एटीएममधून लुटलेले पैसे ठेवलेली कार कंटेनरमधून नेणारे दरोडेखोर कसे सापडले?

ट्रक

फोटो स्रोत, HANDOUT

    • Author, झेवियर सेल्वाकुमार
    • Role, बीबीसी तमिळ

"ते दोघेही तिथल्या एका जंगलाच्या दिशेने पळाले. सब इन्स्पेक्टर रणजीत त्यांच्या मागे धावू लागले. कुमारपालयमचे पोलीस इन्स्पेक्टर थवामणीदेखील त्यांना पकडण्यासाठी धावू लागले."

जंगलासारख्या दिसणाऱ्या त्या परिसराचे एका ओढ्यामुळे दोन भाग होतात. त्या ओढ्यापलीकडे अजरू धावू लागला. जुमान तिथेच अडखळला.

त्याला पकडण्याच्या प्रयत्न करणाऱ्या सब इन्स्पेक्टर रणजीत यांच्यावर त्याने हल्ला केला. तेव्हा या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इन्स्पेक्टर थवामणी यांनी आपली बंदूक काढली आणि त्याच्यावर गोळी झाडली. जुमानचा जागीच मृत्यू झाला.

तमिळनाडूमध्ये 27 सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहा ते पावणेअकराच्या दरम्यान घडलेल्या या एन्काऊंटरबाबतची माहिती सालेमच्या डीआयजी उमा यांनी पत्रकारांना दिली.

हल्ली तमिळनाडूमधील एन्काऊंटरच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचा आरोप मानवाधिकार कार्यकर्त्यांकडून वारंवार केला जात आहे. त्यातच आता एन्काऊंटरची आणखी एक घटना घडल्यामुळे तमिळनाडूमध्ये हे प्रकरण चांगलंच चर्चेत आलं आहे. त्याविषयीचा हा सविस्तर वृत्तांत...

ग्राफिक्स
ग्राफिक्स

तमिळनाडू पोलिसांना मिळाली केरळमधून माहिती

26 सप्टेंबर रोजी केरळमधील त्रिसूरमध्ये तीन एटीएम मशीन्स फोडून रोकड लुटण्यात आली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरांनी गॅस कटर मशीनच्या सहाय्याने एटीएम मशीनचा वरचा भाग फोडण्यात यश मिळवलं.

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

चोरांनी पैशांचे नुकसान होणार नाही, अशा पद्धतीने अत्यंत चतुराईने या एटीएम मशीन्स फोडल्या. पैशांची चोरी करुन ते सहजगत्या पसारही झाले.

या घटनेनंतर त्रिसूर पोलिसांनी त्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. क्रेटा कारमधून आलेल्या चोरांनी ही चोरी केल्याचं त्यांच्या तपासामध्ये निष्पन्न झालं.

हे चोर 27 सप्टेंबर रोजी सकाळी सहाच्या सुमारास तमिळनाडूच्या दिशेने पळून जात असल्याचं लक्षात आल्यानंतर नमक्कलच्या एसपींनी राजेश खन्ना यांना फोन करुन याबाबतची माहिती दिली.

डीआयजी उमा म्हणाल्या की, त्यांनी त्यांच्या वरिष्ठांना याबाबतची कल्पना दिली आणि आपल्या अखत्यारित असलेल्या सर्व पोलीस ठाण्यांना चोरांच्या वाहनाचा शोध घेण्याची सूचना दिली.

पोलिसांनी पुढील एका तासात जिल्ह्यातील विविध ठिकाणी या चोरांचा शोध घेण्यासाठी तपास मोहीम राबवण्यास सुरुवात केली.

त्यानंतर नमक्कलच्या एसपींनी पुन्हा एकदा फोन करुन तमिळनाडू पोलिसांना अशी माहिती दिली की, चोरांनी लपण्यासाठी आपली कार एका कंटेनर ट्रकमध्ये चढवली आहे.

"त्यानंतर पोलिसांना कंटेनर ट्रकचा शोध घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. सकाळी पावणे नऊ वाजता जेव्हा नमक्कल पोलीस कुमारपालयम रस्त्यावरुन ये-जा करणाऱ्या वाहनांना थांबवून तपास करत होते, तेव्हा पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केल्यानंतर सुद्धा एक कंटेनर ट्रक सुसाट पुढे गेला. पोलिसांनी राजस्थानचा नोंदणी क्रमांक असलेल्या या ट्रकचा संशय आल्यानंतर दुचाकीवरुन त्याचा पाठलाग केला."

त्यानंतर हा ट्रक संगकिरीच्या दिशेने गेला आणि टोलनाक्यामधून जाण्याऐवजी पुन्हा त्याच रस्त्यावर परतला. "संगकिरी शहरातून दोनवेळा फेरी मारुन वेबबडीच्या दिशेने जाणाऱ्या या ट्रकची माहिती जिल्ह्यातील सर्व पोलिसांना देऊन 'अलर्ट' जारी करण्यात आला," अशी माहिती डीआयजी उमा यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संन्यासीपट्टीच्या जवळ 'यू-टर्न' घेताना या कंटेनर ट्रकने एका कारसहित दोन दुचाकींनाही धडक दिली. तिथे उपस्थित काही लोकांनी या ट्रकच्या दिशेने दगडंही भिरकावली. त्यानंतर पोलिसांनी या ट्रकला थांबवण्यात यश मिळवलं. या ट्रकच्या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं.

या ट्रकमधील कारमध्ये एकूण 5 लोक बसले होते. जुमन हा त्या कारचा चालक होता. तेव्हा हा ट्रक त्रिसूरमधून आल्याचं पोलिसांना लक्षात आलं.

पोलिसांनी अशी माहिती दिली की, जेव्हा हा ट्रक थांबवण्याचा प्रयत्न केला जात होता तेव्हा या ट्रकच्या मागील भागातून खूप गोंगाट ऐकू येत होता.

ट्रकमध्ये लपवण्यात आली होती कार

ट्रकची झडती घेतल्यानंतर, त्यावर असलेल्या कंटेनरमध्ये नंबर प्लेट नसलेली क्रेटा कार आढळून आली. त्या कारमध्ये आणखी दोन लोक बसलेले असल्याचे पोलिसांना आढळून आले.

अजरू आणि जुमान यांनी पोलिसांना चकवा देत पळून जाण्याचा प्रयत्न केला. या दोघांमधील अजरूकडे निळ्या रंगाची बॅग होती.

"त्याचवेळी पळून जाताना जुमानने पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्याने ट्रक रिपेअरी करण्याच्या एका अवजाराचा वापर शस्त्र म्हणून केला. त्या दोघांनीही इन्स्पेक्टर थवामाणी यांच्यावर हल्ला केला आणि पळून गेले. सब इन्स्पेक्टर रणजीत यांनी त्यांचा पाठलाग केला. त्यांच्या मागून थवामणी यांनीही चोरांच्या मागे धाव घेतली."

हे फरार आरोपी जंगलासारख्या एका परिसरामध्ये शिरले. तिथे मध्ये असलेला ओढा ओलांडताना खाली कोसळलेल्या जुमानला पकडण्याचा प्रयत्न सब इन्स्पेक्टर रणजीत यांनी केला. पुढे डीआयजी उमा यांनी पत्रकारांना सांगितलं की, आरोपी जुमानने एसआय रणजीत यांच्यावर हल्ला केल्यानंतर थवामानी यांनी त्यांना वाचवण्यासाठी आरोपीवर गोळी झाडली.

जुमानच्या मृत्यूनंतर, अजरुलाही अटक करण्यात आली. या अटकेआधी स्वत:च्या बचावासाठी त्याने पोलिसांवर दगडफेक करण्याचाही प्रयत्न केला.

डीआयजी उमा

फोटो स्रोत, HANDOUT

फोटो कॅप्शन, डीआयजी उमा

या सगळ्या घटनाक्रमाचे वर्णन करताना डीआयजी उमा यांनी पुढे आरोपींविषयी आणखी माहिती दिली.

"या आरोपींपैकी पाच जण हरियाणामधील बलवाल जिल्ह्यातील आहेत; तर दोन जण जवळच्याच नुआ जिल्ह्यातील आहेत. गॅस कटर मशीनचा वापर करुन एटीएम मशीन फोडणे आणि पैशांची चोरी करणे हा त्यांचा नित्यक्रम आहे. त्यांनी विशेषकरुन स्टेट बँकेच्या एटीएम्सना अधिक लक्ष्य केलं आहे."

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी रस्त्यावर एके ठिकाणी हा ट्रक उभा केला होता. चोरी केल्यानंतर ते कारने ट्रकच्या जागेपर्यंत पोहोचले. काही वेळाच्या प्रवासानंतर त्यांनी निर्मनुष्य ठिकाणी ही कार ट्रकमध्ये चढवली. हरियाणाकडे जाण्याचे त्यांचे नियोजन होते.

बव्हेरियातील घटनेशी काही संबंध?

याआधीही डीआयजी उमा यांनी अशी माहिती दिली होती की, हरियाणामधील मेवात जिल्ह्यातील दोन जणांनी याच प्रकारे एटीएम मशीन फोडली होती. त्यांना कृष्णगिरी जिल्ह्यात अटक करण्यात आली होती.

"सध्याच्या घटनेतील आरोपी आणि कृष्णगिरी जिल्ह्यातील आरोपींमध्ये काही सहसंबंध आहे का, याबाबत अद्याप माहिती नाही. या सात जणांवर इतर काही गुन्हे नोंद आहेत का, याबाबतही सध्या काही उपलब्ध नाही. सध्या एन्काऊंटरमुळे न्यायालयीन चौकशी सुरु आहे. या चोरांनी किती पैसे चोरले आहेत, ती रक्कम देखील मोजलेली नाही. सध्या जखमी आरोपी अजरूवर कोइम्बतूरमध्ये उपचार केले जात आहेत. आम्ही इतरांचीही चौकशी करत आहोत. मृत पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांशी संपर्क करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

लोकांची गर्दी

फोटो स्रोत, HANDOUT

अद्याप या ट्रकची तपासणी झालेली नाही. त्यामध्ये बंदूक अथवा तत्सम शस्त्रे ठेवलेली आहेत का, याची तपासणी बाकी आहे. त्यांचे बावरिया अथवा इतर गुन्हेगारी टोळीबरोबर काही संबंध असतील, असं वाटत नाही. एटीएममधून पैसे चोरणे एवढंच त्यांचं काम दिसतं. मात्र, पुढील तपासानंतरच खात्रीलायकपणे माहिती देता येईल", अशीही माहिती डीआयजी उमा यांनी दिली.

मोटारसायकल

फोटो स्रोत, HANDOUT

मुख्य रस्त्याऐवजी जंगलात ही घटना घडल्याने हा ठरवून केलेला एन्काऊंटर आहे का, असे प्रश्न पत्रकारांनी विचारले. त्यावर उत्तर देताना डीआयजी उमा म्हणाल्या की, "या ट्रकने कार आणि दुचाकींना धडक देण्यापूर्वीच पोलिसांना त्याविषयी माहिती मिळाली होती. आपण पोलिसांकडून पकडले जाऊ या भीतीने त्यांनी अधिक गतीने ट्रक चालवण्यास सुरुवात केली. त्यामुळेच, हे अपघात घडले.

या ट्रकच्या आत कार आणि दोन व्यक्ती आहेत, याची माहिती पोलिसांना नव्हती. व्हेंटीलेशनसाठी आरोपींनी ट्रकच्या मागील भागात सोयदेखील केली होती.

मृत आरोपी जुमान हा 40 वर्षांचा होता तर जखमी आरझू हा 28 वर्षांचा आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.