'108 आली असती, तर मुलगा वाचला असता'; वाढते अपघात अन् सुविधांचा अभाव, समृद्धी महामार्गाचा ग्राऊंड रिपोर्ट

संतोष आजबे

फोटो स्रोत, kiran sakale

फोटो कॅप्शन, संतोष आजबे

"माझ्या मुलाला फक्त आणि फक्त ऑक्सिजनची गरज होती. 108 आली असती तर आज माझा मुलगा हयात असता."

अहिल्यानगरच्या नवनागापूर येथील संतोष आजबे सांगत होते.

'हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गा'च्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण होऊन 11 डिसेंबर 2025 रोजी 3 वर्षं पूर्ण होत आहेत.

समृद्धी महामार्गावर आजघडीला दररोज सरासरी 42 हजार 78 वाहने प्रवास करताहेत. हा महामार्ग लोकांसाठी खुला करण्यात आला तेव्हापासून या महामार्गावर 4762 अपघात झाले आणि या अपघातांमध्ये 314 जणांचा मृत्यू झालाय.

नवनागापूर येथील संतोष आजबे यांच्या 17 वर्षांच्या मुलाचा, विवेक आजबे याचा समृद्धी महामार्गावरील अपघातात मृत्यू झाला. मे 2025 मध्ये ही घटना घडली.

संतोष सांगतात, "गाडी चालली होती, ड्रायव्हरचं म्हणणं आलं की, गाडी अशी भिंगली. राऊंड अप झाला आणि गाडी डिव्हायडरचा जो साईडचा पॅनल आहे, त्याच्यावर आदळली.

"माझ्या मुलाला फक्त आणि फक्त ऑक्सिजनची गरज होती. त्याला ऑक्सिजन घेता येत नव्हता. 108 आली असती तर आज माझा मुलगा हयात असता."

विवेक हा संतोष आजबे यांचा एकुलता एक मुलगा होता.

वैद्यकीय मदत वेळेवर न मिळाल्याचं आजबे कुटुंबाचं म्हणणं आहे.

तर, "कोणत्याही घटनेमध्ये मदत वेळेवर मिळाली नसल्याचं निदर्शनास आलेलं नाही. आजपर्यंत घटनेची माहिती मिळाल्यानंतर जास्तीत जास्त 20 मिनिटांमध्ये मदत पोहचली," असं महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ म्हणजेच MSRDC कडून बीबीसी मराठीला सांगण्यात आलं.

अपघात वाढले, मृतांची संख्याही वाढली

समृद्धी महामार्गावरील अपघात आणि अपघातांमधील मृतांची संख्या वाढलीय. माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहिती अधिकारांतर्गत मिळवलेल्या आकडेवारीनुसार,

समृद्धी महामार्गावर 2024 मध्ये 137 अपघात झाले आणि त्यात 126 मृत्यू झालेत. 2025 च्या ऑक्टोबरपर्यंत अपघातांची संख्या 154 वर पोहचलीय आणि 128 जणांचा मृत्यू झालाय.

समृद्धी महामार्गावरील अपघात, ग्राफिक्स कार्ड

रस्ते सुरक्षाविषयक काम करणाऱ्या परिसर या संस्थेनं समृद्धी महामार्गाची पाहणी केली होती.

परिसर संस्थेतील नगररचनाकार आदित्य चवांदे सांगतात, "समृद्धी महामार्गावर रोड डिझाईन इश्यू आम्हाला जाणवलेला आहे. समृद्धी महामार्गाला culvert sections भरपूर आहेत. ते इतके वारंवार येतात की, त्याच्यावरुन प्रवास करताना रस्त्याचा पृष्ठभाग सलग नसल्याचं जाणवतं.

त्यानंतर रस्त्याची edge wall हीसुद्धा रस्त्याच्या रुंदीनुसार नाहीये. त्याच्यात डिफ्लेक्शन आहे, तो रस्ता त्या भागात निमुळता होतो आणि मग पुन्हा तो वाढतो."

समृद्धी महामार्गावर गाड्या आदळल्याच्या खूणा

फोटो स्रोत, kiran sakale

फोटो कॅप्शन, समृद्धी महामार्गावर गाड्या आदळल्याच्या खूणा

पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी सुचनेला उत्तर देताना तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी Intelligent Traffic Management System (ITMS) बसवण्याविषयी सांगितलं होतं.

ते म्हणाले, "ITMS प्रणालीच्या माध्यमातून संपूर्ण समृद्धी महामार्ग प्रत्येक वाहनानं किती वेगानं चाललं पाहिजे, कोणत्या लेननं चाललं पाहिजे, या संदर्भातील 17 प्रकारचे जे उल्लंघन आहेत, ते होणार नाहीत. यासाठी ITMS प्रणाली बसवायला घेतलेली आहे. जेणेकरुन अपघातांचं प्रमाण कमी करता येईल."

11 दिवसांनंतरही रस्ता खचलेला

आम्ही 19 नोव्हेंबर 2025 रोजी छत्रपती संभाजीनगरहून शहापूरपर्यंत समृद्धी महामार्गावरुन प्रवास केला. त्यावेळी काही ठिकाणी गाड्या आदळल्याच्या खूणा दिसल्या. काही ठिकाणी (धोक्याची चिन्हे) Hazard signs जे रस्त्याच्या बाजूनं असणं अपेक्षित होते, ते रस्त्याच्या बाहेर लावण्यात आल्याचं दिसलं.

समृद्धी महामार्गावरील 506.6 ते 506.7 या पॉईंटदरम्यान रस्ता खाली खचल्याचं स्पष्टपणे दिसून आलं. इथून वाहनं मोठ्या वेगानं प्रवास करत होते.

8 नोव्हेंबरला आम्ही या रस्त्यावरुन प्रवास केला, तेव्हाही या पॉईंटरम्यानचा रस्ता खचलेलाच होता. 11 दिवसांनंतरही तीच स्थिती कायम होती.

समृद्धी महामार्गावर पुरेशा प्रमाणात सोयीसुविधा नसल्याचं या महामार्गावरुन सातत्यानं प्रवास करणाऱ्यांचं म्हणणं आहे.

समृद्धी महामार्गावरील रस्त्याचा खचलेला भाग

फोटो स्रोत, kiran sakale

फोटो कॅप्शन, समृद्धी महामार्गावरील रस्त्याचा खचलेला भाग

विजय भागवत ट्रक चालक आहेत. समृद्धी महामार्गावर एका पेट्रोलपंपाजवळ ट्रक उभा करुन ते विश्रांती घेत होते.

बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, "सुविधेचं म्हणाल तर, झोपण्यासाठी सुविधा नाही. त्यानंतर जेवणाची सुविधा नाहीये. अॅडजस्ट म्हणजे एखादा पंप पाहणं, तिथं खाली उतरणं, तिथं बी चोरी चपाटीचा भेव."

समृद्धी महामार्गावर प्रवास करताना आम्ही काही फूड कोर्टवर थांबलो. तिथं चहाचा एक कप 40 रुपयांना मिळाला. चहाच्या एका कपाच्या किंमतीची चर्चा उपस्थितांमध्ये सुरू होती.

समृद्धी महामार्गावर पाण्याची सुविधा नसल्यामुळे ट्रक चालकांना पेट्रोलपंपावरील वॉटर पॉईंटवर अवलंबून राहावे लागते.

फोटो स्रोत, Kiran sakale

फोटो कॅप्शन, समृद्धी महामार्गावर पाण्याची सुविधा नसल्यामुळे ट्रक चालकांना पेट्रोलपंपावरील वॉटर पॉईंटवर अवलंबून राहावे लागते.

इथंच आमची भेट संतराम यादव यांच्याशी झाली. ते अनेक दिवसांपासून या महामार्गावरुन प्रवास करतात. पेट्रोल पंपावरील एका वॉटर पॉईंटवर ते पिण्यासाठीचं पाणी भरुन घेत होते.

ते म्हणाले, "सोयीसुविधा काहीच नाही. तुम्ही पाहा, 40 रुपयांचा चहा आहे. कोण पिऊ शकतं? ड्रायव्हर पिऊ शकतो का? नाही पिऊ शकत.

सर्वांत जास्त त्रास पाण्याचा आहे. प्यायला पाणीच मिळत नाही. अशात रस्त्यात टायर वगैरे फुटलं, तर मग त्यात दोन दिवस गेलेच म्हणून समजा."

टोल घेता, मग सुविधांचं काय?

समृद्धी महामार्गावर पेट्रोल पंपाशेजारीच फूड कोर्ट उभारण्यात आलेत. एका पेट्रोलपंपावर काही ट्रकचालक पिण्याचं पाणी बाटल्यांमध्ये भरुन घेताना दिसले.

टोलच्या रकमेच्या तुलनेत या महामार्गावर चांगल्या सुविधाही मिळाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जातेय.

समृद्धी महामार्गाबाबात नागपूर येथील अनिल वडपल्लीवार यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केलीय.

ते सांगतात, "लोकांना सोयीसुविधा पुरवण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले, याबाबत सरकारनं शासनाला अनेक ताशेरे ओढले आहेत.

आमचं म्हणणं आहे की, तुम्ही लोकांकडून टोल घेताय तर लोकांना सुविधा उपलब्ध करून द्या. आज एका गाडीला नागपूर ते मुंबई जाण्यासाठी सुमारे दोन ते अडीच हजार रुपयाचा टोल लागतो. मग त्या हिशेबाच्या सोयी मिळाल्या पाहिजेत."

समृद्धी महामार्गावर आकारण्यात येणारा पथकर

फोटो स्रोत, kiran sakale

फोटो कॅप्शन, समृद्धी महामार्गावर आकारण्यात येणारा पथकर

"फडणवीस सरनं हे केलं पाहिजे, ड्रायव्हर लोकांसाठी 100 किलोमीटरवरती सर्व्हिस रोड दिला पाहिजे. पाण्याचा स्टॉप दिला पाहिजे," समृद्धी महामार्गावर चालक आकाश गवई यांनी ही भावना व्यक्त केली.

दरम्यान, "रस्त्यालगतच्या सुविधांमध्ये वाढ केली जाणार असून काही ठिकाणी नवीन पेट्रोलपंप कार्यान्वित केले जाणार आहेत.

त्याबाबतचा आढावा घेण्यात आलाय. जिथं अंतर जास्त आहे, तिथं मध्येमध्ये काही रेस्ट रूम्स करता येईल का, याचीही पडताळणी सुरू आहे," असं MSRDC च्या अधिकाऱ्यांनी बीबीसी मराठीला सांगितलं.

'कमी वेळेत पोहचण्यापेक्षा, सुरक्षित प्रवास महत्त्वाचा'

61 हजार कोटी रुपये खर्चून 701 किलोमीटर लांबीचा समृद्धी महामार्ग तयार करण्यात आला आहे. या महामार्गावर सध्या 22 ठिकाणी पेट्रोल पंप असून 29 ठिकाणी उपहारगृह आहेत.

या महामार्गामुळे नागपूर ते मुंबई प्रवास फक्त 8 तासांत पूर्ण करता येणार असल्याचं सरकारचं म्हणणं आहे.

"एका ठिकाणाहून दुसरीकडे लवकरात लवकर पोहण्याचा उद्देश ठेवून रस्त्यांच्या योजना बनवण्यापेक्षा आपण किती सुरक्षितपणे पोहचू शकतो, हा उद्देश ठेवून रस्ता बनवायला पाहिजे," परिसर संस्थेचे आदित्य चवांदे म्हणतात.

कोणत्याही रस्त्याचं लोकार्पण करण्याआधी त्याचं सेफ्टी ऑडिट करायला हवं, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

समृद्धी महामार्गाचं सेफ्टी ऑडिट करण्यात आलं का, या प्रश्नाचं उत्तर MSRDC कडून बीबीसी मराठीला देण्यात आलं नाही.

समृद्धी महामार्गावरील रुग्णवाहिका

फोटो स्रोत, kiran sakale

फोटो कॅप्शन, समृद्धी महामार्गावरील रुग्णवाहिका

समृद्धी महामार्गावर 21 शीघ्र प्रतिसाद वाहनं, 108 च्या 21 रुग्णवाहिका, 16 गस्त घालणारी वाहनं, 16 क्रेन्स कार्यरत आहेत. तर 16 महामार्ग सुरक्षा पोलीस केंद्रं आहेत.

समृद्धी महामार्गातून 2 वर्षांत 50 हजार कोटी रुपये सरकारला मिळतील, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं होतं. समृद्धी महामार्ग हा केवळ एक रस्ता नसून महाराष्ट्राच्या समृद्धीचा आर्थिक कॉरिडॉर आहे, असंही ते म्हणाले.

ग्राफिक्स कार्ड

समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याच्या लोकार्पणापासून ते 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत, या महामार्गावरुन 2 कोटी 75 लाख 80 हजार 652 वाहनांनी प्रवास केलाय. यातून 2016 कोटी 36 लाख रुपयांचा महसूल प्राप्त झाल्याची माहिती आम्हाला माहिती अधिकार अर्जातून मिळाली.

समृद्धी महामार्गामुळे गेल्या 3 वर्षांत महाराष्ट्राच्या अर्थकारणावर काय फरक पडला? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

61 हजार कोटी रुपये खर्चून 701 किलोमीटर लांबीचा समृद्धी महामार्ग तयार करण्यात आलाय.

फोटो स्रोत, kiran sakale

फोटो कॅप्शन, 61 हजार कोटी रुपये खर्चून 701 किलोमीटर लांबीचा समृद्धी महामार्ग तयार करण्यात आलाय.

अर्थतज्ज्ञ प्रा. नीरज हातेकर म्हणतात, "ज्यातनं आर्थिक वाढ होईल, म्हणजे मॅन्यूफॅक्चरिंग आहे किंवा मोठमोठ्या सर्व्हिस इंडस्ट्रीज आहेत, असं काही या समृद्धी महामार्गाच्या बाजूनं झालं नाही.

फक्त रस्ते बांधून त्या भागांमध्ये आर्थिक विकास होईल, उद्योग येईल, कॉरिडॉर्स येईल, असं मला वाटत नाही.

"मला वाटतं आपण मागास भागांचा विचार करताना तिथल्या स्थानिक संसाधनांचा नीट वापर करुन त्यातनं मॅक्झिमम रिटर्न लोकांना कसा मिळू शकेल, हे जर जास्त बघितलं किंवा जोडून जरी बघितलं तरी आपल्याला बराच फायदा होईल."

नीरज हातेकर कोट कार्ड

समृद्धी महामार्गामुळे 1 हजार शेततळी तयार झाल्याचा सरकारचा दावा आहे, पण प्रत्यक्षात काहीच ठिकाणी शेततळी उभारल्याचं आम्हाला दिसलं.

समृद्धी महामार्गासाठी 1 लाख 64 हजार 669 झाडे तोडण्यात आली, तर समृद्धी महामार्गावर लावण्यात आलेल्या झाडांची संख्या 22 लाख 5 हजार 159 असल्याचा MSRDC चा दावा आहे.

समृद्धी महामार्गावर दोन्ही बाजूकडील रस्त्याच्या मधोमध मोठ्या प्रमाणावर रोपटे लावल्याचं दिसून येतं. त्यामुळे या रोपांनाच झाडं म्हणून ग्राह्य धरण्यात येत आहे का, हा प्रश्नही उपस्थित होतोय.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.