You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
निलेश लंकेंचा भर सभेत आमदारकीचा राजीनामा, सुजय विखेंविरोधात मैदानात?
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे अहमदनगरमधील पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. ते अहमदनगर मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची शक्यता आहे.
अहमदनगरमधील पारनेरमध्ये निलेश लंके यांनी समर्थक कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता.
भाषणादरम्यान निलेश लंके म्हणाले की, "आमदारकीसाठी संघर्ष केला, आता खासदारकीसाठी संघर्ष करायचा. त्यासाठी आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल."
निलेश लंके यांना भाषणादरम्यान रडू कोसळलं.
आताच ईमेलद्वारे राजीनामा पाठवत आहे, असं सांगत निलेश लंकेंनी राजीनाम्याचं पत्र भर सभेत उपस्थितांना दाखवलं.
शरद पवार यांच्या नेतृत्वात आपण पुढे जायचं आहे. मधल्या काळात पवार साहेबांना आपण दु:ख दिलं, ते भरून काढायचं, असंही लंके म्हणाले.
कोण आहेत निलेश लंके?
निलेश लंके हे अहमदनगर जिल्ह्याच्या पारनेर मतदारसंघाचे आमदार आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तिकीटावर ते निवडून आले. पहिल्यांदाच ते आमदार म्हणून निवडून आले. त्यांनी तिनवेळा निवडून आलेल्या शिवसेनेच्या विजय औटी यांचा पराभव केला.
लंके यांचे वडील हे प्राथमिक शिक्षक होते. 12 वी पर्यंतचं शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी आयटीआय केलं आहे. काहीकाळ ते काही कंपन्यांमध्ये काम करत होते. हंगा स्टेशनवर त्यांनी छोटे हॉटेल देखील सुरु केलं. परंतु काही काळाने ते बंद केलं. त्यांनंतर त्यांनी सामाजिक काम करण्यास सुरुवात केली.
शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात
निलेश लंके हे जरी सध्या राष्ट्रवादीमध्ये असले तरी त्यांची राजकारणातील सुरुवात शिवसेनेतून झाली.
वयाच्या 15 व्या वर्षी शिवसेनेच्या शाखा प्रमुख पदापासून कामाला त्यांनी सुरुवात केली. या काळात त्यांनी आपल्या गावात मोठा जनाधार मिळवला. हंगा गावची ग्रामपंचायत देखील त्यांनी जिंकली.
पण 27 फेब्रुवारी 2018 रोजी झालेल्या वादामुळे त्यांना शिवसेनेतून काढण्यात आलं. त्यानंतर त्यांनी निलेश लंके प्रतिष्ठानच्या मार्फत सामाजिक काम करण्यास सुरुवात केली.
27 फेब्रुवारी 2018 च्या सभेत काय झालं?
शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे 27 फेब्रुवारी 2018 या दिवशी पारनेरच्या दौऱ्यावर होते. तसंच त्यांची सभा देखील आयोजित करण्यात आली होती. या दौऱ्याच्यावेळी गोंधळ झाला.
या घटनेविषयी बीबीसी मराठीने दैनिक लोकमतचे अहमदनगरचे आवृत्तीप्रमुख सुधीर लंके यांच्याकडून जाणून घेतलं. सुधीर लंके आणि निलेश लंके यांच्या आडनावात जरी साम्य असलं तरी दोघांचा एकमेकांशी कुठलाही संबंध नाही.
सुधीर लंके सांगतात, "फेब्रुवारी 2018 रोजी उद्धव ठाकरे पारनेरमध्ये आले होते. ठाकरे यांच्या दौऱ्यात गोंधळ झाला. काही कार्यकर्ते ठाकरे यांच्या गाडीसमोर आडवे झाले. दगडफेक देखील झाली होती. या दौऱ्याला गालबोट लावण्याचं काम निलेश लंके यांनी केले असा आरोप विजय औटी यांनी केला. तर लंके यांना बदनाम करण्यासाठी विजय औटी यांनीच हे घडवून आणल्याचं लंके यांचं म्हणणं होतं. या घटनेनंतर लंके यांना पक्षातून काढण्यात आलं."
विजय औटी आणि निलेश लंके यांच्यामध्ये सुरु झालेल्या वादाबाबत सांगताना सुधीर लंके म्हणाले, "निलेश लंके हे औटी यांचे कार्यकर्तेच होते. लंकेंचा जनसंपर्क मोठा होता. दोघांच्या कामाची पद्धत वेगवेगळी आहे. लंके थेट लोकांमध्ये मिसळतात तर औटी त्याअर्थाने सोफेस्टिकेटेड नेते आहेत.
लंके यांच्या पत्नी जिल्हा परिषदेवर निवडून आल्या होत्या. परंतु पुढे त्यांना नियोजन समितीवर न घेतल्याचा राग लंके यांना होता. लंके यांना देखील नेतृत्व करण्याची महत्त्वकांक्षा होती. तर लंके यांना अशी महत्त्वकांक्षा आहे हे औटी यांच्या लक्षात येत होतं. त्यामुळे देखील त्यांच्यात वाद होण्यास सुरुवात झाली. लंके यांच्या कार्यकर्त्यांना औटी डॉमिनेट करत आहे असं देखील लंके यांना वाटत होतं."
रुग्णांसाठी कोव्हिड सेंटर
कोरोनाची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा मोठी होती. यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने रुग्णांना हॉस्पिटलमध्ये बेड न मिळण्याच्या अनेक घटना समोर आल्या. त्यामुळे कोरोना रुग्णांना उपचार मिळावेत यासाठी निलेश लंके यांनी पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे शरद पवार यांच्या नावाने एक हजार बेड्सचं कोव्हिड सेंटर सुरु केलं आहे.
सर्व सोयी सुविधा असलेल्या कोव्हिड सेंटरमध्ये रुग्णांच्या जेवणाची तसंच उपचाराची सोय करण्यात आली आहे. त्याचबरोबर रुग्णांच्या मनोरंजनासाठी विविध कार्यक्रम देखील इथं आयोजित करण्यात आले आहेत. यापूर्वी देखील ऑगस्ट 2020 मध्ये टाकळी ढाकेश्वरमध्ये एक हजार बेड्सचं कोव्हिड सेंटर त्यांनी सुरु केलं होतं. त्याचं उद्घाटन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते करण्यात आलं होतं.
कोव्हिड सेंटरबाबत बोलताना निलेश लंके म्हणाले, "14 एप्रिलला हे कोव्हिड सेंटर सुरु केलं. तेव्हापासून आत्तापर्यंत अडीच हजार रुग्ण उपचार घेऊन घरी गेले आहेत. इथं रुग्णांना सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या भीतीमुळे अनेक रुग्णांचे मृत्यु होतात त्यामुळे त्यांना गुंतवून ठेवण्यासाठी विविध कार्यक्रम देखील येथे आयोजित करण्यात येतात."
कोव्हिड सेंटरमध्ये जाऊन लंके रुग्णांची विचारपूस करतात. तसंच ते या कोव्हिड सेंटरमध्येच रुग्णांसोबत राहतात, त्याची भीती वाटत नाही का, या सगळ्याबाबत त्यांना विचारले असता लंके म्हणाले, "मी घाबरून घरात बसलो असतो तर हो रुग्ण कुठे गेले असते. त्यांना धीर देण्यासाठी मी त्यांच्यात जातो. या काळात समाज सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे."
सामाजिक काम की स्टंटबाजी?
निलेश लंके यांनी कोरोना रुग्णांसाठी कोव्हिड सेटर्स सुरु केलीच परंतु रुग्णांची देखभाल करण्यासाठी ते त्याच कोव्हिड सेंटरमध्ये झोपत होते. कोव्हिड सेंटरमध्ये जमिनीवर झोपल्याचा त्यांचा फोटो देखील व्हायरल झाला होता.
असाच आमदार निवासामधील एक फोटोदेखील समोर आला होता. तिथं देखील लंके यांचे कार्यकर्ते बेडवर झोपले होते तर लंके जमिनीवर. त्यांच्या या फोटोंमुळे त्यांचे कौतुक करण्यात आले तर दुसरीकडे ते प्रसिद्धीसाठी स्टंट करत असल्याचा टीका देखील त्यांच्यावर करण्यात आली.
निलेश लंके यांच्यावर होणाऱ्या टीकेबाबत विचारले असता ते म्हणाले, "ज्यांना ही स्टंटबाजी वाटते त्यांनी इथं येऊन काय काम सुरू आहे ते पहावे. घरात बसून टीका करणे सोपं आहे. टीका करणाऱ्यांनी एकातरी रुग्णाची भेट घेतली असेल का, कोरोना रुग्णांमध्ये मिसळून काम करणं सोपं नाही."
निलेश लंके यांच्यावर होणाऱ्या टीकेबाबत पत्रकार सुधीर लंके यांनी देखील मत व्यक्त केलं ते म्हणाले,
"जे पटकन लोकांमध्ये मिसळतात असे पुढारी लोकांना आवडतात. तो नेत्यांच्या शैलीचा भाग असतो. लंके कोणालाही लगेच भेटतात. ते गाडीतून उतरल्यानंतरही कोणीही त्यांच्याशी जाऊन बोलू शकतं. कोव्हिड सेंटरमध्ये देखील ते रुग्णांची जातीने विचारपूस करतात त्यांची ऑक्सिजन पातळी तपासतात. याला कोणी स्टंटबाजी म्हणू शकेल पण त्यांच्या या कामात सातत्य आहे. ते याच ठिकाणी असे वागतात असं नाही तर प्रत्येक कार्यक्रमात ते असेच थेट लोकांना जाऊन भेटतात. त्यामुळे मला ही स्टंटबाजी वाटत नाही."
कार्यकर्त्यांमध्ये मिसळून काम करण्याची शैली
"निलेश लंके पुढाऱ्यासारखे वागत नाहीत. ते सामान्य नागरिकांमध्ये लगेच मिसळतात. त्यांच्या याच काम करण्याच्या शैलीमुळे त्यांनी अनेक कार्यकर्ते जोडल्याचं सुधीर लंके सांगतात. त्यांच्या कोव्हिड सेंटरमधील पेशंटची आपुलकीने विचारपूस करतात त्यामुळे नागरिकांना देखील त्यांच्याबद्दल जिव्हाळा वाटतो," असं देखील सुधीर लंके यांना वाटतं.
दैनिक पुढारीचे अहमदनगरचे प्रतिनिधी केदार भोपे हे देखील लंके यांच्या कार्याचं असंच वर्णन करतात. भोपे यांच्यामते लंके यांची कार्यकर्त्यांमध्ये मिसळून काम करण्याची पद्धत आहे.
"ग्राऊंड लेवलला जाऊन ते काम करतात. इतर आमदारांप्रमाणे व्हीआयपी कल्चर लंके यांच्याकडे दिसून येत नाही. त्यांनी त्यांच्या निलेश लंके प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक सामाजिक कामं केली त्यामुळे अनेक लोक त्यांना जोडले गेले आहेत," असं देखील भोपे यांना वाटतं.