महमूद शाह बेगडा : रोज 35 किलो जेवणासह विष खाणारा सुलतान

    • Author, वकार मुस्तफा
    • Role, पत्रकार आणि संशोधक, लाहोर

गुजरातमध्ये पंधराव्या शतकात मुजफ्फरी घराण्याचं साम्राज्य होतं. त्यातही या घराण्यात असा एक राजा होऊन गेला, जो तब्बल 53 वर्षे राज्यकारभार चालवत होता.

मुजफ्फरी घराण्यातील आठवा सुल्तान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुल्तान महमूद शाह बेगडा प्रथम यांची कारकिर्दी अनेक गोष्टींसाठी ओळखली जाते.

महमूद शाह यांचा कधीही उल्लेख झाला, तर त्यांच्याबाबत एक गोष्ट मात्र हमखास सांगितली जाते. ती म्हणजे त्यांच्या विषसेवनाबाबत. होय, महमूद शाह दररोज काही प्रमाणात विष खात असल्याची नोंद इतिहासात आहे.

मुजफ्फरी साम्राज्याची स्थापना 1407 साली सुलतान महमूद शाह बेगडाचे पणजोबा सुल्तान जफर खान मुजफ्फर यांनी केली होती.

या घराण्यातील आठवे सुल्तान म्हणून महमूद शाह बेगडा 1458 साली गादीवर बसले. तब्बल 53 वर्षे म्हणजेच 1511 सालापर्यंत महमूद शाह बेगडा यांनी राज्यकारभार सांभाळला. पुढे, 1572 साली मुघलांकडून पाडाव होईपर्यंत मुजफ्फरी घराण्याकडील सत्ता कायम होती.

लेखक सदुप्ता मिश्रा यांच्या माहितीनुसार, सुलतान महमूद शाह यांच्या काळात गुजरातचं मुजफ्फरी साम्राज्य सर्वोच्च शिखरावर होतं. त्यावेळी पूर्वेकडे मालवा ते पश्चिमेकडे कच्छचे आखात इथपर्यंत हे साम्राज्य पसरलेलं होतं.

खरंतर सुल्तान महमूद शाह प्रथम यांचं खरं नाव फतेह खान असं होतं. वडील मोहम्मद शाह द्वितीय आणि आई बीबी मुघली यांच्या पोटी महमूद शाह यांचा जन्म झाला. बिबी मुघली या सिंधचे सत्ताधीश सम्मा यांच्या कन्या होत्या.

महमूद शाह प्रथम यांना लहानपणापासूनच रोजच्या रोज न चुकता विष देण्यात येत होतं . पण हा निर्णय त्यांच्या वडिलांचा होता की आईचा होता, याबाबत फारशी माहिती मिळू शकत नाही.

इटालियन प्रवासी लोडोव्हिको दी वर्थेमा यांनी याविषयी लिहितात, “मला माझ्या एका सहकाऱ्याने विचारलं की हे सुल्तान विष कसं काय खाऊ शकतात. काही व्यापाऱ्यांनी त्याला उत्तर दिलं, ‘त्यांचे वडील त्यांना लहानपणापासून विषाची मात्रा देतात.”

पोर्तुगीज लेखक डुआर्ट बार्बोसा म्हणतात, “ते विषाची अत्यंत छोटी मात्रा घ्यायचे. असं करण्याचं कारण म्हणजे पुढे एखाद्या शत्रूने त्यांच्यावर विषप्रयोगाचा प्रयत्न जरी केला तरी त्यामुळे फारसं नुकसान होऊ नये.”

इतिहासकार मनू पिल्ले यांच्या मते, “महमूद यांना एक मुलगा म्हणून संरक्षणाची गरज होती.”

जेम्स कॅम्पबेल आणि एस. के. देसाई यांच्या माहितीनुसार, मोहम्मद शाह द्वितीय यांच्या अकाली निधनानंतर त्यांचा मुलगा आणि फतेह खान (मेहमूद शाह बेगडा) यांचा सावत्र भाऊ कुतुबुद्दीन अहमद शाह द्वितीय याने गादी सांभाळली.

दरम्यान, सत्तापदावर बसलेला कुतुबुद्दीन राजकीय महत्त्वाकांक्षासाठी आपला मुलगा फतेह खान याचं काही बरं वाईट करेल, या भीतीने मोहम्मद शाह द्वितीय यांची विधवा पत्नी बीबी मुघली यांनी तत्काळ मुलाला घेऊन ते घर सोडलं.

बीबी मुघली यांनी आपली बहीण बीबी मुरकी यांच्या घरी आश्रय घेतला. काही काळाने बीबी मुरकी यांचं निधन झाल्याने तिचे पती शाह आलम यांच्याशी विवाह करण्याचा निर्णय बीबी मुघली यांनी घेतला.

दरम्यान, कुतुबुद्दीन अहमद शाह द्वितीयने सात वर्षे राज्यकारभार सांभाळल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याचे काका म्हणजेच मोहम्मद शाह द्वितीय यांचे भाऊ दाऊद खान यांनी सत्ता हातात घेतली. मात्र, त्यांच्या मंत्रिमंडळ सदस्यांनी त्यांना अपात्र ठरवलं. यामुळे वयाच्या 13 व्या वर्षी महमूद शाह बेगडा यांच्याकडे मुजफ्फरी साम्राज्याचं सुल्तानपद चालून आलं.

सन 1458 मध्ये फतेह खान गादीवर बसले. यावेळी त्यांचं नामकरण सुल्तान अबुल फतेह नसीरुद्दीन महमूद शाह प्रथम असं करण्यात आलं. तसंच सुल्तान महमूद शाह यांनी स्वतःला सुल्तान अल-बहर ही उपाधीही दिली.

पिल्ले लिहितात, “महमूद यांनी कारभार सुरू करताच सर्वप्रथम आपल्या मृत सावत्र भावाची विधवा पत्नी (रूपमंजरी किंवा रुपमती जिच्या नावे अहमदाबाद येथे मशीद आहे) हिच्याशी विवाह केला.

सुल्तान महमूद शाह यांना पुढे बेगडा हे नावही जोडलं गेलं. हे नाव जोडण्यामागे दोन कारणं सांगितली जातात. एक म्हणजे सुल्तानाच्या मिशा या एखाद्या बैलाच्या शिंगासारख्या डौलदार होत्या. अशा बैलाला बुगरू असं म्हटलं जातं. म्हणून त्यावरून बेगडा असं नाव पडलं असावं.

दुसरं कारण म्हणजे सुल्तान महमूद शाह यांनी 1472 साली जुनागढ आणि दहा वर्षांनी पावागढ हे दोन किल्ले जिंकले. गुजराती भाषेत दोन म्हणजे ‘बे’ तर गढा म्हणजे किल्ले. याचाच एकत्रित अपभ्रंश होऊन बेगडा असं नाव त्यांच्या नावासमोर जोडलं जातं.

इतिहासकारांच्या मते, “शूरता, धार्मिकता, न्याय, सत्कार्य अशा चांगल्या गोष्टींमुळे महमूद शाह यांनी गुजरातच्या चांगल्या राजांमध्ये स्थान मिळवलं."

कॅम्पबेल यांच्या माहितीनुसार, "जमिनीच्या मालकीबाबत त्यांनी काही अतिशय चांगले निर्णय घेतले. उदा. जमिनीच्या मालकाचं निधन झाल्यानंतर त्याच्या मुलासह मुलीलाही त्याच्या संपत्तीचे अधिकार मिळावेत.

जमीनदारांसंदर्भात एक कठोर निर्णय त्यांनी घेतल्यानंतर राज्याचा महसूल दुप्पट-तिप्पट वाढला. त्यांच्या काळात पर्यटन आणि व्यापार सुरक्षित असे. त्यावेळी सैनिकांना व्याजावर कर्ज घेण्यास मनाई होती.

त्याऐवजी गरजू सैनिकांना सरकारी खजिन्यातून आवश्यक पैसे दिले जायचे. पुढे त्यांच्या मासिक पगारातून थोडी थोडी रक्कम कापून घेतीली जायची. शिवाय, फळबागांच्या लागवडीवरही महमूद शाह यांनी लक्ष केंद्रीत केलं होतं."

कॅम्पबेल लिहितात, “मेहमूद शाह प्रथम यांच्या सत्ताकाळात काही व्यापाऱ्यांनी इराक आणि खुरासान प्रांतातून घोडे आणि इतर सामान आणलं होतं. मात्र, सिरोहीजवळ त्या व्यापाऱ्यांवर दरोडा टाकून लुटण्यात आलं. त्यावेळी सुल्तान महमूद शाह यांनी त्यांना आपल्या मालाची किंमत विचारली. संबंधित रक्कम त्यांनी व्यापाऱ्यांना सरकारी खजिन्यातून देऊ केली. नंतर ही रक्कम सिरोहीच्या राजाकडून वसूल करण्यात आली."

मरत-ए-सिकंदरीमध्ये अली मुहम्मद खान यांनी लिहिलं आहे, “सुल्तान महमूद शाह हे गुजरातच्या सर्व राजांमध्ये सर्वात चांगले राजे होते. त्यांनी कारभारादरम्यान न्याय, परोपकार भावनेने काम केलं. तसंच अल शरिया कायद्याचा आदर आणि पालनही केलं.

पिल्ले यांच्या मते, “सुल्तान महमूद शाह हे त्यांच्या काळातील सर्वात यशस्वी राजे होते. महमूद एक प्रभावी सम्राट आणि शासक होते. पण त्यांच्यावर धर्माचाही तेवढाच प्रभाव होता.”

त्यांनी शहरनगरमध्ये एक लहान पण सुंदर अशी संगमरवरी मशीद बांधली. ही साधारपणपणे तीस फूट उंच आणि तितकीच रूंद आहे. मशिदीसाठी लागणारा दगड जवळच्याच करूणझार डोंगरावरून आणला. या मशिदीत जैन वास्तुकलेची झलकही पाहायला मिळते. गेल्या पाचशे वर्षांपासून ही मशिद भोदेसर परिसरात तग धरून आहे.

महमूद शाहने द्वारका उद्ध्वस्त केली होती. देवस्थाने लुटणाऱ्या दरोडेखोरांना आश्रय दिल्यानेच त्यांनी असं केलं, असं त्याबाबत म्हटलं जातं.

सुल्तान महमूद शाह यांनी पोर्तुगीज भाषा शिकण्याचाही प्रयत्न केला. पण तो अयशस्वी ठरला. महमूद शाह यांनी स्वतः कोणतंही औपचारिक शिक्षण घेतलेलं नव्हतं. पण त्यांच्या कार्यकाळात बरंच अरेबिक साहित्य पर्शियन भाषेत भाषांतरित करण्यात आलं.

महमूद शाहबाबत लिहिताना इटालियन प्रवासी वर्तेमा म्हणतात, “सुल्तान महमूद शाह रोज सकाळी बाहेर पडल्यानंतर पन्नास हत्ती त्यांना सलामी द्यायचे. ते जेवण करत असताना पन्नास ते साठ प्रकारची वाद्ये वाजवली जात असत. महमूद शाह यांच्या मिशा इतक्या मोठ्या होत्या, की ते त्या डोक्यावर बांधून ठेवत असत. महिला जशा आपल्या अंबाडा डोक्यावर बांधतात, तशा प्रकारे ते मिशा डोक्यावर बांधत असत. त्यांना पांढरी शुभ्र दाढीही होती. त्याची लांबी त्यांच्या बेंबीपर्यंत होती.”

वर्तेमा यांच्या माहितीनुसार, “महमूद शाह रोज न चुकता विषाचं सेवन करायचे. हे विष एका विशिष्ट प्रमाणात ते घेत असत. हे विष घेतल्याने त्यांचं शरीर अत्यंत विषारी बनलं होतं.”

त्यांच्या विषारीपणाबाबत काही गोष्टी सांगितल्या जातात. त्यापैकी एक म्हणजे, महमूद शाह यांना एखाद्या व्यक्तीला ठार करायचं असल्यास त्या व्यक्तीला त्यांच्या समोर आणलं जायचं. महमूद शाह त्या व्यक्तीसमोर काही फळे खात. त्यांनी खाल्लेली ही उष्टी फळे त्या व्यक्तीला खाऊ घातली जात. त्यानंतर अर्ध्या तासात त्याचा जीव जात असे.

तसंच, सुल्तान महमूद शाह यांच्या हरममध्ये तीन ते चार हजार महिला होत्या. रोज रोज रात्री ज्या महिलेशी संभोग करायचा. ती दुसऱ्या दिवशी सकाळी मृत्युमुखी पडायची. महमूद शाह यांच्या विषारीपणामुळेच असं व्हायचं, असं म्हटलं जायचं.

असंही सांगितलं जातं की सुल्तान महमूद शाह यांच्याकडे एक अंगठी होती. एखाद्या आवडीच्या महिलेसोबत त्यांना संभोग करायचा असेल, तर त्या महिलेच्या तोंडात ही अंगठी ठेवल्यास तिच्यावर सुल्तानाच्या विषाचा प्रभाव होत नसे.

विषारीपणामुळेच महमूद शाह हे एकदा वापरलेले कपडे कधीच पुन्हा वापरत नसत. ते रोज नवे कपडे देण्यात येत असत. वापरलेले कपडे दुसऱ्या दिवशी जाळून टाकण्यात यायचे.

इतकंच काय तर बार्बोसा यांच्या माहितीनुसार, “एखाद्या कीटकाने सुलतानाचा चावा घेतला तरी तो मरून पडायचा, इतकं जहाल विषारी त्यांचं शरीर बनलं होतं."

पण स्थानिक इतिहासकारांचं याबाबत वेगवेगळं मत आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, सुल्तान महमूद शाह यांच्या विषारीपणासंदर्भात अतिशयोक्ती कथा रचण्यात आलेल्या आहेत. तसंच त्यांच्या मते, महमूद शाह यांच्या राण्या अशा प्रकारे विषाने मरण्याचाही कुठे उल्लेख आढळून येत नाही.

त्यामुळे या सगळ्या वाढीव गोष्टींमध्ये काय खरं, काय खोटं याबाबत स्पष्ट स्वरुपात सांगता येत नाही.

कॅम्पबेलच्या माहितीनुसार, महमूद शाह याला तीन मुले होती. मुहम्मद काला, आपा खान आणि अहमद खान. सुल्तानाला ही तीनही मुले राणी रुपमतीकडून होती.

ही तीन मुले जन्मण्याचा अर्थ, त्यांच्याकडे विषाचा प्रभाव टाळण्यासाठी काही होतं, असा लावण्यात येतो.

पहिला मुलगा काला याचं अकस्मान निधन झालं. दुसरा मुलगा आपा खान हा सुल्तानाच्या हरममध्ये जाताना आढळून आल्याने त्याला विष देऊन ठार करण्यात आलं. तर तिसरा मुलगा अहमद खान याला सुल्तान महमूद शाह याची राजगादी सांभाळण्याची जबाबदारी सोपवण्यात आली.

या सगळ्या गोष्टींशिवाय सुल्तान महमूद शाह आपल्या खाण्यापिण्याबाबत प्रसिद्ध होता. एक वाटी मध, तूप, शे-दीडशे केळी इतका त्याचा नाश्ता असायचा. यानंतर दिवसभर जेवणात ते काही ना काही खात राहायचे.”

बार्बोसा आणि वर्तेमा यांच्या मते, “सुल्तान महमूद शाह यांचं रोजचं जेवण 35 ते 37 किलो इतकं होतं. इतकं खाऊनही सुल्तानाचं पोट न भरल्यास ते पाच किलो तांदळाने बनवलेली मिठाई खायचे.”

सतीश चंद्रा म्हणतात, “महमूद शाह दिवसभरात खूप खायचे. तरीही रात्री भूक लागली तर खाण्यासाठी त्यांच्या पलंगाजवळ नेहमी समोसे ठेवण्यात येत असत. खाण्यावर तुटून पडणारे महमूद शाह बेगडा यांची शरीरयष्टीही प्रचंड मजबूत होती.”

हेही नक्की वाचा

हा व्हीडिओ पाहिलात का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)