सेन्सेक्स तब्ब्ल 1400 अंकानी गडगडला, तर निफ्टीतही मोठी घसरण, जाणून घ्या बाजाराच्या पडझडीची कारणं?

फोटो स्रोत, Getty Images
भारतीय शेअर मार्केटसाठी 28 फेब्रुवारीचा दिवस 'ब्लॅक फ्रायडे' ठरला आहे. सेन्सेक्स 1400 अंकांनी घसरून 73,198 वर बंद झाला, तर निफ्टी 420 अंकांनी घसरून 22,124 वर बंद झाला.
शुक्रवारी शेअर मार्केट उघडताच बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या (बीएसई) 30 शेअर्सच्या सेन्सेक्स आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या (एनएसई) 50 शेअरच्या निफ्टी या निर्देशांकात मोठी घसरण झाली.
शुक्रवारी एकदा तर सेन्सेस्क 1400 अंकांपर्यंत खाली घसरलेला पाहायला मिळाला. पण नंतर काही काळानं त्यात सुधारणा पाहायला मिळत होती.
सकाळी 11:30 च्या सुमारास सेन्सेक्स 1000 अंकांनी म्हणजे 1.28 टक्क्यांनी घसरला आणि 73,600 वर पोहोचला. त्यानंतर एक वाजेपर्यंत त्यात 1400 अंकांची घसरण नोंदवली गेली.
दरम्यान, निफ्टी 282 अंकांनी म्हणजे 1.25 टक्क्यांनी घसरून 73,660 वर होता.


बँकिंग आणि आयटी क्षेत्रातल्या मोठ्या शेअर्समध्ये घसरण झाल्याने मार्केटवर दबाव होता. स्मॉल आणि मिडकॅप शेअर्सच्या किमती सर्वात जास्त कमी झाल्यात.
भारतीय शेअर मार्केटच्या दृष्टीकोनातून फेब्रुवारी महिना फार वाईट ठरला आहे. या क्षेत्रातील तज्ज्ञ याचा संबंध अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या काही निर्णयांमुळे व्यापार युद्ध सुरू होण्याच्या शक्यतेशी जोडत आहेत.
भारतीय बाजारपेठेवर ट्रम्प यांचा प्रभाव?
शुक्रवारीच भारताच्या जीडीपीची अधिकृत आकडेवारीही जाहीर होणार होती. त्याचाही संबंध काही जाणकार कोसळलेल्या शेअर मार्केटशी लावत आहेत.
शुक्रवारच्या शेअर बाजारातल्या या पडझडीमागे पाच कारणं असल्याचं इकॉनॉमिक टाइम्सनं सांगितलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
जीडीपीची आकडेवारी येण्याआधी निर्माण झालेली तणावाची परिस्थिती, डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफबद्दलच्या निर्णयाची अस्पष्टता, आयटी क्षेत्रातल्या शेअर्सवर आलेला ताण, डॉलरचे वाढलेले मूल्य आणि परदेशी गुंतवणूक महाग होणं अशी ही कारणं आहेत.
कॅनडा आणि मेक्सिकोकडून येणाऱ्या उत्पादनांवर 25 टक्के टॅरिफ 2 एप्रिल ऐवजी 4 मार्चपासूनच लागू केला जाईल अशी घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी केली.
चीनवरून येणाऱ्या मालावरही 10 टक्के अतिरिक्त कर लावणार असल्याचंही ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे जगातल्या मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये व्यापार युद्ध सुरु होणार असल्याच्या शंकेला खतपाणी मिळालं.
गुंतवणुकदारांना कशाची भिती?
शुक्रवारी जवळपास सगळ्याच क्षेत्रातले शेअर्स लाल रंगात रंगलेले होते. पण आयटी, ऑटो, मीडिया आणि टेलिकॉम क्षेत्रातल्या शेअर्समध्ये विशेषतः मोठी घसरण दिसून आली. या सगळ्या क्षेत्रांत दोन ते तीन टक्क्यांची घसरण नोंद केली गेली आहे.
बीएसईचे मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकही 2 टक्कांपर्यंत खाली आले.
सेन्सेक्समध्ये सगळ्यात जास्त तोटा 'इंडस इन्ड' बँकेला झाला. त्यांचे शेअर्स 4.44 टक्क्यांनी पडले. त्याखालोखाल 'एम ॲंड एम' आणि 'एचसीएल टेक' या कंपन्यांचं सर्वात जास्त नुकसान झालं.
शिवाय इन्फोसिस, टीसीएस, भारती एयरटेल, टाटा मोटर्स आणि टायटनचे शेअर्सही लाल रंगात होते.
रेलिगेयर ब्रोकिंग कंपनीच्या रिटेल रिसर्चचे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. रवी सिंह यांनीही शेअर बाजाराच्या घसरणीमागची कारणं अधोरेखित केली आहेत.
"एक जानेवारीपासून आत्तापर्यंत सगळ्या क्षेत्रातल्या शेअर्समध्ये कमीत कमी 20 ते 25 टक्क्यांपेक्षा जास्त घसरण आली आहे," असं, रवी सिंग सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images
त्यात बँक, आयटी, डिफेन्स, ऑटोमोबाईल, पॉवर, एफएमजीसी म्हणजे खाद्य, पेय पदार्थ विकणाऱ्या कंपन्या, रियलिटी म्हणजे रिअल इस्टेटशी जोडलेल्या कंपन्या, एनबीएफसी म्हणजे इतर वित्तीय संस्था, किटकनाशकं, साखर उद्योग अशा क्षेत्राचा समावेश आहे.
अर्थव्यवस्थेला अपेक्षित असणारी वृद्धी न दिसल्यामुळे अशी मोठी पडझड झाली असल्याचंही ते पुढे म्हणाले.
अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ लावणार असल्याची घोषणा केल्यानं बाजारात नकारात्मक कल दिसून येतो आहे. त्याचाच परिणाम म्हणून शेअर्समध्ये घसरण दिसतेय असं त्यांनी म्हटलं.
"गेल्या तीन महिन्यांपासून कंपन्यांच्या कमाईमध्ये घट होताना दिसत आहे. त्याचाही परिणाम शेअर मार्केटवर झाला आहे.
चीनच्या मेटल आणि गुंतवणूक याबद्दलच्या धोरणांचाही आंतरराष्ट्रीय बाजारावर नकारात्मक परिणाम झाला आहे. यामुळे भारतीय शेअर मार्केटमध्ये घसरण दिसून येत आहे," असं रवी सिंह म्हणाले.
जगातले भौगोलिक-राजकीय वाद अजूनही कमी झालेले नाहीत. रशिया-युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धावर अजूनही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीबद्दल अजूनही अनिश्चितता दिसून येते. हेही भारतीय शेअर बाजारात पडझड होण्यामागचं कारण असल्याचं रवी सिंह यांना वाटतं.
आंतरराष्ट्रीय व्यापाराचं जग सद्यस्थितीत अनिश्चिततेच्या गर्तेत अडकल्याचं एचडीएफसी सिक्युरिटीजचे कमोडिटीज आणि करेन्सी प्रमुख अनुज गुप्ता म्हणाले.
डोनाल्ड ट्रम्प चीनी मालावरचा टॅरिफ सतत वाढवत असल्याने जागतिक शेअर बाजारात शंकेचं वातावरण पसरलं आहे. त्यामुळे लोकांनी शेअर्स विकणं सुरू केलं आहे. याचाच परिणाम म्हणून भारतीय बाजारात घसरण दिसत असल्याचं गुप्ता यांचं मत आहे.

फोटो स्रोत, Getty Images
"मार्केटमध्ये अजूनही 'मार्केट सेटिंमेट' कमी असल्याचं दिसून येत आहे. त्यात सुधार झाल्याशिवाय मार्केट वर येणं अवघड आहे. शिवाय, ॲसेट क्लासमध्ये घसरण होत असल्यामुळे एकूण बाजारातच पडझड सुरू आहे," असं गुप्ता यांनी सांगितलं.
अनिश्चितता ही शेअर बाजाराचा मोठा शत्रू असल्याचं जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे मुख्य गुंतवणूक रणनितीकार व्ही. के. विजयकुमार हे 'मनीकंट्रोल' या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले. ट्रम्प अमेरिकेत सत्तेवर आल्यापासून अनिश्चिततेच्या वातावरणात वाढच होताना दिसते आहे.
"ट्रम्प सातत्याने टॅरिफ टॅक्सबद्दल नवनवीन घोषणा करत आहेत. त्याचा मार्केटवर परिणाम होतोय. चीनवर 10 टक्के कर लावण्याची घोषणा त्यांनी अलीकडेच केली.
त्यामुळे राष्ट्राध्यक्ष पदाचा कार्यभार सांभाळल्यानंतर सुरूवातीच्या दिवसात ट्रम्प इतर देशांना टॅरिफच्या धमक्या देऊन अमेरिकेच्या फायद्याची तडजोड करायला लावणार या बाजारातल्या समजावर शिक्कामोर्तब झालं आहे."
आता यावर चीनचं काय उत्तर आहे ते पाहणं रंजक ठरणार आहे, असं विजयकुमार म्हणाले. मार्च महिन्यात भारतीय बाजार पुन्हा वधारेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











