10 वर्ष, 9 स्पर्धा आणि आयसीसी जेतेपदाची प्रतीक्षा

फोटो स्रोत, Getty Images
ओव्हल इथे सुरू असलेल्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारतावर 209 धावांनी विजय मिळवत जेतेपदावर नाव कोरलं. पाचव्या आणि अंतिम दिवशी ऑस्ट्रेलियाला जिंकण्यासाठी 7 विकेट्स तर भारताला 280 धावांची आवश्यकता होती. ऑस्ट्रेलियाच्या शिस्तबद्ध माऱ्यासमोर भारतीय फलंदाजांनी शरणागती पत्करली. या पराभवासह भारताची आयसीसी जेतेपदाची प्रतीक्षा दहा वर्षानंतरही कायम राहिली.
ऑस्ट्रेलियाने ट्रॅव्हिस हेड आणि स्टीव्हन स्मिथ यांच्या शतकांच्या बळावर पहिल्या डावात 469 धावांची मजल मारली. हेडने 163 तर स्मिथने 121 धावांची खेळी केली. भारतातर्फे मोहम्मद सिराजने 4 विकेट्स पटकावल्या.
प्रत्युत्तारादाखल खेळताना भारतीय संघाने 296 धावा केल्या. अजिंक्य रहाणेने 89 धावांची दिमाखदार खेळी साकारली. शार्दूल ठाकूरने 51 धावा करत त्याला चांगली साथ दिली. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने 3 तर मिचेल स्टार्क, स्कॉट बोलँड आणि कॅमेरुन ग्रीन यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 270 धावांवर डाव घोषित केला. अलेक्स कॅरेने नाबाद 66 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. मिचेल स्टार्क आणि मार्नस लबूशेन यांनी 41 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 444 धावांचं लक्ष्य ठेवलं. पण हे लक्ष्य भारतीय संघाच्या आवाक्याबाहेरचं ठरलं.
टेस्ट, वनडे आणि ट्वेन्टी20 प्रकारात दोन देशांमधील मालिकांमध्ये दमदार प्रदर्शन करणाऱ्या भारतीय संघाला आयसीसी स्पर्धांच्या जेतेपदाने सातत्याने हुलकावणी दिली आहे. आयसीसीतर्फे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप, वनडे वर्ल्डकप, ट्वेन्टी20 वर्ल्डकप, चॅम्पियन्स ट्रॉफी या चार स्पर्धांचं आयोजन केलं जातं. भारताने 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या जेतेपदावर कब्जा केला होता. मात्र त्यानंतर 10 वर्षात भारताला एकदाही आयसीसी जेतेपद पटकावता आलेलं नाही. 10 वर्षात आयसीसीच्या 9 स्पर्धांमध्ये भारतीय संघ जेतेपदाच्या प्रतीक्षेतच राहिला आहे.
2014 ट्वेन्टी20 वर्ल्डकप- उपविजेते

फोटो स्रोत, Getty Images
बांगलादेशमध्ये मीरपूर इथे झालेल्या 2014 ट्वेन्टी20 वर्ल्डकपच्या फायनलमध्ये भारतीय संघाला अनपेक्षित पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करताना 130 धावाच करता आल्या. विराट कोहलीने 58 चेंडूत 77 धावांची खेळी केली. कुमार संगकाराच्या अर्धशतकाच्या बळावर श्रीलंकेने 6 विकेट्स राखून विजय मिळवला. विराट कोहलीला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं पण जेतेपदापासून भारतीय संघ दूरच राहिला.
2015 वनडे वर्ल्डकप- सेमी फायनल

फोटो स्रोत, Getty Images
चार वर्षांपूर्वी घरच्या मैदानावर विश्वविजेतेपदाला गवसणी घालणाऱ्या भारतीय संघाचा प्रवास सेमी फायनलमध्ये संपुष्टात आला. भारताने चांगल्या कामगिरीच्या बळावर सेमी फायनलमध्ये आगेकूच केली. सेमी फायनलच्या लढतीत ऑस्ट्रेलियाने 328 धावांचा डोंगर उभारला. स्टीव्हन स्मिथने 105 धावांची खेळी केली. आरोन फिंचने 81 धावा करत त्याला चांगली साथ दिली. भारतातर्फे उमेश यादवने 4 विकेट्स पटकावल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना भारताला 233 धावाच करता आल्या. कर्णधार महेंद्रसिंग धोनीने 65 धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून जेम्स फॉकनरने 3 तर मिचेल स्टार्क, मिचेल जॉन्सन यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
2016 ट्वेन्टी20 वर्ल्डकप- सेमी फायनल
वेस्ट इंडिजच्या झंझावाती खेळासमोर वानखेडे स्टेडियमवर भारतीय संघ निष्प्रभ ठरला. भारतीय संघाने 192 धावा करत वेस्ट इंडिजला आव्हानात्मक लक्ष्य दिलं. विराट कोहलीने 47 चेंडूत 89 धावांची तडाखेबंद खेळी केली. वेस्ट इंडिजने लेंडल सिमन्सच्या 82 धावांच्या बळावर हे लक्ष्य गाठलं. जॉन्सन चार्ल्सने 52 तर आंद्रे रसेलने 43 धावांची खेळी केली. भारतीय इनिंग्जनंतर विजय पक्का मानला जात होता पण वानखेडेच्या छोट्या मैदानावर वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी धावांची लयलूट केली.
2017 चॅम्पियन्स ट्रॉफी- उपविजेते
भारतीय संघाचं जेतेपदाचं स्वप्न फायनलमध्ये भंगलं. पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानने भारताला नमवत जेतेपदाची कमाई केली. फायनलमध्ये पाकिस्तानने फखर झमनच्या 114 धावांच्या बळावर 338 धावांची मजल मारली. अझर अली (59), मोहम्मद हफीझ (57) यांनी त्याला चांगली साथ दिली. प्रत्युत्तरादाखल खेळताना भारताचा डाव 158 धावांमध्येच आटोपला. हार्दिक पंड्याने सर्वाधिक 76 धावा केल्या. पाकिस्तानकडून मोहम्मद आमिर आणि हसन अली यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.
2019 वनडे वर्ल्डकप- सेमी फायनल
चार वर्षानंतरही पुनरावृत्ती होत भारतीय संघाचं आयसीसी जेतेपदाचं स्वप्न सेमी फायनलमध्येच भंगलं. न्यूझीलंडच्या शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर भारताचं आयसीसी जेतेपदाचं स्वप्न पुन्हा एकदा भंगलं. पावसामुळे दोन दिवसात ही लढत खेळवण्यात आली. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 239 धावांची मजल मारली. कर्णधार केन विल्यमसनने 67 तर रॉस टेलरने 74 धावांची खेळी केली. भुवनेश्वर कुमारने 3 विकेट्स पटकावल्या. भारतीय संघ हे लक्ष्य सहजी पार करेल असं वाटत होतं. पण न्यूझीलंडच्या भेदक गोलंदाजीसमोर भारताची अवस्था 24/4 अशी झाली. महेंद्रसिंग धोनी आणि रवींद्र जडेजाने भागीदारी करत विजयाच्या आशा जागृत ठेवल्या. पण धोनी रनआऊट होताच भारताच्या आशा मावळल्या. धोनीने 50 तर रवींद्र जडेजाने 77 धावांची खेळी केली. न्यूझीलंडकडून मॉट हेन्रीने 3 तर ट्रेंट बोल्ट, मिचेल सँटनर यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिप 2021- उपविजेते
न्यूझीलंडचा संघ पुन्हा एकदा भारतीय संघाच्या मार्गात उभा राहिला. भारतीय संघाने सातत्यपूर्ण प्रदर्शन करत पहिल्यावहिल्या टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल गाठली होती. मात्र न्यूझीलंडने दमदार खेळ करत बाजी मारली. साऊदॅम्पटन इथे झालेल्या फायनलमध्ये भारतीय संघाने पहिल्या डावात 217 धावा केल्या. कायले जेमिसनने 5 विकेट्स घेतल्या. न्यूझीलंडलाही मोठी धावसंख्या नोंदवता आली नाही आणि त्यांचा डाव 249 धावातच आटोपला. मोहम्मद शमीने 4 तर इशांत शर्माने 3 विकेट्स घेतल्या. भारताची दुसऱ्या डावात भंबेरी उडाली आणि डाव 170 धावांतच आटोपला. न्यूझीलंडला विजयासाठी 139 धावांचं लक्ष्य मिळालं. न्यूझीलंडने 2 विकेट्सच्या मोबदल्यात हे लक्ष्य गाठलं आणि पहिल्यावहिल्या टेस्ट चॅम्पियनशिपच्या जेतेपदावर नाव कोरलं.
2021- ट्वेन्टी20 वर्ल्डकप- प्राथमिक फेरी

फोटो स्रोत, Getty Images
जेतेपदाचे दावेदार असलेल्या भारतीय संघावर प्राथमिक फेरीत गाशा गुंडाळण्याची नामुष्की ओढवली. पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानने 10 विकेट्सनी भारतीय संघाचा धुव्वा उडवला. भारताने दिलेलं 152 धावांचं लक्ष्य बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान या जोडीने तडाखेबंद खेळी करत हे लक्ष्य गाठलं. न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीततही पराभूत झाल्यामुळे भारतीय संघाच्या बाद फेरीच्या आशा मावळल्या. भारताला प्रथम फलंदाजी करताना 110 धावाच करता आल्या. न्यूझीलंडने 2 विकेट्सच्या मोबदल्यात हे लक्ष्य गाठलं. भारताने अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामिबियाविरुद्ध दमदार विजय मिळवले पण बादफेरीसाठी ते पुरेसे ठरले नाहीत.
2022 ट्वेन्टी20 वर्ल्डकप- सेमी फायनल

फोटो स्रोत, Getty Images
जबरदस्त फॉर्मात असलेल्या इंग्लंडने भारतीय संघाचा धुव्वा उडवत अंतिम फेरी गाठली. भारतीय संघाने 168 धावांची मजल मारत इंग्लंडला आव्हानात्मक लक्ष्य दिलं. हार्दिक पंड्याने 63 तर विराट कोहलीने 50 धावांची खेळी केली. इंग्लंडतर्फे ख्रिस जॉर्डनने 3 विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना जोस बटलर (80) आणि अलेक्स हेल्स (86) यांच्या 170 धावांच्या सलामीच्या बळावर इंग्लंडने भारताला निरुत्तर केलं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








