You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'दुसऱ्या जातीतल्या मुलावर प्रेम केलं म्हणून आईने चटके दिले, वडिलांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केला'
- Author, विष्णुप्रिया, नित्या पांडियान
- Role, बीबीसी तमीळ प्रतिनिधी, द न्यूज मिनिट
"माझ्या आईने काठीने तर कधी हाताने मला मारहाण केली. तिने माझ्या पायाच्या तळव्यांना चटके दिले. माझ्या वडिलांनी तर भाजी कापण्याच्या सुरीने मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला."
आपल्या आईवडिलांचा राग सांगताना किर्तीचं अंग आजही थरथर कापतं. तिचं वन्नियार जातीतील सुंदर नावाच्या तरुणावर प्रेम जडलं. वन्नियार ही जात तामिळनाडूमध्ये अत्यंत मागास जात म्हणून ओळखली जाते. आपल्या प्रेमाविषयी तिने तिच्या आईवडिलांना सांगितलं.
त्यांच्या मुलीचं प्रेमप्रकरण ऐकून तिच्या आईवडिलांचा जातीचा अहंकार दुखावला गेला. त्यानंतर त्यांनी 2018 मध्ये जवळजवळ 6 महिने कीर्तीचा शारीरिक आणि मानसिक छळ केला.
तिच्याच आई-वडिलांकडून अशी वागणूक मिळणं तिच्यासाठी अत्यंत त्रासदायक होतं. पण पुढे जेव्हा सुंदरने स्वतः कीर्तीच्या घरी जाऊन तिला लग्नासाठी मागणी घातली तेव्हा या गोष्टीला वाईट वळण लागलं.
सुंदर सांगतो, "मी जेव्हा तिच्या वडिलांना भेटलो तेव्हा त्यांनी मला न्यूज चॅनेल पाहतोस का? असं विचारलं. ते म्हणाले की, तुला रस्त्यावर, रेल्वे ट्रॅकवर मरायचं आहे का?"
BBCShe या प्रकल्पातील या गोष्टीसाठी बीबीसीने 'द न्यूज मिनिट' संस्थेसोबत काम केले आहेत.
वाचकांची आवडनिवड, प्राधान्य अधिक चांगल्याप्रकारे समजून घेणं या प्रकल्पाचा उद्देश आहे.
BBCShe बाबत सविस्तर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.
कीर्ती सांगते की, तिच्या वडिलांनी आईला सुंदर आणि त्याचे वडील बसलेल्या खुर्च्या बाहेर फेकून द्यायला सांगितल्या. शिवाय त्यांनी घरी येताना जी फळं, मिठाई आणि फुलं आणली होती, ती कचऱ्यात टाकून द्यायला सांगितली.
त्यानंतर त्यांनी कीर्तीला सुसाईड नोट लिहायला सांगितली.
सुंदर सांगतो की, "ही सुसाईड नोट त्यांना पुन्हा वापरता आली असती. कीर्तीला आता कळून चुकलं होतं की, आता आपल्याला जिवंत राहणं अवघड आहे. त्यामुळे लग्न हाच सुरक्षित मार्ग आहे."
आता त्या दोघांच्या जीवाला धोका वाढला होता.
अस्मिता दुखवल्याच्या नावाखाली हत्या
2006 मध्ये लता सिंग विरुद्ध उत्तरप्रदेश या खटल्याचा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने जे निरीक्षण नोंदवलं होतं त्यानुसार, "ऑनर किलिंग ही अभिमान बाळगावा अशी गोष्ट नाहीये. पाशवी, सरंजामी विचारसरणीच्या व्यक्तींनी केलेलं हे लज्जास्पद कृत्य असून हे लोक कठोर शिक्षेस पात्र आहेत."
यानंतर सर्वोच्च न्यायालयाने, आंतरजातीय जोडप्यांना धमकावणाऱ्या किंवा त्रास देणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
आज या गोष्टीला सतरा वर्ष उलटून गेली तरीही देशभरात धमक्या, क्रूर हिंसाचार सुरूच आहे.
सुरक्षित राहण्यासाठी कीर्ती आणि सुंदरने रजिस्ट्रारच्या कार्यालयात जाऊन त्यांच्या लग्नाची नोंदणी करायचं ठरवलं. पुढे दोघांनी सर्वकाही सुरळीत असल्यासारखी कामावर जायला सुरुवात केली.
पण कोणीतरी ही माहिती बाहेर फोडली आणि त्याचे विपरीत परिणाम घडू लागले.
कीर्ती सांगते, "आमच्या लग्नाविषयी कळताच माझ्या वडिलांनी मला लोखंडी रॉडने मारहाण केली. त्यावेळी मला खूप रक्तस्त्राव झाला."
त्यांनी तिच्याकडून वडिलांच्या संपत्तीवरील हक्कसोड पत्र मागितलं. आणि तिचं लग्न मोडलं तर पुन्हा कधीच ती तिच्या आईवडिलांकडे परत येणार नाही असं पत्र लिहून मागितलं.
हातावर 100 रुपये टेकवून कीर्तीच्या आई-वडिलांनी तिला घर सोडायला लावलं. कीर्ती आणि सुंदर दोघेही सरकारी नोकऱ्या करत असल्यामुळे त्यांना आर्थिक अडचणी आल्या नाहीत.
ते जिवंत सुटले...
कन्नगी, मुरुगेसन, विमलादेवी, शंकर, इलावरसन ही नावं सोडून अशी कित्येक जोडपी आहेत ज्यांचा जातीच्या अभिमानाखाली जीव गेलाय. ही यादी बरीच मोठी आहे. बहुतेक आंतरजातीय विवाहांमध्ये जेव्हा जोडप्यातील कोणी एक दलित समाजातील असेल तेव्हा हिंसाचार ठरलेला असतो.
तामिळनाडूमध्ये आंतरजातीय विवाह करणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. 2015 मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, राज्यातील फक्त तीन टक्के लोकसंख्येने त्यांच्या जातीबाहेर लग्न केलंय.
इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पॉप्युलेशन सायन्सेस (IIPS) चे संचालक आणि सिनियर अकॅडमीक, के श्रीनिवासन यांच्या एका रिपोर्टनुसार, राष्ट्रीय स्तरावर हे प्रमाण 10 टक्क्यांनी जास्त आहे.
तामिळनाडूला पेरियार यांच्या जातीविरोधी आत्म-सन्मान चळवळीचा इतिहास लाभला असूनही, सर्वांना समान हक्क मिळावे आणि जातीची उतरंड नष्ट व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
जातीय भेदभाव नष्ट करण्यासाठी स्वाभिमान चळवळीने आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन दिलं. 1968 मध्ये हिंदू विवाह (तामिळनाडू दुरुस्ती) कायद्याद्वारे तामिळनाडूमध्ये स्वाभिमान विवाहांना कायदेशीर मान्यता मिळाली. आज तामिळनाडूतील अनेक लोक शतकानुशतके जुने ब्राह्मणी विधी नाकारून स्वाभिमान विवाह करत आहेत.
पण इतके प्रयत्न होऊन देखील आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना हिंसाचारापासून मुक्तता मिळालेली नाही. आंतरजातीय विवाहांची नोंदणी करण्यास मदत करणारे वकील रमेश सांगतात, आंतरजातीय विवाह करणारी जोडपी बऱ्याचदा घराच्यांना माहीत पडू नये यासाठी मंदिरांमध्ये लग्न करतात. विवाहाची अधिकृत नोंद न झाल्यामुळे ते हिंसाचाराला बळी पडतात.
"मंदिरामध्ये लग्न झाल्याने मुलीचे पालक पोलिसात मुलगी हरवल्याची तक्रार नोंदवतात. मग पोलिस त्या जोडप्याचा शोध घेतात आणि मुलीला तिच्या कुटुंबीयांकडे परत पाठवतात. त्यांच्या लग्नाला कायद्याची वैधता राहत नाही."
आंतरजातीय विवाहासाठी मॅट्रिमोनिअल वेबसाईट
आंतरजातीय विवाहाची नोंदणी करणं सोपं नसतं. रमेश सांगतात की, अधिकारी अनेकदा जोडप्यांना त्यांच्या पालकांना रजिस्ट्रार ऑफिसमध्ये घेऊन यायला सांगतात. आणि विशेष म्हणजे कोणत्याही विवाह कायद्यानुसार याची आवश्यकता नसते.
लग्नाची नोंदणी करण्यासाठी पालकांची संमती गरजेची नसल्याचं रमेश अधिकाऱ्यांना पटवून सांगतात. त्यांनी बऱ्याच जोडप्यांना या प्रकरणात मदत केली आहे.
पण आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि जोडप्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी उचललेलं हे एक छोटंस पाऊल आहे. रमेश यांना याहीपुढे जाऊन काम करायचं आहे. त्यांना विविध जातींमधील स्त्री-पुरुषांबरोबर संवाद साधण्यासाठी आणि जोडीदार शोधण्यासाठी एक सुरक्षित जागा तयार करायची आहे.
म्हणून त्यांनी दोन महिन्यांपूर्वी मॅट्रिमोनिअल वेबसाईट सुरू केली. त्यांच्या या मॅट्रिमोनिअल वेबसाईटचं नाव आहे 'मणिदम' म्हणजे मानवता. आज जवळपास शंभर जणांनी यासाठी नोंदणी केली आहे.
दलित लेखिका आणि कार्यकर्त्या जयाराणी सांगतात की, तामिळनाडूमधील लोक रोटीबेटी प्रथा पाळतात. स्त्रियांनी त्यांच्या जातीबाहेर लग्न करू नये यासाठी मामा किंवा नात्यातील भावांबरोबर लग्न करण्याच्या प्रथा इथे अस्तित्वात आहेत.
नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे (NFHS - 5) 2019-21 नुसार, तामिळनाडूमधील 28% स्त्रियांनी आपल्या नात्यातील पुरुषांशी विवाह केले आहेत. आणि देशात हा टक्का सर्वाधिक आहे.
त्या पुढे सांगतात की, "रोटीबेटी प्रथांचं पालन होत असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर हत्या होत आहेत."
मात्र या गुन्ह्यांची नोंद होण्याचं प्रमाण देखील कमी आहे. स्टेट क्राईम ब्युरो रेकॉर्डमध्ये 2013 नुसार राज्यात दोनच 'ऑनर किलिंग' घटनांची नोंद झाली आहे. आणि हे दोन्ही गुन्हे 2017 साली घडले होते.
पण दलितांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या आणि ऑनर किलिंग विरोधात काम करणाऱ्या एव्हिडन्स या स्वयंसेवी संस्थेने गोळ्या केलेल्या माहितीनुसार, 2020 ते 2022 दरम्यान ऑनर किलिंगच्या 18 घटना घडल्या आहेत.
उशिरा मिळणारा न्याय
तामिळनाडू अस्पृश्यता निर्मूलन आघाडीचे (TNUEF) सरचिटणीस सॅम्युअल राज म्हणतात की, ऑनर किलिंग घडण्यामागे सरकारकडून संरक्षण न मिळणं आणि सुरक्षित ठिकाण नसणं या गोष्टी कारणीभूत आहेत.
एप्रिल 2016 मध्ये दिलीप कुमार या दलित पुरुषाशी लग्न केल्यामुळे कल्लर समाजातील विमलादेवी या महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर मद्रास उच्च न्यायालयाने तामिळनाडू सरकारला प्रत्येक जिल्ह्यात स्पेशल सेल, 24 तास हेल्पलाइन नंबर, मोबाइल अॅप्स, आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना मदत मिळवण्यासाठी ऑनलाइन तक्रार नोंदणी सुविधा सुरू करण्याचे निर्देश दिले होते.
आम्ही चार जिल्ह्यांतील हेल्पलाइन क्रमांक वापरून पाहिले पण कुठूनच प्रतिसाद मिळाला नाही. आंतरजातीय विवाहाची प्रकरणं पोलिस बऱ्याचदा चुकीच्या पद्धतीने हाताळत असल्याचेही आरोप लोकांनी केलेत.
सॅम्युअल राज सांगतात, "जेव्हा पालक पोलिसांशी संपर्क साधतात तेव्हा ते अनेकदा 'कट्टा पंचायती' पद्धतीने प्रकरण मिटवतात आणि जोडप्याला वेगळं करतात. वरच्या जातीच्या मुलींना शक्यतो त्यांच्या कुटुंबाकडे परत पाठवलं जातं. तर काही प्रकरणात मुलींचा बळी जातो."
2014 मध्ये विमलादेवीचा मृत्यू झाला. आज याला जवळपास दहा वर्ष लोटली तरीही त्यांच्या खटल्याची सुनावणी सुरूच आहे. आम्ही दिलीप कुमार यांच्याशी संपर्क साधला तेव्हा ते म्हणाले की, माझ्या पत्नीला न्याय मिळेल अशी आशा आहे. अशा प्रकरणांमध्ये दोषी मोकाट सुटण्यामागे काही कारणं आहेत.
सॅम्युअल सांगतात "बऱ्याचदा एखादी हत्या झाली की पीडितेचं कुटुंब न्यायासाठी झगडतं. पण जेव्हा आंतरजातीय विवाहातून खून होतात तेव्हा कुटुंबातील सदस्यच मारेकरी असतात. त्यामुळे दोषी शोधणं बाजूलाच राहिलं, न्यायासाठी लढा सुरू करण्याची कोणाचीही इच्छा होत नाही."
आशा...
कीर्ती 25 वर्षांची होती आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होती, त्यामुळेच तिने सुंदरशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण तिचे निर्णय तिने स्वतः घ्यावेत इतकी ती शहाणी नसल्याचं तिच्या पालकांना वाटत होतं.
कीर्ती सांगते, "माझी आई मला ब्रेनवॉश करणारे लेक्चर्स द्यायची. तिने मला सांगितलं होतं की, दलित पुरुष उच्चजातीच्या स्त्रिया शोधून त्यांच्याशी लग्न करण्यासाठी शपथ घेतात. मी माझ्या सबंध आयुष्यात ऐकलेली ही सर्वात हास्यास्पद गोष्ट होती."
हा एक प्रदीर्घ चालणारा लढा आहे.
2022 मध्ये दलित ह्युमन राइट्स डिफेंडर नेटवर्क आणि जातीविरोधी संघटनांनी एकत्र येऊन 'विवाह, संघटना स्वातंत्र्य आणि सन्मानाच्या नावावर गुन्हेगारी प्रतिबंध कायदा 2022' हा मसुदा तयार केला.
यामुळे पीडित होण्यापासून संरक्षण मिळते. अशा गुन्ह्याच्या घटनांमध्ये गुन्हेगारांना किती शिक्षा द्यावी आणि पीडितांसाठी भरपाई आणि पुनर्वसन याची रूपरेषा ठरवली आहे.
कीर्तीला आज दोन वर्षांची मुलगी आहे. मागच्या चार वर्षांत तिची आई तिच्याशी दोनदाच बोलली. तिचे वडील आजही मनात राग धरून आहेत. त्यांनी कीर्तीच्या लग्नानंतर कधीही तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला नाही. पण एक दिवस ते नक्की बोलतील असं कीर्तीला वाटत राहतं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)