आसाम: मंदिरात जाताना अडवलं, राहुल गांधींचं धरणं आंदोलन; राजकीय संघर्ष का पेटलाय?

    • Author, दिलीप कुमार शर्मा
    • Role, बीबीसी हिंदीसाठी
    • Reporting from, गुवाहाटी

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ आसाममधून जात असताना गेल्या दोन दिवसांपासून आसाममध्ये राजकीय संघर्ष पेटल्याचं पाहायला मिळत आहे.

राहुल गांधी सोमवारी, 22 जानेवारीला नागाव जिल्ह्यातील बताद्रवा येथील श्री श्री शंकरदेव सत्ता (मठ) मंदिरात जाणार होते, परंतु स्थानिक प्रशासनातर्फे त्यांना 17 किलोमीटर अलीकडे हैबोरगाव येथे रोखण्यात आलं.

आसामी समाजातील प्रतिष्ठित वैष्णव संत श्रीमंत शंकरदेव यांच्या जन्मस्थळी असलेल्या बताद्रवा सत्र मंदिरात जाण्यापासून रोखण्यात आल्यानंतर संतप्त झालेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह हैबरगाव येथेच धरणं आंदेलन सुरू केलं.

त्यापूर्वीच्या एका व्हिडीओमध्ये राहुल गांधी गाडीतून खाली उतरून पोलिसांना यात्रा थांबवण्यामागचं कारण विचारताना दिसले होते.

धरणे आंदोलनावर बसण्यापूर्वी राहुल गांधी यांनी अधिकाऱ्यांवर टीका केली आणि प्रसारमाध्यमांना म्हणाले, “असं दिसतंय की आज फक्त एकाच व्यक्तीला मंदिरात जाण्याची परवानगी आहे. मंदिरात कुणी जायचं हे पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरवणार का?”

ते पुढे म्हणाले, "आम्हाला 11 जानेवारी रोजी शंकरदेव जन्मस्थळाला भेट देण्याचं निमंत्रण मिळालेलं, परंतु रविवारी आम्हाला सांगण्यात आलं की कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती खूप नाजूक आहे. कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती नाजूक असताना गौरव गोगोई आणि इतर सर्वजण वैष्णव संत श्रीमंत शंकरदेव यांच्या जन्मस्थळी जाऊ शकतात, पण फक्त राहुल गांधी जाऊ शकत नाहीत.''

राहुल गांधी ज्या ठिकाणी धरणं आंदोलनाला बसले होते, त्या ठिकाणी त्यांचे समर्थक ‘रघुपती राघव राजाराम, पतित पावन सीताराम’ भजन गाताना दिसले.

काँग्रेस समर्थकही शंकराचं कीर्तन गाताना दिसले.

त्यानंतर स्थानिक खासदार आणि काँग्रेस नेते गौरव गोगोई यांनी मंदिरात जाऊन प्रार्थना केली.

राहुल गांधीऐंवजी आपल्याला श्रीमंत शंकरदेव यांच्या जन्मस्थळाला भेट देण्याची संधी मिळाल्याचं त्यांनी दर्शन घेतल्यानंतर सांगितलं.

गौरव गोगोई यांनी एक फोटो शेअर करत सांगितलं की, "श्री श्री शंकरदेव मठ पूर्णपणे रिकामी होता. तिथे अजिबात गर्दी नव्हती. कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते अशा खोट्या अफवा पसरवण्यात आलेल्या. मुख्यमंत्र्यांमुळे आजचा दिवस हा बताद्रवा आणि श्री शेंकरदेव यांच्या इतिहासात एक काळा दिवस ठरला आहे."

श्रीमंत शंकरदेव यांचं आसाममधील महत्त्व

22 जानेवारी रोजी सकाळी राहुल गांधी बताद्रवा श्री श्री शंकरदेव सत्र येथे जाणार असल्याचं काँग्रेसने घोषित केल्यापासूनच काँग्रेस आणि सत्ताधारी भाजपमध्ये संघर्ष आणि वाक् युद्धाला सुरूवात झालेली.

आसाममध्ये दोन दशकांहून अधिक काळ पत्रकारिता करत असलेले समीर के पुरकायस्थ म्हणतात की, 15-16व्या शतकातील संत-विद्वान आणि समाजिक-धार्मिक सुधारक श्रीमंत शंकरदेव यांना आसामच्या सर्वसमावेशक संस्कृतीचं प्रतिक मानलं जातं.

त्यामुळे देशात सध्या सुरू असलेल्या हिंदुत्वाच्या राजकारणात राहुल गांधी यांची बताद्रवा भेट अनेक अर्थांनी महत्त्वाची आहे.

पुरकायस्थ म्हणतात, "सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी राहुल गांधी यांच्या न जाण्याने भाजप त्यांना भविष्यात ज्याप्रकारे राजकीय कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करेल, त्याला उत्तर म्हणून श्रीमंत शंकरदेव यांच्या दर्शनाकडे पाहिलं जातंय."

मुख्यमंत्री काय म्हणाले?

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी यापूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना 22 जानेवारी रोजी बताद्रवा येथील श्रीमंत शंकरदेव यांच्या जन्मस्थान भेट न देण्याचा सल्ला दिला होता.

"सोमवारी होणाऱ्या राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या वेळी बताद्रवा येथे न जाण्याची आम्ही राहुल गांधींना विनंती करतोय कारण त्यामुळे आसामबाबत चुकीची प्रतिमा निर्माण होईल," असं मुख्यमंत्र्यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितलं.

ते म्हणाले होते की, प्रभू राम आणि राज्यात एक आदर्श म्हणून ओळखले जाणारे मध्ययुगीन वैष्णव संत यांच्यात कोणतीही स्पर्धा असू शकत नाही.

याशिवाय काँग्रेसने सोमवारसाठी मोरीगाव, जगीरोड आणि नेल्ली या ‘संवेदनशील भागातून’ जाणारा जो मार्ग निवडलाय तो टाळता आला असता, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं.

ते म्हणाले, "हा भाग संवेदनशील आहे आणि कायदा आणि सुव्यवस्थेची कोणतीही परिस्थिती उद्भवण्याची शक्यता मी नाकारू शकत नाही आणि म्हणूनच 22 जानेवारी रोजी राहुल गांधींच्या यात्रेदरम्यान अल्पसंख्याक बहुल भागातील संवेदनशील मार्गांवर कमांडो तैनात करण्यात आले आहेत."

दीर्घकाळ काँग्रेसमध्ये राहिलेले हिमंता बिस्वा सरमा 2015 मध्ये भाजपमध्ये सामिल झाल्यापासून राहुल गांधींवर टीका करत आले आहेत.

राहुल गांधी आणि हिमंता यांच्यातील शाब्दिक युद्ध

मणिपूर येथून 14 जानेवारीला सुरू झालेली भारत जोडो न्याय यात्रा गेल्या गुरुवारी आसाममध्ये पोहोचल्यापासून राहुल गांधी आणि हिमंता बिस्वा सरमा यांच्यात शाब्दिक युद्ध पेटल्याचं पाहायला मिळत आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांच्या एका सभेत आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचे देशातील सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री म्हणून वर्णन केलं होतं आणि असंही म्हटलेलं की ते "भाजपच्या इतर मुख्यमंत्र्यांना भ्रष्टाचाराचे धडे देऊ शकतात."

प्रत्युत्तरादाखल सरमा यांनी गांधी कुटुंब हे देशातील सर्वात भ्रष्ट कुटुंब असल्याचं म्हटलेलं.

त्यानंतर राहुल गांधींची यात्रा जोरहाट शहरातून जात असताना प्रशासनाने ठरवून दिलेल्या मार्गाचं उल्लंघन केल्याप्रकरणी यात्रेच्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

यादरम्यान उत्तर लखीमपूरमध्ये काँग्रेसच्या अनेक वाहनांवर दगडफेक करण्यात आल्याचा आणि परिसरात लावण्यात आलेले पक्षाचे पोस्टर आणि बॅनर फाडल्याचा आरोप काँग्रेसने केला होता.

या संदर्भात काँग्रेसने लखीमपूरमध्ये एक गुन्हा दाखल केला. यानंतर रविवारी ही यात्रा अरुणाचल प्रदेशातून आसाममध्ये परतत असताना आसाम प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष भूपेन बोरा यांच्यावर भाजप समर्थकांनी हल्ला केल्याने ते जखमी झाले.

मात्र, या हल्ल्यानंतर मुख्यमंत्री सरमा यांनी पोलीस महासंचालकांना गुन्हा नोंदवून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

हेही वाचलंत का?

बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.