अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेवर चकमकीत 58 पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याचा तालिबानचा दावा, नेमकं काय घडलं?

फोटो स्रोत, Getty Images
पाकिस्तानच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून केलेल्या कारवाईत 58 पाकिस्तानी सैनिक ठार झाले असून 30 जखमी झाल्याचा दावा अफगाणिस्तानातील तालिबान सरकारचे प्रवक्ते जबिहुल्लाह मुजाहिद यांनी केला आहे.
रविवारी (12 ऑक्टोबर) काबूलमध्ये पत्रकार परिषदेत जबिहुल्लाह मुजाहिद म्हणाले, "पाकिस्तानला प्रत्युत्तर देताना' 20 पाकिस्तानी चौक्या ताब्यात घेण्यात आल्या होत्या. परंतु लढाई संपल्यानंतर त्या परत करण्यात आल्या."
जबिहुल्लाह मुजाहिदच्या दाव्यावर पाकिस्तानकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, गृहमंत्री मोहसिन नक्वी यांनी शनिवारी (11 ऑक्टोबर) रात्री दावा केला की, अफगाणिस्तानच्या कारवाईला प्रभावी प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
या चकमकीत 9 तालिबानी जवान ठार झाले असून 20 हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती प्रवक्ते मुजाहिद यांनी दिली.
आयएसआयएसचे प्रमुख पाकिस्तानात असून हे संघटन अद्याप खैबर पख्तूनख्वाह आणि बलुचिस्तान प्रांतांमध्ये सक्रिय आहे, असा आरोप जबिहुल्ला मुजाहिद यांनी केला.
त्यांनी सांगितलं की, अफगाणिस्तानमधून आयएसआयएसचा सफाया करण्यात आला आहे.
आयएसआयएसचे प्रशिक्षण केंद्र पाकिस्तानमध्ये आहेत आणि आंतरराष्ट्रीय समुदायाने याकडे लक्ष दिले पाहिजे, असा आरोप त्यांनी केला.
अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा भारत दौरा कोणत्याही देशाच्या विरोधात नाही आणि त्यावर कोणालाही आक्षेप असू नये, असंही त्यांनी नमूद केलं.
(बीबीसी पश्तोचे प्रतिनिधी इफ्तिखार खान यांनी याबाबत माहिती दिली.)
आतापर्यंत काय माहिती समोर?
अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेवर शनिवारी (11 ऑक्टोबर) रात्री उशिरा भीषण गोळीबार झाला. अफगाण तालिबान दलांनी पाकिस्तानी चौक्यांवर हल्ला केला.
याच आठवड्यात काबुलमध्ये झालेल्या एका हवाई हल्ल्यानंतर ही घटना घडलीय.
रॉयटर्स वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, अफगाणिस्तानने काबुलवरील हवाई हल्ल्यासाठी पाकिस्तानला जबाबदार ठरवलं होतं.
रॉयटर्सने पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या देशांच्या सुरक्षा अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर सांगितलं की, सीमारेषेवर अनेक ठिकाणी भीषण झटापट झाली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
पाकिस्तानी सुरक्षा अधिकाऱ्यांनी म्हटलं की, "अफगाणिस्तानकडून 'उकसवलं नसतानाही' झालेल्या गोळीबाराला 'पूर्ण ताकदीने' उत्तर देत आहोत. सीमेवरील सहाहून अधिक ठिकाणी गोळीबार झाला आहे."
तर तालिबान दलांचा दावा आहे की, "पाकिस्तानच्या तीन सीमा चौक्यांवर कब्जा केला आहे." मात्र, पाकिस्तानी सुरक्षा अधिकाऱ्यांचे म्हणणं आहे की, "आमच्या सैन्याने अफगाणिस्तानच्या अनेक चौक्या उद्ध्वस्त केल्या आहेत."
तालिबानच्या संरक्षण मंत्रालयाचं म्हणणं आहे की, अलीकडेच अफगाण भूमीवर झालेल्या पाकिस्तानी लष्करी कारवायांच्या प्रत्युत्तरादाखल सीमापार पाकिस्तानी सैनिकांवर मोठ्या प्रमाणात प्रतिहल्ले करण्यात आले आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
बीबीसी उर्दूच्या माहितीनुसार, पाकिस्तानातील लष्करी सूत्रांनी या ऑपरेशनला दुजोरा दिला असून, त्यांनी दावा केलाय की, अफगाण हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं गेलं असून, अनेक चौक्या नष्ट केल्या गेल्यात.
शुक्रवारी (10 ऑक्टोबर) अफगाणिस्तानातील तालिबानच्या संरक्षण मंत्रालयानं पाकिस्तानवर आरोप केला होता की, "पाकिस्ताननं आमच्या हवाई क्षेत्रात उल्लंघन करत काबुलसह दोन ठिकाणी हवाई हल्ले केले."
तालिबानच्या संरक्षण मंत्रालयानं सांगितलं की, या उपाययोजनांनंतर जर परिस्थिती अधिक तणावपूर्ण झाली तर त्याचे परिणाम पाकिस्तानी सैन्यालाच भोगावे लागतील.
काबुलमध्ये तालिबानच्या संरक्षण मंत्रालयाने बीबीसीला सांगितले की, शनिवारी (11 ऑक्टोबर) रात्री अफगाणिस्तानच्या पूर्वेकडील कुनार प्रांतात, दक्षिण-पूर्वेतील खोस्त, पक्तिया आणि दक्षिणेकडील हेलमंद येथे ड्युरंड रेषेजवळ पाकिस्तानी सैनिकी चौक्यांवर समन्वित हल्ले करण्यात आले.
प्रत्यक्षदर्शींनी बीबीसीला सांगितले की, तालिबान दलांनी संध्याकाळी हलक्या आणि मोठ्या अशा दोन्ही प्रकारच्या शस्त्रांनी हल्ला केला आणि त्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये भीषण लढाई झाली.
पाकिस्तानातील लष्करी सूत्रांनीही अफगाणिस्तानकडून झालेल्या हल्ल्यांना दुजोरा दिला आणि सांगितलं की, तालिबान दलांनी अंगूर अड्डा, बाजौर, कुर्रम, दीर, चित्राल आणि बलुचिस्तानमधील बारम चाह अशा ठिकाणी "उकसवलं नसतानाही" गोळीबार केला.
सीमारेषेपासून काही किलोमीटर अंतरावर पाकिस्तानातील कुर्रम जिल्ह्यातील एका पोलिस अधिकाऱ्यानं बीबीसी उर्दूचे अजीजुल्ला खान यांना सांगितलं की, दोन्ही बाजूंनी मोठ्या शस्त्रास्त्रांद्वारे गोळीबार सुरू आहे, ज्यामध्ये आतापर्यंत दोन जण जखमी झाल्याची माहिती आहे.
सौदी अरब आणि कतारने काय म्हटलं?
सौदी अरबने पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमावर्ती भागामध्ये वाढलेला तणाव आणि संघर्षावर चिंता व्यक्त केली आहे.
सौदीर अरबच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या एका वक्तव्यामध्ये असं म्हटलं गेलं आहे की, सौदी अरबला पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन्ही देशांमध्ये सीमावर्ती भागामध्ये वाढता तणाव आणि संघर्षाबाबत चिंता असून तो या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
या वक्तव्यामध्ये सौदी अरबने दोन्ही बाजूंना सयंम बाळगण्याचं तसेच तणाव कमी करण्याचं आवाहन केलं आहे. सोबतच, या वक्तव्यात असं म्हटलंय की, दोन्हीही देशांनी या प्रदेशात स्थैर्य राखण्यासाठी संवाद आणि धोरणात्मक माध्यमातून मार्ग काढावा.

फोटो स्रोत, @Spa_Eng
सौदी अरब आणि पाकिस्तान या दोन्ही देशांदरम्यान अलीकडेच एक समजुतीचा करार झाला आहे. या कराराअंतर्गत, कोणत्याही एका देशावर हल्ला होण्याच्या परिस्थितीमध्ये हा हल्ला दोन्ही देशांवरील हल्ला मानला जाईल.
दुसऱ्या बाजूला, कतारनेही पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमावर्ती भागामध्ये झालेल्या संघर्षावर आणि प्रदेशाच्या सुरक्षिततेवर पडणाऱ्या प्रभावांबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाने दोन्हीही देशांना असं आवाहन केलंय की, त्यांन हा तणाव कमी करण्यासाठी संवाद करावा आणि धोरणात्मक मार्ग निवडावा.
याआधी काय घडलंय?
शुक्रवारी, अफगाणिस्तानातील तालिबानच्या संरक्षण मंत्रालयाने पाकिस्तानवर त्यांच्या हवाई क्षेत्राचे उल्लंघन करून काबूलसह दोन ठिकाणी हवाई हल्ले केल्याचा आरोप केला.
या उपाययोजनांनंतर परिस्थिती अधिक तणावपूर्ण झाली तर त्याच्या परिणामांना पाकिस्तानी सैन्य जबाबदार असेल, असंही तालिबानच्या संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे.
निवेदनात असंही म्हटलं आहे की, "पुन्हा एकदा पाकिस्ताननं अफगाणिस्तानच्या हवाई हद्दीचे उल्लंघन केलं आहे. पाकिस्तानी सैन्याने डुरंड रेषेजवळील पक्तिका प्रांतातील मरघा भागातील एका बाजारपेठेला लक्ष्य केलं आणि राजधानी काबूलच्या हवाई हद्दीचेही उल्लंघन केलं."

फोटो स्रोत, X/@MoDAfghanistan2
तालिबानच्या संरक्षण मंत्रालयाने पाकिस्तानी सैन्याला इशारा दिला होता की, "परिस्थिती कितीही गंभीर झाली तरी त्याचे परिणाम पाकिस्तानी सैन्याला भोगावे लागतील."
दुसऱ्या बाजूला, पाकिस्ताननं यावर कोणतंही स्पष्ट उत्तर दिलेलं नाही.
बीबीसी उर्दूच्या वृत्तानुसार, शुक्रवारी पेशावरमध्ये पत्रकार परिषदेत याबद्दल विचारलं असता, पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी कोणतेही स्पष्ट उत्तर दिलं नाही.
त्यांनी फक्त एवढंच सांगितलं की, "पाकिस्तानविरोधातल्या दहशतवादासाठी अफगाणिस्तानची भूमी वापरली जात आहे. पाकिस्तानच्या जनतेच्या संरक्षणासाठी आवश्यक पावले उचलली जातील आणि पुढेही प्रयत्न सुरूच राहतील."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)








