भारत-पाकिस्तान युद्धाच्यावेळी दोन्ही देशांचे खेळाडू एकाच क्रिकेट संघातून खेळत होते तेव्हा

क्रिकेट

फोटो स्रोत, Getty Images

भारतात यावर्षी क्रिकेट विश्वचषक सामने होत आहेत. यामध्ये भारत आणि पाकिस्तानचे संघ पुन्हा एकदा एकमेकांसमोर येणार आहेत.

दोन्ही देशांमध्ये अनेक वेळा अशा प्रकारचे वादाचे प्रसंग निर्माण झाल्याचं इतिहासात डोकावून पाहिल्यास दिसून येतं. संवेदनशील पार्श्वभूमीवर अनेकवेळा दोन्ही संघांची क्रिकेटच्या मैदानावर गाठ पडली आहे.

इतकंच नव्हे, एकदा तर एका बाजूला युद्ध सुरू असताना भारत-पाकिस्तान क्रिकेट संघातील खेळाडू मैदानात एकाच संघातून खेळत होते, असं सांगितल्यास आपला त्यावर विश्वास बसणार नाही. पण हे खरंच घडलं होतं.

भारताचे दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांना अजूनही तो प्रसंग चांगलाच स्मरणात आहे.

1971 साली भारत-पाकिस्तानमध्ये युद्ध सुरू असताना दोन्ही देशाच्या क्रिकेट खेळाडूंनी तब्बल चार महिने ड्रेसिंग रूम शेअर केली होती.

विश्व एकादश

फोटो स्रोत, Getty Images

त्यावेळी ऑस्ट्रेलियात विश्व एकादश विरुद्ध ऑस्ट्रेलिया अशी मालिका सुरू होती. या मालिकेत जवळपास सहापेक्षा अधिक सामने दोन्ही संघांच्या खेळाडूंनी एकत्र येत एका संघातून खेळले.

नऊ महिन्यांच्या युद्धानंतर डिसेंबर 1971साली पाकिस्तानकडून वेगळा होत बांगलादेश हा नवा देश बनला, तोच हा काळ होता.

याविषयी सुनिल गावस्कर यांनी लिहिलं, "इतकं सगळं घडत होतं, तरीही भारत आणि पाकिस्तानच्या खेळाडूंमध्ये कोणताही तणाव नव्हता."

त्यावेळी वेस्ट इंडिजचे दिग्गज क्रिकेटपटू गॅरी सोबर्स यांच्या नेतृत्वाखालील 17 सदस्यीय विश्व एकादश संघात सहापेक्षा जास्त खेळाडू भारतीय उपखंडातील होते.

यामध्ये फलंदाज सुनिल गावसकर, फिरकीपटू बिशनसिंग बेदी आणि धडाकेबाज विकेटकीपर-फलंदाज फारुख इंजिनियर या भारतीय खेळाडूंचा समावेश होता.

तर पाकिस्तानकडून धडाकेबाज फलंदाज झहीर अब्बास, गुणी अष्टपैलू इंतिखाब आलम आणि वेगवान गोलंदाज आसिफ मसूद हे सहभागी झाले होते

क्रिकेट

फोटो स्रोत, Getty Images

याबाबत गावस्कर यांनी त्यांच्या सनी डेज या पुस्तकात लिहिलंय, "आम्ही जवळपास रोजच संध्याकाळी एका पाकिस्तानी मालकीच्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला जायचो. मालक वेगवेगळ्या रेडिओ न्यूज बुलेटिन्समधून बातम्या ऐकायचा आणि ते कागदाच्या रुमालावर उर्दूमध्ये लिहून इंतिखाबला देत असे. इंतिखाब त्याकडे एकटक पाहत असे. तो अलगद त्याचा चुरडा करून फेकून द्यायचा."

त्यावेळी दोन्ही संघातील खेळाडूंनी मैदानावर आपल्या देशात सुरू असलेल्या घडामोडींकडे दुर्लक्ष केलं.

दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज हिल्टन एकरमन या संघात गावस्कर यांच्यासोबत सलामीला यायचे.

संघात नेहमी मैदानात एकमेकांसोबत मजा मस्करी चालायची, असं त्यांनी सांगितलं.

गावस्कर लिहितात, "मैदानाबाहेर वातावरण काळजीत टाकणारी होतं. पण आम्ही हास्यविनोद करत वातावरण हलकंफुलकं ठेवण्याचा प्रयत्न करत होतो."

"फारूख इंजिनिअर यांचं घर मुंबईत समुद्रकिनाऱ्यावर होतं. त्यामुळे त्यांना पत्नी आणि मुलांच्या सुरक्षेबाबत सतत काळजी वाटत होती. त्यामुळे त्यांना इंग्लंडमधील लँकेशायरच्या घरी राहण्यास पाठवण्याचा विचार करत असल्याचं इंजिनिअर यांनी एका स्थानिक पत्रकाराला सांगितलं. हे ऐकून बिशनसिंग बेदी निराश झाले. कारण त्यांचं घर भारत पाकिस्तान सीमेजवळच्याच अमृतसर येथे होतं. पण त्यांनी पत्रकारांशी बोलणं टाळणंच योग्य समजलं," असं गावस्कर लिहितात.

बांगलादेश युद्धादरम्यान भारतीय आणि पाकिस्तानी खेळाडूंनी ड्रेसिंग रूम शेअर केल्याबाबतच्या गावस्कर यांच्या आठवणी पाहता दोन्ही देशांमध्ये दोन युद्ध झाले, काश्मीर संघर्ष सुरू होता. पण त्यांच्या वैयक्तिक संबंधांमध्ये कधीच कोणता अडथळा आला नाही.

1947 मध्ये फाळणीनंतर भारत-पाकिस्तानने पाच वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळला नाही.

1952 मध्ये पाकिस्तानने भारताचा दौरा केला. त्यावेळी पहिल्यांदा क्रिकेट सामना खेळवला गेला.

इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी दोन्ही देशांमधील तणावादरम्यान खेळवण्यात येत असलेल्या या सामन्यांचं वर्णन आपल्या पुस्तकात केलं आहे.

पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांच्या मालकीच्या डॉन वृत्तपत्रात याविषयी बातमी होती, 'पाकिस्तान या दौऱ्यात चांगली छाप सोडेल. ते सद्भावनेचे दूत आहेत.'असे मथळे पहिल्या पानावर होते. शिवाय, भारत हा काश्मीरमध्ये सैन्य वाढवत आहे, अशा बातम्याही सोबत होत्या.

क्रिकेट

फोटो स्रोत, Getty Images

सर्व गोष्टींचा विचार करता हा दौरा यशस्वी ठरला. कोलकाता येथील कसोटी सामन्यावर बहिष्कार टाकण्याचे हिंदू कट्टरपंथी गटाचे प्रयत्न अयशस्वी ठरले. कारण खेळ पाहण्यासाठी लोकांची प्रचंड गर्दी झाली होती.

पाच कसोटी सामन्यांची ही मालिका भारताने 2-1 अशी जिंकली.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात गेल्या 70 वर्षांत केवळ 58 कसोटी सामने खेळले गेले आहेत.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात याच कालावधीत 97 कसोटी सामने खेळले गेले आहेत.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सुरुवातीच्या अनेक द्विपक्षीय मालिका अनिर्णित राहिल्या.

दरम्यान, 1965 आणि 1971 च्या युद्धांच्या कालावधीत दोन्ही संघ तब्बल 17 वर्षे एकमेकांशी खेळले नाहीत.

पुढे 1978 मध्ये भारताने पाकिस्तानला भेट देऊन क्रिकेट संबंध पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली.

पुन्हा संबंधांत वितुष्ट येण्यापूर्वी पुढील दोन दशके दोन्ही संघ एकमेकांशी खेळत होते.

पण नव्वदीच्या दशकात भारताने पाकिस्तानवर काश्मीरमधील वातावरण बिघडवत असल्याचा आरोप लावत खेळण्यास नकार दिला.

नंतर, 2003-04 साली क्रिकेट संबंध पुन्हा प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांअंतर्गत भारतीय संघ पाकिस्तानला गेला.

हे सुरळीच चाललेलं असतानाच नोव्हेंबर 2008 ला मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे द्विपक्षीय मालिका पुढील 4 वर्षांपर्यंत थांबवण्यात आले होते.

पाकिस्तानने 2012-213 मध्ये पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारताचा दौरा केला तेव्हाचा अपवाद होता, जी त्याने 3-2 ने जिंकली. जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगमधून पाकिस्तानी खेळाडूंना वगळण्यात आलं.

"क्रिकेटच्या जगात ऑन-ऑफ संबंधांचा दुसरं उदाहरण सापडणार नाही," असं इतिहासकार मुकुल केसवन यांनी एका निबंधात लिहिलं आहे.

क्रीडा लेखक सुरेश मेनन यांच्या मते, "भारत-पाकिस्तानमधील क्रिकेट सामन्यादरम्यान दोन्ही देशांतील खेळाडूंपेक्षाही जास्त शत्रुत्व हे सर्वसामान्य समर्थकांच्या हृदयात आणि मनात अधिक तीव्र असतं."

भारतीय खेळाडू नेहमीच पाकिस्तानातील चाहत्यांकडून मिळालेल्या प्रेमाबद्दल आणि कौतुकाबद्दल बोलत असतात. 1955 मध्ये हजारो चाहते कराची विमानतळावर भारतीय क्रिकेटपटूंचे स्वागत करण्यासाठी जमले होते. पाकिस्तान दौऱ्यात भारतीय खेळाडू जेव्हा खरेदीसाठी जायचे तेव्हा दुकान मालक त्यांच्याकडून पैसे घेण्यास नकार देत असत.

मेनन म्हणतात, "आजकाल चाहत्यांकडून सोशल मीडियावरील लढाई लढली जाते.

क्रिकेटच्या मैदानावरील विजय हा आपला धर्म किंवा राष्ट्र दुसऱ्यापेक्षा श्रेष्ठ असल्याचा निर्णायक पुरावा आहे, असं या चाहत्यांना वाटतं. तर दुसरीकडे, दोन्ही देशांतील क्रिकेट सामना हा आता एक राजकीय मुद्दाही बनलेला आहे."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)