झोहरान ममदानींसोबत त्यांच्या सीरियन वंशाच्या पत्नी रमा दुवाजींचीही का होतेय चर्चा?

न्यूयॉर्कच्या महापौरपदी निवडून आलेले झोहरान ममदानी सध्या फारच चर्चेत आहेत.

पण त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रमा दुवाजींची देखील चर्चा होते आहे.

दुवाजी आता न्यूयॉर्कच्या फर्स्ट लेडी होणार आहेत. त्या या शहराच्या आतापर्यंतच्या सर्वांत युवा फर्स्ट लेडी असतील.

आपल्या विजयी भाषणात ममदानी यांनी त्यांच्या शेजारी उभ्या असलेल्या त्यांच्या पत्नीचा उल्लेख 'हयाती' असा केला.

हा एक अरबी शब्द आहे ज्याचा अर्थ 'माझे आयुष्य' असा होतो.

दुवाजी या न्यूयॉर्कमध्ये राहतात. त्या एक चित्रकार आणि सीरियन वंशाच्या कलाकार आहेत. त्या मध्य पूर्वेकडील थीमवर आधारित कला आणि इलेस्ट्रेशन तयार करतात.

त्यांचं काम बीबीसी न्यूज, द न्यूयॉर्क टाईम्स, द वॉशिंग्टन पोस्ट, व्हाइस आणि लंडनमधील टेट मॉडर्न म्युझियममध्ये प्रसिद्ध झालं आहे.

या वर्षी मे महिन्यात, ममदानी यांनी त्यांच्या पत्नीच्या ओळखीबद्दल उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली होती.

पत्नीबाबतच्या प्रश्नांना दिली होती उत्तरं

"रमा फक्त माझी पत्नी नाही, ती एक उत्कृष्ट कलाकार आहे आणि लोकांनी तिला तिच्या स्वतःच्या कामावरून आणि प्रतिभेच्या आधारावर ओळखावं, हा तिचा अधिकार आहे."

दि. 13 मे 2025 रोजी झोहरान ममदानी यांनी त्यांच्या पत्नी रमा दुवाजी यांच्यावर सातत्यानं होणाऱ्या टीकेला प्रत्युत्तर देताना हे लिहिलं होतं.

परिस्थिती अशी होती की, ममदानी यांच्यावर त्यांच्या पत्नीची ओळख लपवून ठेवल्याचे आरोप होत होते.

ममदानी यांनी जाणूनबुजून रमा दुवाजी यांना त्यांच्या प्रचारापासून दूर ठेवलं होतं. कारण त्या सीरियातून आलेल्या आहेत आणि त्या पॅलेस्टाइन समर्थक आहेत, असं म्हटलं होतं.

पण ममदानी यांचं म्हणणं होतं की, त्यांची पत्नी ही केवळ त्यांच्यापुरती किंवा त्यांच्यामुळे ओळखली जाऊ नये. ती एक उत्तम कलाकार आहे आणि लोकांनी तिला कोणत्याही नात्याऐवजी तिच्या कौशल्यावरून, प्रतिभेनं ओळखावं.

न्यूयॉर्क सिटीच्या महापौरपदासाठीच्या डेमोक्रेटिक पार्टीच्या प्राथमिक (प्रायमरी) निवडणुकीत विजयी होईपर्यंत, ममदानी यांच्या कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात किंवा प्रचारात दुवाजी फारशा दिसल्या नाहीत.

त्यांनी आपल्या सोशल मीडिया हँडल्सवरही कधी उघडपणे झोहरान यांच्या समर्थनात किंवा त्यांच्या निवडणूक प्रचाराच्या समर्थनात कोणतीही पोस्ट केली नाही.

त्या सहसा त्यांच्या सोशल मीडिया हँडल्सवर त्यांच्या कलाकृती किंवा स्वतःचे फोटो शेअर करताना दिसल्या.

परंतु, 24 जून 2025 रोजी जेव्हा ममदानी यांनी न्यूयॉर्क सिटीच्या महापौरपदासाठी डेमोक्रेटिक पार्टीच्या प्राथमिक निवडणुकीत विजय मिळवला. तेव्हा या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी आयोजित एका कार्यक्रमात रमा दुवाजी पहिल्यांदाच त्यांच्यासोबत मंचावर दिसल्या.

प्राथमिक फेरी जिंकणं म्हणजे झोहरान ममदानी यांना न्यूयॉर्कच्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी डेमोक्रेटिक पार्टीकडून उमेदवारी मिळाली आहे.

विजयानंतरच्या त्या कार्यक्रमात रमा दुवाजी थोड्या संकोचल्यासारख्या दिसत होत्या.

नंतर त्यांनी ममदानींसोबतचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत लिहिलं, "माझ्यासाठी यापेक्षा अधिक अभिमानाचा क्षण नाही."

रमा दुवाजी आणि झोहरान ममदानी यांचा विवाह याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात झाला होता.

एप्रिलपासून ममदानी यांचा प्रचार सुरू झाला आणि या काळात त्यांना एका बाजूला मुस्लीम ओळखीमुळे टीकेला सामोरे जावं लागलं.

दुसऱ्या बाजूला काही लोक त्यांच्यावर फक्त यासाठी टीका करत राहिले की, त्यांच्या पत्नी रमा दुवाजी आपल्या कलेच्या माध्यमातून गाझामधील इस्रायलच्या लष्करी मोहिमेला आणि त्यावेळी होणाऱ्या हिंसेचा विरोध करत असतात.

अशा परिस्थितीत प्रश्न उपस्थित होतो की, रमा दुवाजी नेमक्या कोण आहेत आणि त्यांची ओळख इतकी महत्त्वाची का आहे?

कोण आहेत रमा दुवाजी?

दुवाजी या सीरियन वंशाच्या इलस्ट्रेटर आणि अ‍ॅनिमेटर आहेत. सध्या त्या न्यूयॉर्क शहरात ब्रुकलिन येथे राहतात.

त्या 27 वर्षांच्या असून अमेरिकेतील व्हर्जिनिया कॉमनवेल्थ युनिव्हर्सिटीतून पदवी आणि न्यूयॉर्क शहरातील स्कूल ऑफ व्हिज्युअल आर्ट्स येथून पदव्युत्तर पदवी मिळवली आहे.

त्यांचे कुटुंबीय सीरियातील दमिश्क येथील आहे. परंतु, रमा यांचा जन्म टेक्सास येथे झाला आहे. सध्या त्यांचं कुटुंब दुबई येथे वास्तव्यास आहे.

कुटुंबात कोण कोण आहेत, वडील काय करतात यासंबंधीची माहिती फारशी उपलब्ध नाही. दुवाजी स्वतः कधीही याबद्दल बोलत नाहीत.

पण याच वर्षी 'यंग मी' नावाच्या एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं होतं की, कोव्हिडच्या काळात त्यांनी आपला जास्तीत जास्त वेळ दुबईत आपल्या कुटुंबासोबत घालवला होता.

दुवाजी या एक प्रसिद्ध इलस्ट्रेटर आहेतच, पण त्या सामाजिक - राजकीय मुद्द्यांवरही स्पष्ट व निर्भीड मतं मांडतात.

आपल्या कलेच्या माध्यमातून त्या सतत पॅलेस्टिनी लोकांच्या प्रश्नांना आवाज देण्याचा प्रयत्न करत असतात.

याशिवाय वर्णद्वेषावर आधारित हिंसाचार आणि कॉलेज कॅम्पसमधील विरोधाच्या आवाजांना दाबण्यासारखे मुद्देही त्यांच्या कामाच्या केंद्रस्थानी राहिले आहेत.

त्यांनी कोलंबिया युनिव्हर्सिटीमधील पॅलेस्टिनी विद्यार्थी महमूद खलीलच्या समर्थनासाठी इलस्ट्रेशन्स तयार केली होती.

महमूद खलीलला त्याचवर्षी हमाससमर्थक हालचालींच्या आरोपाखाली ताब्यात घेण्यात आलं होतं.

याचवर्षी एप्रिल महिन्यात रमा दुवाजी यांनी 'यंग मी' नावाच्या एका वेबसाइटला मुलाखत दिली होती.

या मुलाखतीत जेव्हा त्यांना विचारण्यात आलं, "आपण अशा काळात आहोत जिथे राजकारण आणि कला वेगळी करता येणं जवळजवळ अशक्य वाटतं. अशा परिस्थितीत पॅलेस्टाइनचा प्रश्न, ट्रम्प यांचं परतणं, इमिग्रेशन आणि कस्टम एन्फोर्समेंटच्या धाडी या घटनांकडे तुम्ही एक कलाकार म्हणून कशा पाहता?"

रमा म्हणतात, "मी खोटं बोलणार नाही. सध्या न्यूयॉर्कमधील परिस्थिती चांगली नाही. मला माझ्या मित्रमैत्रिणींची आणि कुटुंबाची काळजी वाटते. असं वाटतं की, या सगळ्या गोष्टी माझ्या हाताबाहेर आहेत."

"माझी कला नेहमीच माझ्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचं एक प्रतिबिंब राहिलेली आहे. सध्याच्या काळात, जेव्हा इतक्या लोकांच्या आवाजाला दाबलं जात आहे, त्यांना देशाबाहेर हाकललं जातंय, तेव्हा मी तरी माझा आवाज उठवू शकते. अमेरिका, पॅलेस्टाइन किंवा सीरियामध्ये जे काही चाललं आहे, त्यावर मी बोलू शकते."

सीरियन पार्श्वभूमीमुळे संभ्रमावस्था

रमा दुवाजी मूळच्या सीरियाच्या असल्या, तरी स्वतःची सीरियाई ओळख स्वीकारायला त्यांना खूप वेळ लागला.

2019 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी आपल्या सीरियन-अमेरिकन ओळखीबद्दल सांगितलं होतं.

या मुलाखतीत त्यांनी सांगितलं होतं की, सुरुवातीच्या काळात त्या आपली सीरियन ओळख लपवण्याचा प्रयत्न करत असत. त्या सगळ्यांना सांगत की, त्या अमेरिकन आहेत.

त्या म्हणतात, "मी 10 वर्षे आखाती देशांमध्ये राहत असताना मी माझ्या अमेरिकन ओळखीसोबतच जगत होते. तेव्हा माझे केस फिक्कट रंगाचे होते, विचारपद्धती पूर्णपणे पाश्चिमात्य होती आणि मला नीट अरबी भाषाही बोलता येत नव्हती."

पण जेव्हा मी अमेरिकेत आले, तेव्हा मला जाणवलं की पारंपरिक अर्थाने मी अमेरिकनही नाही."

"मला तिथल्या लोकांशी स्वतःला जोडता येत नव्हतं. म्हणून बराच काळ मी माझ्या ओळखीबाबत संभ्रमात होते. पण शेवटी मी माझी आखाती ओळख स्वीकारली."

"मला माहीत नाही की हे नेमकं काय आहे, ना पूर्णपणे सीरियन आहे, ना पूर्णपणे अमिराती. पण काहीही असलं तरीही या ओळखीने माझ्या कलेवर, माझ्या कामावर खूप प्रभाव टाकला आहे."

झोहरान ममदानी यांच्याशी विवाह

झोहरान हे रमा यांच्या कामाचं नेहमीच कौतुक करत आले आहेत. दोघांच्या वयात 6 वर्षांचा फरक आहे.

अलीकडील एका मुलाखतीत झोहरान ममदानी यांनी त्यांची आणि रमा यांची भेट 'हिंज' या डेटिंग अ‍ॅपवर झाल्याचं सांगितलं होतं.

याच मुलाखतीत ममदानी हसत हसत म्हणाले होते, "हे डेटिंग ॲप्स अजूनही आशादायक आहेत, हे यावरून सिद्ध होतं."

दोघांनी याच वर्षी न्यूयॉर्क शहरात साध्या आणि मोजक्या लोकांच्या उपस्थितीत विवाह केला होता.

तत्पूर्वी 2024 साली दोघांनी दुबईत साखरपुडा आणि त्यानंतर पारंपरिक पद्धतीनं 'निकाह'ही केला.

ममदानी यांच्या प्रचार टीमकडून जारी केलेल्या निवेदनात या लग्नाला 'खासगी, पण आनंदाने भरलेला सोहळा' असं म्हटलं, ज्यात फक्त जवळचे मित्र आणि कुटुंबीय उपस्थित होते.

दि. 24 जून रोजी जेव्हा झोहरान यांनी न्यूयॉर्क सिटीच्या महापौरपदासाठी डेमोक्रॅटिक पार्टीची प्राथमिक फेरी जिंकली आणि त्या विजयाचा आनंद साजरा केला तेव्हा त्यांनी आपल्या आई मीरा नायर, वडील महमूद ममदानी आणि पत्नी रमा दुवाजी यांचे आभार मानले होते.

त्यांनी सर्वांच्या समोर आपल्या पत्नीचा हात धरून त्याचे चुंबन घेतले आणि म्हणाले-

"माझ्या प्रिय पत्नीचे आभार मानायलाच हवेत."

'रमा, थँक्यू'.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)