ज्यांना हात दाखवायचा त्यांना 30 जूनलाच दाखवलाय - शिंदेंचा शरद पवारांना टोला

आम्हाला ज्यांना हात दाखवायचा होता, त्यांना आम्ही तो 30 जून रोजीच दाखवलेला आहे, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवारांना टोला लगावला आहे.

 एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या ज्योतिषांच्या भेटीवरुन शरद पवारांनी देखील टीका केली आहे. "दैनंदिन काम सोडून देवदर्शन करणे आणि ज्योतिषाला हात दाखवणे, ही म्हणजे आत्मविश्वासाला धक्का बसल्याची लक्षणे आहेत. "जेव्हा आत्मविश्वास डळमळीत होतो तेव्हा लोक अशा गोष्टींकडे वळतात," अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला होता.

यावर प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे यांनी पवारांना प्रत्युत्तर दिलं.

महाराष्ट्र बंदच्या उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्याविषयी बोलताना ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कुणाशीही होऊ शकत नाही, याबाबत पूर्वीदेखील मी माझं मत मांडलं आहे.

चार महिन्यांपूर्वी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचं शिवसेना-भाजपचं सरकार ज्या प्रकारे काम करत आहे, त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकून छातीत धडकी भरली आहे. त्यामुळे अशा प्रकारचं राजकारण ते करत आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार मोडणाऱ्यांना आहे का, असा सवाल शिंदे यांनी केला.

राज्यपालांना हटवा, अन्यथा महाराष्ट्र बंद करू - उद्धव ठाकरे

छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना हटवा, अन्यथा महाराष्ट्र बंद करू, असा इशारा माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर आज आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

"महाराष्ट्रात शिंदे सरकार आल्यानंतर सातत्याने राज्याची अवहेलना होत आहे. आज अचानक कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या अंगात भूत संचारलं आहे. महाराष्ट्रात जणू काही माणसं राहतच नाहीत.

"महाराष्ट्राला अस्मिता, हिंमत, धमक, शक्ती काहीच नाही. कुणीही यावं आणि टपली मारून जावं. आम्ही छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून नुसतंच गप्प बसायचं, हे आता खूप झालं," असं उद्धव ठाकरे म्हणाले.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेनंतर काही वेळाने देवेंद्र फडणवीस माध्यमांसमोर आले. एका कार्यक्रमात सहभागी होऊन ते बाहेर पडत असताना माध्यमांनी त्यांना उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याबाबत प्रतिक्रिया मागितली.

यावेळी फडणवीस म्हणाले, "मी कार्यक्रमात व्यासपीठावर होतो, त्यामुळे उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले, हे मी ऐकलेलं नाही. पण शरद पवार आज बोलले आहेत, ते बोलल्यानंतरच उद्धव ठाकरे बोलतात, एवढं मी सांगू शकतो."

पण सीमावादाबाबत बोलताना ते म्हणाले, "राज्याची निर्मिती झाली, तेव्हापासून सीमेचा वाद सुरू आहे. पक्षाचा वाद असण्याचं कारण नाही.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी महाराष्ट्रातील 40 गावांवर केलेला दावा हा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या मर्जीनुसारच केलेला आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला.

महाराष्ट्रात मिंधे सरकार असल्यामुळे त्यांना स्वतःला ते मुख्यमंत्री आहेत किंवा नाही, हे कळत नाही. त्यांच्याकडून आम्हाला काहीही अपेक्षा नाही.

उपमुख्यमंत्री नेहमीप्रमाणे सारवासारव करत आहेत.

भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री त्यांच्या वरीष्ठांच्या मर्जीशिवाय काही बोलू शकतात का, असा सवाल ठाकरे यांनी केला.

एकूणच गेले काही दिवसांत, विशेषतः महाराष्ट्रात शिंदे सरकार आल्यानंतर सातत्याने अवहेलना होत आहे.

आज अचानक कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या अंगात भूत संचारलं आहे. महाराष्ट्रात जणू काही माणसं राहतच नाहीत. महाराष्ट्राला अस्मिता, हिंमत, धमक, शक्ती काहीच नाही. कुणीही यावं आणि टपली मारून जावं. आम्ही छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून नुसतंच गप्प बसायचं, हे आता खूप झालं.

महाराजांचा अपमान झाल्यानंतर मुळमुळीत गुळगुळीत प्रतिक्रिया दिल्या जातात. ज्यांनी अपमान केला, त्यांच्याच पक्षातील लोक अशा प्रकारची प्रतिक्रिया देत आहेत.

गेले काही दिवस आपण पाहत आहोत, देशात काही विषयांची चर्चा व्हायला पाहिजे. ती होतही आहे.

देशाच्या कायदेमंत्र्यांनी न्यायमूर्तींच्या नेमणुकीवर प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. ही पद्धत अपारदर्शक असून पंतप्रधानांमार्फत ही नियुक्ती व्हावी, असं त्यांचं म्हणणं आहे. तसंच निवडणूक आयुक्तांसंदर्भातही कुणीतरी याचिका दाखल केली आहे.

ते पुढे म्हणाले, "स्वातंत्र्याला 75 वर्षे झाली. देशात ज्यांचं सरकार असतं, त्यांचीच माणसं राज्यात राज्यपाल म्हणून पाठवली जातात. ज्यांना वृद्धाश्रमात जागा नाही, त्यांना राज्यपाल म्हणून नेमलं जातं का हा प्रश्न आहे.

राज्यपालपदी नेमण्याचे निकषही ठरवायला पाहिजेत. राज्यपाल हे राष्ट्रपतींचे दूत असतात. राष्ट्रपतींप्रमाणे राज्यपालसुद्धा निःपक्ष असायला पाहिजेत. राज्यात काही अडचणी असतील तर ते सोडवण्याची त्यांची तयारी पाहिजे.

कोश्यारी यांना राज्यपाल म्हणणं मी सोडून दिलं आहे. महाराष्ट्रातील जुने आदर्श मोडून त्यांच्या मंडळींची आदर्श स्वीकारावेत, असं कोश्यारींचं म्हणणं आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी मुंबईतील मराठी लोकांचा अपमान केला होता. सावित्रीबाई फुले यांच्याबाबतही ते असंच बोलले होते. यांच्या सडक्या मेंदूमागे कोण आहेत, हे शोधलं पाहिजे.

त्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना तत्काळ पदावरून हटवण्यात यावं, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. त्यांना दोन दिवसांत न हटवल्यास महाराष्ट्र बंदचं आंदोलन पुकारू, असा इशारा ठाकरे यांनी यावेळी दिला.

 महाराष्ट्रात मिंधे सरकार असल्यामुळे त्यांना स्वतःला ते मुख्यमंत्री आहेत किंवा नाही, हे कळत नाही. त्यांच्याकडून आम्हाला काहीही अपेक्षा नाही.

उपमुख्यमंत्री नेहमीप्रमाणे सारवासारव करत आहेत. भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री त्यांच्या वरीष्ठांच्या मर्जीशिवाय काही बोलू शकतात का, असा सवाल ठाकरे यांनी केला.

फडणवीसांचं स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही, आम्हाला जत नाही तर अक्कलकोटही पाहिजे- बोम्मई

कालपासून कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या जतमधील गावांवरील टिप्पणीनंतर दोन्ही राज्यातले राजकारण पेटले आहे. महाराष्ट्रातील एक इंचही जमीन कर्नाटकात जाणार नाही असं विधान मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी काल केले होते.

मात्र आता बोम्मई यांनी पुन्हा काही ट्वीट करुन या वादाचा पुढचा भाग सुरू केला आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रक्षोभक विधान केले आहे. त्यांचं स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही. आपल्या देशाच्या भू, जल सीमांचं रक्षण करण्यासाठी आमचं सरकार कटीबद्ध आहे.

कर्नाटक सीमेच्या गावांची जमीन देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, सोलापूर, अक्कलकोटमधील कन्नड भाषिक प्रदेश कर्नाटकात यावा अशी आमची मागणी आहे.

आम्ही कायदेशीर लढाई लढण्यास तयार आहोत.

शरद पवार यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. तसंच त्यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनादेखील प्रत्युत्तर दिलं आहे.

राज्यपालांनी सर्व मर्यादा सोडल्या आहेत, अशी टीका शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर केली आहे.

औरंगाबादमध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीत राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत केलेल्या वक्तव्यावर टीका केली जात आहे.

“मला असं वाटतं की तुम्हाला कोणी विचारलं की तुमचे आदर्श कोण? किंवा तुमच्यासाठी हिरो कोण? तर तुम्हाला महाराष्ट्रातच ते भेटतील. बाहेर कुठे जायची गरज नाही. शिवाजी तर जुन्या युगातली गोष्ट आहे. डॉ. आंबेडकरांपासून ते नितीन गडकरींपर्यंत इथेच भेटतील,” असं वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं होतं. त्यावर अनेकांनी आक्षेप घेतला आहे.

अशी वक्तव्य करणाऱ्यांकडे मोठी जबाबदारी दोणं योग्य नाही. राज्यपालांबाबत राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी दखल घ्यावी, अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे.

"उदयनराजे काय म्हणाले मला माहिती नाही. राज्यपलांचं वक्तव्य बेजबाबदारापणाचं आहे. हे वारंवार होत आहे. त्यामुळे अशी वक्तव्यं करण्याची यांना सवयच आहे. त्यामुळे लोक चिडणारच," असं उदयनराजे भोसले यांनी केलेल्या मागणी संदर्भात पवार म्हणाले आहेत.

उदयनराजे भोसले यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना हटवण्याची मागणी केली आहे.

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर

तसंच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी 40 गावं आणि सोलापूर- अक्कलकोटबाबत केलेल्या वक्तव्यावर “सीमावादावर भाजपला त्यांची जबाबदारी टाळता येणार नाही,” असं पवार म्हणाले आहेत.

"महाराष्ट्रातील जत तालुका हा दुष्काळग्रस्त असून तिथं तीव्र पाणी टंचाई आहे. तिथं देखील आम्ही पाणी देऊन त्यांना मदत केली आहे. या पाण्याच्या प्रश्नावर जत तालुक्यातील ग्रामपंचायतींनी कर्नाटकात समाविष्ट होण्यासाठी ठराव पास केले आहेत. त्यावर आम्ही गंभीरपणे विचार करत आहोत," असं बोम्मई यांनी म्हटलंय.

तसंच त्यांनी पुढे आणखी एक ट्वीट करत सोलापूर आणि अक्कलकोटमध्ये कानडी बोलणारी मंडळी राहतात म्हणून हा भाग कर्नाटकाला मिळावा अशी मागणी केली आहे.

“कर्नाटकांच्या मुख्यमंत्र्यांनी काही गावांची मागणी केली आहे. माझं त्यावर असं मत आहे की निपाणी, कारवार आणि इतर परिसर त्यांनी सोडला तर त्यांना काय देता येईल याची चर्चा होऊ शकते. पण काहीही न करता अशी मागणी करणं शहाणपणाचं लक्षण नाही,” असं पवार म्हणाले आहेत.

त्याला आमचा पाठिंबा नाही. तिथे भाजपचं राज्य आहे आणि इथेही आहेच त्यामुळे साहजिकच त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे भाजपला ही जबाबदारी टाळता येणार नाही इतकंच मी सांगू शकतो.

प्रकाश आंबेडकर महाविकास येणार की नाही याबद्दल माझ्याशी कोणी चर्चा केली नाही.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)