भारतानं हरवलं तर पाकिस्तान आज चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडेल का?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, विमल कुमार
- Role, बीबीसी हिंदीसाठी
एखाद्या मृत शरीरात जीव ओतू शकेल अशा वाणीचा एक प्रशिक्षक पाकिस्तानच्या क्रिकेट संघाला लाभला आहे. त्या प्रशिक्षकाचं नाव आहे आकिब जावेद.
आजकालच्या नव्या पिढीला हे नाव फारसं माहिती नसेल. पण नव्वदच्या दशकात जेव्हा पाकिस्तानकडे इम्रान खान, वसीम अक्रम आणि वकार युनूससारख्या वेगवान गोलंदाजांची फळी होती, त्याचकाळात आपल्या आक्रमक आणि भेदक गोलंदाजीने आकिब जावेदने भारताला आश्चर्यचकित केलं होतं.
संयुक्त अरब अमिरातीमध्ये झालेल्या सामन्यात भारताविरुद्ध संस्मरणीय हॅट्रिक घेणाऱ्या आकिब जावेदने काही महिन्यांपूर्वी पाकिस्तान संघाच्या प्रशिक्षकपदाची सूत्रे हाती घेतली. त्यानंतर पाकिस्तानने काही महत्त्वपूर्ण विजय मिळवले आहेत.
पण आता प्रश्न असा आहे की, प्रेरणादायक भाषेने आकिब जावेद अतिशय सामान्य दिसणाऱ्या पाकिस्तानच्या संघात जीव फुंकू शकतील का? भारताविरुद्धच्या मोठ्या सामन्यात पाकिस्तान मोठी उलथापालथ घडवेल का? तेवढी क्षमता या संघात आहे का?


पाकिस्तानचा संघ दुबईला पोहोचल्यानंतर आकिब जावेद यांनी सर्वप्रथम त्यांचे जुने मित्र आणि माजी सलामीवीर मुदस्सर नजर यांच्याशी संपर्क साधला. पाकिस्तानच्या संघाचं सरावसत्र सुरु असताना त्यांनी मुदस्सर नजर यांना खेळपट्टीबाबत शक्य ते सगळे प्रश्न विचारले.
मुदस्सर नजर हे कधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलच्या करियर अकादमीच्या माध्यमातून तर कधी पाकिस्तानी संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून या मैदानाशी संबंधित राहिले आहेत. टीम इंडियाच्या फिरकीपटूंना घाबरून जाण्याची आवश्यकता नसल्याचा विश्वास त्यांनी पाकिस्तानच्या संघामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.

फोटो स्रोत, Getty Images
पाकिस्तानच्या संघातील एका मातब्बर सलामीवीरासमोर सगळ्यात मोठं आव्हान हे फिरकी गोलंदाजीचंच असणार आहे. 2021 पर्यंत फिरकी गोलंदाजीसमोर 89.94ची सरासरी आणि 89च्या स्ट्राईक रेटने धावा करणाऱ्या या गोलंदाजाची कामगिरी अचानक खालावली आहे. त्यात फलंदाजाचं नाव आहे बाबर आझम आणि पाकिस्तानमध्ये सध्या त्याच्यावर खूप टीका केली जात आहे. पाकिस्तानचे टीव्ही चॅनल आणि त्याहीपेक्षा अधिक पहिले जाणारे युट्युब चॅनल्सनी सध्या बाबर आझमला धारेवर धरलं आहे.
भारतीय संघ नक्की बाबर आझमला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करेल. 2022च्या सुरुवातीपासूनच बाबर आझमचे फिरकीपटूंच्या विरोधातली सरासरी घसरून 31.80वर आली आहे. त्याचा स्ट्राईक रेटसुद्धा घसरून 67.65वर आला आहे. भारताकडून या सामन्यात वरुण चक्रवर्तीला संधी मिळाली तर त्याच्या नवीन अॅक्शनमुळे पाकिस्तानी संघाला अडचणीत आणू शकतो.
रोहित-विराट जोडीसाठी चॅम्पियन्स ट्रॉफी महत्त्वाची आहे
आणखीन एक गोष्ट यावेळी स्पष्ट आहे की, भारत-पाकिस्तान सामन्याच्या आधी दुबईमध्ये 'सगळ्यात मोठी लढाई' असल्याचं किंवा 'युद्धजन्य सामना' असल्याचं वातावरण नाहीये.
अर्थात भारतीय संघाला या सगळ्या गोष्टींचा फरक पडत नाही. कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीला हे माहिती आहे की जर भारतीय संघाचा या सामन्यात पराभव झाला तर त्याचा परिणाम संपूर्ण स्पर्धेच्या प्रवासावर पडू शकतो. या पराभवाचा सगळ्यात मोठा परिणाम देखील रोहित आणि विराटवरच पडू शकतो.
शनिवारी (22 फेब्रुवारी) मी रविचंद्रन आश्विनशी बोललो तेव्हा तो म्हणाला की, या सामन्यात सगळ्यात मोठा गेमचेंजर ठरेल विराट कोहली.

फोटो स्रोत, Getty Images
गेल्या वर्षीच्या अखेरीस ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या अश्विनने असेही म्हटले आहे की, विराट कोहलीने रोहित शर्मा ज्या प्रकारे कोणतीही चिंता न करता आक्रमक फलंदाजी करतो आणि त्याच्या खेळाचा आनंद घेतो अगदी तसंच काहीतरी करण्याची गरज आहे.
एका टीव्ही चॅनेलवरील कार्यक्रमात चेतेश्वर पुजारा माझ्यासोबत होता. तिथे पुजाराने सांगितले की, गेल्या सामन्यात अर्शदीप सिंगची अनुपस्थिती आश्चर्यकारक होती आणि कदाचित पाकिस्तानविरुद्धच्या संघात अंतिम अकरामध्ये बदल दिसून येईल.
या सामन्यासाठी चाहते कोणतीही किंमत मोजायला तयार आहेत
अलीकडच्या काळात भारत-पाकिस्तान सामन्यांबाबत एक गोष्ट आधीसारखीच आहे. आणि ती म्हणजे या खेळाचे श्रीमंत चाहते हा सामना बघण्यासाठी कोणतीही किंमत मोजायला तयार आहेत.
बहुतांश क्रिकेट चाहते स्वतःचे संपर्क वापरून या सामन्याचं तिकीट मिळवण्यासाठी झटत आहेत.
भारतीय संघाने हा सामना जिंकला तर उपांत्य सामान्यांपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा मार्ग सुकर होईल. यामुळेच हा अत्यंत महत्त्वाचा सामना आहे, म्हणजे चाहत्यांसाठी तर तो महत्त्वाचा आहेच पण संपूर्ण स्पर्धेच्या दृष्टीने हा अत्यंत निर्णायक सामना आहे असं म्हणता येईल.

फोटो स्रोत, Getty Images
पाकिस्तानचा पराभव झाला तर मात्र, सुमारे तीन दशकानंतर एखाद्या मोठ्या स्पर्धेचं यजमानपद भूषवणाऱ्या पाकिस्तानच्या संघाला या स्पर्धेच्या विजयाच्या जल्लोषात सहभागी होता येणार नाही. कारण भारत अंतिम फेरीत पोहोचला तर अंतिम सामना पाकिस्तानात होणार नाही. या स्पर्धेत भारताव्यतिरिक्त प्रत्येक संघ पाकिस्तानात खेळतो आहे.
एखाद्या यजमान देशासाठी ही नामुष्कीजनक परिस्थिती असू शकते आणि म्हणून पाकिस्तानचा संघ भारताविरुद्धच्या सामन्यात चमत्कार घडवून आणू शकतो. या संघाचे प्रशिक्षक आकिब जावेद यांच्या काळात पाकिस्तानसाठी भारताला हरवणं ही एवढी अवघड गोष्ट कधीच नव्हती.
पाकिस्तानसाठी 'करो या मरो'
भारतीय संघाच्या सरावादरम्यान आणखीन एक वेगळी गोष्ट पाहायला मिळाली. ती म्हणजे भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने विराट कोहलीला बोलावलं आणि संघातल्या तरुण खेळाडूंना मार्गदर्शन करायला सांगितलं.
विराट कोहली सुमारे 10 मिनिटं बोलत होता. आणि हे होत असताना तिथून 20 मीटर अंतरावर मी उभा होतो पण मला ऐकू येत नव्हतं. मात्र कोहलीच्या बोलण्याने तरुण खेळाडूंच्या बाहुंमध्ये स्फुरण चढलं असेल हे मात्र नक्की.

फोटो स्रोत, Getty Images
ऐतिहासिक आकड्यांचा विचार केला तर अजूनही पाकिस्तानचं पारडं जड दिसतं. मात्र पाकिस्तानी संघाचा सध्याचा फॉर्म आणि मागच्या दशकातली कामगिरी अत्यंत साधारण राहिली आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळल्या गेलेल्या गेल्या 135 सामन्यांपैकी भारताने 57 सामने जिंकले आहेत तर 73 सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.
हा सामना पाकिस्तानसाठी 'करो किंवा मरो' असा असणार आहे. इथे पराभव झाला तर पाकिस्तान या स्पर्धेतून बाहेर पडू शकतो.
वरुण चक्रवर्तीला संधी मिळेल का?
सध्या भारतीय संघाला अंतिम अकरामध्ये कुणाला संधी द्यायची असा प्रश्न नक्कीच पडला असेल.
मागच्या सामन्यात खेळलेल्या हर्षित राणाच्या जागी डावखुऱ्या अर्शदीपला संधी द्यायची की मग अनेक दशकांनंतर पहिल्यांदाच चार फिरकीपटू घेऊन मैदानात उतरायचं हा प्रश्न भारतासमोर असणार आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी निवड झालेल्या भारतीय संघातून अचानक यशस्वी जयस्वालला काढून वरूण चक्रवर्तीला संधी दिली गेली. भारताकडे वरुण चक्रवर्ती सारखा हुकमी एक्का आहे आणि याच एक्क्याचा वापर करून निर्णायक सामन्यांमध्ये प्रतिस्पर्ध्याला हरवण्याची रणनीती भारतीय संघाकडे असू शकते.

फोटो स्रोत, Getty Images
अलीकडच्या काळातला इतिहास आणि कामगिरी पाकिस्तानच्या विरोधात आहे. दोन्ही संघांमध्ये झालेल्या शेवटच्या 11 एकदिवसीय सामन्यांपैकी 9 सामन्यांमध्ये भारतीय संघाने विजय मिळवला आहे.
दोन्ही संघांमध्ये झालेल्या आयसीसी स्पर्धांमधल्या सामन्यांचा विचार केला तर पाकिस्तानच्या संघाला केवळ दोनच सामन्यांमध्ये विजय मिळवता आलेला आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.










