100 वर्षांपूर्वी ब्रिटिश अभियंत्याने पाहिलं होतं पाण्याखालून धावणाऱ्या रेल्वेचं स्वप्न

फोटो स्रोत, INSTITUTION OF CIVIL ENGINEERS ARCHIVE, LONDON
- Author, मोनिदीपा बॅनर्जी
- Role, मुक्त पत्रकार, बीबीसीसाठी
- Reporting from, कोलकात्याहून
कोलकात्यात लवकरच पाण्याखालून धावणाऱ्या मेट्रो रेल्वेचं स्वप्न प्रत्यक्षात अवतरणार आहे. एका ब्रिटिश अभियंत्याने सुमारे 100 वर्षांपूर्वी कोलकात्यात पाण्याखालून रेल्वे नेण्याचं स्वप्न पाहिलं होतं.
सर हार्ले डॅलरीम्पल असं या अभियंत्याचं नाव. कोलकाता आणि त्याचं जुळं शहर हावडा यांना जोडण्यासाठी हुगळी नदीखालून एक बोगदा असलेली 10 थांब्यांसह एक भूमिगत रेल्वे लाईन असावी, असं त्यांचं स्वप्न होतं.
पण, त्यावेळी अपुरा निधी आणि मातीच्या भूवैज्ञानिक गुणधर्मांबाबत शंका यांमुळे ती भव्य योजना प्रत्यक्षात येऊ शकली नव्हती.
अखेर, ऑक्टोबर 1984 मध्ये कोलकाता हे मेट्रो रेल्वे सुरू करणारं देशातील पहिलं शहर बनलं. केवळ 3.4 किलोमीटर आणि पाच मेट्रो स्टेशनने तेव्हा याची मुहूर्तमेढ रोवली गेली. आता 26 स्टेशन आणि 31 किलोमीटर अंतरापर्यंत ही रेल्वे धावते. यामध्ये निम्मे स्टेशन भूमिगत आहेत.
आता डिसेंबरमध्ये, कोलकाता मेट्रो भारतातील पहिला पाण्याखालील मार्ग सुरू करेल. हुगळी नदीखालून हा मार्ग बांधण्यात आलेला आहे.
नदीखालील जुळे बोगदे 520 मीटर लांब आहेत आणि कोलकाता आणि हावडा यांना जोडणाऱ्या मेट्रो रेल्वेच्या 4.8 किमी (2.98 मैल) भागाचा भाग आहे. हे नदीपात्राच्या खाली 52 फूट आहे.
हा मार्ग सुरू झाला की दर तासाला 3 हजारहून अधिक प्रवासी याचा लाभ घेऊ शकतील.
मेट्रोचा हा पाण्याखालील भाग हावडा आणि पूर्व कोलकाता येथील सॉल्ट लेक या भागाला जोडेल.
विशेष म्हणजे, सर हार्ले यांच्या 1921सालचं डिझाईन आणि सध्याचं डिझाईन यांच्यात बरंच साम्य आढळून येतं.

फोटो स्रोत, pti
परंतु, यामध्ये लक्षात घेण्यासारखी एक गोष्ट म्हणजे सर हार्ले यांनी फक्त एक मेट्रो लाईन डिझाईन केली नाही, तर संपूर्ण कोलकात्यासाठी त्यांनी भूमिगत मास्टरप्लॅन तयार केला होता. कोलकात्याच्या चारही बाजू जोडणारं ते डिझाईन होतं.
कोलकाता ट्यूब रेल्वे या पुस्तकात त्यांना याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.
यामध्ये कोलकात्याचे किचकट पण नाजूकपणे रंगवलेले नकाशे, प्रस्तावित मेट्रो मार्गांचे रेखाचित्र आणि ट्यूब रेल्वेसाठी संभाव्य खर्चाचा अंदाज या बाबींचा उल्लेख करण्यात आलेला आहे.
हार्ले यांनी त्यावेळी सर्व स्थानकांवर एस्केलेटर आणि पंखे बसविण्याची शिफारस केली होती.
ते लिहितात, “कोलकात्यातील हवामानाचा विचार करता गाड्यांमध्ये आणि भूमिगत स्थानकांवर आरामदायी तापमान राखण्याचा मोठा प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे."
हार्ले यांनी कोलकाता मेट्रो योजनेची कल्पना केली तेव्हा लंडन, पॅरिस आणि न्यूयॉर्कमध्ये भूमिगत रेल्वे सुरू होत्या.
10 जानेवारी 1863 रोजी लंडनमधील मेट्रोपॉलिटन रेल्वेने पॅडिंग्टन (पूर्वीचं बिशप रोड) आणि फॅरिंग्डन स्ट्रीट दरम्यान जगातील पहिली भूमिगत रेल्वे सुरू केली होती.

फोटो स्रोत, AFP
नदीखालील पहिला बोगदा थेम्स नदीखालून खोदण्यात आला. हा मार्ग जानेवारी 1843 मध्ये सुरू झाला.
सर मार्क ब्रुनेल आणि त्यांचा मुलगा इसाम्बर्ड यांनी मालवाहतुकीच्या उद्देशाने याची निर्मिती केली होती.
पण त्यांच्याकडील पैसे संपल्याने सुरुवातीला पादचाऱ्यांसाठी एक आकर्षणाचं केंद्र म्हणून पुढे आणण्यात आलं.
1921 पर्यंत थेम्स नदीच्या खालून रस्ते, पादचाऱ्यांसाठी तसंच ट्यूब ट्रेनसाठी किमान 10 बोगदे वापरात होते.
त्यामुळे, कोलकात्यात हुगळी नदीखालून बोगदा नेण्याचं डिझाईन हार्ले यांनी 1921 साली तयार केलं, ही काय फार मोठी गोष्ट नव्हती.
1861 मध्ये पश्चिम बंगालच्या बीरभूम जिल्ह्यात जन्मलेल्या हार्ले यांनी एडिनबर्गमध्ये अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलं.
त्यानंतर लंडन अंडरग्राउंडमध्ये ते रुजू झाले. लंडन ट्यूब रेल्वेमध्ये त्यांनी बेकरलू लाइन, हॅम्पस्टेड ट्यूब आणि पिकाडिली मार्गावर काम केलं.
त्यानंतर, ब्रिटिश राजवटीच्या अखत्यारित असलेल्या कोलकात्यामध्येही लंडनप्रमाणे ट्यूब रेल असावी, असा निर्णय इंपीरियल लेजिस्लेटिव्ह कौन्सिलने घेतला. हे काम हार्ले डॅलरीम्पल यांना देण्याचं निश्चित झालं.

फोटो स्रोत, SCIENCE & SOCIETY PICTURE LIBRARY
त्यावेळी कोलकाता हे शहर ब्रिटिश राजवटीचं राजधानी राहिलेलं नव्हतं. पण, भारतातील व्यापाराचं मोठं केंद्र म्हणून ते प्रसिद्ध होतं. हावड्यात विविध उद्योगांचे कारखाने भरभराटीस आलेले होते.
या दोन शहरांमध्ये काम करण्यासाठी संपूर्ण भारतातून लोक आले. पण सार्वजनिक वाहतुकीचा याठिकाणी प्रश्न होता.
त्यावेळी कोलकाता आणि हावडा या दोन शहरांना जोडणारा एकमेव मार्ग म्हणजे हुगळी नदीवर बांधलेला पॉटून पूल होता.
याशिवाय, बोटीचा दुसरा पर्याय होता. पुढे, सुप्रसिद्ध हावडा ब्रिज 1943 मध्ये सुरू करण्यात आला.
सर हार्ले यांनी कोलकात्यात पायही न ठेवता शहरासाठी ट्यूब रेल्वेच्या डिझाईनची रचना केली.
त्यासाठीची सर्व आवश्यक माहिती मिळविण्यासाठी कलकत्ता आणि हावडा येथे एक सहायक त्यांनी पाठवला होता.
सर हार्ले यांच्या प्रस्तावित नेटवर्कच्या पहिल्या विभागाचं उद्दिष्ट पूर्व कोलकात्यातील बागमारी आणि हावडा येथील बनारस रोड नावाची ठिकाणे जोडणं हे होतं.
त्यावेळी हार्ले यांनी 35 लाख युरो इतक्या खर्चाचा अंदाजपत्रकात समावेश केला. पण हे खूप महागडं ठरत असल्याचं दिसून आलं.

फोटो स्रोत, CALCUTTA CORPORATION GAZETTE
डिसेंबर 1947 मध्ये कलकत्ता म्युनिसिपल गॅझेटने शहराच्या ट्यूब रेल्वेच्या स्वप्नांचा अंत झाल्याची बातमी पहिल्या पानावर प्रकाशित केली.
त्यावेळी, “खर्चाचा विचार करता ओव्हरहेड रेल्वे हीच सर्वात चांगली गोष्ट असेल," असं एका नगरपालिकेने बैठकीनंतर सांगितले.
हुगळीच्या खाली बोगदा बांधताना कोलकात्याच्या खालील भागातील जलयुक्त, चिकणमातीने भरलेली जमीन त्यासाठी पूरक ठरेल किंवा नाही, हा संशय व्यक्त करण्यात आला. त्यामुळे त्यावेळी कोलकात्यातील पाण्याखालून जाणाऱ्या मेट्रो रेल्वेचं स्वप्न पाण्यातच वाहून गेलं.
ट्यूब रेल्वेचं स्वप्न अस्तित्वात आलं नाही तरी पाण्याखालून बोगदा निर्मितीचं स्वप्न त्यानंतर काही दिवसांत पूर्ण झालं.
1928 मध्ये शहराची वीज पुरवठा कंपनी CESC ने सर हार्ले यांना कोलकाता ते हावडादरम्यान वीज केबल्स टाकण्यासाठी हुगळी नदीच्या खालून एक बोगदा बांधण्यास सांगितलं. त्यानंतर 1931मध्ये कोलकाताचा पहिला पाण्याखालील बोगदा अस्तित्वात आला.
हुगळीखालून त्यावेळी सर हार्ले यांनी बांधलेला बोगदा आजही वापरात आहे. पण त्यातून केवळ केबल्स नेण्यात आलेले आहेत.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








