You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'रघुपति राघव राजा राम' भजन गायल्यावर गायिकेला माफी का मागावी लागली? कुठल्या शब्दावर होता आक्षेप?
- Author, सीटू तिवारी,
- Role, बीबीसी प्रतिनिधी, पाटणा
बिहारमध्ये लोकगायिका देवी यांना 'रघुपति राघव राजा राम' हे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचं आवडतं भजन गायल्याबद्दल माफी मागावी लागली आहे.
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त 25 डिसेंबरला एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला असताना ही घटना घटली.
अटल विचार परिषद आणि दिनकर न्याय समिती यांनी शिक्षणतज्ज्ञ मदन मोहन मालवीय यांची जयंती आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पाटण्यातील बापू सभागृहात दोन दिवसांच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.
माजी केंद्रीय मंत्री अश्विनी कुमार चौबे, अटल विचार परिषदेचे आधारस्तंभ आहेत.
या कार्यक्रमाचे आयोजक अर्जित शाश्वत चौबे होते. त्यांनी बीबीसीला सांगितलं, "या कार्यक्रमात एक दिवस गांधी मैदानात अटल दौडचं आयोजन करण्यात आलं होतं. तर दुसऱ्या दिवशी देशभरातून आलेल्या लोकांना अटल सन्मान दिला जाणार होता."
काय आहे प्रकरण?
अर्जित शाश्वत चौबे यांनी बिहारच्या भागलपूर विधानसभा मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवलेली आहे.
अर्जित म्हणतात, "लोकगायिका देवी यांचं फ्लाइट होतं. त्यामुळे त्यांना अटल सन्मान दिल्यानंतर एक गाणं गायल्यानंतर निरोप द्यायचा होता. त्यांनी गांधीजी आणि अटलजी या दोघांचं आवडतं भजन गायलं. त्यावर मागे बसलेल्या पाच-सहा जणांनी आरडाओरडा करत गोंधळ घालू लागले."
हे लोक तुमच्या परिचयाचे होते का, हा प्रश्न विचारल्यावर अर्जित म्हणाले, "बापू सभागृहात हजारो लोक आले होते. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला होता. ज्या लोकांनी गोंधळ घातला त्यांना मी ओळखत नाही."
अर्जित म्हणाले की, ही घटना दोन मिनिटांत घडली. अर्जित यांच्या म्हणण्यानुसार, या कार्यक्रमाच्या वेळी खासदार रविशंकर प्रसाद, संजय पासवान, सीपी ठाकूर देखील व्यासपीठावर उपस्थित होते.
लोकगायिका देवी यांना मागावी लागली माफी
या घटनेचा व्हीडिओ व्हायरल झाला. व्हीडिओमध्ये दिसतं आहे की "रघुपति राघव राजा राम हे भजन गायल्यानंतर देवी यांनी सर्वांची माफी मागितली. त्या म्हणाल्या, जर तुमच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर त्यासाठी मी तुम्हा सर्वांची माफी मागते."
असं बोलून देवी पोडियमवरून बाजूला झाल्या. त्यानंतर भाजपाचे नेते अश्विनी चौबे यांनी 'जय श्री राम' च्या घोषणा दिल्या.
अर्जित शाश्वत चौबे यांचा दावा आहे की पाच-सहा लोकांनीच गोंधळ घातला. मात्र "प्रभात खबर" या वृत्तपत्रातील बातमीनुसार 60-70 तरुण कार्यकर्त्यांनी तिथे गोंधळ घातला होता.
या वृत्तपत्रात लिहिलं आहे की, "60-70 तरुण कार्यकर्ते नाराज झाले आणि ते जागेवर उभं राहून घोषणा देत होते. त्यावर देवी म्हणाल्या की, देव एकच आहे आणि रामाचं स्मरण करणं हाच फक्त त्यांचा उद्देश होता. मात्र त्यांच्या बोलण्याचा परिणाम न झाल्यावर आयोजकांनी हस्तक्षेप केला होता."
या घटनेनंतर लगेचच लोकगायिका देवी यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं की, "लोकांच्या वेगवेगळ्या भावना असतात. मी 'रघुपति राघव' हे भजन गायले, ते भारतात सर्वच लोक गातात. आपला हिंदू धर्म खूप विशाल आहे, तो सर्वांनाच आपल्यात सामावून घेतो."
"मला वाटतं की, माणुसकी हा सर्वात मोठा धर्म आहे. मात्र कार्यक्रमात आलेल्या अनेकजणांच्या भावना बहुधा अल्लाहचं नाव घेतल्यामुळे दुखावल्या गेल्या. त्यामुळे मी त्या लोकांची माफी मागते. मात्र, मला वाटतं की सर्वांनी माणुसकी धर्माचा अंगिकार केला पाहिजे."
राजकारण तापलं
या प्रकरणावरून राजकारण तापत असल्याचं दिसतं आहे.
जेडीयूचे प्रवक्ते नवल शर्मा म्हणाले, "बिहार ही महात्मा गांधीजींची कर्मभूमी होती. बिहार सरकारच्या कोणत्याही दफ्तरी गांधीजीचं तत्त्वज्ञान लिहिलेलं सापडेल.
आमचे नेते आणि आमचा गांधीवादी मूल्यांवर अढळ विश्वास आहे. आघाडी सरकार संयुक्त कार्यक्रमाच्या आधारावर चालतात. एरवी कोणाच्याही विचारधारेवर टिप्पणी करणं योग्य नाही."
प्रदेश भाजपाचे प्रवक्ते असित नाथ तिवारी म्हणाले, "हा भाजपाचा कार्यक्रम नव्हता. एका कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आलं होतं. त्या कार्यक्रमाचं आमंत्रण भाजपाच्या नेत्यांना दिल्यामुळे ते गेले होते. भाजपला गांधीजींबद्दल पूर्ण आदर आहे."
तर गांधी संग्रहालयाचे संयुक्त सचिव आसिफ वसी बीबीसीला म्हणाले, "ज्या विचारधारेच्या लोकांचा कार्यक्रम होता, त्यांचा रघुपति राघव या शब्दांना आक्षेप नाही. मात्र, ईश्वर अल्लाह या शब्दांमध्ये 'अल्लाह' या शब्दाला त्यांचा आक्षेप आहे. नितीशजींचा दृष्टीकोन चुकीचा नाही. मात्र ते ज्यांच्यासोबत सरकारमध्ये आहेत, त्यांना 'अल्लाह' पसंत नाही."
लालू प्रसाद यादव आणि प्रियंका गांधी यांनीही केली टीका
काँग्रेसनं या प्रकरणावरून भाजपावर टीका केली आहे. केरळमधील वायनाड मतदारसंघातून काँग्रेसच्या खासदार म्हणून निवडून आलेल्या प्रियंका गाधी यांनी एक्स या सोशल मीडिया व्यासपीठावर लिहिलं, "बापू यांचं आवडतं भजन गायलं म्हणून भाजपाच्या नेत्यांनी लोकगायिका देवीजी यांना माफी मागण्यास भाग पाडलं. 'रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम' हे भजन त्यांना गाऊ दिलं नाही."
त्यांनी लिहिलं, "जगाला दाखवण्यासाठी म्हणून बापूजींच्या चरणी फूलं वाहतात. मात्र, प्रत्यक्षात त्यांच्याबद्दल यांना कोणताही आदर नाही. दाखवण्यासाठी म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतात. मात्र प्रत्यक्षात त्यांचा अपमान करतात. भाजप आमच्या सहिष्णू आणि सर्वसमावेशक संस्कृती-परंपरेचा इतका द्वेष करते की, ते आमच्या महापुरुषांचा वारंवार अपमान करतात."
तर राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी एक्स या सोशल मीडिया व्यासपीठावर लिहिलं की, "राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाला "जय सियाराम, जय सीताराम" या नावाबद्दल आणि घोषणबद्दल सुरुवातीपासूनच द्वेष आहे.
कारण त्यात माता सीतेची जयजयकार आहे. हे लोक सुरुवातीपासूनच महिला विरोधी आहेत. ते 'जय श्री राम' ची घोषणा देऊन लोकसंख्येतील अर्धी संख्या असलेल्या महिलांचा देखील अपमान करतात."
त्यांनी पुढे लिहिलं, "गायिका देवी यांनी कालच्या कार्यक्रमात बापूजींचं नाव असलेल्या सभागृहात बापूजींचं भजन गाऊन "सीताराम" म्हटलं तर भाजपानं माईक वर त्यांना माफी मागायला लावली.
तसंच माता सीतेच्या जय सीतारामच्या घोषणे ऐवजी जय श्रीरामच्या घोषणा द्यायला लावल्या. हे संघाचे लोक "सीता माते"सह महिलांचा अपमान का करतात?"
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)