नवदीप सैनीः एकेकाळी अवघे 200 रुपये मानधन घेणारा फास्ट बॉलर

नवदीप सैनी, भारत, वेस्ट इंडिज, दिल्ली, हरियाणा, क्रिकेट

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, नवदीपने वेस्ट इंडिजविरुद्ध दिमाखात पदार्पण केलं.

बॉर्डर-गावस्कर मालिकेतील सिडनी कसोटी गुरुवारपासून सुरू होत आहे. मेलबर्न कसोटीत फास्ट बॉलर उमेश यादव दुखापतग्रस्त झाल्याने सिडनी कसोटीत नवदीप सैनी पदार्पण करणार आहे. मयांक अगरवालऐवजी रोहित शर्माला समाविष्ट करण्यात आलं आहे.

संघव्यवस्थापनासमोर शार्दूल ठाकूर आणि टी.नटराजन असे आणखी दोन पर्याय आहेत. मात्र सैनीची मूळ संघात निवड झाली होती. शार्दूल आणि नटराजनला यांना नंतर समाविष्ट करण्यात आलं आहे.

28वर्षीय सैनी डोमेस्टिक क्रिकेटमध्ये दिल्लीसाठी, भारत अ संघासाठी तसंच आयपीएल स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघासाठी नियमितपणे चांगली बॉलिंग करतो आहे. विकेट्स मिळवतो आहे. चांगल्या वेगासह बॉलिंग हे सैनीचं वैशिष्टय आहे. ऑस्ट्रेलियातल्या खेळपट्या सैनीसाठी अनुकूल आहेत.

7 वनडे आणि 10 ट्वेन्टी-20 सामन्यात सैनीने भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. गेले साधारण दोन वर्ष राखीव फास्ट बॉलर म्हणून तो संघाचा भाग असतो. इशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी आणि उमेश यादव असे चार प्रमुख बॉलर्स दुखापतग्रस्त झाल्याने मोहम्मद सिराज आणि नवदीप सैनी यांना पदार्पणाची संधी मिळते आहे.

डोमेस्टिक क्रिकेटमध्ये सैनीने 46 मॅचमध्ये 128 विकेट्स घेतल्या आहेत. जिममध्ये शरीर कमावण्यासाठी मेहनत घेणाऱ्या सैनीची इथपर्यंतची वाटचाल सोपी नाही. परिस्थितीशी संघर्ष करत सैनीने आगेकूच केली आहे.

नवदीपची आतापर्यंतची वाटचाल संघर्षमय आहे. गौतम गंभीर आणि विराट कोहलीसारखे खंबीर कर्णधारांचा पाठिंबा मिळाल्याने नवदीपने भारतासाठी खेळण्याचं स्वप्न साकारलं आहे. वरपांगी तो हडकुळा वाटेल परंतु काटक शरीरयष्टीच्या नवदीप सैनीला सुमीत नरवाल यांनी पहिल्यांदा पाहिलं. शिडशिडीत बांध्याच्या नवदीपचा वेग आणि अचूकता बघून ते प्रभावित झाले.

स्थानिक क्रिकेटचा प्रदीर्घ अनुभव असणाऱ्या नरवाल यांनी करनाल प्रीमिअर स्पर्धेदरम्यान नवदीपला पहिल्यांदा पाहिलं. हा कार्यकर्ता कामाचा आहे हे त्यांनी हेरलं. त्यांनीच नवदीपला दिल्ली संघाच्या सरावावेळी रोशनहारा क्लब इथं यायला सांगितलं.

नवदीप सैनी, भारत, वेस्ट इंडिज, दिल्ली, हरियाणा, क्रिकेट

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, नवदीप सैनी

नवदीप तेव्हा टेनिस बॉल क्रिकेट खेळायचा. प्रत्येक मॅचसाठी त्याला 200 रुपये मिळायचे. अव्वल दर्जाचं क्रिकेट खेळण्यासाठी आवश्यक स्पाईक्स म्हणजे शूजही नव्हते. नरवाल यांनी नवदीपचा खेळ एकदा बघ असं दिल्लीचा कर्णधार गौतम गंभीरला सांगितलं.

रोशनहारा क्लब इथं दिल्ली संघाच्या सरावावेळी नवदीपने आपल्या भन्नाट वेगाने गंभीरला सतवलं. गौतम खूश झाला. सरावानंतर गंभीरने नवदीपशी बोलत त्याची पार्श्वभूमी समजून घेतली. त्याच्यासाठी तात्काळ स्पाईक्सची व्यवस्था केली.

गंभीरच्या सूचनेनुसार सैनी दिल्ली संघाच्या सराव सत्राचा नियमित भाग झाला. मूळच्या हरयाणाचा असल्याने नवदीपला दिल्ली संघात खेळवण्यावरून वादही झाला. हरयाणाचा स्वतंत्र संघ आहे. नवदीपसाठी गौतम गंभीरने डीडीसीएच्या पदाधिकाऱ्यांशी, निवडसमितीशी हुज्जत घातली.

यावेळी नरवाल, मिथुन मन्हास, आशिष नेहरा यांनी नवदीपच्या गोलंदाजीला पैलू पाडले. 2013-14 हंगामात नवदीपने दिल्लीसाठी पदार्पण केलं.

तेव्हापासून नवदीप दिल्ली संघाचा अविभाज्य घटक झाला आहे. दिल्लीसाठी 43 मॅचेस खेळताना नवदीपच्या नावावर 120 विकेट्स आहेत.

नवदीप सैनी, भारत, वेस्ट इंडिज, दिल्ली, हरियाणा, क्रिकेट

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, नवदीप सैनी

नवदीपकडे वेग होता मात्र फिटनेस आणि बॉलिंगचे बारकावे यावर काम करण्याची आवश्यकता होती. नरवाल यांनी नवदीपला वकार अहमद यांचं मार्गदर्शन घेण्याचा सल्ला दिला. हिमाचल प्रदेशसाठी खेळलेल्या वकार यांनी नवदीपच्या अॅक्शनवर लक्ष दिलं.

नवदीपच्या वेगाचा परिणाम त्याच्या आरोग्यावर होऊ शकतो तसंच त्याला अजून ताकद कमावण्याची आवश्यकता आहे असं त्यांच्या लक्षात आलं. तेच त्याला फिटनेस ट्रेनर नासीर जमशेद यांच्याकडे घेऊन गेले.

त्यांनी स्नायू बळकट करण्यासाठी व्यायाम सांगितले. फास्ट बॉलरसाठी आवश्यक असा डाएट प्लॅन आखून दिला. ग्लुटेन आहारातून वर्ज्य झालं.

कार्बोहायड्रेट्स आणि फळं वाढली. नवदीप शुद्ध पाणी पीत आहे का याची तपासणी करण्यात आली. नवदीपने हा सल्ला मानला. या मेहनतीचा परिणाम नवदीपच्या खेळात दिसून येतो आहे.

नवदीपची घरची परिस्थिती मध्यमवर्गीय अशी. बाबा हरयाणा सरकारमध्ये चालक म्हणून काम करतात.

नवदीपचे आजोबा करम सिंग नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या आझाद हिंद फौजेत सहभागी झाले होते. आजोबा नेताजींसमवेत जपानमध्ये होते. नेताजींच्या अनेक गोष्टी आजोबा सांगतात असं नवदीप सांगतो. भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असताना नेट बॉलर म्हणून नवदीपला जाण्याची संधी होती. मात्र गंभीरने त्याला वेगळा सल्ला दिला. "दिल्ली संघाला रणजी स्पर्धेत सेमी फायनलमध्ये तुझी गरज आहे. तू तिथे चांगलं खेळलास तर लवकरच भारतीय संघात असशील", असं गंभीरने सांगितलं.

गंभीरचा सल्ला नवदीपने मानला. बंगालविरुद्ध सात विकेट्स घेत नवदीपने गंभीरचा विश्वास सार्थ ठरवला. त्या हंगामात नवदीपने दिल्लीसाठी 8 मॅचेसमध्ये 34 विकेट्स घेतल्या होत्या.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

आयपीएलच्या दहाव्या हंगामात म्हणजे 2017 मध्ये नवदीपला दिल्ली डेअरडेव्हिल्सने घेतलं होतं. मात्र पुढच्या वर्षी लिलावात नवदीपसाठी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने नवदीपसाठी 3 कोटी रुपये खर्च करत त्याला ताफ्यात समाविष्ट केलं. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळताना नवदीपला आशिष नेहराचं मार्गदर्शन मिळालं.

नवदीप सैनी, भारत, वेस्ट इंडिज, दिल्ली, हरियाणा, क्रिकेट

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, वेग हे नवदीपचं प्रमुख अस्त्र आहे.

सातत्यपूर्ण प्रदर्शनामुळे नवदीप आता इंडिया ए संघासाठी खेळतो. बॉलला उसळी मिळणाऱ्या परदेशातील खेळपट्यांवर नवदीपची जादू दिसते. काही दिवसांपूर्वी वेस्ट इंडिज अ संघाविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत नवदीपने पाच विकेट्स पटकावल्या होत्या. वेस्ट इंडिजमधील खेळपट्या नवदीपसाठी अगदीच पोषक ठरू शकतात या विचारातून त्याची संघात निवड करण्यात आली होती.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)