You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
खतांच्या किंमती वाढणार की कमी होणार? जाणून घ्या...
- Author, श्रीकांत बंगाळे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
2023 चा खरिप हंगाम जवळ आला आहे. त्यातच केंद्र सरकारनं खरिप हंगाम 2023 साठी P&K (फॉस्फेट आणि पोटॅश) खतांसाठीचं अनुदान जाहीर केलं आहे.
1 एप्रिल 2023 ते 30 सप्टेंबर 2023 दरम्यान हे अनुदान लागू असणार आहे.
केंद्र सरकारकडून राखायनिक खतांवर NBS (Nutrient Based Subsidy) या योजनेअंतर्गत अनुदान दिलं जातं. खतांमधील पोषकद्रव्यांच्या आधारावर म्हणजे त्या खतात किती किलो नायट्रोजन, फॉस्फेट, पोटॅश आणि सल्फर आहे, यानुसार हे अनुदान दिलं जातं.
यंदाच्या खरिप हंगामात खतांवरील अनुदानासंदर्भात 17 मे रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली.
या बैठकीनंतर केंद्रीय रसायन आणि खते मंत्री मनसुख मांडवीय यांनी जाहीर केलंय की, “खरिप हंगामात भारत सरकार खतांची किंमत वाढवणार नाही. खतांवरील अनुदानापोटी युरियासाठी 70 हजार कोटी रुपये आणि डीएपीसाठी 38 हजार कोटी रुपये दिले जाणार आहेत.”
याचा अर्थ 1 लाख 8 हजार कोटी रुपयांचं अनुदान खतांसाठी सरकार देणार आहे.
“यंदा खताचे दर वाढवले जाणार नाहीत. शेतकऱ्यांना आज ज्या किंमतीत युरिया, डीएपी आणि एनपीके खतं मिळत आहेत, त्याच किंमतीत ते मिळत राहिल,” असंही मांडवीय यांनी स्पष्ट केलं आहे.
खतांचे सध्याचे दर काय आहेत?
खतांचे दर वाढवण्यात येणार नाही, असं सरकारनं स्पष्ट केलं आहे. याचा अर्थ सध्या ज्या किंमतीला खत शेतकऱ्यांना मिळत आहेत, त्याच किंमतीला ते मिळणार आहे.
त्यामुळे खतांचे सध्याचे दर किती आहेत ते जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं.
भारतात सर्वाधिक वापर यूरिया या खताचा केला जातो. सगळ्या खत उत्पादक कंपन्यांची यूरियाची 45 किलोची एक बॅग शेतकऱ्यांना 266 रुपयांनाच मिळत आहे. तर 50 किलोची बॅग 295 रुपयांना मिळत आहे.
डीएपी खताची 50 किलोची एक बॅग साधारणपणे 1350 रुपयांना मिळत आहे.
एमओपी खताची किंमत -
- कोरोमंडल – 1700 रुपये
- इंडियन पोटॅश लिमिटेड – 1700 रुपये
- महाधन – 1780 रुपये
- कृभको -875 रुपये
- झुआरी -875 रुपये
खताचा ग्रेड आणि कंपनीनुसार, 50 किलोच्या एका बॅगची किंमत पुढीलप्रमाणे -
खताचा ग्रेड -NPK -10:26:26
- इफ्को - 1470 रुपये
- महाधन – 1470 रुपये
- कोरोमंडल – 1470 रुपये
- राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर्स लिमिटेड - 1470 रुपये
खताचा ग्रेड -NPS - 20-20-0-13
- कोरोमंडल – 1200 रुपये
- इफ्को – 1200 रुपये
- महाधन – 1300 रुपये
- ग्रीनस्टार - 1275 रुपये
खताचा ग्रेड -NPK - 12-32-16
- कोरोमंडल – 1470 रुपये
- इफ्को – 1470 रुपये
- महाधन – 1800 रुपये
- प्रदीप फॉस्फेट लिमिटेड -1470 रुपये
खतांची किंमत स्थिर राहणार की कमी होणार?
केंद्र सरकारनं निर्देश दिल्याप्रमाणे, सध्याच्या दरानुसारच खत मिळणार आहे. पण, सामान्यपणे सरकारनं अनुदान घोषित केल्यानंतर खत उत्पादक कंपन्या खतांच्या किंमती जाहीर करत असतात.
खतांच्या किंमतीविषयी बोलताना बुलडाणा जिल्ह्यातील खत पुरवठादार सोहन सावजी सांगतात, “खत उत्पादक कंपन्यांनी अद्याप त्यांच्या किंमतीविषयीचं अपडेट दिलेलं नाहीये. खतांच्या किंमत स्थिर राहणार, वाढणार की कमी होणार, हे पुढच्या 1 ते 2 दिवसांत स्पष्ट होईल.”
खत विक्रेते भाऊसाहेब नरवदे यांच्या मते, “अद्याप तरी खत विक्रीचा सीझन सुरू झालेला नाहीये. पण, खतांचे जे दर मागच्या वर्षी होते तेच यंदाही कायम राहणार आहेत. सरकारनं तसं स्पष्ट केलं आहे.”
खताची किंमत अशी पाहा...
कोणत्याही कंपनीच्या खताची किंमत जाणून घेण्यासाठी सर्वप्रथम किसान सुविधा या वेबसाईटवर जा.
इथल्या खते या पर्यायावर क्लिक करून मग खताची किंमत या पर्यायावर क्लिक करा.
तिथं राज्य आणि खताचा प्रकार निवडून सबमिट बटनावर क्लिक करा. पुढे तुम्हाला तुम्ही निवडलेल्या खताच्या प्रकारासाठी कंपनीनुसार किंमत दिलेली दिसेल.
तुमच्या जवळच्या खत विक्रेत्याकडे खताचा किती साठा उपलब्ध आहे, तेही तुम्ही इथं पाहू शकता.
त्यासाठी या वेबसाईटवर गेल्यानंतर खते या पर्यायावर क्लिक करून ‘खताचा स्टॉक स्थिती’ या पर्यायावर क्लिक करा.
पुढे राज्य, जिल्हा आणि विक्रेत्याचं नाव निवडा आणि सबमिट बटनावर क्लिक करा. तिथं सदर विक्रेत्याकडे कोणतं खत किती मेट्रिक टन उपलब्ध आहे ते दिसेल.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)