दानुष्का गुणातिलके लैंगिक संबंधांदरम्यान विनासंमती कंडोम काढल्याच्या आरोपातून असा सुटला

32-वर्षांच्या दानुष्का गुणातिलकेवर गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात एका महिलेसोबत डेटवर असताना लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप झाला होता.

आधी या महिलेने बलात्काराचाही आरोप केला होता, पण नंतर प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान तिने स्टिलदिंगचा आरोप केला, म्हणजे लैंगिक संबंधांदरम्यान दानुष्काने तिला न सांगता काँडम काढला असं तिचं म्हणणं होतं.

कोर्टात देण्यात आलेल्या माहिती नुसार दानुष्का आणि 29 वर्षीय तक्रारदार तरुणी 29 ऑक्टोबर 2022 ला टिंडरवर भेटले होते.

त्यानंतर 2 नोव्हेंबरला सिडनीमध्ये डिक्स आणि डिनरसाठी भेटले. त्यानंतर ते तक्रारदार तरुणीच्या घरी आले. त्यावेळी दानुष्काने तक्रारदार तरुणीवर सेक्स करण्यासाठी दबाव आणला. तसंच सेक्स दरम्यान तीन वेळा तिचा गळा आवळला आणि एकदा तर 30 सेकंदांसाठी तिचा गळा आवळला होता, असा दावा पोलिसांच्या अहवालात करण्यात आला आहे.

पीडितेला तिच्या जीवाची भीती वाटत होती म्हणून ती पुढे येऊन बोलण्यास घाबरत होती, असा दावासुद्धा पोलिसांनी कोर्टात केला होता.

सेक्स दरम्यान काँडम जमिनीवर पडलेलं तक्रारदार महिलेने पाहिलं, ते घालण्यासाठी त्याला सांगण्यात आलं, पण त्यानं त्याकडे दुर्लक्ष केलं असंसुद्धा पोलिसांच्या अहवालात म्हणण्यात आलं होतं.

तक्रारदार महिलेने दावा केला की तिने घाबरत सर्व प्रकार तिच्या 2 मैत्रिणींना सांगितला.

त्यानंतर तिनं मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेतल्याचा दावा केला. शिवाय गळा दाबल्यामुळे काही दुखापत तर झाली नाही ना यासाठी तिने डॉक्टरांकडून तपासणी करून घेतली. त्यानंतर मग तिने पोलिसात तक्रार करण्यासाठी धाव घेतली.

तक्रारदार तरुणी आणि त्याच्यात सहमतीने सेक्स झाल्याचा दावा, दानुष्काने पोलिसांच्या जबाबात केला होता. तसंच सेक्स दरम्यान कुठलीही हिंसा केली नसल्याचं त्याने पोलिसांना सांगितलं होतं.

ऑस्ट्रेलियाच्या न्यू साऊथ वेल्स कोर्टात चार दिवस हा खटला चालला. कोर्टात दानुष्काच्या वकिलांनी म्हटलं की या महिलेनी वेळोवेळी आपला जबाब बदलला आहे.

कोर्टाने हे मान्य केलं की दानुष्का खरं सांगतोय आणि तक्रारदार महिला विरोधाभासी गोष्टी सांगतेय.

कोर्टाचा निकाल आल्यानंतर दानुष्काने म्हटलं की, “या निर्णयाने खरं काय ते समोर आलं. मला आनंद आहे की माझं आयुष्य आता पूर्ववत होईल. मी पुन्हा क्रिकेट खेळण्यासाठी अतिशय उत्सुक आहे.”

कोण आहे दानुष्का गुणातिलके?

डावखुरा दानुष्का आक्रमक बॅटिंग शैलीसाठी ओळखला जातो. 2015 मध्ये श्रीलंका अ संघाच्या न्यूझीलंड दौऱ्यात त्याने चांगली कामगिरी केली.

2017 मध्ये गुणतिलकाने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारताविरुद्ध 72बॉलमध्ये 76 रन्सची वेगवान खेळी साकारत श्रीलंकेला दिमाखदार विजय मिळवून दिला होता. गुणतिलके मूळ संघात नव्हता पण चामरा कपूगेडराला झालेल्या दुखापतीमुळे त्याला संधी मिळाली. दानुष्काने त्या संधीचं सोनं केलं.

कुमार संगकाराला आदर्श मानणारा गुणतिलका ऑफस्पिन बॉलिंगही करतो. आक्रमक शैलीमुळे ट्वेन्टी20 प्रकारात श्रीलंकेच्या संघाचा तो अविभाज्य भाग आहे.

दानुष्काने आतापर्यंत 8 टेस्ट, 47 वनडे आणि 46 ट्वेन्टी-20 सामन्यात श्रीलंकेचं प्रतिनिधित्व केलं आहे. वनडे प्रकारात दानुष्काच्या नावावर दोन शतकंही आहेत.

दानुष्काने 2017 मध्ये गॉल इथे भारताविरुद्ध पदार्पण केलं होतं.

2022 च्या T-20 वर्ल्डकपमध्ये दानुष्का गीलाँग इथे झालेल्या नामिबियाविरुद्धच्या लढतीत खेळला. त्यात त्याला भोपळाही फोडता आला नाही. हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे दानुष्का स्पर्धेत पुढे खेळू शकणार नसल्याचं स्पष्ट झालं होतं. खेळू शकणार नसला तरी दानुष्का संघाबरोबर ऑस्ट्रेलियातच होता. तो मायदेशी परतला नव्हता.

लैंगिक अत्याचाराच्या आरोपानंतर श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने त्याला सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निलंबित केलं होतं.

दानुष्का आणि वाद

2017 मध्ये दानुष्कावर गैतवर्तणुकीवरून कारवाई करण्यात आली होती. तेव्हा त्याला 6 मॅचेससाठी निलंबित करण्यात आलं होतं. त्यावेळी स्वतःचं क्रिकेट किट न आणण्याचा आरोपसुद्धा त्याच्यावर करण्यात आला होता. पण नंतर ही कारवाई फक्त 3 मॅच पुरतीच करण्यात आली.

2018 मध्ये दानुष्कावर पुन्हा एकदा 6 मॅचेससाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली. यावेळी त्याच्यावर टीम कर्फ्युचं पालन न केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.

2018 मध्ये जेव्हा त्याच्या जवळच्या मित्रावर नॉर्वेच्या एका महिलेवर बलात्काराचे आरोप होते तेव्हा त्याच्यावर पुन्हा एकदा निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.

2021 मध्ये UKमध्ये असताना कोरोना बायो बबलच्या नियमांचा भंग केल्यामुळे दानुष्कावर 1 वर्षाच्या निलंबनाची कारवाई करण्यात आलेली. सहा महिन्यांनतर मात्र त्याच्यावरची ही कारवाई मागे घेण्यात आली होती.

हेही वाचलंत का?

बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.