वैचारिक क्षमता ही कमी असल्याचं त्यांना आढळून आलं.

विशेषतः स्मरणशक्तीवर त्याचा होणारा विपरीत परिणाम हा ठळकपणे समोर आला. प्रतिदिन 50 ग्रॅम मिरचीचं सेवन करणाऱ्या लोकांची स्मरणशक्ती कमजोर होण्याचा धोका दुपटीने वाढला असल्याचं या प्रयोगातून समोर आलं.

अर्थात ही माहिती प्रयोगात सहभागी झालेल्या लोकांनी स्वतः सांगितलेली आहे. ती कुठल्या यंत्र अथवा शास्त्रीय चाचणीतून मोजली गेली नाही. त्यामुळे या माहितीची विश्वासाहर्ता कितपत आहे, हा सवाल अगदीच गैरलागू ठरणार नाही.

तिखट खाल्ल्यानंतर जीभेला आणि शरिरात होणारी जळजळ हा कायमच शास्त्रज्ञांसाठी कुतूहलाचा विषय राहिलेला आहे. मिरचीचं सेवन केल्यानं आकलनक्षमता का कमी होते, याचं कारण कदाचित याच जळजळीत दडलेलं असावं, असा शास्त्रज्ञांचा कयास आहे.

कोणत्याही झाडाची चव जीभेला जळजळ अथवा तापट का असावी, याचं कारण त्या झाडाच्या उत्क्रांतीत दडलेलं आहे. धोक्यापासून स्वत:चं संरक्षण करत स्वतःला नष्ट होण्यापासून वाचवण्यासाठी सजीव कायम उत्क्रांत होत असतात.

ही मिरचीचं झाडे सुद्धा कीटकांपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी या जळजळ उत्पन्न करणाऱ्या चवीमध्ये बदलली असावीत, असं उत्क्रांतीचा सिद्धांत सांगतो.

"ही जळजळ उत्पन्न करणारी वृत्ती म्हणजे या मिरचीच्या झाडांमध्ये विषाचे अंश असल्याचा पुरावा आहे. कीटकांनी झाडावर हल्ला करू नये म्हणून निसर्गाने केलेली ही तजवीज आहे.

या विषामुळे झाडाला कडू अथवा तिखट चव येते. पण या विषाचा माणसावर तितका परिणाम होत नाही. कारण मानवी शरिराचा आकार बघता या झाडातील विषाचं प्रमाण अत्यल्प असतं. हा कडवड अथवा तिखटपणा फक्त सूक्ष्म कीटकांसाठी विषारी ठरतो.

एका अर्थाने हे अत्यल्प विष मानवी शरिरासाठी हानीकारक नव्हे तर लाभदायक असतं. उदाहरणार्थ कॉफीचं झाड. त्यातल्या कडवडपणामुळे हे कीटकांसाठी विषारी ठरतं. या विषारीपणातून हे झाड कीड लागण्यापासून स्वतःचा बचाव करत कीटकांना परावृत्त करतं. पण हे अत्यल्प प्रमाणातील विष आणि त्यातून येणारा कटवडपणा मानवी शरीराला लाभदायकच ठरतो.

हा विषारी कडवटपणा म्हणजेच कॅफिन. कॉफी मधला प्रमुख घटक पदार्थ. तो मानवी शरिराची पचनक्रिया वेगवान बनवतो. त्यामुळेच कॉफी घेतल्यावर आपल्याला ताजेतवाने झाल्यासारखं वाटतं. पण अति प्रमाणात घेतल्यावर त्याचे प्रतिकूल परिणाम मानवी शरिरावार देखील दिसून येतात.

कारण प्रमाण अत्यल्प असलं तरी ते शेवटी विषच आहे," ब्रिटन मधील न्यू कॅसल युनिव्हर्सिटी मधील ह्युमन न्यूट्रिशन रिसर्च सेंटर पॉप्युलेशन हेल्थ सायन्सेस इन्स्टिट्यूट मधील वरिष्ठ प्राध्यापिका क्रिस्टन ब्रँड्ट यांनी चवीमागील उत्क्रांतीचं विज्ञान उलगडून सांगितलं.

ब्रिटनच्या बर्मिंगहॅममधील ऑस्टन मेडिकल स्कूलमधील आहारतज्ञ ड्युअन मेलर म्हणाले, "आपण खात असलेल्या अन्नाला बऱ्याचदा थोडी कटवड अथवा तिखट चव असते. ज्याने जळजळ निर्माण होते.

माणसाला ही चव आवडते. ती त्या झाडामध्ये असलेल्या विषामुळे आलेली असते. पण माणसासाठी ते विषाचं प्रमाण अत्यल्प असल्यामुळे काळजीचं काही कारण नसतं. कीटकांनी आपल्याला खाऊ नये म्हणून झाडांनी उत्क्रांतीच्या टप्प्यात केलेली ती सोय असते‌.

कॉफी मधलं कॅफिन, चहा मधील टॅनिन्स हे विषारी घटक पदार्थ माणसाला तरतरी आणणात पण इतर कीटकांसारख्या प्रजातींसाठी ते जीवघेणे ठरतात.

दुसऱ्या बाजूला मानवी शरिराला फायदेशीर ठरू शकतील असेही काही घटक पदार्थ या मसाल्यांमध्ये असतात. पण त्यांचंही प्रमाण अत्यल्पच असल्यानं हा फायदा कितपत होतो, याबाबत संदिग्धता आहे.

उदाहरणार्थ पॉलीफेनॉल्स : हा घटक पदार्थ अनेक झाडांमध्ये आढळून येतो. हा घटक शरीराच्या आतली सूज कमी करतो. मसाले आरोग्यासाठी लाभदायक असतात कारण मसाल्यांमध्ये पॉलीफेनॉल्स असतात.

पण 2014 च्या संशोधनानुसार त्याचं प्रमाण कमी असल्यानं इतक्या कमी प्रमाणात ते मानवी शरिराला नेमके कितपत फायदेशीर ठरतात, याबाबत ठोसपणे सांगता येत नाही. मिरची सह इतर मसाल्यांचे अनेक फायदे आजकाल सांगितले जात असले तरी प्रत्यक्ष प्रयोगात आढळून आलेले फायदे हे पुरेसे स्पष्ट नाहीत.

हळद किती गुणकारी?

मसाल्यांमध्ये आरोग्याला लाभदायक म्हणून लोकप्रिय असलेला आणखी एक पदार्थ म्हणजे हळद. करकमिन (Curcumin) हा हळदीमधील प्रमुख घटक पदार्थ आहे ज्यामुळे हळदीला औषधी गुणधर्म प्राप्त होतो, असं मानलं जातं. करकमिनचे मॉलीक्युल औषध निर्मिती प्रक्रियेत सुद्धा वापरले जातात.

अनेक संशोधक असं मानतात की, मसाले हे प्रत्यक्षात आरोग्याला लाभदायक नाहीत. हे मसाले ज्या अन्नपदार्थांसोबत आपण खातो त्यामुळेच गुण येतो

हळदीमध्ये खरंच औषधी गुणधर्म आहेत, याचे ठोस शास्त्रीय पुरावे मात्र उपलब्ध नाहीत.

प्रयोगशाळेत केल्या गेलेल्या काही प्रयोगांमधून करकमिनमध्ये कॅन्सरचा प्रतिकार करण्याची क्षमता असल्याचं आढळून आलं आहे. पण प्रयोगशाळा आणि मानवी शरीर या दोन पूर्ण वेगळ्या गोष्टी आहेत. प्रयोगशाळेतील कृत्रिम वातावरणात आणि मानवी शरिरातील करकमिनचे गुणधर्म आणि वागणूक वेगवेगळी असू शकते.

एखादा घटक पदार्थ प्रयोगशाळेत कृत्रिम वातावरणात कसा वागतो आणि जिवंत शरिरात गेल्यावर कसा वागतो यातील फरक म्हणजे बायोअव्हेलिबिलिटी (Bioavailability). एखादा पदार्थ जसा प्रयोगशाळेत कृत्रिम वातावरणात काम करतो तसाच जिवंत मानवी शरिरात गेल्यानंतर काम करत असल्यास त्याची बायोअव्हेलिबिलिटी जास्त / उत्तम आहे, असं म्हणता येईल.

दुर्दैवानं करकमिनची किंबहुना बहुतांशी मसाल्यांची बायोअव्हेलिबिलिटी कमजोर असते. त्यामुळे प्रयोगशाळेत त्यांचे औषधी गुणधर्म सिद्ध झाले तरी प्रत्यक्षात ते तितके प्रभावी ठरताना दिसत नाहीत.

काही प्रमाणात ठराविक आजारांवर ठरावीक मसाल्याचे पदार्थ कामी येऊ शकतात. ल्यूपस आणि रेमटॉईड अथ्रायटिससारख्या ऑटो इम्युन आजारांचा सामना करत असलेल्या रूग्णांना रोज अदरक खाल्ल्यानंतर थोडाफार आराम मिळाल्याचं 2023 सालच्या एका अभ्यासातून दिसून आलं होतं.

हळदी सारख्या मसाल्यांकडे पर्यायी औषधं म्हणून पाहण्याचा प्रघात पाश्चात्य जगात पुन्हा सुरू झाला असल्याचं निरीक्षण येल विद्यापीठातील इतिहासाचे प्राध्यापक पॉल फ्रीडमन यांनी नोंदवलं. या आधी मध्ययुगात सुद्धा पाश्चात्य देश हळदीकडे औषधी आणि उपयुक्त वनस्पती म्हणून पाहत असत.

"अन्नाला संतुलित बनवण्यासाठी लोक मसाल्यांचा वापर करत आलेले आहेत. काही खाद्यपदार्थ हे अतिशय उष्ण तर काही अगदी थंड, काही अगदीच ओलसर तर काही फारच कोरडे असतात. यात काहीतरी संतुलन असावं, असं लोकांना वाटत असे. त्यामुळे लोकांनी मसाले वापरायला सुरुवात केली.

उदाहरणार्थ मासे अतिशय थंड आणि ओलसर असतात. त्यात गरम आणि कोरडे मसाले टाकले तर संतुलन होईल म्हणून मसाल्यांचा वापर केला जातो," असं फ्रीडमन सांगतात.

अन्नामधील औषधी गुणधर्म शोधून त्यानुसार आहार घेण्याचा हा प्रघात आयुर्वेदातही अवलंबला गेला आहे. भारतासारख्या देशात हजारो वर्षांपासून आयुर्वेदाचा वापर प्रचलित आहेत. आयुर्वेदात मसाल्यांमधील औषधी गुणधर्मांवर चर्चा केलेली आहे.

"आजकाल संतुलित आहाराला महत्व दिलं जात आहे. खाद्यपदार्थांमधील विशेषतः मसाल्यांमधील औषधी गुणधर्मांवर जोर दिला जात आहे. आयुर्वेदाकडे पाश्चात्य जगही कुतुहलाने बघत आहे. 50 वर्षांपूर्वी ही परिस्थिती नव्हती. आयुर्वेदाला थोतांड आणि अशास्त्रीय म्हणून नाकारलं जात असे. फक्त आधुनिक वैद्यकशास्त्रातील ॲन्टीबायोटिक्सवरच विश्वास दाखवला जात असे. मात्र आता हा दुजाभाव कमी होत चालला आहे. आधुनिक वैद्यकशास्त्राबरोबरच प्राचीन आयुर्वेदालाही आता पाश्चात्य जगात स्वीकाहार्यता मिळायला सुरुवात झाली आहे," असं निरीक्षण पॉल फ्रीडमन यांनी नोंदवलं.

युनिव्हर्सिटी ऑफ मिनेसोटा इन्स्टिट्यूट फॉर थेरपटिक्स डिस्कव्हरी ॲन्ड डेव्हलपमेंट या संस्थेत संशोधक म्हणून काम करत असताना प्राध्यापक कॅथरीन नेल्सन यांनी करकमिनचे औषधी गुणधर्म तपासणारा एक प्रयोग केला. त्यांनी करममिनच्या संयोगापासून (जो हळदीमधील प्रमुख घटक पदार्थ आहे) एक औषध बनवलं. टेस्ट ट्यूबवरील पेशींमध्ये हे संयुग टाकून पाहिलं. हे औषध टाकल्यानं पेशींवर नेमके काय परिणाम होतात, याचा अभ्यास केला. त्यांना लक्षात आलं की औषध म्हणून करकमिनची उपयुक्तता अगदी शून्य आहे. कारण मुळात करकमिन हा घटक बायो अव्हेलेबल नाही. एकदा पचन होऊन करकमिन मानवी शरिरात गेल्यानंतर त्याचा काहीच उपयोग होत नाही. एकतर लहान आतडे हे करकमिन शोषून घेत नाहीत. मोठे आतडे करकमिनला जरूर शोषून घेतात. पण तिथल्या प्रोटिन्ससोबत प्रक्रिया झाल्यानंतर करकमिनचे गुणधर्म बदलतात. या बदललेल्या गुणधर्मांचा करकमिन आरोग्याच्या दृष्टीने निरूपयोगीच असतो. त्यामुळे हळद औषधी असते, हा प्रचलित समज कॅथरीन आपल्या प्रयोगातून मोडून काढतात.

पण हळदीचा दुसरा एक अप्रत्यक्ष फायदा जरूर आहे आणि तो करमिनमुळे होत नाही. जेवणातील पदार्थ हळदीसोबत घेताना ते अन्न बनवण्याच्या प्रक्रियेत उच्च तापमानात शिजवताना अन्नपदार्थांची हळदीसोबत प्रक्रिया होऊन तिचे गुणधर्म बदलतात. हे बदलेले गुणधर्म शरिराला फायदेशीर ठरू शकतात, असं कॅथरिन मानतात.

"पण हा फायदा फार मोठ्या प्रमाणावर होणारा नसतो. त्यामुळे फक्त आहारातील एक लाभदायक पदार्थ म्हणून हळदीचं सेवन करा. त्याकडे कुठल्याही आजाराचं औषध म्हणून मात्र पाहू नका," असा काळजीवाहू सल्ला कॅथरीन देतात.

ठोस पुराव्यांचा अभाव

मिरची आणि हळदीवर बरंच संशोधन झालेलं आहे. पण आरोग्याला त्याचा थेट फायदा होतो, हे ठोसपणे अजूनही समोर आलेलं नाही. बरेचशे फायदे हे अप्रत्यक्ष आहेत.

हे पदार्थ खाण्याचे जे फायदे लक्षात आलेले आहैत, ते फक्त निरीक्षणाच्या आधारावर. त्यामुळे या पदार्थांना औषधी म्हणून मान्यता देताना शास्त्रज्ञ कचरताना दिसतात. शिवाय जो सिद्धांत प्रयोगशाळेत सिद्ध झालाय तशीच प्रतिक्रिया हे पदार्थ खाल्ल्यानंतर मानवी शरिरात देतील, याची सुद्धा शाश्वती नसते.

उदाहरणार्थ 2019 साली इटलीमध्ये केल्या गेलेल्या प्रयोगातून मिरचीचं सेवन जास्त असलेल्या लोकांमधील मृत्यूचा धोका कमी असल्याचं पाहायला मिळालं. पण हा मिरचीचा परिणाम आहे की प्रयोगात सहभागी झालेल्या लोकांचं आरोग्य मूळात:च चांगलं होतं, हे स्पष्ट करणारा कुठलाही ठोस पुरावा उपलब्ध नाही.

मिरची जास्त प्रमाणात खाणारे लोक आरोग्यदायी असतात की मिरची खाल्ल्यामुळे त्यांचं आरोग्य सुधारलं, हे कोडं न सुटणारं आहे.

हा प्रयोग पार पाडणाऱ्या अभ्यासिका मरिलौरा बोनाशिओ यांच्या मते प्रत्यक्ष मिरचीच्या गुणधर्मापेक्षा कोणत्या अन्नपदार्थांसोबत तिचं सेवन केलं जात आहे, ही गोष्ट निर्णायक ठरते. मरिलौरा इटलीतील मेडिटेरियन न्यूरॉलॉजिकल इन्स्टिट्यूटमध्ये एपिडेमिलॉजिस्ट म्हणून काम करतात.

"या भूमध्य समुद्राला लागून असलेल्या देशांमध्ये (Mediterranean countries) आहारात मिरचीचं सेवन मोठ्या प्रमाणात केलं जातं. पास्ता, भाजीपाला आणि कडधान्यांमध्ये मिरची टाकून खाण्याचा प्रघात इथे पडलेला आहे. हाच इथल्या लोकांचा मुख्य पारंपारिक आहार आहे. इथल्या लोकांच्या चांगल्या आरोग्याचं गमक या आहारात आहे.

भाजीपाला आणि कडधान्ये हे पौष्टिक असतात. त्यामुळे त्यांचे अनुकूल आरोग्य निर्देशक हा भाजीपला आणि कडधान्याच्या सेवनाचाही परिणाम असू शकतो, असं मरिलौरा मानतात.

मांसामध्ये मसाले टाकल्यामुळे मांसामधील कर्करोग उत्पन्न करणारे घटक निष्क्रिय होऊ शकतात. भूमध्य प्रदेशात बर्गर मिरची आणि तत्सम मसाले टाकून बनवले जातात. मसाले हे अन्नाला अधिक काळ टिकवून ठेवण्यात मदत करतात.

मसाले हे नैसर्गिक अन्नपरिरक्षक (preservatives) असल्यामुळे कुठलाही पदार्थ कमी हानीकारक बनवण्याची त्यांची क्षमता असते.

थोडक्यात मसाल्यांचे स्वतःचे असे आरोग्याला लाभदायक असणारे गुणधर्म नाहीत. पण हेच मसाले ठराविक अन्नपदार्थांमध्ये टाकल्यावर तो अन्न पदार्थ शरिरासाठी अधिक पौष्टिक आणि कमी हानिकारक बनतो.

"हल्ली बऱ्याच प्रदेशांमध्ये मसाल्यांकडे मिठाचा पर्याय म्हणून पाहिलं जात आहे. अन्नाला चव यावी म्हणून आपण त्यात मीठ टाकतो. पण मिठामध्ये असलेला सोडियम हा घटक पदार्थ मानवी शरीरासाठी हानिकारक आहे. मिठाप्रमाणेच मसाल्यांमुळेही अन्नाची चव वाढते. त्यामुळे मिठाऐवजी चव आणण्यासाठी मसाल्यांचा पर्याय वापरला जात आहे.

मसाल्यांचा थेट आरोग्याला काही फायदा नसला तरी तोटा सुद्धा नाही. त्यामुळे मीठापेक्षा मसाले वापरणे कधीही चांगलंच," असं मत न्यूयॉर्कमधील लंगोन हेल्थ मेडिकल सेंटरमधील प्राध्यापिका लिपी रॉय यांनी व्यक्त केलं.

त्यामुळे भाज्या असो अथवा कडधान्य त्यामध्ये थोडे मसाले टाकून त्यांचा आस्वाद जरूर घ्या. त्याचा कुठलाच तोटा तुम्हाला होणार नाही. पण त्याचा कुठला मोठा फायदा सुद्धा होणार असल्याचं समोर आलेलं नाही. त्यामुळे मसाल्याचं सेवन जरूर करा. पण त्यातील औषधी गुणधर्मांमुळे ते आपला आजार बरा करतील, हा भ्रम पाळू नका. इतकंच.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)