दात घासण्यासाठी दोन मिनिटं पुरेशी आहेत का? शास्त्रज्ञ काय सांगतात?

    • Author, डॉ. जोसेफाइन हिर्शफेल्ड
    • Role, बीबीसीसाठी

( हा लेख 2021 मध्ये प्रकाशित करण्यात आला होता. आता तो पुन्हा प्रसिद्ध करत आहोत.)

प्रत्येकानं दिवसातून दोन वेळा किमान दोन मिनिटे दात घासायला हवं, याबाबत आपल्या सर्वांनाच माहिती आहे. मात्र आपल्यापैकी अनेकजण ब्रश करताना किती वेळ दात घासले याचा चुकीचा अंदाज लावत असतात. त्यामुळं अनेकदा तर आपण मिनिटभरही दात घासत नाही.

खरं म्हणजे पूर्ण दोन मिनिटे दात घासणं हेदेखील दातांच्या आरोग्यासाठी पुरेसं नाही, अशी माहिती समोर आली आहे.

एका संशोधनानुसार दात घासताना दातांवरचा थर (प्लाक) जास्तीत जास्त काढलेलं अधिक फायद्याचं ठरतं. त्यासाठी तीन ते चार मिनिटे दात घासावे लागतात. म्हणजे आपण दात घासण्याची वेळ दुप्पट करायला हवी आहे का?

1970 मध्ये दातांच्या डॉक्टरांनी (डेंटिस्ट) आपण किमान दोन मिनिटे ब्रश करायला हवं असं सांगितलं. नंतर मऊ ब्रिसल्स असलेले ब्रश वापरण्याचा सल्ला देण्यात आला.

मात्र, सध्याच्या स्थितीत 1990 पासून समोर आलेल्या अभ्यासातील तथ्यांनुसार ब्रश करण्याची वेळ, तंत्र आणि ब्रशचा प्रकार हे सर्व ठरवलं जात आहे.

दोन मिनिटे दात घासल्यामुळं प्लाक निघतं, पण चांगल्या प्रकारे किंवा जास्तीत जास्त प्लाक एवढ्या वेळात निघत नाही. तर दोन मिनिटांपेक्षा जास्त वेळ ब्रश केल्यास प्लाक निघू शकते, असं दिसून आलं आहे.

मात्र, जास्त वेळ ब्रश केल्यास केवळ दोन मिनिटे ब्रश करण्याच्या तुलनेत आपल्या दातांचं किंवा तोंडाचं आरोग्य अधिक चांगलं राहतं का? याबाबत अद्याप फारसं संशोधन झालेलं नाही.

दातांवरचा थर जास्त प्रमाणात वाढल्यामुळं होणारे दुष्परिणाम माहिती असल्यामुळं, प्रत्येक वेळी ब्रश करुन ते जास्तीत जास्त काढणं याचा संबंध, तोंडाच्या आरोग्याशी जोडला जातो.

याबाबत दीर्घकाळ अभ्यास करणं कठीण ठरत असल्यानं अधिक स्पष्ट माहिती नाही, हेही एक महत्त्वाचं कारण आहे.

प्लाकचे दुष्परिणाम

आपण जेव्हा दात घासतो तेव्हा दातावर असलेले मायक्रोब्स (सूक्ष्मजंतू किंवा प्लाक) काढून टाकणं हा मुख्य उद्देश असतो. हे प्लाक म्हणजे बॅक्टेरिया, फंगस आणि विषाणू यासर्वांचा संग्रह असतो. हे सगळे ज्या समुदायात एकत्र राहतात त्याला मायक्रोबायल बायोफिल्म्स म्हटलं जातं. बायोफिल्म्स अत्यंत चिकट असते आणि ते केवळ ब्रश करूनच काढले जाऊ शकते.

दातावरील या सूक्ष्मजंतुंची अनेक कारणांमुळं वाढ होऊ शकते. त्यात दाताचा खडबडीत भाग (काही तरी भरल्यामुळं झाला असल्यास), टूथब्रश काही ठराविक भागांपर्यंत पोहोचणं शक्य नसल्यास (दातांमधील भागासारखे ठिकाण) किंवा इतर काही कारणं असतात.

आपण ब्रश केल्यानंतर काही तासांतच दातावर प्लाक बायोफिल्म्स तयार होतात. त्यामुळंच दिवसातून दोन वेळा दात घासण्याचा सल्ला आपल्याला दिला जातो.

व्यवस्थितपणे किंवा पुरेशा कालावधीसाठी दात घासले नाही, तर त्यावर मोठ्या प्रमाणात प्लाक जमा होते. त्यामुळं शरीराची रोग प्रतिकारशक्ती सक्रिय होते आणि त्यामुळं जळजळ आणि हिरड्यांना सूज येण्यासारखे प्रकार घडतात.

जळजळीमुळं वेदना होत नाहीत. मात्र, काही वेळा ब्रश करताना हिरड्यांमधून रक्त येणं किंवा दुर्गंधी अशा प्रकारचे दुष्परिणाम पाहायला मिळू शकतात. बायोफिल्म्समुळे दात पोकळही होऊ शकतात.

योग्य तंत्र

दात घासण्याचा सर्वात मुख्य उद्देश हा प्रत्येक दातावर असलेलं जास्तीत जास्त प्लाक काढणे हा आहे.

सध्या समोर आलेल्या पुराव्यांनुसार जास्त वेळ दात घासल्यास (चार मिनिटांपर्यंत) दात अधिक स्वच्छ होतात. जास्त वेळ ब्रश केल्याने दात अधिक स्वच्छ होतात. तसेच ज्याठिकाणी ब्रश पोहोचणं कठीण असतं त्या जागाही अधिक स्वच्छ होतात.

मात्र खूप जास्त दात घासणं (दिवसातून दोन पेक्षा अधिक वेळा) देखील चांगलं नाही. तसंच फार जोरात किंवा मऊ नसलेल्या टूथ पेस्टचा वापरही करू नका. कारण त्यामुळं दातांबरोबरच हिरड्यांचंही नुकसान होऊ शकतं. विशेषतः तुम्ही तर फार कडक ब्रिसल असलेला ब्रश वापर असाल तर त्रास अधिक होतो.

दात चांगल्या प्रकारे स्वच्छ करण्यासाठी दात घासण्याच्या अनेक पद्धती आहेत. त्यातील सर्वाधिक सांगितली जाणारी म्हणजे बास पद्धत. यात हिरड्यांच्या खालच्या रेषेच्या भागातील प्लाक कमी केलं जातं. याठिकाणी सर्वात आधी प्लाक तयार होतं आणि तेच जळजळ होण्यास कारणीभूत ठरतं.

दात घासताना नेहमी हलक्या हाताने घासावेत. त्यात नेमका किती जोर लावायचा असं अगदीच काही ठाम नाही. मात्र, आपल्या तोंडातील टिश्यूचं त्यानं नुकसान होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी.

दात घासायचं तंत्र, टूथपेस्ट, टूथब्रश अशा अनेक गोष्टींचा परिणाम होऊ शकतो. उदाहरण द्यायचं झाल्यास, जास्त सोडा असलेली शीतपेय प्यायल्यानं अनेकांच्या दाताचा वरचा भाग हा खराब झालेला असतो. त्यामुळं दात कमकुवत बनतात.

म्हणजेच अशा लोकांनी मऊ नसलेली टूथपेस्ट आणि कडक ब्रिसल्सचा ब्रश वापरला तर त्यांना नुकसान पोहोचण्याचा अधिक धोका असतो. त्यामुळं कोणी दात घासण्यासाठी काय वापरायला हवे? याबाबत डेंटिस्टचा सल्ला घेणं अधिक योग्य ठरतं.

आतल्या भागातील स्वच्छता

दात घासण्याबरोबर आतल्या भागाची स्वच्छता किंवा ज्याला आपण फ्लॉसिंग म्हणतो ते करण्याचाही सल्ला दिला जातो. फ्लॉसिंगमुळं दात किडणे किंवा जळजळ कमी होऊ शकते, हे अभ्यासावरून सिद्ध झालं आहे.

फ्लॉसिंग करण्याची प्रभावी पद्धत म्हणजे, दात आणि हिरड्या यात फ्लॉस आत सरकवणे आणि दातांना गुंडाळून घट आवळत ते दातावर घासणे. हे अगदी हळूवार आणि खाली-वर असा दिशेनं करायला हवं. अशाप्रकारे हळू हळू फ्लॉस हिरड्यांना लागून असलेल्या रेषेपर्यंत घेऊन जावं.

हिरड्यांपर्यंत जाऊ शकणारे ब्रश हे अधिक प्रभावी ठरू शकतात. त्याशिवाय टूथपिक (दात कोरण्याची काडी), वॉटर जेट्स किंवा टंग क्लिनर्स हे कितपट प्रभावी आहेत, याबाबत मात्र माहिती नाही.

आपण रोज दिवसातून दोन वेळा किमान दोन मिनिटांसाठी ब्रश करायला हवे हे माहिती असलं तरी, आपण योग्य पद्धतीनं ब्रश करणंही तेवढंच गरजेचं आहे, हेही लक्षात घ्यायला हवं. दोन मिनिटांपेक्षा जास्त वेळ दात घासल्याने आपण दातावरील जास्तीत जास्त प्लाक काढू शकतो. त्यामुळं तुमचे दात आणखी निरोगी राहू शकतात.

(जोसेफाइन हिर्शफेल्ड हे बर्मिंगहम विद्यापीठ, यूके याठिकाणी दंतचिकित्सा विभागाच्या प्राध्यापिक आहेत)

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.