मिलिंद देवरा : काँग्रेस सोडण्याची आणि शिवसेना निवडण्याची 5 कारणं

फोटो स्रोत, ANI
- Author, नितीन सुलताने
- Role, बीबीसी मराठीसाठी
माजी मंत्री आणि काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. या पक्षप्रवेशाच्या पार्श्वभूमीवर मिलिंद देवरांचं राजकारण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.
मिलिंद देवरा यांचा त्यांचे वडील स्वर्गीय मुरली देवरा यांच्यापासून जवळपास 55 वर्षं काँग्रेसशी संबंध होता. पण अनेक मोठ्या नेत्यांप्रमाणेच देवरा यांनीही काँग्रेसला राम-राम केल्यानंतर त्यावर चर्चा सुरू झाली.
मिलिंद देवरा यांच्या निर्णयाकडं विविध दृष्टीकोनातून पाहिलं जात आहे. आगामी निवडणुकांच्या तोंडावर राजकीय आडाखे बांधून हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. तर त्यामागे नाराजीचं कारण असल्याचंही म्हटलं जातंय.
राजकीय विश्लेषक आणि अभ्यासकदेखील मिलिंद देवरा यांच्या या निर्णयाची वेगवेगळ्या प्रकारे कारणमीमांसा केली आहे. काँग्रेस सोडण्याची त्यांची नेमकी कारणं आणि शिंदे गटातील प्रवेशाचे अर्थ याविषयीच आपणही चर्चा करणार आहोत.
मिलिंद देवरांनी सांगितलेलं कारण
सर्वांत आधी मिलिंद देवरा यांनी सांगितलेलं कारण पाहुयात. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत प्रवेशासाठी आमंत्रण दिल्याचं सांगत, देवरा यांनी त्यामागचं कारणही स्पष्ट केलं.
"एकनाथ शिंदे यांना मुंबई आणि महाराष्ट्राच्या हितासाठी काम करणारे चांगले लोक हवे आहेत. खासदार होऊन मी मुंबई, महाराष्ट्र, शिवसेना आणि शिंदेसाहेबांच्या व्हिजनचं उत्तम प्रतिनिधित्व करू शकतो, असं एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांचं मत आहे. त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे," असं मिलिंद देवरा प्रवेशानंतर म्हणाले.
म्हणजेच शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर ते खासदार होणार असं एकनाथ आणि श्रीकांत शिंदेंकडून सांगण्यात आल्याचंच त्यांनी एकप्रकारे याठिकाणी सांगून टाकलंय.
सध्याचा काँग्रेस पक्ष आणि मिलिंद देवरा यांचे वडील मुरली देवरा यांनी प्रवेश केला तेव्हाचा म्हणजे 1968 चा काँग्रेस पक्ष तसंच 2004 मध्ये त्यांनी प्रवेश केलेला काँग्रेस पक्ष यात खूप फरक असल्याचंही मिलिंद देवरा म्हणाले.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं व्हिजन मोठं आहे. त्यामुळे त्यांचे हात बळकट करायचे आहेत. तसंच पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्याकडे देशासाठी व्हिजन आहे, त्यामुळे शिवसेनेच्या माध्यमातून त्यांचे हात बळकट करायचे आहेत, असंही एक कारण त्यांनी यावेळी दिलं.
1. देवरा-गांधी यांच्यातील दुरावा
मिलिंद देवरा आणि राहुल गांधी किंवा काँग्रेस नेतृत्व यांच्यात मुळातच 2-3 वर्षांपासून एकप्रकारचा तणाव किंवा दुरावा होता, असं मत राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांनी याबाबतची कारणमीमांसा करताना मांडलं.
"मुंबई काँग्रेस अध्यक्षपद किंवा अशा प्रकारच्या काँग्रेसच्या पक्ष संघटनेतले निर्णय घेताना मिलिंद देवरा यांना फारसं महत्त्वं दिलं जात नव्हंत, त्यावरूनही ते नाराज असण्याची शक्यता नाकारता येत नाही."
त्यात सर्वांत महत्त्वाचं कारण म्हणजे, देवरा यांचा दावा असलेल्या दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी हा असू शकतो.
"महाविकास आघाडीमधील सध्याच्या चर्चेनुसार ज्याठिकाणी ज्या पक्षाचे विद्यमान खासदार असतील ती जागा संबंधित पक्षाला दिली जाणार आहे. या गणिताचा विचार करता अरविंद सावंत विद्यमान खासदार असल्यानं हा मतदारसंघ उद्धव ठाकरे गटाकडं राहील. त्यामुळे काँग्रेसमध्ये राहून इथून लोकसभा निवडणूक लढण्याची संधी मिळणार नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं होतं. त्यामुळं त्यांनी अखेर हा निर्णय घेतला असावा," असं अभय देशपांडे म्हणाले.
मुंबईतील पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांनीही या मुद्द्याला दुजोरा दिला. देवरा यांनी त्यांच्या राजकीय भवितव्याचा विचार या निर्णयापूर्वीही केल्याचं ते म्हणाले.
"मिलिंद देवरा दोन वेळा लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले. त्यामुळे आधीच 10 वर्षांचा मोठा राजकीय गॅप होता. त्यात यावेळीही संधी मिळाली नाही तर राजकारणातून बाजुला पडण्याची भिती या निर्णयापूर्वी त्यांच्या मनात असावी," असं सूर्यवंशी यांना वाटतं.
त्याचबरोबर काँग्रेसकडून मिलिंद देवरा यांना राज्यसभेच्या जागेसाठी तरी प्राधान्य किंवा आश्वासन दिलं जाईल अशी अपेक्षा होती. पण ती पूर्ण होताना दिसत नसल्याचंही सूर्यवंशी म्हणाले.

फोटो स्रोत, Getty Images
गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं मोठे नेते पक्ष सोडून जात असल्याच्या समस्येचा काँग्रेसला सामना करावा लागत आहे. त्याच यादीत आता मिलिंद देवरा यांच्या नावाचा समावेश झाला आहे.
याआधीही देवरा काँग्रेस सोडणार अशी चर्चा काही वेळा समोर आलेली आहे. अनेकवेळा काँग्रेसवरील त्यांची नाराजी पाहायला मिळाली आहे.
त्यांनी मुंबई काँग्रेसचं प्रदेशाध्यपद सोडलं तेव्हा आणि महाविकास आघाडीची स्थापना झाल्यानंतरही ते काँग्रेस सोडणार अशा बातम्या समोर आल्या होत्या.
दोनवेळा निवडणूक हारल्यानंतर ते राजकारणात फारसे सक्रियदेखील नव्हते. शिवाय त्यांची राजकीय ताकद मर्यादित स्वरुपाची आहे. मुंबई काँग्रेसवर देखील त्यांना त्यांचा अंमल निर्माण करता आला नव्हता.
देवरांनी पक्ष सोडल्यामुळे काँग्रेसला दक्षिण मुंबईत थोडाफार फटका बसू शकतो.
2. म्हणून शिवसेनेत प्रवेश
मिलिंद देवरा यांच्या सोशल मीडिया पोस्ट किंवा प्रतिक्रियांवरून ते भाजपमध्ये जाणार अशी चर्चा अनेकदा रंगली. पण त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला.
वरिष्ठ पत्रकार दीपक भातुसे यांच्या मते, "भाजपकडून पक्षात अशाच नेत्यांना घेतलं जातं, ज्यांचा पक्षाला फायदा होईल. त्यादृष्टीनं त्यांच्यासाठी मिलिंद देवरा यांची तेवढी मदत झाली नसती. उलट त्यांच्या दक्षिण मुंबई मतदारसंघामध्ये भाजपची अधिक शक्ती आहे."
"तसंच देवरांच्या दक्षिण मुंबई मतदारसंघातून राहुल नार्वेकर हे सध्या लोकसभेची तयारी करत आहेत. त्यामुळे भाजप शिवसेनेला ही जागा नाकारण्याची शक्यता अधिक आहे. प्रतिस्पर्धी उमेदवाराला पक्षात प्रवेश देऊन आपल्या नेत्यांना कदाचित भाजपला नाराज करायचं नसेल," असंही ते म्हणाले.
शिवाय एकनाथ शिंदे यांनी देवरा यांना राज्यसभेची जागा देण्याचं आश्वासन दिल्याची चर्चा आहे. त्यामुळेच त्यांनी शिवसेनेची निवड केली असू शकते, असंही दीपक भातुसे यांनी सांगितलं.
3. राष्ट्रवादीचाही पर्याय नाही, कारण...
पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांच्या मते, "देवरा यांच्यासाठी थेट भाजपमध्ये प्रवेश करणं योग्य ठरलं नसतं. त्यामुळे सुरुवातीला ते अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असंही ठरलं होतं. त्यामुळं विचारसरणीचाही मुद्दा उपस्थित झाला नसता.

फोटो स्रोत, ANI
पण विश्लेषणात असं लक्षात आलं की, दक्षिण मुंबई मतदारसंघात राष्ट्रवादीचा मतदारच नाही. तिथं मराठी माणसाच्या रुपानं शिवसेनेचे मतदार आहेत. तर काँग्रेसचा पारंपरिक मतदार आणि गुजराती, मारवाडी, व्यापारी असा भाजपचा म्हटला जाणारा मतदार आहे. यामुळं अखेर मधला मार्ग म्हणून त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय भाजपच्या सल्ल्यानंच झाला असावा," असंही ते म्हणाले.
अभय देशपांडे यांच्या मते, "महायुतीमध्ये ही जागा कोण लढवणार यावर आधीच चर्चा झालेली असणार. एकनाथ शिंदे, मिलिंद देवरा आणि फडणवीस यांच्यातील चर्चेनंतरच त्यांनी शिवसेनेत जाण्याच्या निर्णय झाला असेल."
अब्दुल सत्तारांच्या वेळीही ते भाजपमध्ये जाणार हे जवळपास निश्चितच होतं. पण फडणवीसांनीच त्यांना शिवसेनेत पाठवलं, असं म्हटलं जात असल्याचा दाखलाही त्यांनी यावेळी दिला.
4. देवरा यंदा लोकसभा लढवणार?
दक्षिण मुंबईतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून तयारी सुरू झाली आहे. ठाकरे गटाकडून वारंवार दावे केले जात आहेत. काही दिवसांपूर्वीच आदित्य ठाकरेंनी या मतदारसंघात कार्यक्रमही घेतला.
या सर्वानंतर महाविकास आघाडीकडून जागा मिळणार नाही म्हणून देवरा यांनी हा निर्णय घेतला असू शकतो. पण या निर्णयानंतर तरी त्यांना लोकसभा निवडणूक लढवता येणार का? हा प्रश्न आहे.
याचं कारण म्हणजे, भाजपदेखील दक्षिण मुंबई मतदारसंघामधून निवडणूक लढवण्याची तयारी करत आहे. विद्यमान मंत्री मंगल प्रभात लोढा, राहुल नार्वेकर यांची याठिकाणी तयारी सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

फोटो स्रोत, Milind Deora
दीपक भातुसे यांच्या मते, भाजप ही जागा महायुतीच्या जागावाटपात शिवसेनेला सोडण्याची शक्यता फारच कमी आहे.
"युतीच्या जागावाटपात हा मतदारसंघ मूळ भाजपचाच होता. 1996 आणि 1999 मध्ये याठिकाणाहून भाजपच्या जयवंतीबेन मेहता विजयी झाल्या होत्या. दोन्ही वेळा त्यांनी मिलिंद देवरा यांचे वडील मुरली देवरा यांचाच पराभव केला होता," असंही ते म्हणाले.
त्याशिवाय सर्वकाही पार करूनही उमेदवारी मिळालीच तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा उमेदवार त्यांच्या विरोधात असेल. त्याचबरोबर मनसे नेते बाळा नांदगावकरही याठिकाणाहून निवडणूक लढवू शकतात अशी चर्चा आहे. तसं झाल्यास मराठी मतांचंही विभाजन होऊ शकतं.
5. मुंबई दक्षिण - उच्चभ्रू मतदारसंघ
दक्षिण मुंबई देशातील श्रीमंत लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे.
यात कुलाबा, शिवडी, भायखळा, मुंबादेवी, वरळी, मलबार हिल हे विधानसभेचे मतदारसंघ येतात.
अनेक उद्योगांची मुख्यालयं, मंत्रालय, मंत्र्यांचे बंगले, रिझर्व्ह बँक, महत्त्वाची कार्यालयं तसंच फोर्टमधील अनेक जुन्या वास्तू या मतदारसंघामध्ये येतात.
इथल्या उच्चभ्रूंमुळे तयार झालेल्या संस्कृतीला आणि या परिसराला 'सोबो' (साऊथ बॉम्बेचे लघुरूप) म्हटलं जातं.
दक्षिण मुंबईत सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. यापैकी दोन ठाकरे गटाकडे, एक शिंदेंच्या शिवसेनेकडे, दोन भाजप आणि एक काँग्रेसकडे आहे.
वरळीतून शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे, शिवडी विधानसभा मतदारसंघात अजय चौधरी, मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातून अमिन पटेल, भायखळ्यातून यामिनी जाधव, मलबार हिल मतदारसंघातून मंगलप्रभात लोढा आणि कुलाब्यातून राहुल नार्वेकर सध्या प्रतिनिधित्व करत आहेत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








