कुंभमेळा : तरुणींचे अंघोळ करताना, कपडे बदलतानाचे व्हीडिओ विकल्याचं प्रकरणं 'असं' आलं उघडकीस

    • Author, कीर्ती रावत
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

प्रयागराजमध्ये झालेल्या महाकुंभमेळ्यात भाविकांनी मोठ्या संख्येनं त्रिवेणी संगमात स्नान केलं. यामध्ये महिला भाविकही मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.

पण, या कुंभमेळ्यात महिला आणि तरुणी आंघोळ करतानाचे, कपडे बदलतानाचे फोटो आणि व्हीडिओ विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून शेअर करण्यात आले आहेत.

फेसबुक, एक्स, यूट्यूबवर हे व्हीडिओ, फोटो पोस्ट करण्यात आले होते. याशिवाय हे व्हीडिओ अनेक टेलिग्राम चॅनलवरही विकले गेले.

हे प्रकरण समोर आल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली असून काहींना अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणात 27 फेब्रुवारीला पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यातून अमित कुमार झा या 27 वर्षीय व्यक्तीला अटक केल्याचं प्रयागराज पोलीस आयुक्तालयानं सांगितलं होतं.

या प्रकरणामुळे पुन्हा एकदा महिलांची गोपनियता आणि सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे.

महाकुंभमेळ्यातील फोटो व्हीडिओनंतर गुजरातमधूनही एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

राजकोटमधील प्रसूती रुग्णालयात महिलांचे व्हीडिओ काढून ते टेलिग्राम चॅनेलवर विकल जाते होते.

सीसीटीव्हीमधून घेतलेले महिलांचे फोटो शेअर करणाऱ्या दोन टेलिग्राम ग्रुपचे स्क्रीनशॉट बीबीसीकडे आहेत. हे फोटो शेअर करताना संपूर्ण व्हिडिओ कुठून खरेदी करता येईल याचा उल्लेख देखील त्यात करण्यात आलाय.

या टेलिग्राम चॅनल्सने फक्त कुंभमेळाच नव्हे तर इतर धार्मिक कार्यक्रमांमध्ये महिलांनी स्नान केल्याचे फोटो आणि व्हीडिओ शेअर केले आहेत.

पोलिस तपासात काय उघड झालं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुंभमेळ्यात महिलांनी स्नान केल्याचे व्हीडिओ टेलिग्रामवर विकले जात आहेत.

हे व्हीडिओ 'महाकुंभ गंगा स्नान प्रायगराज' असं कॅप्शन देऊन फेसबुकवर अपलोड केले होते. तसेच काही पोस्टमध्ये कुंभमेळ्याशी संबंधित हॅश्टॅगही वापरल होते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार हे व्हीडिओ 2 हजार ते 3 हजार रुपयांना विकले जात आहेत. महिलांचे व्हीडिओ विकल्याचे समोर आल्यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी या प्रकरणात कारवाई केली आहे.

यासंदर्भात काही इंस्टाग्राम अकाऊंट आणि टेलिग्राम चॅनल्सवर कारवाई करण्यात आल्याचं वृत्त पीटीआयनं युपी पोलिसांच्या हवाल्यानं दिलंय.

"कुंभमेळ्यात महिला आंघोळ करताना आणि कपडे बदलतानाचे व्हीडिओ काही प्लॅटफॉर्मवर अपलोड होत असल्याचे सोशल मीडिया मॉनिटरींग टीमच्या निदर्शनास आल्यानंतर आम्ही कारवाई केली आहे. हे महिलांच्या गोपनियतेचं आणि प्रतिष्ठेचं उल्लंखन आहे," असं उत्तर प्रदेश पोलिसांनी म्हटलं आहे.

उत्तर प्रदेश पोलिसांनी 17 फेब्रुवारीला महिलांचे फोटो व्हीडिओ पोस्ट केल्याच्या आरोपाखाली एका इन्स्टाग्राम अकाऊंटवर गुन्हा दाखल केला.

तसेच दुसऱ्या एका प्रकरणात 19 फेब्रुवारीला टेलिग्राम चॅनेल्सवरही गुन्हा दाखल करण्यात आला.

हे दोन्ही गुन्हे प्रयागराजमधील कोतवाली कुंभमेळा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत.

याबद्दल उत्तर प्रदेश पोलिसांनी एक्स अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे.

"कुंभमेळ्यात महिला भाविकांचे स्नान करतानाचे अश्लील व्हीडिओ सोशल मीडियावर अपलोड करून काही व्हीडिओ विकले जात आहेत, अशी माहिती मिळाल्यानंतर कुंभमेळा पोलिसांनी कारवाई केली.

आम्ही या कृत्यात सहभागी असलेल्या 17 सोशल मीडिया अकाउंट्सची ओळख पटवली असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे" असं या पोस्टमध्ये म्हटलंय.

कुंभमेळ्याला गेलेल्या एका महिलेसोबत बीबीसीनं संवाद साधला.

नाव न लिहिण्याच्या अटीवर त्यांनी सांगितलं की, कुंभमेळ्यात स्नान करणाऱ्या महिलांचे फोटो, व्हीडिओ काढून विकले जात आहेत हे समजल्यानंतर खूप वाईट वाटलं.

ही महिलांच्या मान-सन्मानाची गोष्ट आहे. आंघोळ करणाऱ्या महिलांचे फोटो बाजारात विकणं हे त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणारं आहे. धार्मिक कार्यक्रमांमध्ये अशा प्रकारच्या घटना घडू नये.

जर अशा ठिकाणी महिला सुरक्षित नसतील तर इतर ठिकाणची परिस्थितीबद्दल कायच बोलायचं? असाही सवाल त्या उपस्थित करतात.

राजकोटमध्ये काय घडलं?

राजकोट जिल्ह्यातील एका क्लिनिकमध्ये तपासणीसाठी जाणाऱ्या महिला रुग्णांचे व्हीडिओ लीक होत आहेत. हे व्हीडिओ युट्यूबवर अपलोड करण्यात आले होते.

तसेच टेलिग्रामवरही विक्रीसाठी उपलब्ध होते. गुजरात पोलिसांचे सायबर क्राईमचे सहाय्यक पोलिस आयुक्त हार्दीक मकडिया यांनी बीबीसीसोबत संवाद साधला

ते म्हणतात, "एका प्रसूतिगृहाचे सीसीटीव्ही हॅक करण्यात आले असून व्हीडिओ एका यूट्यूब चॅनेलवर अपलोड करण्यात आले आहे. तसेच व्हीडिओच्या कॅप्शनमध्ये चॅनलची लिंकही देण्यात आली आहे.

कोणीतरी सोशल मीडिया अकाऊंटला टॅग करून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. ते व्हिडिओ पाहिले तर डॉक्टर आणि रुग्ण गुजरातीमध्ये बोलत होते. "

"त्यामुळे आम्ही पूर्ण माहिती गोळा करायला सुरुवात केली. या प्रकरणात सहा जणांना अटक केली असून आणखी दुसऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहोत. ते सर्वजण टेलिग्राम चॅनलेद्वारे एकमेकांच्या संपर्कात आहेत. त्यांनी ते व्हीडिओ हॅक करून मिळवले आहेत." असंही पुढं ते म्हणाले.

कुंभमेळा आणि गुजरातमधील घटनांमुळे महिलाच्या सुरक्षेबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पण, असं का घडत असेल? याबद्दल वरिष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. निमिश जी देसाई बीबीसीसोबत बोलताना म्हणाले,

"आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं अशा गोष्टी सहज शक्य होतात. झटपट पैसा कमवणे हे देखील अशा गोष्टी करण्यामागे एक कारण आहे अशा गुन्ह्यांसाठी कुठलेही कठोर कायदे नाहीत. म्हणून लोकांना भीतीही वाटत नाही."

मानसशास्त्रज्ञ करीश्मा मेहरा म्हणतात, समाजात लिंगभाव महत्वाची भूमिका बजावतो. महिलांना एक वस्तू म्हणून बघितलं जातं.

याच मानसिकतेमुळे आपण महिलांसोबत जे केलं ते योग्य आहे असं त्यांना वाटतं. पुरुषांनी केलेल्या अशा कृत्यांसाठी महिलांनाच गुन्हेगार ठरवलं जातं.

टेलिग्रामवर अशी बेकादेशीर कृत्य कशी होतात?

इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपेक्षा टेलिग्रामवर अशा घटना का होतात? याबद्दल सायबर सुरक्षा तज्ज्ञ शुभम सिंह म्हणतात, "टेलिग्राममध्ये एंड टू एंड एन्क्रिप्शन आहे.

यामुळे सरकारला बेकायदेशीर कृत्यांचा मागोवा घेणं कठीण होतं. व्हॉट्सअप आणि फेसबुकसारख्या इतर प्लॅटफॉर्मच्या तुलनेत टेलिग्रामवर मोठ्या प्रमाणात ग्रुप्स असून त्यावर देखरेख कमी आहे.

यामुळे अशा घटना सहज घडतात. तसेच टेलिग्रामवर अकाऊंट तयार करणं आणि डिलीट करणं सोप्पं आहे. यामुळे गुन्हेगार शोधण्यातही अडचणी येतात."

टेलिग्राम दुबईहून चालवलं जातं. यामुळे युरोपीयन युनियन आणि अमेरिकेची धोरणं या अपवर लागू होत नाही.

याशिवाय टेलिग्रामवर लाखो ग्रुप्स आणि चॅनल्स आहेत. त्यावर देखरेख ठेवण अशक्य आहे, असंही ते म्हणाले.

कायदा काय सांगतो?

महिलांच्या गोपनीयतेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कोणती कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते? याबद्दल वकील राधिका थापर यांच्यासोबत बीबीसीनं संवाद साधला.

"भारतीय दंड संहितेच्या कलम 509 नुसार, महिलेच्या गोपनियतेचं उल्लंघन केल्यास तीन वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. कलम 509 नुसार कुठल्या महिलेचे आक्षेपार्ह फोटो दाखवत असाल तर हा गुन्हा आहे. "

"कोणीही अश्लील फोटो, व्हीडिओ प्रकाशित करत असले तर, त्याला आयटी कायद्याच्या कलम 67 अंतर्गत शिक्षा होऊ शकते. हे फक्त महिलांनाच नाहीतर मुलांसह इतरांच्या बाबतीतही लागू होतं." असंही पुढं ते म्हणाले.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.