Ind vs Eng: ओव्हल कसोटीत भारतानं पराभवाच्या जबड्यातून विजय खेचून आणला 'तो' क्षण

भारत आणि इंग्लंडदरम्यानची अँडरसन-तेंडुलकर मालिका अखेर 2-2 ने बरोबरीत सुटली आहे.

मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारतानं इंग्लंडला 6 धावांनी पराभूत केलं. अंतिम सामन्याचा आजचा शेवटचा आणि निर्णायक दिवस होता.

इंग्लंडला विजयासाठी 35 धावा करायच्या होत्या. तर, भारताला विजयासाठी चार विकेट हव्या होत्या. त्यापैकी तिघांना सिराजनं बाद करत भारताला सामन्यात विजय मिळवून दिला.

सामन्याच्या शेवटच्या दिवशी इंग्लंड मालिका जिंकणार की भारत ही सिरीज ड्रॉ करणार, हे ठरणार होतं. इंग्लंडने हा सामना जिंकला असता तर त्यांनी ही मालिका जिंकली असती.

पण भारताच्या विजयामुळं मालिका 2-2 ने बरोबरीत सुटली आहे.

याआधी या सिरीजमध्ये भारताने एक सामाना जिंकला होता तर इंग्लंडने दोन सामने होते. एक सामना बरोबरीत सुटला होता. त्यामुळं, इंग्लंडला या सिरीजला जिंकण्यासाठी हा सामना जिंकणं गरजेचं होतं.

खरं तर ही संपूर्ण सिरीज फारच रंजक ठरलेली आहे. त्यातला हा अंतिम सामना आणि त्यातला शेवटचा दिवसही तसाच रंजक ठरलेला आहे.

गिलच्या नेतृत्वातली ही पहिलाच कसोटी मालिका असल्यानं ती आणखीच महत्त्वाची ठरली.

मोहम्मद सिराज हा 'मॅन ऑफ द मॅच' ठरला आहे.

रूटची विकेट टर्निंग पॉईंट

ओव्हलच्या या मैदानावर चौथ्या डावात पाठलाग करताना विजय मिळवण्याचे आजवरचे आकडे पाहता भारताला विजयाची आशा होती. पण इंग्लंड ज्या पद्धतीनं क्रिकेट खेळतं त्यामुळं हे एवढं सोपंही नसणार याचीही जाणीव होतीच.

झालंही तसंच पहिल्या तीन विकेट गेल्यानंतर जो रूट आणि हॅरी ब्रूक यांनी चौथ्या विकेटसाठी तब्बल 195 धावांची भागिदारी केली. ब्रूक आणि रूट यांची दोघांचीही शतकं झाली. पण 332 धावांवर ब्रूक बाद झाला आणि त्यानंतर पाचच धावांत 337 धावांवर जो रूट बाद झाला.

रिमझिम पावसामुळं गोलंदाजांसाठी परिस्थिती काहीशी मदतीची झाली आणि चेंडू चांगलाच स्विंग होऊ लागला. त्याचा भारतीयं गोलंदाजांना चांगलाच फायदा झाला. कारण त्यानंतर अचानक भारतीय गोलंदाजांसह संपूर्ण संघाची देहबोलीच बदलली होती.

त्यामुळं खऱ्या अर्थानं हा या सामन्यातला टर्निंट पॉईंट ठरला. कारण ब्रूक आणि रूट बाद झाले नसते तर कदाचित सामना जिंकण्याची संधीही भारताला मिळाली नसती.

अखेरच्या चार विकेटचा खेळ

भारताला शेवटच्या दिवशी जिंकण्यासाठी इंग्लंडचे चार फलंदाज बाद करायचे होते.

पाचव्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतर मोहम्मद सिराजनं जेमी स्मिथला बाद करत भारताच्या सामना जिंकण्याच्या आशा उंचावल्या. विकेटकिपर जुरेलच्या हातून सिराजनं स्मिथला झेलबाद केलं.

त्यानंतर सिराजनं त्याच्या पुढच्या ओव्हरमध्ये ओव्हरटनलाही परत पाठवत भारताचा सामन्यातला दावा आणखी मजबूत केलं. सिराजच्या चेंडूवर ओव्हरटन पायचित झाला.

त्यानंतर प्रसिद्ध कृष्णानं टंगचा त्रिफळा उडवला. त्यामुळं सामन्याची सगळी जबाबदारी ॲटकिन्सनवर होती. कारण दुसऱ्या बाजुला एका हात बांधलेल्या अवस्थेतला वोक्स होता.

ॲटिकिन्सननंही प्रत्येक चेंडू स्वतः खेळण्याचा प्रयत्न केला. सिराजच्या चेंडूवर त्यानं एक मोठा फटका लगावला पण आकाशदीपनं तो झेल सोडला. सीमारेषेपासून आकाशदीप काहीसा पुढं असल्यानं तो झेल सुटला आणि षटकार झाला.

पण अखेर सिराजनं ॲटकिन्सनला बोल्ड करत भारताला विजय मिळवून दिला.

फ्रॅक्चर हातासह उतरला वोक्स

ओव्हल कसोटीत शेवटच्या दिवशी इंग्लंडच्या ख्रिस वोक्सनं लक्ष वेधून घेतलं. या मॅचच्या पहिल्या दिवशी फिल्डिंग करताना वोक्सला दुखापत झाली होती. त्याचा खांदा निखळला होता. पण तरीही चौथ्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी 17 रन्सची गरज असताना वोक्स मैदानात उतरला, तेव्हा सर्वांनीच टाळ्या वाजवून त्याच्या धाडसाचं कौतुक केलं.

याच मालिकेत मॅन्चेस्टर कसोटीत ऋषभ पंतच्या पायाचं बोट फ्रॅक्चर झालं होतं. तरीही ऋषभ फलंदाजीसाठी आला होता.

2009 साली दक्षिण आफ्रिकेच्या ग्रॅमी स्मिथनं सिडनी कसोटीत एका हातानं बॅटिंग केली होती. तर वेस्ट इंडीजच्या माल्कम मार्शल यांनी 1984 साली इंग्लंडमध्ये अंगठ्याला दुखापत झाल्यावर एका हातानं खेळत टीमला विजयही मिळवून दिला होता.

अनिल कुंबळेनंही 2002 सालच्या वेस्ट इंडीज दौऱ्यावर जबड्याला बँडेज लावलेलं असतानाही गोलंदाजी केली होती. 2019 च्या आयपीएल फायनलमध्ये शेन वॉटसन पायाला जखम झाल्यावरही खेळला होता, तेही अनेकांना आठवत असेल.

या सगळ्यांनी धाडस तर दाखवलंच, पण कधीही हार न मानण्याची वृत्ती महत्त्वाची असल्याचंही दाखवून दिलं.

'बिलिव्ह' लिहिलेला वॉलपेपर लावला - सिराज

या सामन्यात विजयाचा शिल्पकार ठरलेला आणि संपर्ण मालिकेत उत्तम गोलंदाजी केलेल्या मोहम्मद सिराजनं या विजयानंतर या आनंदाचं शब्दांत वर्णन करता येणार नाही अशी प्रतिक्रिया दिली.

"काल ब्रूक बाद झाला असता तर सामन्याचं चित्रंच वेगळं राहिलं असतं. त्याची कॅच सुटल्यानं बरंच काही बदललं.

पण आज सकाळी उठलो तेव्हा मी स्वतःला सांगितलं होतं की, मीच सामना बदलणार. त्यानंतर मी सकाळी मोबाईलवर 'बिलिव्ह' लिहिलेला वॉलपेपर लावला आणि मी करून दाखवणारच असं ठरवलं," असं सिराज म्हणाला. .

माझा एकच प्लॅन होता एकाच जागेवर चेंडू टाकून आत आणि बाहेर स्विंग करायचा असं मी ठरवलं होतं. त्यामुळं मला यश मिळालं असं तो म्हणाला. प्रत्येक सामना पाच दिवस आणि अखेरच्या सेशनपर्यंत चालला, त्यामुळं प्रत्येकानं उत्तम कामगिरी केल्याचं सिराजनं म्हटलं.

रोमहर्षक मालिका

भारत आणि इंग्लंड यांच्यातली ही मालिका पहिल्याच सामन्यापासून अगदी रोमहर्षक ठरली. पाच पैकी दोन्ही संघांनी प्रत्येकी दोन सामन्यांत विजय मिळवला. तर एक सामना अनिर्णित राहिला.

मालिकेत लीड्समध्ये खेळलेला पहिला सामना यजमान इंग्लंडने पाच विकेट्सने जिंकला होता, तर बर्मिंगहॅममध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत भारताने शानदार पुनरागमन केले आणि 336 धावांनी सामना जिंकून मालिका 1-1 अशी बरोबरीत आली.

लॉर्ड्सवर खेळलेला तिसरा कसोटी सामना अत्यंत रोमहर्षक ठरला. इंग्लंडने तो सामना 22 धावांनी जिंकला, तर मँचेस्टरवर खेळलेला चौथा कसोटी सामना अनिर्णित राहिला.

त्यानंतर या अखेरच्या सामन्यात भारतानं 6 रन्सनं विजय मिळवत मालिका अखेर बरोबरीत सोडवली.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)