You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बीबीसीचं भारतातील कामाचं स्वरूप बदललं, 'कलेक्टिव्ह न्यूजरूम' या नव्या कंपनीची सुरुवात
बीबीसीच्या भारतातील कामाचं स्वरूप बदललं आहे. 'कलेक्टिव्ह न्यूजरूम' या स्वतंत्र माध्यम कंपनीच्या रुपात काम करण्यास सुरुवात झाली आहे. विश्वासार्ह, सर्जनशील आणि धाडसी पत्रकारिता करण्याचं उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून या नव्या कंपनीची स्थापना करण्यात आली आहे.
कलेक्टिव्ह न्यूजरूम ही पूर्णपणे भारतीय कंपनी आहे. बीबीसीच्या चार वरिष्ठ पत्रकारांनी राजीनामा देत कलेक्टिव्ह न्यूजरूमची स्थापना केली आहे. ही कंपनी डिजिटल मीडियाच्या क्षेत्रातील परदेशी गुंतवणुकीच्या नियमांनुसार स्थापन करण्यात आली आहे.
कलेक्टिव्ह न्यूजरूम भारतात बीबीसीसाठी कंटेट तयार करेल आणि प्रकाशितही करेल.
परिणामकारक पत्रकारितेच्या माध्यमातून भारतीय वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचणं, हे कलेक्टिव्ह न्यूजरूमचं उद्दिष्ट आहे.
संपादकीय निर्मितीच्या बाबतीत कलेक्टिव्ह न्यूजरूम महत्त्वाकांक्षी आहे आणि भारतात पत्रकारितेच्या क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरीचं उदाहरण समोर ठेवू इच्छित आहे.
ही नवी कंपनी सध्या बीबीसीसाठी कंटेट बनवेल आणि प्रकाशित करेल. मात्र, ही कंपनी स्वतंत्र असल्यानं भविष्यात वृत्तसेवा पुरवणाऱ्या इतर कंपन्यांसाठी कंटेट बनवण्याचा विचार करू शकते.
कलेक्टिव्ह न्यूजरूमच्या सीईओ रूपा झा म्हणाल्या, "अतिशय अनुभवी आणि प्रतिभाशाली कर्मचाऱ्यांच्या मदतीने विश्वसार्ह, सर्जनशील आणि धाडसी पत्रकारिता करण्याचं उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून कलेक्टिव्ह न्यूजरूमची स्थापना झाली आहे."
"सत्य माहितीवर आधारित बातम्या देणारी, जनहितासाठी काम करणारी आणि समाजातील विविध घटकांचा आवाज ऐकून त्यांना व्यासपीठ देणारी कलेक्टिव्ह न्यूजरूम ही एक स्वतंत्र वृत्तसंस्था असल्याचं वाचक प्रेक्षकांच्या लवकरच लक्षात येईल."
रूपा झा यांच्याबरोबर मुकेश शर्मा, संजॉय मुजुमदार आणि सारा हसन हे संपादकीय अनुभव असणारे संचालकही असतील.
कलेक्टिव्ह न्यूजरूमनं बीबीसी हिंदी न्यूजसाठी कंटेट तयार करण्याचाही करार केला आहे. बीबीसी हिंदी ही बीबीसीच्या सर्व भाषासेवांमधील मोठी सेवा आहे.
वाचक आणि प्रेक्षकांचा विचार केल्यास, बीबीसीसाठी भारत प्रथम क्रमांकाचा देश आहे. बीबीसीचं कंटेट भारतातील आठ कोटी लोकांपर्यंत पोहोचतं.
बीबीसी न्यूज हिंदी, बीबीसी न्यूज मराठी, बीबीसी न्यूज गुजराती, बीबीसी न्यूज पंजाबी, बीबीसी न्यूज तमिळ, बीबीसी न्यूज तेलगू यांच्यासह इंग्रजीतही डिजिटल आणि युट्यूबवर भारतीय वाचक-प्रेक्षकांसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूम माहिती आणि बातम्यांची निर्मिती करणार आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचं प्रकाशन)