You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
WPL चा नवा सीझन ठरणार खास; यंदा संघांमध्ये पाहायला मिळू शकते 'हे' वेगळेपण
विमेन्स प्रीमियर लीगचा (डब्ल्यूपीएल) चौथा सीझन आजपासून (9 जानेवारी) सुरू झालाय.
स्पर्धेची सुरुवात मागील सीझनचा विजेता संघ मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्याने होणार आहे.
यंदा डब्ल्यूपीएलचा नवा सिझन फेब्रुवारीऐवजी जानेवारीतच सुरू होत आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना 5 फेब्रुवारी रोजी वडोदरा येथे खेळवला जाणार आहे.
डब्लूपीएलच्या चौथ्या सीझनमध्ये एकूण 22 सामने खेळवले जाणार आहेत. मात्र हे सर्व 22 सामने नवी मुंबईतील डी.वाय.पाटील स्टेडियम आणि वडोदऱ्यातील कोटंबी स्टेडियम येथेच होतील.
स्पर्धेतील सुरुवातीचे 11 सामने नवी मुंबईतील डी.वाय.पाटील स्टेडियममध्ये होतील. तर एलिमिनेटर आणि फायनलसह उर्वरित 11 सामने वडोदऱ्यातील कोटंबी स्टेडियममध्ये खेळवले जातील.
डबल्यूपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच डबल हेडर सामने खेळवले जाणार आहेत. पहिला डबल हेडर शनिवारी (10 जानेवारी) मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियममध्ये होणार आहे. या दिवशी पहिला सामना दुपारी 3.30 वाजता सुरू होईल.
सायंकाळचे सर्व सामने 7.30 वाजता सुरू होतील.
यंदा कोणते नवे बदल?
मागील सीझनच्या तुलनेत यंदा स्पर्धेत सहभागी असलेल्या सर्व पाच संघांमध्ये-मुंबई इंडियन्स, गुजरात जायंट्स, दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि यूपी वॉरियर्समध्ये बराच बदल पाहायला मिळेल.
दिल्ली कॅपिटल्सने या हंगामासाठी जेमिमा रॉड्रिग्जकडे कर्णधारपदाची धुरा दिलेली आहे. ती मेग लॅनिंगची जागा घेईल.
मेग लॅनिंग दिल्ली कॅपिटल्समधून यूपी वॉरियर्स संघात सहभागी झाली आहे. लॅनिंग डब्ल्यूपीएलच्या या नव्या सीझनमध्ये यूपी वॉरियर्सचं नेतृत्त्व करणार आहे.
मुंबई इंडियन्सची धुरा हरमनप्रीत कौरच्या हाती आहे. तर स्मृती मंधाना आरसीबी आणि ॲशले गार्डनर गुजरात जायंट्सची कर्णधार आहे.
ऑस्ट्रेलियाची अनुभवी अष्टपैलू खेळाडू एलिस पेरी वैयक्तिक कारणांमुळे या सीझनमध्ये खेळताना दिसणार नाही.
मुंबई इंडियन्स
मुंबई इंडियन्स डब्ल्यूपीएलमध्ये आतापर्यंतची सर्वात यशस्वी टीम आहे. मुंबईने डबल्यूपीएलच्या पहिल्या आणि तिसऱ्या सीझनमध्ये विजेतेपद मिळवलं होतं.
मागील वर्षी फायनलमध्ये मुंबईने दिल्ली कॅपिटल्सला 8 धावांनी पराभूत करत जेतेपद पटकावलं होतं.
परंतु, या सीझनमध्ये झालेल्या ऑक्शनमध्ये मुंबई इंडियन्समध्ये पाच बदल पाहायला मिळाले.
मुंबई इंडियन्सच्या नव्या संघात ऑस्ट्रेलियाची वेगवान गोलंदाज निकोला कॅरी आणि मिली इलिंगवर्थ यांचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय त्रिवेणी वशिष्ठ, क्रांती रेड्डी, पूनम खेमनार आणि राहिला फिरदौस यांनाही संघात स्थान देण्यात आलं आहे.
कर्णधार हरमनप्रीत कौरशिवाय मुंबईच्या टीममध्ये वनडे वर्ल्ड कप विजेत्या टीमची सदस्य अमरजोत कौरचाही समावेश आहे.
मुंबईची टीम फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागात मजबूत असल्याचे दिसून येते.
आरसीबीला एलिस पेरीची अनुपस्थिती जाणवणार?
2024 मध्ये जेतेपद पटकावल्यानंतर आरसीबीसाठी मागील सीझन फारसा चांगला ठरला नाही. स्मृती मंधानाच्या संघाला 8 पैकी फक्त 3 सामने जिंकता आले आणि बाद फेरीसाठीही त्यांचा संघ पात्र ठरला नाही.
यंदाचा हंगामही आरसीबीसाठी सोपा नसेल. टीमसाठी सर्वाधिक धावा करणारी खेळाडू एलिस पेरी या हंगामात सहभागी होणार नाही.
सीझन बाहेर असूनही आरसीबीने तिला रिटेन खेळाडूंच्या यादीत ठेवलं होतं. मात्र आता तिच्या जागी सायली सातघरेला संघात स्थान देण्यात आलं आहे.
आरसीबीमध्ये आणखी काही नवीन खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. टीममध्ये ऑलराऊंडर्स मोठ्या संख्येनं असल्याचे दिसून येते.
टीमच्या ओपनिंगची जबाबदारी कर्णधार स्मृती मंधानाकडे असेल. त्याचबरोबर पूजा वस्त्राकर, ग्रेस हॅरिस, अरुंधती रेड्डी, नादिन डी क्लार्क आणि राधा यादव. हे खेळाडू फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये चमत्कार करू शकतात.
यूपी वॉरियर्स
डब्ल्यूपीएलच्या पहिल्या हंगामात यूपी वॉरियर्सने चांगला खेळ केला होता. त्यांची टीम प्ले ऑफपर्यंत पोहोचण्यात यशस्वी ठरली होती.
परंतु, मागील हंगामात यूपी वॉरियर्स 8 पैकी 5 सामनेच जिंकू शकली. यूपी वॉरियर्सने मागील दोन हंगामात 16 पैकी 6 सामन्यात विजय नोंदवला आहे.
यूपी वॉरियर्सने यंदाच्या सीझनच्या सुरुवातीला सर्व खेळाडूंना रिलीज केलं होतं आणि ऑक्शनमध्ये 14.50 कोटींच्या मोठ्या रकमेने भाग घेतला होता.
मेग लॅनिंगला या हंगामासाठी कर्णधार करण्यात आलं आहे. त्याचबरोबर यूपी वॉरियर्सच्या टीमला दीप्ती शर्मा आणि शिखा पांडेवर अवलंबून राहावं लागेल.
क्रांती गौड टीमच्या वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळताना दिसेल.
गुजरात जायंट्स
मागील सिझनमध्ये गुजरात जायंट्स प्रथमच नॉकआउट फेरीत पोहोचली होती. मात्र एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सने त्यांना पराभूत केलं आणि अंतिम फेरीत जाण्याचं त्यांचं स्वप्न भंग केलं होतं.
गुजरात जायंट्स साखळी फेरीत तिसऱ्या स्थानावर राहिली. पण चांगल्या कामगिरीनंतरही त्यांनी यंदा कर्णधार ॲशले गार्डनर आणि बेथ मुनी वगळता इतर कोणत्याही खेळाडूला रिटेन केलं नाही.
ऑक्शनमध्ये गुजरात जायंट्सने न्यूझीलंडची ऑलराउंडर सोफी डिव्हाइनला 2 कोटींमध्ये विकत घेतलं.
गुजरातने जॉर्जिया वेयरहॅम, किम गार्थ, कनिका आहूजा आणि आयुषी सोनीसह अनेक अष्टपैलू खेळाडूंचा संघात समाविष्ट केलं आहे.
गुजरातच्या बॅटिंग युनिटमध्ये डॅनी व्याट-हॉज आणि विकेटकीपर-फलंदाज यस्तिका भाटिया यांचाही समावेश आहे.
गुजरातच्या संघात वेगवान गोलंदाजीची जबाबदारी रेणुका सिंह आणि टायटस साधू यांच्यावर असेल. तर डाव्या हाताची फिरकीपटू राजेश्वरी गायकवाड स्पिन विभाग सांभाळेल.
दिल्ली कॅपिटल्स
मागील वर्षी दिल्ली कॅपिटल्स सलग तिसऱ्यांदा उपविजेता संघ राहिला. दिल्लीने पाँइंट्स टेबलमध्ये सर्वोच्च स्थानी राहत थेट फायनलचं तिकीट मिळवलं होतं.
परंतु, डब्ल्यूपीएलचा किताब पटकावण्याचं दिल्लीचं स्वप्न मागील वर्षीही पूर्ण झालं नाही.
दिल्ली कॅपिटल्स यंदा नव्या कर्णधारासह मैदानात उतरत आहे. भारतीय संघाला पहिला वनडे वर्ल्ड कप जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेली जेमिमा रॉड्रिग्ज दिल्ली कॅपिटल्सचं नेतृत्व करताना दिसेल.
दिल्लीकडे श्री चरणी आणि शेफाली वर्मा आहेत. हे दोन्ही खेळाडू वर्ल्ड कप जिंकणाऱ्या टीम इंडियाचा भाग होत्या.
दिल्लीने 16 वर्षीय दिया यादववर विश्वास दाखवला आहे.
विश्वचषकापासून चांगल्या फॉर्मात असणाऱ्या शेफाली वर्माकडून दिल्ली कॅपिटल्सला सर्वाधिक आशा आहेत.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)