You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
गावाकडचा मुलगा नको म्हणणाऱ्या मुलींना नावं ठेवण्याआधी या गोष्टींचाही विचार करा- ब्लॉग
- Author, श्वेता पाटील
- Role, बीबीसी मराठीसाठी
काही दिवसांपूर्वी फेसबुकवर ग्रामीण भागात लग्न करून जायला मुली नकार का देतात, याबद्दल अनेक पोस्ट लिहिल्या गेल्या. यातील बहुतांश पोस्ट मुली कोणत्या दृष्टिकोनातून विचार करतात, हे मांडणाऱ्या होत्या. त्यावर अनेक उलट सुलट प्रतिक्रियाही आल्या. अनेकांनी मुलींच्या विचारांशी सहमती दाखवली, तर बरेच जण त्यांच्या अपेक्षांना अवास्तव मानणारेही होते.
सोशल मीडियाबरोबरच ही चर्चा वैयक्तिक आणि सामाजिक पातळीवरही आजकाल होतानाच दिसते. त्यामुळेच या विषयाबद्दल एक मुलगी कोणत्या अंगांनी विचार करते? तिची भूमिका काय असते? हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला.
श्वेता पाटील युवा लेखिका आहेत आणि सध्या युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन येथे 'जेंडर अँड डेव्हलपमेंट' या विषयात एम.ए करत आहेत. त्यांनी बीबीसी मराठीसाठी हा लेख लिहिला आहे.
या लेखातील त्यांची भूमिका ही त्यांना आलेल्या अनुभवांवर बेतलेली आहे.
त्यांनी मांडलेलं चित्र हे सरसकट नाही, पण प्रातिनिधीक नक्कीच आहे.
'शेतकरी नवरा हवा', 'तुझ्यात जीव रंगला' सारख्या मालिका असतील किंवा अगदी काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेला नवरदेव बीएस्सी अॅग्रीसारखा सिनेमा असेल; यातून शेती करणाऱ्या स्थळाला ग्लॅमर आणि प्रतिष्ठा मिळवून देण्याचा प्रयत्न झाल्याचं दिसलं.
पण खरंच गावाकडे राहणाऱ्या, शेती करणाऱ्या मुलांबद्दलचा दृष्टिकोन बदलायला मदत झाली का?
सोशल मीडियावर, माध्यमांमध्ये आणि खाजगी चर्चेतही नेहमी शेतकरी मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाहीत आणि यात मुलींची कशी चूक आहे, त्यांच्या अपेक्षा कशा अवास्तव आहेत हा एक चर्चेचा सूर नेहमी कानावर पडतो.
दुसरीकडे शेतीला प्रतिष्ठा नाही, शेतीतून आर्थिक उत्पन्न मिळत नाही, शेती क्षेत्र भरवशाचं राहिलं नाही म्हणून आजकालची मुलं शेती करत नाहीत आणि शहरात छोटीमोठी नोकरी करतात ही चर्चा असते.
या दोन्ही चर्चांमध्ये फरक एवढाच की पहिल्या चर्चेत मुलींना दोष देऊन मोकळे होतात, पण दुसऱ्या चर्चेत मात्र तरुण पुरूष शेती का करत नाहीत याची नीट कारणमीमांसा करायची इच्छा दाखवतात.
असं का? मुलांच्या त्यांच्या आयुष्याकडून असलेल्या अपेक्षांबद्दल सहानुभूतीने पाहताना आपण मुलींच्या आकांक्षांकडे, निवडींकडे मात्र पूर्वग्रहाने का पाहतो? आपल्या जोडीदारामध्ये नेमकं काय हवं हे ठरवण्याचा अधिकार मुली वापरत असतील तर त्यात गैर काय?
बरं, मुलींची अगदी भरपूर बागायती शेती असलेल्या शेतकरी मुलापेक्षाही पण पगारदार असलेल्या (भलेही तो कमी असेल), शहरात भाड्याच्या घरात राहणाऱ्या मुलाला पसंती का असते? याचा विचार करण्याची तरी आपण तयारी का दाखवत नाही?
'मुली शेफारल्या', 'त्यांना शेतात कष्ट करायला नको' वगैरे म्हणून फक्त दूषणं देण्यापेक्षा त्यांना शहरात जाऊन राहावं का वाटतं यामागे असलेल्या आर्थिक कारणांसोबतच जी सामाजिक कारणं आहेत, त्याबद्दल बोलायलाच हवं.
माझी शाळेतली एक मैत्रीण आहे. (नाव लिहित नाही.)
तिने आमच्या जिल्ह्याच्या ठिकाणीच इंजिनिअरिंग केलं आणि लग्न करून नंतर ती मुंबईला गेली. तिच्या लग्नाला चार वर्षं झाली आहेत. तिच्याशी मी या विषयावर बोलत होते.
'गावात सुनेनं जीन्स घातली तर किती चर्चा होईल!'
तिनं मला म्हटलं, “मुंबईला गेल्यामुळे मी माझ्या शिक्षणाचा काहीतरी उपयोग होऊ शकला. एखादया गावात लग्न करून गेले असते तर तिथेही मी काहीतरी धडपड करायचा प्रयत्न केला असता.
पण जी संधी शहराने दिली ती गावात मिळेलच याची काही गॅरंटी नाही. अन् मुद्दा फक्त नोकरी करण्याचा नाहीये.
आपण पण गावात वाढलोय. गावात एखादया सुनेने जीन्स घातली तर किती चर्चा होईल! पण शहरात ह्या गोष्टी सहजपणे स्वीकारल्या जातात. शहरात मला acceptance जास्त वाटला.'
अजून एक मैत्रीण लग्नानंतर पुण्याला आली आहे. ती मला म्हणत होती, “ मुद्दा फक्त कपडे घालण्यावर बंधन किंवा कपड्यांची चॉईस आहे एवढाच नसतो.
पुण्यात माझ्या घरी कोणताही महत्त्वाचा निर्णय घेत असताना आम्ही आमच्या घराच्या हॉलमध्ये एकत्र बसलेलो असतो, मी माझं मत मांडते. एखाद्या श्रीमंत शेतकरी कुटुंबात मी अशा खुलेपणानं वावरू शकले असते की नाही, हे मला खरंच माहीत नाही."
अन् दुसरा मुद्दा असतो तो म्हणजे घरी जरा मनमोकळा कारभार असायचा. गावाकडच्या शेतकरी कुटुंबात सगळं काटेकोर ठरलेलं असतं, निदान घरच्या सुनेसाठी तरी. माझी मोठी बहीण अशाच एका मोठ्या घरात लग्न करून गेली आहे. रोज सकाळी पाच वाजता उठलंच पाहिजे, अंगण झाडलं पाहिजे, सडा-रांगोळी केली पाहिजे हा नियम एवढा कडक आहे की आज पीरिएड्स आलेत, जरा बरं वाटत नाही म्हणून उशीरापर्यंत झोपायची तिला मुभा नाही.”
ती पुढं सांगत होती, “त्याउलट माझं आहे. ठरलेल्या वेळेच्या जरा मागे पुढे झोपेतून उठलं तरी त्याचा काही इश्यू होईल अशी शक्यता फारच कमी आहे. मला मान्य आहे आहे की, हळूहळू तीही बोलायला शिकेल. पण लग्नानंतरची ही सुरुवातीची काही वर्षं म्हणजे तिच्यासाठी एक ठरलेला साचा आहे, त्यातून बाहेर पडणं इतकं सोपं आहे असं मला वाटतं नाही. शहर बदल झटपट स्वीकारतं. गावाला हाच बदल स्विकारायला जरा जास्त वेळ लागतो."
एकीकडे जबाबदारीचं ओझं, दुसरीकडे हस्तक्षेप
या acceptance सोबतच या मुलींना स्वातंत्र्याचीही आस आहे. अनेक लग्नाळू मुली त्यांच्या शहरात लग्न होऊन गेलेल्या मैत्रिणी, बहिणींचं आयुष्य पाहात असतात.
सोशल मीडियामुळे तर तुम्ही एकमेकांच्या थेट संपर्कात नसला तरी एकमेकांच्या खाजगी आयुष्यातल्या गोष्टी कळत राहतात. या मुलींना दिसतं की त्यांची शहरात लग्न झालेली मैत्रीण किंवा बहीण नवऱ्यासोबत छान जीन्स वगैरे घालून फिरायला जाते, कधीतरी हॉटेलमध्ये जेवायचे फोटो, तिच्या वाढदिवसाचे फोटो त्या बघतात.
त्याउलट गावात अगदी श्रीमंत वगैरे घरात लग्न करून गेलेल्या मुलींचे मात्र सतत कुठल्यातरी लग्नात, पूजेत दागिने, साडी घालून काढलेले वगैरे एवढेच फोटो दिसत राहतात.
एकत्र कुटुंब असेल तर या आधी घरात कुणाचाच वाढदिवस साजरा झाला नाही, फक्त लहान मुलांचे वाढदिवस साजरे करतात गावात वगैरे म्हणून साधा केकही आणायचा नाही अन् त्याचवेळी तिच्या दुसऱ्या मैत्रिणीच्या वाढदिवसाला तिच्या नवऱ्याने केलेली सजावट, केक, गिफ्ट हे सगळं तिने व्हॉट्सअप स्टेटसला पाहिलेलं असतं. ही यादी वाढतच जाते.
जोडप्याला स्वतंत्र वेळ घालवता यावा अशी व्यवस्था असते का? एकत्र फिरायला जाणं वगैरे तर विषयच नाही.
गावातलं शेतकरी जोडपं असंच काही कारण नसतांना कुठेतरी भटकायला निघालय हे घडण्याचं प्रमाण किती? परत सणवार, यात्रा-जत्रा, लग्न, मयत सगळी जबाबदारी गावाकडे राहणाऱ्या जोडप्यावर.
त्याचाच एखादा भाऊ शहरात राहत असेल तर तो अन् त्याची फॅमिली आली की त्यांची वरवर करावी लागते. अनेक जबाबदाऱ्या येऊन पडतात.
गावाकडे अचानक कुणीही घरी येतं. घरी जास्त शेती, मोठा परिवार असेल तर येणाऱ्या जाणाऱ्यांची नेहमी सरबराई करावी लागते.
समाजात कुणाचं लग्न, कुणाचं मरण, कुणाची सोयरिक जोडायची तर येणाऱ्या पाहुण्यांचा डेरा आधी यांच्याकडे पडणार. आपलं खानदान नावाजलेलं, सगळे आपल्याकडेच येतात या सगळ्याचं घरातल्या पुरुषांना कोण कौतुक असतं.
आज रात्री दहा लोक जेवायला असतील ही ऑर्डर किती सहज दिली जाते अशावेळी. मग कितीही थकलेली असली, आजारी असली तरी तिला ह्या येणाऱ्या पाहुण्यांचा मानपान निभावून न्यावा लागतो.
बाहेरुन कुठून जेवण आणू, वगैरे व्यवस्था नसते. कारण 'इज्जतीचा' हा डौल सांभाळायची जाबाबदारी या व्यवस्थेने तिच्यावर टाकलेली असते.
एकीकडे जबाबदारीचं ओझं वाहात असतानाच वैयक्तिक आयुष्यातल्या छोट्या-मोठ्या गोष्टींतही हस्तक्षेप होतात. साधं रात्री झोपताना गाऊन घालायचा की नाही यावर चर्चा सत्र भरतं.
सासरे, मोठे दीर ओट्यावर बसलेले असताना ओट्यावर बसू नये, दुपारचं घरी कुणी नसलं तरी हॉलमध्ये झोपू नये (अचानक कुणी आलं तर!) अशा बालिश गोष्टी अजूनही नीट पाळाव्यात अशा अपेक्षा असतात.
ठरलेला आठवड्याचा बाजार, शेतात जायचा रस्ता, काही दुकानं, मंदिरं, रोज सकाळ संध्याकाळ चक्कर मारता येतील अशा काही ठरलेल्या जागा सोडल्या तर गावात महिलांच्या संचार स्वातंत्र्यावरही खूप बंधन असतं.
गावच्या बाजारच्या ठिकाणी असलेल्या हातगाडीवर सहज जाऊन घरातल्या सुना जाऊन पाणीपुरी खाऊन आल्या वगैरे असं अजूनही होत नाही.
बाहेर पोर्चमध्ये बंगळी/ झुला बांधलेला असेल तर घरची सून संध्याकाळच्या वेळी तिथे सहज एकटीच झोके घेत बसलीये हे चित्र अजूनही दुर्मिळ वाटतं.
कपडे, केस, वागणं, बोलणं, चालणं यावर सतत कोणी तरी लक्ष ठेवून आहे असं वाटत राहत.
हे सगळं चित्र अगदी सगळीकडे असंच आहे का, तर नाही. हे मलाही मान्य आहे. बदल निश्चितच घडत आहे. पण ढोबळमानानं विचार केला तर साधारण गावाकडच्या कुटुंबात चित्र असं दिसतं.
नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेची आकडेवारीही हेच सांगते.
नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे-4 (2015-2016) नुसार भारतातल्या 41टक्के महिलांना पूर्ण संचार स्वातंत्र्य मिळतं. त्यातल्या त्यात ग्रामीण भागातल्या महिलांकडे हे संचार स्वातंत्र्य फार कमी आहे.
तुमचं घराच्या प्रमुख पुरुषाशी नातं काय आहे यावर हे संचार स्वातंत्र्य ठरतं. त्यात कर्त्या पुरुषाच्या बायकोला सगळयात जास्त संचार स्वातंत्र्य, तर सुनेला सगळयात कमी अशी मांडणी हा सर्व्हे करतो.
बाजार, दुकानं, दवाखाने आणि नातेवाईकांची घरं सोडली तर इतर ठिकाणी एकटीने जाण्याचं फार स्वातंत्र्य घरातल्या सुनेला नसतं हे हा सर्व्हे ठळकपणे सांगतो.
मुलींच्या बदललेल्या आशा-अपेक्षा
शहरातला नवरा हवा, यामागे अजून एक मुद्दा aspirations म्हणजेच आकांक्षांचाही आहे.
तो अधिक व्यवहारी विचार आहे. सामाजिक-आर्थिक, शैक्षणिक बदलांतून मुलींच्या आयुष्याकडून आशा-अपेक्षा बदलल्या आहेत. त्यातून स्वतःबद्दल ठाम निर्णय घेऊ लागल्या आहेत.
शेतकरी नवरा नको म्हणताना, त्यांना शेतीत कष्ट करायचे नाहीयेत असं नाही, पण त्यातून आपली आर्थिक प्रगती खरंच किती होणार आहे, याचा विचार त्या करतात.
जर मुलगी स्वतः शेतकरी कुटुंबातली असेल तर आलेल्या अनुभवातून तिला घरात दर महिन्याला येणाऱ्या ठराविक रकमेचं महत्त्व कळलेलं असतं. मग तिचा कल हा पगारदार नवरा हवा हा असतो.
स्वतः ती उत्तम शिकली असेल, नोकरी करत असेल तर मग आपल्याला प्रगतीसाठी गावात राहायचं की नाही, त्या संधी शहरात असतील तर मग शहरातला जोडीदारच का नको हा विचार असतो.
मुली अगदी खूप शिकल्या नसल्या तरी, पार्लर, बेकिंग, टेलरिंग, फॅशन डिझायनिंगसारखे कोर्स करतात. छोटासा स्वतःचा व्यवसाय सुरू करतात. पण त्यांच्याकडे येणारे लोक किती असतात?
अशावेळी मग त्या म्हणतात की ‘सिटीत असतो तर जरा हे नीट केलं असतं. नवीन शिकता आलं असतं. कुठेतरी कामही करता आलं असतं.’
म्हणजे त्यांना अगदी मोठं करिअर करायचं नसलं तरी आपल्या कौशल्याला किमान वावही शहरात मिळेल असं वाटतं.
दुसरं म्हणजे संधी. त्यातली सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिक्षण.
आपल्याला नाही तर किमान आपल्या मुलांना शिक्षणाच्या, विकासाच्या संधी मिळाव्यात हा विचार आजकाल प्रत्येक जोडपं करतं. त्यातूनही त्यांचा कल शहरांकडे असतो.
आरोग्यासारख्या सुविधाही अजून आपल्याकडे ग्रामीण भागात नसतात. त्याचाही विचार होतो.
थोडक्यात, केवळ ‘राजा-राणीचा संसार’ असं म्हणत स्वातंत्र्याचा स्वप्नाळू विचार नसतो शेती करणारा किंवा ग्रामीण भागातला मुलगा नाकारण्यामागे, तर अगदी रोखठोक व्यवहारही पाहतात मुली.
याला अनेकजण ‘अवास्तव’ अपेक्षांचं लेबल लावतात कारण मुलींच्या असून असून काय अपेक्षा असणार किंवा चांगला कमावता मुलगा आहे, खात्या-पित्या घरचा आहे, अजून काय हवं यापलिकडे मुलींनी अपेक्षा ठेवायच्याच नसतात असा समाज म्हणून अजूनही बहुतांश जणांचा समज आहे.
गावं बदलताहेत असं आपण म्हणतोय. वरकरणी बदल होत आहेत. पण जेव्हा लग्नासारखा विषय येतो तेव्हा अजूनही साचेबद्ध विचार होतो.
अगदी शहरातही. ग्रामीण भागात तर परिस्थिती तशीच आहे. माझं गाव जळगाव जिल्ह्यातलं एक मोठं गाव आहे. माझ्या गावात महिला सार्वजनिक जागी सहज फिरतात, गावात आलेल्या सुना सहज पंजाबी ड्रेस, जीन्स टॉप यावर राहतात.
खूप मुलींकडे स्वतःच्या गाड्या आहेत. माझं गाव बदल पटकन स्वीकारतं असं मला वाटतं, पण माझ्या गावापासून जवळच्या आमच्या नातेवाईकांच्या गावात गेल्यावर गाव म्हणून असलेला बोजडपणा तिथल्या वागण्या बोलण्यात जाणवत राहतो.
मुलांबद्दल मौन, मुलींना मात्र दूषणं का?
शहरात सगळचं चांगलं आहे असं नाही, पण निदान शहरात मोकळेपणान जगता यायच्या शक्यता असतात.
गावं बदलली तर गावाकंडे आणि पर्यायाने शेतकरी मुलाचा लग्नासाठी बघण्याच्या मुलींच्या दृष्टिकोनातही बदल होईल.
जेव्हा शेतीत काही मिळत नाही, पिकत नाही, शेतीत हाल होतात लहानपणापासून बघितलं असल्याने,शहराचं आकर्षण असल्याने किंवा आपल्या शिक्षणाचा उपयोग शहरात करता येइल हे माहीत झाल्याने तरुण मुलांनी शहरांची वाट धरली तेव्हा कुणीही गहजब केला नाही.
पण आता मुली शहरातल्या मुलांशी लग्न करण्याचं ठरवतात/ स्वतः लग्नाच्या निर्णयप्रक्रियेत सहभागी होतात तेव्हा मात्र सगळी चर्चा तिला दूषणं देण्याकडे कशी जाते?
गावात राहिलो तर जुन्या-नव्या सगळ्या परंपरा पार पाडायची जबाबदारी पुरुष तिच्यावर ढकलून मोकळे होतात.
तिने घरात पदर घेऊन राहावं म्हणणारे पुरुष स्वतः मात्र बर्मुडा शॉर्ट्स वर शेती करतांना दिसतात. संस्कृती रक्षण तिनेच कुठवर करायचं? गावपण फक्त तिनेच कधीपर्यंत जपायचं?
शेतीला कमी लेखतात वगैरे मुद्दे इथं गौण ठरतात. गावात तिला तिचं स्वतंत्र अवकाश मिळेल की नाही याबद्दल ती साशंक आहे. शहरात निदान तिच्यासाठी आशेची एक खिडकी नेहमी खुली दिसते.
गावचं सरंजामी रूप बदलायची जबाबदारी घेत नसू आपण तर मुलींना शेतकरी नवरे नकोत म्हणून त्यांनाच दोष देण्याचा अधिकार आपल्याला नाही.
ज्याचं त्याचं हक्काचं आभाळ शोधता येण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे हे विसरता कामा नये!
(श्वेता पाटील युवा लेखिका आहे आणि सध्या युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन येथे Gender and Development या विषयात MA करत आहे. लेखिकेनं मांडलेली ही मतं तिची वैयक्तिक आहेत. त्यांना आलेल्या अनुभवांवर त्यांनी व्यक्त केलेले हे विचार आहेत.)