You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शिवसेना: उद्धव ठाकरेंचे आमदार अपात्र ठरल्यास ठाकरे गटाचा 'प्लॅन बी' काय असेल?
- Author, दीपाली जगताप
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
आजचा दिवस हा शिवसेनेच्या इतिहासातील एक अत्यंत निर्णायक दिवस ठरेल. कारण शिवसेनेतील शिंदे आणि ठाकरे या दोन गटांमध्ये कोणते आमदार पात्र ठरणार आणि कोणते अपात्र ठरणार याचा निर्णय आज स्पष्ट होणार आहे.
शिवसेना हा राजकीय पक्ष नेमका कोणाचा आणि त्यानुसार कोणत्या गटाचा व्हिप अधिकृत मानला जाणार हे आजच्या शिवसेना आमदारांच्या अपात्रता प्रकरणाच्या निकालात सांगितलं जाईल.
विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सप्टेंबर 2023 ते डिसेंबर 2023 या कालावधीत शिवसेनेच्या आमदारांची सुनावणी पूर्ण झाली. त्याचा निकाल आज संध्याकाळी चार वाजता राहुल नार्वेकर वाचून दाखवतील. या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. अनेक संभाव्य निकालांची चर्चा सुरू झाली आहे.
एकाबाजूला शिंदे गटाच्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई करा अशा याचिका ठाकरे गटाने दाखल केल्या होत्या तर यानंतर शिंदे गटानेही 'आम्ही खरी शिवसेना आहोत' हे सांगत ठाकरे गटाच्या आमदारांनी व्हिप मोडल्याचा दावा करत अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी केली. यात त्यांनी आमदार आदित्य ठाकरे यांना वगळलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही अपात्रतेच्या कारवाईची टांगती तलवार आहे. यामुळे ते अपात्र ठरल्यास सरकार कोसळण्याचा धोका आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या 14 आमदारांना मात्र अपात्र ठरवल्यास त्यांच्यासाठी मोठं आव्हान उभं राहू शकतं. यासाठी त्यांचा 'प्लॅन बी' काय आहे? जाणून घेऊया.
उद्धव ठाकरेंना काय निकाल अपेक्षित?
सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या दोन्ही गटांचा युक्तिवाद ऐकला आणि 20 डिसेंबर रोजी सुनावणी पूर्ण केली. या प्रकरणात आतापर्यंत 2 लाखांहून अधिक पानांचे पुरावे सादर करण्यात आले आहेत.
उद्धव ठाकरे यांनी 21 जून 2022 रोजी सर्व आमदारांची बोलावलेली बैठक, त्यासाठी बजावलेला व्हिप, सुरत ते गुवाहटी प्रवास, आपल्याच मुख्यमंत्र्याचं सरकार पाडण्याचा दावा, सत्तांतर आणि विधानसभा अध्यक्षांची निवड अशा अनेक घटनांचा दाखला देत ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी पक्षांतर बंदी कायद्याचं उल्लंघन झाल्याचं सिद्ध करण्याचा प्रयत्न केला.
तर दुसऱ्या बाजूला शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी ठाकरे गटाची 21 जून 2022 रोजीची बैठक कधी झालेलीच नाही, त्यासाठी दाखवला जात असलेला व्हिप बनावट आहे असा दावा केला. तसंच उद्धव ठाकरे यांचं पक्षप्रमुख पद पक्षाच्या घटनेनुसार नाही हे सुद्धा सिद्ध करण्याचा प्रयत्न त्यांनी केला.
आता अध्यक्ष राहुल नार्वेकर काय निकाल देतात याकडे राज्यासह देशाचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, निकालापूर्वी उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात एक प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दोन वेळा गुप्त भेट घेतल्याचं सांगत ठाकरेंनी यावर आक्षेप घेतला आहे.
राहुल नार्वेकर न्यायाधीशांच्या भूमिकेत असताना निकालाच्या तोंडावर आरोपीला कसे भेटू शकतात? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, "या खटल्याचा निकाल देशामध्ये लोकशाही जिवंत राहणार की नाही हे ठरवणारा निकाल असणार आहे. गेले दोन वर्ष त्यावर चर्चा, सुनावणी, उलट तपासणी सुरू आहे. गेल्या एप्रिलमध्ये सर्वोच्च न्यायालयाने योग्य वेळेत निकाल लावावा असं म्हटलं होतं. 31 डिसेंबर तारीख दिली होती. ज्याप्रमाणे सुनावणी सुरू होती तेव्हाच आमच्या लक्षात आलं होतं की वेळकाढूपणा करत आहेत."
ते पुढे सांगतात,"लवाद म्हणून अध्यक्ष महोदय दोन वेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घरी जाऊन भेटले आहेत. याचा अर्थ होतो की न्यायाधीशच आरोपीला जाऊन भेटले. ते मुख्यमंत्र्यांना तसं भेटले तर हरकत नाही पण खटला सुरू असताना ते भेटले. आरोपीला घरी जाऊन भेटणार असतील तर कोणत्या न्यायाची अपेक्षा करणार?"
'आम्ही सर्वोच्च न्यायालयाला विनंती करतो की तुमच्या डोळ्यादेखत हे घडत आहे. यात वेडावाकडा निकाल दिला तर तो जनतेलाही कळायला हवा', असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी प्रतिज्ञापत्र दाखल केल्याचं म्हटलं आहे. तसंच ही सुनावणी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर अवलंबून असायला हवी होती, हे मुद्दे कोणते आहेत याचीही आठवण परब यांनी करून दिली.
ते सांगतात, "ही सुनावणी सात आठ महिने चालली. सर्वोच्च न्यायालयाने जे मुद्दे अधोरेखित केले होते त्यानुसार सुनावणी अपेक्षित होती होतं. या निकालात त्यांनी म्हटलं आहे की गोगावले यांची व्हिप म्हणून नियुक्ती बेकायदेशीर होती. अध्यक्षांनी 3 जुलै 2022 रोजी गोगावले यांची प्रतोदपदी केलेली नियुक्ती बेकायदेशीर आहे असं कोर्टाने म्हटलं आहे. आता फक्त लवादाला तपासायचे होते की नियुक्ती कशी झाली, लवादाची नेमणूक सुद्धा सुप्रीम कोर्टाने बेकायदेशीर ठरवली होती.आता आम्हाला पहायचं आहे की उद्या सुप्रीम कोर्टाने म्हटलंय त्याला डावलून निकाल देतात का?"
"उपाध्यक्षांसमोर दोन गट पडल्याचे दिसत नाही. चौधरी यांची शिंदे यांच्या जागी केलेली नेमणूक (गटनेतेपदाची) वैध ठरते असं सुप्रीम कोर्टाने निकालात म्हटलं आहे. यामुळे लवादाला त्याविरोधात निर्णय देता येतो की नाही हे आम्हाला पहायचं आहे. अध्यक्षांनी कोणतीही शहानिशा न करता एकनाथ शिंदे यांची केलेली निवड बेकायदेशीर ठरते असं स्पष्ट सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. निकालात आम्हाला अपेक्षित आहे की, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या गाईडलाईन्सप्रमाणे निकाल व्हावा.
पण अध्यक्ष दोन वेळा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जातात असं करता येत नाही. मतदारसंघातील कामासाठी गेले असं सांगितलं जातं पण कुठलाही तपशील जाहीर न करता गुप्त बैठका झालेल्या आहेत."
दरम्यान, या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी विरोधकांना आरोप करण्याशिवाय दुसरी कामं नाहीत अशी प्रतिक्रिया दिली.
तसंच अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही ही भेट मतदारसंघाच्या कामासाठी होती असं माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं आहे.
उद्धव ठाकरे यांचे आमदार अपात्र ठरले तर पुढे काय?
या प्रकरणाचे प्रामुख्याने तीन संभाव्य निकाल लागतील अशी चर्चा केली जात आहे. पहिला संभाव्य निकाल म्हणजे ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरू शकतात, दुसर्या निकालाची शक्यता म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या गटातील आमदारांना अपात्र ठरवू शकतात. आणि तिसरी शक्यता म्हणजे दोन्ही गटाच्या आमदारांना अपात्र ठरवलं जाणार नाही किंवा पक्षात फूट दाखवली जाणार नाही.
आजचा निकाल ठाकरे गटाच्या विरोधात लागला तर त्यांचे कोणते आमदार अपात्र ठरतील पाहूया,
1. सुनील प्रभू
2. अजय चौधरी
3. सुनील राऊत
4. रवींद्र वायकर
5. राजन साळवी
6. वैभव नाईक
7. नितीन देशमुख
8. भास्कर जाधव
9. राहुल पाटील
10. रमेश कोरगावकर
11. प्रकाश फातर्पेकर
12. उदयसिंह राजपूत
13. संजय पोतनीस
14. कैलास पाटील
यात आमदार आदित्य ठाकरे आणि ऋतुजा लटके यांच्याविरोधात अपात्रतेची याचिका शिंदे गटाने दाखल केलेली नाही.
तसंच एकनाथ शिंदे यांच्या विरोधात निकाल लागल्यास कोणते 16 आमदार अपात्र ठरतील पाहूया,
अपात्रतेची टांगती तलवार असणाऱ्या आमदारांची नावे:
1. एकनाथ शिंदे
2. अब्दुल सत्तार
3. संदीपान भुमरे
4. संजय शिरसाट
5. तानाजी सावंत
6. यामिनी जाधव
7.चिमणराव पाटील
8.भरत गोगावले
9.लता सोनवणे
10. प्रकाश सुर्वे
11. बालाजी किणीकर
12. अनिल बाबर
13. महेश शिंदे
14. संजय रायमूलकर
15. रमेश बोरनारे
16 बालाजी कल्याणकर
विधानसभा अध्यक्षांनी कोणत्याही गटाच्या बाजूने निकाल दिला तरी या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देता येऊ शकतं. यामुळे ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरल्यास उद्धव ठाकरे गट या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहेत.
परंतु ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र केल्यास त्यांना जनतेकडून पुन्हा सहानुभूती मिळू शकते यामुळे त्यांना अपात्र केलं जाणार नाही अशीही चर्चा राजकीय विश्लेषक वर्तवतात.
याविषयी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, "मी सहानुभूतीवरती राजकारण करणारा नाही. हे प्रकरण पुन्हा सुप्रीम कोर्टात जावं आणि आणखी वेळकाढूपणा करावा हीच त्यांची इच्छा आहे."
उद्धव ठाकरे यांना 'प्लॅन बी' काय आहे असाही प्रश्न विचारला गेला. यावर ते म्हणाले, "आमचा प्लॅन ए, बी, सी, डी, काही नाही. पण लोकशाहीचा खून आपल्या डोळ्यादेखत दिवसाढवळ्या होतोय का हे आपल्याला पहावं लागेल."
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र लोकशाहीत बहुमताला महत्त्व असल्याचं सांगत कुठेही कायद्याचं उल्लंघन झालेलं नाही अशी प्रतिक्रिया दिलेली आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले,"सुनावणी पूर्ण झाली आता निकाल येईल. मी एवढच सांगतो की लोकशाहीत बहुमताला महत्त्व आहे. पहिल्या दिवसापासून बहुमत आमच्याकडे आहे. विधानसभेत आणि लोकसभेत बहुमत आहे. निवडणूक आयोगाने अधिकृत शिवसेना पक्ष आणि चिन्ह आमच्याकडे दिलेलं आहे. त्यामुळे निकाल मेरीटप्रमाणे मिळाला पाहिजे. लोकशाहीत बहुमताला महत्त्व आहे. आम्ही नियम सोडून कुठलंही काम केलेलं नाही. घटनेने दिलेल्या अधिकाराप्रमाणे हे सरकार स्थापन झालेलं आहे. बहुमतामुळेच आयोगाने आम्हाला पक्ष आणि धनुष्यबाण दिलेलं आहे. मला अपेक्षा आहे की निकाल मेरिटनुसार लागावा."
याविषयी बोलताना विधिमंडळाचे माजी सचिव अनंत कळसे सांगतात,"अध्यक्षांनी कोणत्याही बाजूने निकाल दिला तरी त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचा मार्ग मोकळा आहे. परंतु प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर पुन्हा तिकडे किती वेळ लागतो हे सुद्धा पाहावं लागेल."
आमदार अपात्र ठरल्यास उद्धव ठाकरेंसमोर किती मोठं आव्हान?
शिवसेनेत ऐतिहासिक बंड झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांची साथ तब्बल 40 आमदारांनी सोडली. यामुळे पक्षाला मोठा फटका बसला.
पक्ष संघटनेसाठी उद्धव ठाकरे यांनी राज्यभरात दौरे केले. त्यात आता लोकसभा निवडणूक तोंडावर असताना अशात ठाकरेंचे आमदार अपात्र ठरल्यास राजकीयदृष्ट्या त्याचा फायदा होईल की पक्ष संघटना अधिक कोलमडेल असाही प्रश्न आहे.
ज्येष्ठ पत्रकार संदीप प्रधान सांगतात, "स्वाभाविक आहे की ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरल्यास त्यांना सहानुभूती मिळेल आणि ते ती मिळवण्याचा प्रयत्न करतील. पण नंतर कोर्टाकडून काय निकाल येतो हे सुद्धा महत्त्वाचं आहे. कोर्टानेही ठाकरे गटावर अन्याय झाला यावर शिक्कामोर्तब केलं तर त्याचा फायदा निश्चित उद्धव ठाकरे यांना मिळवता येऊ शकतो."
"परंतु सुप्रीम कोर्ट या प्रकरणी शांत राहिलं किंवा उशिरा निकाल आल्यास परिस्थिती वेगळी असेल. सर्वोच्च न्यायालयाने जर ठाकरे गटाचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न झाल्याचं सांगितलं तर त्याचा फायदा त्यांना होईल.परंतु विधानसभा निवडणुका होईपर्यंत निकालाच येऊ दिला नाही तर ठाकरेंच्या केवळ बोलण्याने काही होणार नाही तर कोर्टानेही मोहोर उमटवण्याची गरज भासेल. जेवढं विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा निकाल येईल तेवढा फायदा होईल," प्रधान सांगतात.
ते पुढे सांगतात," विधिमंडळातील कामगिरी आतापर्यंत बहुतांश आमदारांची पूर्ण झाली आहे. आता फार फार तर मार्चमधलं अर्थसंकल्पीय अधिवेशन होईल आणि पावसाळी अधिवेशन होईल. त्यामुळे जे काही होणार ती लढाई मैदानात, जनतेमध्येच होईल. दोन्ही विरोधी पक्षाच्या आमदारांना अपात्र ठरवून विधिमंडळाचे कामकाज केले तर त्याचाही सत्ताधारी पक्षाच्या प्रतिमेवर नकारात्मक परिणाम होईल. यामुळे सत्ताधारी पक्षाचा प्रयत्न राहणार की हे प्रकरण आणखी लांबवायचे. निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली की या विधिमंडळाच्या कार्यकाळात जे घडलं ते डिझॉल्व होतं."
हेही नक्की वाचा
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)