कधी हरभजन-शोएब, तर कधी गंभीर-अकमल वाद; आशिया कपमधील भारत-पाकचे 5 हायव्होल्टेज सामने

    • Author, हरपिंदर सिंग तोहरा
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

भारत आणि पाकिस्तानमधील क्रिकेट सामना फक्त मैदानावरच होत नाही, तर चाहत्यांच्या आठवणींमध्येही कायम राहतो. आशिया कपमध्ये या दोन देशांच्या संघांची टक्कर नेहमीच रोमांचक ठरते.

1984 पासून सुरू झालेल्या आशिया कपच्या 17 व्या आवृत्तीमध्ये यंदा टी-20 फॉरमॅटमध्ये दुबई आणि अबू धाबीतील सामन्यांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.

9 सप्टेंबरपासून युएईमध्ये आशिया कपला सुरुवात झाली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना रविवारी (14 सप्टेंबर) खेळला जाणार आहे. यावेळीही दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा होईल, अशी आशा क्रिकेटप्रेमींना आहे.

मात्र, पहलगाम हल्ल्यानंतर, दोन्ही देशांमधील क्रिकेटबाबत अनेक लोकांचे मतमतांतरं आहेत.

यापूर्वी जेव्हा-जेव्हा भारत आणि पाकिस्तान क्रिकेटच्या मैदानावर आमनेसामने आले, त्या-त्यावेळी क्रिकेटसोबतच तणाव आणि संघर्षही पाहायला मिळाला. असे अनेक सामने झाले, ज्यात दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये बाचाबाचीचे प्रसंग घडले.

आशिया कपच्या इतिहासात असे अनेक सामने आहेत जिथे भारत-पाक खेळाडूंमध्ये चुरशीची लढत दिसून आली.

आज आपण आशिया कपमध्ये भारत-पाक सामन्यांतील काही अशा काही सामन्यांबाबत जाणून घेऊया जिथे खेळाडू एकमेकांना थेट मैदानावरच भिडले.

हरभजन सिंग आणि शोएब अख्तर यांच्यातील वाद

2010 चा आशिया कप अनेकांना नक्की आठवत असेल. दाम्बुला येथे खेळल्या गेलेल्या सामन्यामध्ये हरभजन सिंग आणि शोएब अख्तर यांच्यातील संघर्षामुळे मैदानातील वातावरण तापलं होतं.

हा आशिया कपमधील एकदिवसीय सामना होता. यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत भारतासमोर 268 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. प्रत्युत्तरात भारताला शेवटपर्यंत संघर्ष करावा लागला होता.

सामन्याच्या 49 व्या षटकामध्ये हरभजन सिंग आणि शोएब अख्तर यांच्यात तणाव पाहायला मिळाला. दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली आणि यात पंचांना हस्तक्षेप करावा लागला. याआधी हरभजननं 47 व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर शोएबला षटकार लगावला होता.

सामन्याच्या शेवटच्या षटकामध्येही हरभजन आणि पाकिस्तानच्या संघामध्ये तणाव दिसून आला. शेवटच्या षटकात भारताला विजयासाठी अवघ्या 2 चेंडूवर 3 धावांची गरज होती. त्यावेळी हरभजनने मोहम्मद आमिरच्या चेंडूवर मिडविकेटवर मोठा षटकार ठोकून भारताला विजय मिळवून दिला.

षटकार मारल्यानंतर हरभजन सिंगने शोएब अख्तरकडे पाहून आनंद साजरा केला आणि अख्तरनेही त्यावेळी त्याला प्रत्युत्तर दिलं.

हरभजन सिंगने एका टीव्ही मुलाखतीत या सामन्याचा किस्सा सांगितला होता. त्यावेळी शोएब अख्तरने त्याला हॉटेलच्या रूममध्ये घुसून मारण्याची धमकी दिली होती. परंतु, काही वर्षांनंतर दोघेही एका कॉमेडी शोमध्ये एकत्रित आले आणि आता दोघांमध्ये सर्व काही ठीक असल्याचं सांगितलं.

त्याच सामन्यामध्ये गौतम गंभीर आणि कामरान अकमल यांच्यातही वाद झाल्याचे दिसले होते. शाहिद अफ्रिदीच्या चेंडूवर अकमलने झेल घेतल्याचं जोरदार अपील केलं, पण पंचांनी त्याला नाबाद ठरवलं.

यानंतर दुसऱ्या षटकामध्ये अकमलने पुन्हा झेलबादचं अपील केलं. त्यावर गौतम गंभीर चिडला. ड्रिंक्स ब्रेक दरम्यान गंभीर आणि अकमल समोरासमोर आले आणि त्यांच्यात जोरदार वाद झाला. त्यावेळी दोघांमध्ये मोठं भांडण होईल, असं वाटलं. परंतु, महेंद्रसिंह धोनी आणि पंचांनी मध्यस्थी करून परिस्थिती शांत केली.

जेव्हा अर्शदीप सिंगला ट्रोल करण्यात आलं

4 सप्टेंबर 2022 रोजी दुबईतील मैदानावर भारत आणि पाकिस्तानमध्ये सामना झाला. या सामन्यामध्ये भारताने प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानला 182 धावांचं लक्ष्य दिलं होतं.

सामन्याच्या 18 व्या षटकामध्ये अर्शदीप सिंगकडून आसिफ अलीचा झेल सुटला. यामुळे भारताला हा सामना गमवावा लागला. नंतर अर्शदीपला सोशल मीडियावर ट्रोल केलं गेलं.

या पराभवाला अर्शदीप सिंगला जबाबदार ठरवलं गेलं. सोशल मीडियावर त्याची तुलना खलिस्तानींशी केली गेली. परंतु, त्याला अनेक सेलिब्रेटींनी पाठिंबा दिला. त्यावेळी सामन्यातील कमी धावसंख्येपेक्षा त्यानं सोडलेल्या त्या एका झेलाचीच चर्चा जास्त झाली.

जेव्हा हार्दिक पांड्याने षटकार मारून विजय मिळवून दिला

2022 च्या आशिया कपमधील टी-20 फॉरमॅटमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना सर्वात रोमांचक सामन्यांपैकी एक मानला जातो.

दुबईच्या मैदानावर पाकिस्तानने भारताला 148 धावांचं लक्ष्य दिलं होतं. भारताची सुरुवात चांगली झाली नाही. शेवटच्या षटकामध्ये भारताला विजयासाठी 7 धावांची गरज होती.

हार्दिक पांड्याने दबावातही शानदार खेळ केला आणि एक षटकार मारून त्यानं भारताला अविस्मरणीय विजय मिळवून दिला.

विराट कोहलीची ऐतिहासिक खेळी

2012 चा आशिया कप एकदिवसीय फॉरमॅटमध्ये खेळला गेला. बांगलादेशातील ढाकाच्या मैदानावर विराट कोहलीची जबरदस्त खेळी क्रिकेटप्रेमींना आयुष्यभर लक्षात राहील.

या सामन्यामध्ये पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत भारतासमोर 330 धावांचं मोठं लक्ष्य ठेवलं. उत्तरादाखल भारताची सुरुवात खूपच खराब झाली. गौतम गंभीर धावसंख्येचं खातंही न उघडता बाद झाला होता.

त्यानंतर विराट कोहलीने शानदार खेळी करत भारताला सामना जिंकून दिला. कोहलीने 148 चेंडूत 183 धावा केल्या. ही त्यांच्या एकदिवसीय करिअरमधील सर्वोच्च धावसंख्या आहे.

विराट कोहलीच्या या खेळीमुळे आशिया कपमधील हा सामना संस्मरणीय ठरला.

जेव्हा भारताचा पाकिस्तानकडून पराभव झाला

2014 चा आशिया कप भारताच्या कटू आठवणींपैकी एक आहे. या स्पर्धेमध्ये भारताला पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला आणि त्यानंतर भारत या स्पर्धेतून बाहेर पडला.

या सामन्याचा हिरो होता पाकिस्तानचा पॉवर हिटर शाहिद आफ्रिदी. त्यानं आर. अश्विनच्या शेवटच्या षटकामध्ये 2 षटकार मारून पाकिस्तानला विजय मिळवून दिला.

पाकिस्तानला शेवटच्या षटकामध्ये 10 धावांची गरज होती. धोनीच्या अनुपस्थितीत कर्णधार असलेल्या विराट कोहलीने चेंडू आर. अश्विनकडे सोपवला होता. अश्विनने तत्पूर्वी या सामन्यात 3 विकेट्स घेतल्या.

अश्विनने शेवटच्या षटकातील पहिल्या चेंडूवर एक विकेटही घेतली. परंतु, आफ्रिदीने सलग 2 चेंडूंवर 2 षटकार मारल्यानं भारताच्या पदरी निराशा आली.

भारत आणि पाकिस्तान ऐतिहासिक प्रतिस्पर्धी

भारत आणि पाकिस्तान शेजारी देश असले, तरी राजकीय तणावामुळे क्रिकेटमध्ये ते एकमेकांचे कडवे प्रतिस्पर्धी मानले जातात.

आशिया कपमधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याबाबत माजी भारतीय क्रिकेटपटू सरनदीप सिंग यांनी बीबीसीशी खास चर्चा केली.

त्यांनी सांगितलं, "या सामन्यात भारताची बाजू जास्त मजबूत आहे. पाकिस्तानची टीम भारताला टक्कर देण्यास सक्षम."

"पाकिस्तानकडे भारताच्या गोलंदाजांचा सामना करू शकणारे फलंदाजही नाहीत. शुभमन गिल आणि अभिषेक शर्मा यांना रोखू शकणारे गोलंदाजही त्यांच्याकडे नाहीत," असं मत सरनदीप सिंग यांनी व्यक्त केलं.

सरनदीप सिंग पुढे म्हणाले, "एकेकाळी पाकिस्तानकडे वसीम अक्रम यांच्यासारखे दिग्गज गोलंदाज होते, परंतु सध्या पाकिस्तानचं क्रिकेट खूप मागं पडलं आहे."

त्यांच्या मते, भारत आणि पाकिस्तानमधील ताणलेल्या संबंधांमुळे दोन्ही देशांमधील सामन्याची चर्चा जास्त होते, पण खेळाच्या गुणवत्तेच्या बाबतीत ते भारताचा मुकाबला करू शकत नाहीत."

आशिया चषक स्पर्धेचे आयोजन कोण करत आहे?

17 व्या आशिया कपचे आयोजन आशियाई क्रिकेट परिषद (एसीसी) करते. मात्र, अधिकृतपणे आशिया कपचे आयोजन भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) करत आहे.

ही स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) खेळली जात आहे. हे सामने दुबई आणि अबू धाबी येथे होत आहेत.

किती संघ सहभागी झाले आहेत?

यावर्षी आशिया कपमध्ये 8 संघ सहभागी झाले आहेत - भारत, पाकिस्तान, श्रीलंका, अफगाणिस्तान, यूएई, ओमान, बांगलादेश आणि हाँगकाँग.

कोणत्या संघाने सर्वाधिक वेळा विजेतेपद पटकावलं?

आशिया कपची सुरुवात 1984 मध्ये झाली. यंदाचे वर्ष आशिया कपचे 17 वे वर्ष आहे. यावर्षी ही स्पर्धा टी-20 स्वरूपात खेळवली जात आहे.

यापूर्वी 2016 आणि 2022 मध्ये आशिया कप स्पर्धा टी-20 स्वरूपात आयोजित करण्यात आली होती. त्यापूर्वी आशिया कप एकदिवसीय स्वरूपात खेळवला जात होता.

भारताने आतापर्यंत सर्वाधिक 8 वेळा ही ट्रॉफी जिंकली आहे. श्रीलंकेने 6 वेळा, तर पाकिस्तानने 2 वेळा ही स्पर्धा जिंकली आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)