Aus vs Eng: नॅथन लॉयन, मैदानावरचं गवत कापणारा ते सलग 100 टेस्ट खेळणाऱ्या स्पिनरची गोष्ट

फोटो स्रोत, Ryan Pierse
- Author, पराग फाटक
- Role, बीबीसी मराठी
अॅशेस मालिकेतली मंगळवारपासून सुरू होणारी लॉर्ड्स कसोटी ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लॉयनसाठी सलग 100वी कसोटी असेल. आपल्या संघासाठी सलग 100 कसोटी खेळणाऱ्या मोजक्या खेळाडूंमध्ये लॉयनचा समावेश होऊ शकतो.
सलग 100 कसोटी सामने खेळण्यासाठी कामगिरीत अद्भुत सातत्य आणि फिटनेस असावा लागतो. लॉयनने दोन्ही आघाड्यांवर स्वत:ला सिद्ध केलं आहे. अॅलिस्टर कुक, अॅलन बॉर्डर, मार्क वॉ, सुनील गावस्कर, ब्रेंडन मॅक्युलम यांच्या मांदियाळीत लॉयनला स्थान मिळेल.
35 वर्षीय लॉयनच्या नावावर 121 कसोटीत 495 विकेट्स आहेत. लॉर्ड्स कसोटीत लॉयन ऐतिहासिक 500 विकेट्सचा टप्पा पार करु शकतो. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स पटकावणाऱ्यांच्या यादीत लॉयन आठव्या स्थानी आहे.
अॅशेस मालिकेतील पहिल्या कसोटीत लॉयनने कर्णधार पॅट कमिन्सला चिवटपणे साथ देत ऑस्ट्रेलियाला थरारक विजय मिळवून दिला होता.
दोन वर्षांपूर्वी भारताविरुद्ध लॉयनने शंभरावी टेस्ट खेळण्याचा विक्रमही केला होता. क्युरेटर ते ऑस्ट्रेलियाचा प्रमुख स्पिनर हे लॉयनचं संक्रमण प्रेरणादायी आहे.
100वी टेस्ट खेळणारा तो ऑस्ट्रेलियाचा 13वा आणि शेन वॉर्ननंतरचा दुसरा स्पिनर खेळाडू ठरला होता. लॉयनच्या कारकीर्दीचा घेतलेला आढावा.
ही गोष्ट आहे 2010-11 अशेस मालिकेदरम्यानची. ऑस्ट्रेलियाचा बॅट्समन माईक हसीला इंग्लंडच्या ग्रॅमी स्वॉनविरुद्ध चांगलं खेळायचं होतं. स्वॉनसारखी गुणकौशल्यं असलेल्या बॉलरच्या बॉलिंगवर सराव मिळाला तर चांगलं होईल असं हसीला वाटत होतं. शेफील्ड शिल्ड म्हणजे ऑस्ट्रेलियातल्या स्थानिक स्पर्धेतल्या काही स्पिनर्सनी हसीला बॉलिंगचा सराव दिला. मात्र त्याने हसीचं समाधान झालं नाही.
मालिकेच्या तयारीसाठी अॅडलेडमध्ये संपूर्ण संघाचं सराव शिबीर आयोजित करण्यात आलं होतं. तोपर्यंत हसीच्या कानावर एका मुलाचं नाव आलं होतं. अडलेडला सराव सुरू झाल्यानंतर हसीने ग्राऊंडची व्यवस्था बघणारे मुख्य क्युरेटर डॅमियन हॉघ यांना त्यांच्या चमूतल्या एका मुलाला बॉलिंगसाठी पाठवा अशी विनंती केली. त्यावेळी तो मुलगा कामाचा भाग असलेला रोलर चालवत होता.

फोटो स्रोत, EMMANUEL DUNAND
हॉघ यांनी त्या मुलाला सांगितलं- त्यांना स्वॉनसारखी बॉलिंग करणारा बॉलर सरावासाठी हवा आहे. तू रोलरचं काम थांबव आणि नेट्समध्ये जा. स्वॉनपेक्षा तू चांगला बॉलर आहेस हे सिद्ध कर. हा माझा आदेश आहे असं हॉघ म्हणाले. तो मुलगा हसला आणि काही मिनिटात हसीसमोर उभा राहिला.
दहा वर्षं डोमेस्टिक क्रिकेट खेळून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या हसीला या मुलाच्या बॉलिंगमध्ये काहीतरी खास जाणवलं. तांत्रिकदृष्ट्या तो मुलगा क्युरेटर म्हणजे मैदानाची जबाबदारी असणाऱ्या मंडळींपैकी एक होता.
ऑस्ट्रेलियाच्या संघातल्या बॅट्समनला सरावात बॉलिंग करणं हा त्याच्या कामाचा भाग नव्हता. पण हसीने त्या मुलातले गुण हेरले, संघव्यवस्थापनाला कल्पना दिली. सूत्रं हलली. काही महिन्यांनंतर ऑस्ट्रेलियाचा संघ श्रीलंका दौऱ्यासाठी विमानात बसला. त्या संघात तो मुलगा होता. त्याचं नाव होतं-नॅथन लॉयन.
दिग्गज शेन वॉर्नने निवृत्ती घेतल्यानंतर ऑस्ट्रेलियाची स्पिनर शोधता शोधता परवड झाली. मालिकेगणिक ते स्पिनर बदलू लागले. मनापासून स्पिनर मिळत नाही म्हटल्यावर त्यांनी कॅमेरुन व्हाईट आणि स्टीव्हन स्मिथ या कामचलाऊ स्पिनर्सना मुख्य स्पिनर म्हणून खेळवून पाहिलं.
तो प्रयोग तोंडावर आपटल्यानंतर पुन्हा शोध सुरू झाला. निवडसमिती ज्या स्पिनरला संधी द्यायची, त्याच्या बॉलिंगवर प्रतिस्पर्धी संघ तुटून पडायचे. असे 11 प्रयोग झाले. हसीसारख्या विश्वासार्ह व्यक्तीकडून शिफारस झाल्याने नॅथन लॉयनचा राष्ट्रीय संघासाठी विचार होऊ शकला.
पहिल्या टेस्टमध्ये लॉयनला खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. ऑस्ट्रेलियाने लॉयन आणि फास्ट बॉलर ट्रेंट कोपलँड यांना पदार्पणाची संधी दिली. फास्ट बॉलर्सचे सुरुवातीचे स्पेल झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकेल क्लार्कने लॉयनला बॉलिंगसाठी बोलावलं. पदार्पणातच डोक्यावरचे केस उडू लागलेल्या लॉयनने मनाजोगती फिल्डिंग सजवली. मैदानात सभोवताली पाहिलं.
क्युरेटरच्या कामामध्ये खेळपट्टी तयार करण्याचा समावेश होतो. त्यामुळे गॉलच्या फिरकीला साजेशी खेळपट्टी पाहून लॉयनचे डोळे विस्फारले होते. कीपर, एक स्लिप आणि पारंपरिक टेस्टची फिल्डिंग तयार झाली. छोटासा रनअप पूर्ण करून लॉयनने बॉल टाकला. त्याला फ्लाईट दिली होती.
श्रीलंकेचा महान बॅट्समन कुमार संगकाराने तो बॉल तटवून काढण्याचा प्रयत्न केला. मात्र बॉल टप्पा पडल्यानंतर उसळी घेऊन वळला आणि संगकाराच्या बॅटची कड घेऊन पहिल्या स्लिपमध्ये उभ्या असलेल्या कर्णधार क्लार्कने अफलातून कॅच पकडला. मैदानात एकच जल्लोष झाला.
पदार्पणात पहिल्याच बॉलवर संगकारासारख्या अनुभवी आणि स्पिन उत्तम खेळणाऱ्या बॅट्समनची विकेट घेतल्याने ऑस्ट्रेलियाच्या सर्व खेळाडूंनी लॉयनचं अभिनंदन करण्यासाठी त्याला गराडा घातला.

फोटो स्रोत, LAKRUWAN WANNIARACHCHI
टेस्ट क्रिकेटच्या प्रदीर्घ इतिहासात फक्त 20 बॉलर्सना ही किमया करून दाखवता आली आहे. पहिली विकेट मिळवण्यासाठी असंख्य बॉलर्सना महिनोंमहिने प्रतीक्षा करावी लागते. लॉयनने पहिल्या बॉलवर विकेट घेत ऑस्ट्रेलियाचा स्पिनर मीच असेन याची जणू ग्वाही दिली.
पहिल्या बॉलवर मिळालेल्या विकेटने लॉयन हुरळून गेला नाही. त्याने त्या डावात, पदार्पणाच्या टेस्टच्या पहिल्या डावात पाच विकेट्स घेण्याची करामत केली. स्पिनरचा प्रश्न मिटला, आता चिंता सोडा असं लॉयनने आपल्या कामगिरीतून संघव्यवस्थापनाला आणि निवडसमितीला दाखवून दिलं. लॉयनने पहिल्याच मॅचमध्ये संघाला जो विश्वास दिला तो कायम ठेवला.

फोटो स्रोत, LAKRUWAN WANNIARACHCHI
ब्रिस्बेन टेस्ट लॉयनची सलग 78वी टेस्ट आहे. सोप्या शब्दात सांगायचं तर 1 ऑगस्ट 2013 पासून ते शुक्रवारी सुरू झालेल्या ब्रिस्बेन टेस्टपर्यंत जेवढ्या टेस्ट ऑस्ट्रेलिया खेळलं आहे, लॉयन त्या सगळ्या खेळला आहे. सलग टेस्ट खेळण्याचा विक्रम तेच खेळाडू करू शकतात ज्यांच्या कामगिरीत सातत्य आहे आणि ज्यांचा फिटनेस तगडा आहे. लॉयनने या दोन्ही आघाड्या जीवापाड जपल्या आहेत.
संथपणे तेवत राहणाऱ्या समईप्रमाणे लॉयनने आपल्या कामाची मशाल अपार मेहनतीने तेवत ठेवली आहे. आग ओकणारे फास्ट बॉलर्स ही ऑस्ट्रेलियाची शान आहे.
उंच आणि काटक, भन्नाट वेगाने बॉलिंग करताना शरीराचा वेध घेणारे बाऊंसर, बॅट्समनची भंबेरी उडेल असे इनस्विंग किंवा आऊटस्विंग, स्टंप्सचा बुंधा गाठणारे वेगवान यॉर्कर, फसवे स्लोअरवन, बॅक ऑफ द हँड, ऑफस्टंपवरच मारा या गुणवैशिष्ट्यांसाठी ऑस्ट्रेलियाचे फास्ट बॉलर जगभरात प्रसिद्ध आहेत.

फोटो स्रोत, Morne de Klerk
अॅलन बॉर्डर, मार्क टेलर, स्टीव वॉ, रिकी पॉन्टिंग, मायकेल क्लार्क या ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारांच्या नेतृत्वात खेळणाऱ्या संघाने प्रतिस्पर्ध्यांच्या मैदानात जाऊन त्यांना लोळवलं. यामागे असे भारीभक्कम फास्ट बॉलरचे कष्ट होते.
फास्ट बॉलरचं काम प्रचंड श्रमाचं आणि दमवणारं असतं. त्यांचा झंझावात आटोपल्यानंतर स्पिनर म्हणून बॅट्समनला अडचणीत टाकू शकेल असा स्पिनर होता शेन वॉर्न.
काही मालिकांचा अपवाद वगळला तर वॉर्नने आपल्या जादुई फिरकीच्या बळावर बॅट्समनला अक्षरक्ष नाचवलं. वॉर्नने हे व्रत अनेकवर्षं जपलं. त्याची निघायची वेळ आली तोपर्यंत समकालीन स्टुअर्ट मॅकगिल उमेदीच्या वयापल्याड गेला होता.
मोठी माणसं बाजूला झाल्यानंतर निर्माण होणारी पोकळी अधिक गहिरी असते. ऑस्ट्रेलियाला सुदैवाने चांगले फास्ट बॉलर मिळत गेले मात्र वॉर्ननंतर त्यांच्या स्पिनर्सची दैनाच उडाली. ही झाडाझडती लॉयनने थांबवली.
तो फिट होता आणि बॉल वळवू शकत होता. त्याच्या भात्यात अस्त्रं होती. मॅचगणिक, मालिकेगणित तो पोतडीत नवं अस्त्रं टाकू लागला. फास्ट बॉलर्सना साहाय्यकारी ही भूमिका मागे पडली आणि तो मॅचविनर बॉलर झाला.

फोटो स्रोत, GIUSEPPE CACACE
आईबाबा, भाऊ असं लॉयनचं कुटुंब न्यू साऊथ वेल्स भागात राहायचं. भावामुळेच लॉयनला क्रिकेटची गोडी लागली. तो खेळू लागला. वयोगट स्पर्धांमधून लॉयन खेळत असे. U19 खेळत असताना बॉलिंगदरम्यान लॉयनच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली होती. पण त्याने खेळलं सोडलं नाही.
12व्या ग्रेडनंतर लॉयनने साऊथ ऑस्ट्रेलिया क्रिकेट असोसिएशनसाठी ग्राऊंड स्टाफसाठी काम करायला सुरुवात केली. खेळणं एकीकडे सुरूच होतं. प्रशिक्षक डॅरेन बेरी यांनी लॉयनची बॉलिंग पाहिली. छोट्या चणीचा, हडकुळा असा हा मुलगा चांगली ऑफस्पिन बॉलिंग करतो हे त्यांनी हेरलं.
ग्राऊंडस्टाफच्या कामापेक्षा त्यांनी लॉयनला संघात समाविष्ट केलं. त्यावर्षी रेडबॅक्स संघाने बिग बॅश स्पर्धा जिंकली. लॉयन त्या संघाचा भाग होता. काही महिन्यानंतर लॉयन ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय संघात होता.

फोटो स्रोत, Ryan Pierse
अँड्यू डॉसन हे लॉयनचे लहानपणीचे प्रशिक्षक. ऑस्ट्रेलियात व्यावसायिक क्रिकेट खेळलेले मार्क हिग्स यांचाही लॉयनला घडवण्यात मोलाचा वाटा आहे. लॉयनने कॅनबेरा शहरातल्या मनुका ओव्हल इथे आणि अडलेड ओव्हल इथे ग्राऊंडस्टाफ म्हणून काम केलं आहे.
आकडेवारी पाहिलं तर लॉयनच्या बॉलिंगवर बऱ्याच रन्स निघतात हे स्पष्ट होतं. याचं कारण ऑस्ट्रेलियाच्या फास्ट बॉलर्सवर आक्रमण करणं अवघड आहे. त्यांना सन्मान देणारे बॅट्समन लॉयन बॉलिंगला आल्यावर हात मोकळे करून घेतात. मात्र शंभराव्या टेस्टच्या निमित्ताने लॉयनची आकडेवारी पाहिली की त्याचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं.
लॉयनने टेस्टमध्ये चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांना प्रत्येकी 10वेळा बाद केलं आहे. स्पिन बॉलिंग उत्तम खेळू शकणारे, पदलालित्य असणाऱ्या बॅट्समनमध्ये या दोघांचा समावेश होता.
अलिस्टर कुक, विराट कोहली, बेन स्टोक्स अशा मोठ्या खेळाडूंना बाद करण्यात लॉयनचं प्राविण्य आहे. प्रतिस्पर्धी संघाचा आधारस्तंभ असणाऱ्या खेळाडूंना बाद केलं की संघाच्या मनोधैर्यावर परिणाम होतो. लॉयन हे जाणतो आणि त्यानुसार सापळा रचतो.

फोटो स्रोत, Michael Dodge
ऑस्ट्रेलियातल्या खेळपट्या या प्रामुख्याने फास्ट बॉलर्सना अनुकूल असतात. भारतीय उपखंडातल्या खेळपट्या स्पिनर्सला अनुकूल असतात. लॉयनचं वैशिष्ट्य हे की मायदेशात आणि विदेशात त्याची कामगिरी जवळपास सारखी आहे. खेळपट्टी साथ देणारी असो किंवा नसो- लॉयनने विकेट मिळवतोच.
बॅट्समन खेळपट्टीवर स्थिरावण्याआधीच त्यांना तंबूत धाडण्यात लॉयनचा सिंहाचा वाटा आहे. पदार्पण केल्यापासून ऑस्ट्रेलियाने घेतलेल्या एकूण विकेट्सपैकी 22 टक्के विकेट्स लॉयनने घेतल्या आहेत.
लॉयनच्या पदार्पणापासून म्हणजे 2011पासून टेस्टमध्ये सर्वाधिक विकेट्स त्यानेच घेतल्या आहेत. रंगना हेराथ, जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स अँडरसन, रवीचंद्रन अश्विन या समकालीन बॉलर्सना त्याने मागे टाकलं आहे.

फोटो स्रोत, Ryan Pierse
100 टेस्ट, 400 विकेट, सलग 78 टेस्ट असं सगळं असलं तरी अनेकदा कौतुक ऑस्ट्रेलियाच्या फास्ट बॉलर्सचं होतं. ते निश्चितच चांगली कामगिरी बजावतात. परंतु फास्ट बॉलर्सच्या चर्चेत तो झाकोळला जातो. लॉयनला या न मिळणाऱ्या प्रसिद्धीचं फारसं काही वाटत नाही. आपण बरं आपली बॉलिंग बरी या न्यायाने तो खेळत राहतो.
भागीदारी तोडणं, आक्रमक बॅट्समनचा प्रहार सोसून त्याला माघारी धाडणं, आशियाई उपखंडातल्या खेळपट्यांवर तासनतास अगणित ओव्हर्स टाकत बॉलिंग करत राहणं लॉयनला आवडतं. टेस्टमधली चौथी इनिंग्ज स्पिनर्ससाठी आदर्श मानली जाते. पण लॉयन कुठल्याही इनिंग्जमध्ये विकेट पटकावतो.
शंभराव्या टेस्टपर्यंतची वाटचाल अजिबातच सोपी नव्हती. आंतरराष्ट्रीय स्तरावर आपण टिकू शकू हा विश्वास लॉयनला नव्हता. त्याने स्वत:च्या बॉलिंगमध्ये सातत्याने सुधारणा केली.
कारकीर्दीत सुरुवातीला कर्णधार मायकेल क्लार्कने लॉयनच्या क्षमतेवर विश्वास ठेवला. खूप रन्स दिल्या, विकेट्स मिळाल्या नाहीत तरी लॉयनला संघात ठेवलं. त्याने लॉयनचा आत्मविश्वास दुणावला.
नंतर कारकीर्दीत जेव्हा लॉयनला संघातून वगळण्यात आलं तेव्हा त्याने चोख कामगिरीसह पुनरागमन केलं. धोनीने 2013 मध्ये चेन्नईत द्विशतक झळकावताना केलेली लॉयनची धुलाई आजही अनेकांच्या स्मरणात आहे.
गेल्या वर्षी अॅशेस मालिकेत नॅथन लॉयनच्या हातून रनआऊटची संधी निसटली आणि बेन स्टोक्सने इंग्लंडला थरारक विजय मिळवून दिला होता.

फोटो स्रोत, Alex Davidson
शंभराव्या टेस्टपर्यंतच्या वाटचालीत लॉयनच्या नावावर फक्त 4 मॅन ऑफ द मॅच तर केवळ एक मॅन ऑफ द सीरिज पुरस्कार आहे.
पुरस्कारांच्या ट्रॉफीपेक्षा मोक्याच्या वेळी संघाला विकेट मिळवून देण्यात त्याचं प्राविण्य कुठल्याही पुरस्कारापेक्षा कमी नाही. ऑस्ट्रेलियन संघातर्फे विजयगीत म्हटलं जातं. संघातल्या एकाला तो मान दिला जातो. माईक हसी निवृत्त झाल्यानंतर त्याने तो मान लॉयनला दिला.
टेस्टमध्ये शंभरी होत असली तरी निवडसमितीने वनडेसाठी लॉयनच्या नावाचा प्राधान्याने विचार केला नाही. टेस्ट स्पेशालिस्ट असं बिरुद त्याच्या नावाला चिकटलं.
वनडेतही ऑस्ट्रेलियाला चांगल्या स्पिनरची गरज होती पण ती कारकीर्द बेतास बेत राहिली. बिग बॅश स्पर्धा खेळत असला तरी लॉयनचा आयपीएल संघांनी विचार केला नाही हेही एक कोडं आहे. लिलावात त्याचं नाव असायचं पण पाचवेळा अनसोल्ड ठरल्यानंतर लॉयनने ते प्रकरण सोडून दिलं.

फोटो स्रोत, Robert Cianflone
लॉयनला GOAT (Greatest of all time) असंही गंमतीने म्हणतात. संघातल्या मित्रांनी लॉयनला 'गॅरी' आणि 'गाझा' ही टोपणनावं दिली आहेत.
शंभराव्या टेस्टच्या निमित्ताने 'क्रिकेट ऑस्ट्रेलिया'ने एक व्हीडिओ अपलोड केला आहे. तुम्हाला नॅथन लॉयन का आवडतो? असं त्याच्या सहकाऱ्यांना विचारण्यात आलं.
बहुतांश खेळाडूंचं उत्तर होतं- संघासाठी सर्वस्व झोकून देणारा माणूस. दहा वर्षांपूर्वी ग्रेग चॅपेल यांनी लॉयनला बॅगी ग्रीन दिली होती. बॅगी ग्रीन डोक्यावर मिरवणाऱ्या ऑस्ट्रेलियन खेळाडूने जे करायला हवं ते लॉयन करतो याचं समाधान चॅपेल यांना असेल.
स्तंभित व्हावं अशी गुणकौशल्यं नसतील, लायक असूनही, काम होत असूनही श्रेय मिळत नसेल तरी आपण काम करत राहावं हा संदेश लॉयनने शंभराव्या टेस्टपर्यंत पोहोचून दिला आहे. ही शिकवण मोलाची.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








