Ind vs Aus: श्रेयस अय्यर, आर अश्विन फॉर्मात, वर्ल्ड कप टीममध्ये कोणाला संधी, कोणाला डच्चू?

श्रेयस अय्यर

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, मनोज चतुर्वेदी
    • Role, ज्येष्ठ क्रीडा पत्रकार, बीबीसी हिंदीसाठी

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात इंदूरमध्ये झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 99 धावांनी पराभव करत, तीन सामन्यांच्या मलिकेत 2-0 अशी विजयी आघाडी मिळवली आहे.

मात्र या मालिकेच्या पहिल्या दोन सामन्यात भारतीय संघातील वेगवेगळ्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केल्यामुळे आगामी विश्वचषकासाठी अंतिम अकरा जणांचा संघ निवडताना निवड समितीची कसोटी लागणार आहे हे मात्र नक्की.

भारतीय क्रिकेट रसिकांसाठी ही चांगली बातमी असली तरी प्रशिक्षक, कर्णधार आणि निवड समितीसमोर चांगली कामगिरी केलेल्या खेळाडूंना न्याय देण्याचं आव्हान असणार आहे.

मोहाली येथे झालेल्या पाहिल्या सामन्यात विजय मिळवून भारतीय संघाने एकदिवसीय, टी-ट्वेन्टी आणि कसोटी क्रमवारीमध्ये पहिलं स्थान पटकावलं.

त्यानंतर 24 सप्टेंबरला झालेल्या दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून विश्वचषकात सहभागी होताना क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असणारा संघ म्हणून सहभागी होण्याचा बहुमान मिळवला आहे.

विशेष बाब म्हणजे मागील दोन्ही विश्वचषकांमध्ये पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या संघानीच विजय मिळवला आहे.

श्रेयस अय्यरने कालच्या सामन्यात शतक झळकावलं. खरं म्हणजे भारतीय संघ विश्वचषकाची तयारी करत असताना श्रेयस अय्यर हा निवड समितीच्या योजनांचा एक महत्त्वाचा भाग होता.

मात्र दुखापतीतून बरा होऊन संघात परतल्यानंतर त्याला लय सापडत नसल्याने भारतीय संघ चिंतेत होता.

त्यामुळं भारताकडून चौथ्या क्रमांकावर कोण फलंदाजी करणार असा प्रश्न निर्माण झाला होता. संघ व्यवस्थापनाने चौथ्या क्रमांकासाठी वेगवेगळे प्रयोगही केले होते.

पण, विश्वचषकासाठी भारतीय संघात चौथ्या क्रमांकावर कोण फलंदाजी करणार या प्रश्नाचं ठोस उत्तर काही मिळत नव्हतं.

शुभमन गिल आणि श्रेयस अय्यरची चमकदार कामगिरी

आशिया चषक स्पर्धेमध्ये भारताकडून चौथ्या क्रमांकावर के. एल. राहुलला फलंदाजीसाठी उतरवण्यात आलं आणि त्याने पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात शतक झळकावून या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी मजबूत दावेदारी सादर केली.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध सध्या सुरू असलेल्या मालिकेच्या पहिल्या सामन्यात श्रेयस फलंदाजीला उतरला आणि रनआउट झाला.

इंदूरमध्येही जर त्याने चांगली कामगिरी केली नाही तर विश्वचषकासाठी निवडल्या जाणाऱ्या अंतिम अकरा जणांच्या संघात त्याला स्थान मिळणार नाही अशा चर्चा त्यावेळी सुरू झाल्या होत्या.

शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर

फोटो स्रोत, Getty Images

मात्र श्रेयसने इंदूरच्या होळकर स्टेडियमवर शतक झळकावून चौथ्या क्रमांकावर तो किती चांगली फलंदाजी करू शकतो हे दाखवून दिलेलं आहे.

116.66 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना त्याने 11 चौकार आणि तीन षटकारांसह 105 धावा केल्या. या कामगिरीमुळे श्रेयसचा गमावलेला आत्मविश्वासही परत आला आहे, ज्याचा फायदा भारताला विश्वचषकात नक्कीच होणार आहे.

दुसरीकडे शुभमन गिल सध्या प्रचंड फॉर्मात आहे. 2023 मध्ये तब्बल पाच शतकं झळकावून शुभमनने विश्वचषकात भारताचा तो हुकमी एक्का बनू शकतो हे दाखवून दिलं आहे.

आधी मोहालीमध्ये अर्धशतक आणि इंदूरच्या सामन्यात तडाखेबंद शतक झळकावून विश्वचषकामध्ये भारताकडून डावाची सुरुवात करण्यास तो तयार असल्याचं दिसतंय.

सूर्यकुमार यादव तळपला

शुभमन सध्या सुरुवातीपासूनच अतिशय आक्रमक फलंदाजी करत असल्याने त्याचा जोडीदार असलेल्या रोहित शर्माला फलंदाजीला उतरल्यावर आरामात खेळता येणार आहे.

आधी सेट होऊन नंतर आक्रमक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या हिटमॅन रोहितला शुभमनच्या रूपाने चांगला जोडीदार मिळाला आहे.

शुभमन गिल त्याला हवं तेंव्हा धावांची गती वाढवू शकतो हे त्याने वेळोवेळी सिद्ध केलं असल्याने सध्यातरी भारताकडून डावाची सुरुवात करणाऱ्या फलंदाजांची भारताला चिंता नाहीये.

सूर्यकुमार यादव

फोटो स्रोत, Getty Images

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

दोन फिल्डर्सच्या मधून जागा शोधून चौके मारण्याची आणि क्रीझ सोडून उत्तुंग षटकार खेचण्याची शुभमनची क्षमता वादातीत आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन सामन्यांमध्ये टी-ट्वेन्टीचा सुपरस्टार समजल्या जाणाऱ्या सूर्यकुमार यादवनेदेखील चांगली कामगिरी केलीय.

मात्र त्याआधी एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याच्या फलंदाजीच्या शैली आणि क्षमतेवर प्रश्न उपस्थिती केले जाऊ लागले होते. त्याला ट्वेन्टी ट्वेन्टीमधील कामगिरीची एकदिवसीय सामन्यांमध्ये पुनरावृत्ती करताना अडचण येत होती.

मात्र तरीही सूर्यकुमार यादवला निवड समितीने विश्वचषकाच्या संघात स्थान दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

मोहालीमध्ये झालेल्या सामन्यात त्याने त्याच्या फलंदाजीमध्ये काही बदल करत, अनावश्यक जोखमीचे फटके टाळत अर्धशतक झळकावलं आणि तो एकदिवसीय सामन्यांमध्ये देखील भारतीय संघाकडून खेळू शकतो हे दाखवून दिलं.

इंदूरच्या सामन्यात त्याने 194.59 च्या स्ट्राईक रेटने 37 चेंडूत 72 धावांची खेळी खेळून भारताची धावसंख्या 399 धावांपर्यंत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आणि हे दाखवून दिलं की शेवटच्या ओव्हर्समध्ये आक्रमक फलंदाजीची गरज असताना तो भारतीय संघासाठी प्रचंड उपयोगी ठरू शकतो.

सूर्यकुमारने डावाच्या 44व्या ओव्हर मध्ये कॅमेरून ग्रीनला चार चेंडूंवर चार सिक्स मारून ग्रीनचं मनोबल तर नक्कीच तोडलं आहे.

सचिन तेंडुलकर जसा शेन वॉर्नच्या स्वप्नात दिसायचा तसा सूर्य ग्रीनच्या स्वप्नात दिसण्याची शक्यता आहे.

सूर्या आणि ईशान किशनच्या चमकदार कामगिरीमुळे नेमकं काय घडलंय?

सूर्यकुमार यादव आणि ईशान किशन यांनी चांगली फलंदाजी केली असली तरी त्यांना अंतिम अकरामध्ये स्थान मिळणं थोडं अवघड आहे.

असं असलं तरी त्यांनी दे दाखवून दिलंय की गरज पडली तर भारताचे राखीव खेळाडू देखील मैदानात उतरून विरोधी संघाची दाणादाण उडवण्यास सक्षम आहेत.

विश्वचषकासाठी निवडल्या गेलेल्या भारतीय संघामध्ये रविचंद्रन अश्विनला स्थान देण्यात आलेलं नाही. विश्वचषकासाठी भारताकडे एकही ऑफ स्पिनर नसल्यावरून अनेकांनी निवड समितीवर टीकाही केलेली होती.

मात्र आशिया चषकामध्ये अक्षर पटेल जखमी झाला आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी आश्विनची निवड करण्यात आली. यावरून हे दिसतं की संघ व्यवस्थापन अक्षरच्या जागी अश्विनला संघात घेण्याचा विचार करत आहे.

ईशान किशन

फोटो स्रोत, Getty Images

इंदूरच्या सामन्यात अश्विननेही तीन कांगारूंचा बळी घेऊन हे दाखवून दिलंय की तो अजूनही भारताकडून प्रमुख गोलंदाज म्हणून खेळू शकतो.

त्याला खेळपट्टीवरून स्पिन तर मिळत होताच पण आश्विनकडे बॉलिंग करताना वेग कमी जास्त करण्याचं, वेगवेगळे बदल करून गोलंदाजी करण्याचं असणारं कौशल्य त्याला भारताचा प्रमुख गोलंदाज बनवतं.

आश्विन गोलंदाजी करत असताना डावखुरा डेव्हिड वॉर्नर उजव्या हाताने फलंदाजी करू लागला ही आपण सगळ्यांनी बघितलं.

संघ व्यवस्थापनाची डोकेदुखी वाढली आहे

अगदी काही दिवसांपूर्वी असं म्हटलं जात होतं की विश्वचषक तोंडावर आलाय आणि भारताचे फलंदाज आणि त्यांची क्रमवारीच ठरत नाहीये.

याला कारणंही अगदी तशीच होती. के. एल. राहुल, श्रेयस अय्यर हे प्रमुख खेळाडू जखमी झाले होते आणि त्यांच्या जागी फलंदाजी करणारा सूर्यकुमार यादव लयीत खेळताना दिसत नव्हता.

मात्र आधी आशिया चषक आणि आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु असलेल्या मालिकेमध्ये या तिन्ही खेळाडूंनी अतिशय दमदार फलंदाजी केल्याने, विश्वचषकामध्ये अंतिम अकरा जणांच्या संघात कुणाची निवड करायची? हा प्रश्न निवडकर्त्यांसमोर तयार झालाय.

संघ व्यवस्थापन

फोटो स्रोत, Getty Images

फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये भारतीय संघ अतिशय मजबूत दिसत असला तरी ढिसाळ फिल्डिंगमुळे ऑस्ट्रेलियाच्या संघाकडून खेळणाऱ्या तळाच्या फलंदाजांनी पराभवाचं अंतर खूप कमी करण्यात यश मिळवल्याचं बघायला मिळालं.

भारतीय क्षेत्ररक्षकांनी अनेक कॅच सोडले त्यामुळे भारतीय संघाच्या फिल्डिंगबाबत थोडी चिंता निर्माण झालेली आहे.

विश्वचषक तोंडावर असताना भारतीय फिल्डर्सना अतिशय सतर्क राहावं लागणार आहे कारण विश्वचषकामध्ये एक चूक देखील महागात पडू शकते.

हेही नक्की वाचा

हा व्हीडिओ पाहिलात का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)