केमिस्ट्री प्राध्यापक : पतीच्या खून प्रकरणातून बाहेर पडण्यासाठी 'असा' केला रसायनशास्त्राचा वापर करण्याचा प्रयत्न

- Author, सौतिक बिस्वास
- Role, बीबीसी न्यूज, लंडन
"तुम्ही रसायनशास्त्राचे प्राध्यापक आहात का?" असा प्रश्न न्यायाधीशांनी विचारला.
त्यावर "हो," असं उत्तर ममता पाठक यांनी दिलं. उत्तर देताना त्यांनी आदरपूर्वक हात जोडत नमस्कार केला.
ममता पाठक मध्य प्रदेशातील एका न्यायालयात दोन न्यायाधीशांसमोर उभ्या होत्या. त्या निवृत्त प्राध्यापक आहेत. त्यांनी पांढऱ्या रंगाची साडी नेसलेली होती, त्यांनी चष्मा लावलेला होता. न्यायाधीशांशी बोलताना त्या जणू काही फॉरेन्सिक केमिस्ट्रीवर लेक्चर देत असल्यासारखं बोलत होत्या.
त्यांचा आवाज थरथरत होता, मात्र तरीदेखील त्या शांतपणे, संयमित आवाजात बोलत होत्या.
त्या म्हणाल्या, "शवविच्छेदनाच्या वेळी, योग्य रासायनिक विश्लेषणाशिवाय आगीनं झालेली जखम आणि इलेक्ट्रिक उपकरणानं झालेली जखम यात फरक करणं शक्य नाही."
न्यायालयात न्यायमुर्ती विवेक अगरवाल यांनी ममता पाठक यांना आठवण करून दिली, "ज्या डॉक्टरांनी हे शवविच्छेदन केलं त्यांनी सांगितलं की, विजेच्या धक्क्यानं मृत्यू झाल्याची स्पष्ट चिन्हं आहेत."
पतीच्या हत्येसाठी न्यायालयानं ठरवलं पत्नीला दोषी
हा एक दुर्मिळ, जवळपास विचित्र क्षण होता. एक 63 वर्षांची महिला, जिच्यावर तिच्या पतीची विजेचा वापर करून हत्या केल्याचा आरोप होता, ती न्यायालयाला सांगत होती की, ॲसिड आणि ऊतींच्या रिॲक्शनमधून जळण्याचं स्वरुप कसं स्पष्ट होतं.
या खटल्याची एप्रिल महिन्यात सुनावणी झाली. त्यावेळचा न्यायमुर्ती आणि या महिलेमधील हा संवाद व्हीडिओमध्ये रेकॉर्ड झाला. भारतभर तो व्हायरल झाला आणि इंटरनेटवर तो पाहून सर्वजण स्तब्ध झाले.

फोटो स्रोत, Getty Images
मात्र न्यायालयात तज्ज्ञांसारखा असलेला कोणताही आत्मविश्वास सरकारी वकिलांनी मांडलेल्या या खटल्यावर प्रभाव टाकू शकला नाही. यात एका पतीची हत्या झाली होती. या हत्येमागे संशय आणि वैवाहिक कलह हा हेतू होता.
गेल्या महिन्यात उच्च न्यायालयानं ममता पाठक यांची याचिका फेटाळली. तसंच निवृत्त डॉक्टर असलेले पती, नीरज पाठक यांची एप्रिल 2021 मध्ये हत्या केल्याबद्दल त्यांना सुनावण्यात आलेली जन्मठेपेची शिक्षा न्यायालयानं कायम ठेवली.
ममता पाठक यांनी अतिशय जोमानं, स्वत:चा बचाव करणारा युक्तिवाद केला. त्यांनी शवविच्छेदनातील त्रुटी, घरातील इन्सुलेशन आणि अगदी इलेक्ट्रोकेमिकल सिद्धांतांचा वापर करून स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न केला.
मात्र न्यायालयानं परिस्थितीजन्य पुराव्यांनाच निर्णायक मानलं. ते म्हणजे ममता पाठक यांनी त्यांच्या पतीला झोपेच्या गोळ्या दिल्या आणि नंतर विजेचा धक्का देऊन त्यांची हत्या केली.
न्यायाधीशांसमोर रसायनशास्त्राच्या प्राध्यापिकेचा युक्तिवाद
ममता पाठक यांना दोन अपत्य आहेत. न्यायालयात यांनी उत्साहानं त्यांची बाजू मांडण्यापूर्वी फाईल्सच्या ढिगाऱ्यावर नजर टाकली आणि त्यावरून झटकन नजर फिरवली.
"सर, विजेचा धक्का लागल्यानंतरच्या खुणा या मृत्यूपूर्वी किंवा मृत्यूनंतरच्या असल्याचा फरक करता येत नाही," असं त्यांनी फॉरेन्सिकच्या पुस्तकातील भाग उद्धृत करून युक्तिवाद केला.
"मग डॉक्टरांनी शवविच्छेदनात या विजेचा धक्का लागून भाजल्याच्या खुणा असल्याचं कसं काय लिहिलं?" त्या म्हणाल्या.

सूक्ष्मदर्शकातून निरीक्षण केल्यावर मृत्यूपूर्वीच्या आणि मृत्युनंतरच्या विजेचा धक्क्यानं भाजलेल्या खुणा सारख्याच दिसतात. त्यामुळे स्टँडर्ड परीक्षण अनिर्णित राहतं, असं तज्ज्ञ म्हणतात.
एका शोधनिबंधानुसार, त्वचेतील बदलांचा अतिशय बारकाईनं अभ्यास केल्यावर त्या खुणा मृत्यूपूर्वीच्या होत्या की नंतरच्या हे स्पष्ट होऊ शकतं.
रासायनिक अभिक्रियांवर चर्चा होत असताना न्यायाधीशांनी प्रयोगशाळेतील प्रक्रियांबद्दल ममता यांच्याकडे चौकशी केली. त्यावर ममता यांनी विविध प्रकारच्या ॲसिडबद्दल सांगितलं. त्यांनी सांगितलं की इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप वापरून हा फरक लक्षात येतो. काहीवेळा ते शवविच्छेदनाच्या ठिकाणी शक्य नसतं.
त्यानंतर त्यांनी न्यायाधीशांना इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी आणि विविध ॲसिडसंदर्भात माहिती देत त्यांचं मत तयार करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस मागच्या बाजूला बसलेल्या तीन महिला वकिलांनी स्मित केलं.
पतीच्या मृत्यूसाठीची अनेक संभाव्य कारणं मांडली
ममता पुढे म्हणाल्या की, त्या गेल्या वर्षभरापासून तुरुंगात कायद्याचा अभ्यास करत आहेत. स्टिकर्स लावलेल्या फायली उघडत आणि फॉरेन्सिक मेडिसिनच्या पुस्तकातील मुद्दे उद्धृत करत ममता यांनी या तपासातील कथित त्रुटींकडे लक्ष वेधलं.
यात गुन्ह्याच्या ठिकाणच्या न तपासलेल्या बाबींपासून ते गुन्ह्याच्या ठिकाणचं निरीक्षण करण्यासाठी पात्र इलेक्ट्रिकल आणि फॉरेन्सिक तज्ज्ञ नसणं या मुद्द्यांचा समावेश होता.
त्या म्हणाल्या, "आमच्या घराचा 2017- 2022 दरम्यान विमा काढण्यात आला होता. त्यावेळेस झालेल्या तपासणीतून घर विजेपासून लागणाऱ्या आगीपासून सुरक्षित असल्याचं दिसून आलं होतं."

फोटो स्रोत, Getty Images
ममता यांनी न्यायालयाला सांगितलं की, त्यांच्या पतीला उच्च रक्तदाब आणि ह्रदयविकाराची समस्या होती. त्यांनी सांगितलं की, त्यांच्या पतीच्या मृत्यूमागचं खरं कारण बारकाव्यात होतं. ते म्हणजे "वृद्धापकाळामुळे त्यांच्या धमन्यांचं कॅल्सिफिकेशन झालं होतं."
कॅल्सिफिकेशन म्हणजे शरीरातील ऊतींमध्ये कॅल्शियम साठत जातं आणि परिणामी त्या ऊती कडक होत जातात.
त्यांनी असंही सुचवलं की, ते कदाचित घसरून पडले असतील आणि त्यांना हिमाटोमा झाला असेल. मात्र या गोष्टीची खातरजमा करण्यासाठी सीटी स्कॅन करण्यात आलं नाही.
हिमाटोमा म्हणजे शरीरातील अवयात रक्त साकळणं.
ममता यांचा युक्तिवाद न्यायाधीशांना पटला नाही
29 एप्रिल 2021 ला, 65 वर्षांचे नीरज पाठक त्यांच्या घरात मृतावस्थेत आढळले होते. शवविच्छेदनात त्यांचा मृत्यू विजेच्या धक्क्यानं झाल्याचं नोंदवण्यात आलं. त्यानंतर काही दिवसांनी, ममता यांना नीरज पाठक यांच्या हत्येच्या आरोपाखाली अटक झाली.
या जोडप्याच्या घरातून पोलिसांनी टू-पिन प्लग असलेली 11 मीटर लांबीची इलेक्ट्रिक वायर आणि सीसीटीव्ही फुटेज जप्त केलं होतं. तसंच 10 झोपेच्या गोळ्या असलेल्या स्ट्रिपमध्ये 6 गोळ्या सापडल्या होत्या.
1 मे रोजी नीरज पाठक यांचं शवविच्छेदन करण्यात आलं. त्याच्या 36 ते 72 तास आधी त्यांना अनेक जागी विजेच्या प्रवाहामुळे धक्का बसल्यानं ह्रदयाकडून होणारा रक्ताचा पुरवठा बंद पडल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचं शवविच्छेदनात नमूद करण्यात आलं.
"मात्र त्यांना गोळीच्या स्ट्रीपवर माझ्या बोटांचे ठसे सापडले नाहीत," असं ममता यांनी न्यायाधीशांना सांगितलं.
मात्र त्यांच्या युक्तिवादातील गुंतागुंत लगेचच उलगडली. त्यामुळे न्यायाधीश अगरवाल आणि न्यायाधीश देवनारायण सिन्हा यांना त्यांचा युक्तिवाद पटला नाही.
छतरपूरमधील प्राध्यापक आणि डॉक्टरच्या कुटुंबाची कहाणी
ममता आणि नीरज पाठक मध्य प्रदेशातील छतरपूरमध्ये जवळपास 4 दशकं एक सुस्थित मध्यमवर्गीय जीवन जगले होते. छतरपूर हा एक दुष्काळग्रस्त जिल्हा असून तो शेती, ग्रॅनाईटच्या खाणी आणि छोट्या व्यवसायांसाठी ओळखला जातो.
ममता पाठक तिथल्याच स्थानिक सरकारी महाविद्यालयात रसायनशास्त्र शिकवायच्या. तर नीरज पाठक जिल्हा रुग्णालयात मुख्य वैद्यकीय अधिकारी होते. त्यांना दोन मुलं होती. त्यातील एक परदेशात स्थायिक झाला आहे. दुसरा त्याच्या आईसोबत राहत असे.
2019 मध्ये 39 वर्षे सरकारी डॉक्टर म्हणून नोकरी केल्यानंतर नीरज पाठक यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यानंतर त्यांनी घरीच एक खासगी क्लिनिक सुरू केलं.

ही घटना कोरोनाच्या संकटकाळात घडली. नीरज यांना कोविड झाल्याची लक्षणं दिसत होती. त्यामुळे त्यांना पहिल्या मजल्यावरच ठेवण्यात आलं होतं. तर ममता आणि त्यांचा मुलगा नितिश तळमजल्यावर राहत होते.
तळमजल्यापासून दोन जिने नीरज यांच्या खोलीला जोडलेले होते. ते गॅलरी आणि त्यांच्या खासगी क्लिनिकच्या वेटिंग हॉलला जोडत होते. तिथे अर्धा डझन कर्मचारी प्रयोगशाळा आणि मेडिकल स्टोअरमध्ये असायचे.
या प्रकरणाच्या 97 पानी निकालपत्रात म्हटलं आहे की, ममता यांनी 29 एप्रिलला सांगितलं की, नीरज त्यांच्या बेडमध्ये कोणताही प्रतिसाद न देण्याच्या अवस्थेत आढळले. मात्र 1 मेपर्यंत त्यांनी डॉक्टर किंवा पोलिसांना कळवलं नाही.
त्याऐवजी, त्यांच्या ड्रायव्हरच्या म्हणण्यानुसार त्या त्यांच्या मोठ्या मुलाला तिथून 130 किमी अंतरावरील झांशीला घेऊन गेल्या आणि त्याच संध्याकाळी परत आल्या. शेवटी त्यांनी पोलिसांना कळवलं, तेव्हा हा मृत्यू नेमका कसा झाला याबद्दल माहीत नसल्याचं सांगितलं.
वरकरणी सुखी कुटुंब, पण पत्नीकडून होत होता पतीचाच छळ
या सर्व कौटुंबिक शांततेमागं एक त्रासदायक वैवाहिक आयुष्य होतं. न्यायाधीशांनी या कुटुंबात दीर्घकाळापासून चालत आलेले वैवाहिक कलह अधोरेखित केले. हे पती-पत्नी वेगवेगळे राहत होते. ममता यांना त्यांच्या पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा आणि विश्वासघात करत असल्याचा संशय होता.
ज्या दिवशी नीरज यांचा मृत्यू झाला, त्या दिवशी सकाळी, त्यांनी एका सहकाऱ्याला फोन करून ममता "त्यांचा छळ करत असल्याचं" सांगितलं. ममता त्यांना बाथरुममध्ये बंद करून ठेवत होत्या, अनेक दिवस अन्न देत नव्हता आणि त्यांना शारीरिक दुखापती करत होत्या, असं नीरज यांनी सांगितलं होतं.
तसंच ममता यांनी त्यांच्याकडून रोख रक्कम, एटीएम कार्ड्स, वाहनाच्या चाव्या आणि बँकेतील मुदतठेवींची कागदपत्रं घेतल्याचाही आरोप नीरज यांनी केला होता.
मदतीसाठी नीरज यांच्या मुलानं एका मित्राशी संपर्क साधला. त्या मित्रानं पोलिसांना कळवलं. त्यानंतर त्यानं या निवृत्त डॉक्टरची 'ममता यांच्या तावडीतून' सुटका केली.
अलीकडच्या काही काळापासून हे पती-पत्नी वेगवेगळे राहत होते. त्यामुळे न्यायालयाच्या संशयाला बळकटी मिळाली.
'आम्हाला अशा कथा सांगू नका'
ममता यांनी न्यायालयाला सांगितलं की, ती 'सर्वोत्तम आई' आहे. यासाठीचा पुरावा म्हणून त्यांनी त्यांच्या मुलांच्या वाढदिवसाचं कार्ड सादर केलं. तसंच त्या पतीला जेवू घालत असतानाचे आणि त्यांचे कुटुंबाबरोबरचे फोटो त्यांनी दाखवले.
तरीदेखील न्यायाधीशांना त्यांचा युक्तिवाद पटला नाही. त्यांनी नमूद केलं की, अशा प्रेमाच्या खुणा किंवा प्रसंगांमुळे हत्येचा हेतू नष्ट होत नाही. शेवटी, एक 'प्रेमळ आई' देखील 'शंकेखोर पत्नी' असू शकते, असं ते म्हणाले.
न्यायालयाच्या प्रश्नांना तोंड देऊन आणि न्यायालयाच्या शंकाविरोधात स्वत:चा बचाव केल्यानंतर 50 मिनिटांनी ममता यांचा संयम पहिल्यांदाच ढासळला.
"मला एक गोष्ट माहीत आहे, मी त्यांना मारलं नाही," असं त्या मंदावलेल्या स्वरात म्हणाल्या.
दुसऱ्याच क्षणी त्यांनी कबूल केलं, "मी आता हे जास्त वेळ सहन करू शकत नाही."

फोटो स्रोत, Getty Images
तणाव कमी करण्यासाठी न्यायाधीश अगरवाल म्हणाले, "तुम्हाला याची सवय झाली असावी. तुम्ही महाविद्यालयात 50 मिनिटांचा वर्ग घेत असाल."
"40 मिनिटं, सर. पण ती लहान मुलं आहेत," असं ममता म्हणाल्या.
"महाविद्यालयात लहान मुलं? पण तुमचं पद तर सहाय्यक प्राध्यापकाचं आहे," असं न्यायाधीशांनी त्यांना जोर देत विचारलं.
त्यावर ममता यांनी उत्तर दिलं, "पण ती मुलंच आहेत, सर."
"आम्हाला अशा कथा सांगू नका," असं न्यायाधीश अगरवाल यांनी त्यांना खडसावलं.
ममता यांनी हा खटला फक्त एक प्रतिवादी म्हणूनच लढवला नाही, तर न्यायालयाचं रुपांतर रसायनशास्त्राच्या प्रयोगशाळेत करणाऱ्या शिक्षिका म्हणूनही त्यांनी हा खटला लढवला.
विज्ञानाचा वापर करून निर्दोषत्व सिद्ध करण्याच्या आशेनं त्यांनी तो लढवला. मात्र तरीदेखील, त्यांच्या या रसायनशास्त्राच्या धड्यांपेक्षा पुरावेच अधिक सबळ ठरले.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











