पाकिस्तान क्रिकेट बोर्ड एका कुटुंबाची कंपनी बनत असल्याची टीका का सुरू झाली आहे?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, शमी चौधरी
- Role, क्रिकेट विश्लेषक
जय शहांना जे जमलं नाही तर रोहित शर्माच्या संघाने ते अगदी सहज करून दाखवलं. विडंबना ही आहे की, हे करण्यासाठी भारतीय संघाला फारसे प्रयत्नही करावे लागले नाहीत, पाकिस्तानने स्वतःच्या निष्काळजीपणामुळे भारताविरुद्धच्या सामन्यात जणू पराभव स्वीकारला.
संघर्ष करून चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद मिळवलेल्या पाकिस्तानला आता या स्पर्धेतून बाहेर पडण्याचं दुःख सहन करावं लागणार आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला कोणत्याही परिस्थितीत ही स्पर्धा यशस्वी करायची होती, पण प्रत्यक्ष मैदानात उतरून खेळणाऱ्या संघाच्या यशाची जबाबदारी मात्र निव्वळ आकडेवारी पाहून निवडलेल्या टीमवर टाकण्यात आली.
दुबईतल्या पराभवासाठी संघातले खेळाडू तर जबाबदार आहेतच पण, पराभवाचं खरं श्रेय पाकिस्तान क्रिकेट संघाच्या निवड समितीलाही दिलं पाहिजे.
दुबईत पाकिस्तान अनेकवर्ष खेळला आहे. पाकिस्तानात सामने होत नव्हते तेव्हा दुबई हेच त्यांचं होम ग्राऊंड होतं.
अशा परिस्थितीत खेळत असतानाही संघात दोन फिरकीपटू असायला हवेत असं या निवड समितीला वाटलं नाही आणि त्यांनी दुसऱ्या फिरकीपटूऐवजी एका वेगवान गोलंदाजाला संघात स्थान दिलं.
भारतीय संघाविरुद्ध दुबईच्या कोरड्या मैदानात डावखुरा फिरकीपटू प्रभावी ठरू शकतो, हे निव्वळ आकडेवारी आणि डेटाच्या आधारे खेळाडूंचं भविष्य ठरवणाऱ्या निवड समितीला माहिती नव्हतं का?
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघ निवडत असताना, पाकिस्तानला ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुर्मिळ विजय मिळवून दिलेल्या आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध निर्भेळ यश मिळवून दिलेल्या खेळाडूंना संघातून का वगळावं वाटलं असेल?
ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्याआधी संघात झालेले बदल, चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी रद्द का केले गेले असतील?


आकड्यांमध्ये रमणाऱ्या निवड समितीतल्या सदस्यांच्या डोक्यात हे आलं नसेल का? की सॅम आयुबच्या जागी खुशदील शाह याला संधी देणं महागात पडू शकतं. किंवा फखर झमानच्या आक्रमक खेळाऐवजी इमाम उल हकच्या बचावात्मक खेळाची निवड करणं ही चूक ठरू शकते?
तसंच पाकिस्तानच्या संघात खेळणाऱ्या आणि स्वतःची विराट कोहली, वसीम अक्रम आणि वकार युनूससोबत झालेली तुलना आवडणाऱ्या खेळाडूंना हे उमजत नसेल का? की केवळ द्विपक्षीय सामन्यांमध्ये चांगला खेळ करून भागत नाही तर, स्वतःला महान खेळाडू म्हणवून घ्यायला जागतिक स्पर्धांमध्ये स्वतःला वेळोवेळी सिद्ध करावं लागतं.
विराट कोहली महान खेळाडू आहे कारण, स्वतःचा खेळ दाखवण्यासाठी तो जागतिक स्पर्धांच्या नेहमी शोधात असतो.
रिकी पॉन्टिंग, सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा, वकार युनूस, ग्लेन मॅकग्रा यासारख्या खेळाडूंनी बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्ये स्वतःला सिद्ध केलं आहे. संपूर्ण जगाचं लक्ष त्यांच्याकडे असताना त्यांनी त्यांच्या खेळाचू चुणूक दाखवली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
पाकिस्तानचा क्रिकेट संघ निवडणाऱ्या निवड समितीतल्या एखाद्या सदस्याला थोडाफार क्रिकेट खेळायचा अनुभव असू शकतो, पण यामध्ये दबावात क्रिकेट खेळलेल्या एकही व्यक्तीला घेण्यात आलेलं नाही.
खरंतर, संपूर्ण पाकिस्तान क्रिकेटच्या संरचनेत आकिब जावेद वगळता एकही व्यक्ती असा नाही ज्याला दबावात क्रिकेट खेळण्याचा अनुभव असेल.
संघाचा विचार केला तर या पाकिस्तानी संघात असे अनेक तारे आहेत ज्यांना श्रीलंका, बांगलादेश, झिम्बाब्वे, वेस्टइंडिज सारख्या संघांविरुद्ध जिंकण्याच्या कला अवगत आहेत. मात्र, मोहम्मद शमी, हार्दिक पांड्या, मिसेल स्टार्क, कागिसो रबाडा, जोफ्रा आर्चर सारख्या मातब्बर खेळाडूंविरुद्ध खेळताना त्यांचे पाय लटपट हलतात.
एखादा फलंदाज तुलनेने दुबळ्या संघाविरुद्ध धावांचा रतीब घालून आयसीसी क्रमवारीत अग्रस्थानी पोहोचू शकतो आणि जागतिक स्पर्धांसाठी संघात स्थान देखील मिळवू शकतो.
पण जे खेळाडू पॉवर प्लेमध्ये षटकार न मारण्यासाठी शरीरात प्रोटीनची कमतरता असल्याचं कारण सांगतात ते हार्दिक पंड्यासारख्या निर्भीड आणि आक्रमक खेळाडूसमोर कसे टिकू शकतील?
पाकिस्तान क्रिकेट मध्ये सध्या अद्वातद्वा व्यवहार सुरू आहे खेळाडूंना मिळणाऱ्या केंद्रीय वेतन प्रणालीत अशी तरतूद आहे की, कर्णधाराची कामगिरी बघूनच त्याला किती पगार मिळेल हे ठरवलं जाईल.
एवढंच काय पण, पत्रकार परिषदेत असल्या हास्यास्पद युक्तिवादाचा बचावही केला गेला आहे.

फोटो स्रोत, Getty Images
मोहसीन नक्वी यांना पाकिस्तान क्रिकेटच्या संदर्भातील सगळ्या गोष्टी स्वतःकडे ठेवायच्या आहेत. त्यामुळेच पाकिस्तान क्रिकेट बोर्ड एका कौटुंबिक कंपनीसारखा बनत चालला आहे.
या कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मालक किती खुश होतो. यावरूनच त्यांना किती पगार मिळणार हे ठरतं.
मोहसीन नक्वी यांची सरकार आणि प्रशासनावर जरी पकड असली तरी त्यांच्या मगरमिठीचा विपरीत परिणाम पाकिस्तान क्रिकेटवर होत चालला आहे. मात्र, क्रिकेटची ज्यांना माहिती आहे अशा व्यक्तींवर क्रिकेट चालवण्याची जबाबदारी देणं फायदेशीर ठरू शकतं का?
मात्र, असा सल्ला त्यांना द्यावा ज्यांना काही ऐकू येतं, जे बहिरे आहेत त्यांना सांगून काहीही फायदा नाही.
तरीही पाकिस्तानच्या पंतप्रधानांना येणाऱ्या भविष्यकाळात असा अपमान होण्यापासून वाचवायचं असेल तर त्यांच्याकडे असणारं पाकिस्तान क्रिकेटचं मुख्य संरक्षक हे पद संपुष्टात यायला हवं.
हे करून पाकिस्तान क्रिकेट बोर्डात होणारा राजकीय हस्तक्षेप थांबू शकेल. पीसीबीला एक व्यावसायिक आणि स्वायत्त क्रिकेट मंडळ बनवण्यासाठी हे पावलं उचलणं महत्त्वाचं असणार आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











