'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती जगाला देणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशींचे आई-वडील काय म्हणत आहेत?

फोटो स्रोत, Hardik/EPA
भारतीय लष्कराने बुधवारी (7 मे) मध्यरात्री 1 वाजून 5 मिनिटांनी 'ऑपरेशन सिंदूर'ची सुरुवात केली. पाकिस्तान आणि पाकिस्तान प्रशासित कश्मीरमध्ये अनेक ठिकाणी भारताने क्षेपणास्त्र हल्ले केले.
त्यानंतर भारत सरकारच्या वतीनं भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांच्यासोबत कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिल्लीत एका पत्रकार परिषद घेत याबाबत देशाला आणि जगाला अधिकृतपणे माहिती दिली.
अशा महत्त्वाच्या पत्रकार परिषदेत परराष्ट्र सचिवांसोबत उभ्या असलेल्या भारतीय लष्करातल्या महिला प्रतिनिधींची चर्चा सगळ्या देशभर सुरू आहे.
या मोहिमेची माहिती देणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी गुजरातमधल्या वडोदरामधल्या आहेत, असं गुजरातच्या माहिती प्रसारण विभागानं जाहीर केलं.
"माझ्या मुलीने देशासाठी काहीतरी केलं याचा मला अभिमान आहे," अशी भावना सोफिया यांचे वडील, ताज मोहम्मद कुरेशी यांनी व्यक्त केली.
त्यांच्या आई, हलिमा बीबी यांनीही सोफिया यांना सैन्यात जायची प्रेरणा कुठून मिळाली ते सांगितलं.
कर्नल सोफिया पत्रकार परिषदेत काय म्हणाल्या?

फोटो स्रोत, ANI
बुधवारी (7 मे) झालेल्या पत्रकार परिषदेत 'ऑपरेशन सिंदूर'साठी लष्कराने वापरलेल्या रणनितीविषयी कर्नल सोफिया यांनी माहिती दिली.
6 ते 7 मेच्या मधरात्री 1 वाजून 5 मिनिट ते 1 वाजून 30 मिनिटांपर्यंत भारतीय लष्कराचं ऑपरेशन सिंदूर सुरू होतं. "ही कारवाई 22 एप्रिलला पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यातले पीडित, निर्दोष नागरिक आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी केली गेली. या कारवाईत 9 दहशतवादी ठिकाणं निशाण्यावर होती आणि त्यांना पूर्णपणे उद्ध्वस्त केलं गेलं," अशी माहिती सोफिया यांनी दिली.
कर्नल सोफिया यांनी म्हटलं, "गेल्या तीन दशकांपासून पाकिस्तानात दहशतवादासाठी पूरक रचना तयार केली जात आहे. 'दहशतवाद्यांंचं जाळं' पाकिस्तान आणि पाकिस्तान प्रशासित काश्मिरमध्ये सर्वत्र पसरलं आहे."
सोफिया यांची कामगिरी
वडोदरातल्याच महाराजा सयाजीराव विद्यालयातून सोफिया यांनी 1997 मध्ये बायोकेमिस्ट्री या विषयात उच्चशिक्षण घेतलं होतं.
शिक्षणानंतर त्या लष्करात आल्या आणि सिग्नल कोर विभागात सामील झाल्या.
त्यांचे आजोबाही लष्कराशी जोडलेले होते. ते सैन्यात धार्मिक शिक्षक म्हणून काम करत होते.
सोफिया यांचे पतीही भारतीय सैन्यात यांत्रिकी पायदळात अधिकारी आहेत.
या दाम्पत्यानं आपलं जगणं देशाच्या सेवेसाठी दिलंय.
2016 मध्ये कर्नल सोफिया यांनी भारतीय सैन्यात ऐतिहासिक कामगिरी केली होती.

फोटो स्रोत, Information Department, Gujarat
त्या 'फोर्स 18' या बहुराष्ट्रीय सैन्य सरावात भारतीय पथकाचं नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या. या सरावात दक्षिण पूर्व आशियाई राष्ट्र संघ (आसियान प्लस) समूहातील 18 देश सहभागी झाले होते.
त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय पथकाने जागतिक पातळीवर आपली कौशल्यं दाखवून दिली.
त्यांच्या विभागाकडून जाहीर केल्या गेलेल्या माहितीनुसार सोफिया यांनी मैदानात योद्ध्याची भूमिका तर बजावलीच, या शिवाय आंतरराष्ट्रीय शांतता अभियानातही महत्त्वाचं योगदान दिलं.

फोटो स्रोत, ANI
संयुक्त राष्ट्राच्या शांतता अभियानांतर्गत 2006 मध्ये त्यांना 6 वर्षांसाठी कांगोमध्ये तैनात करण्यात आलं होतं.
तिथे शांतता प्रस्थापित करणं आणि मानवाधिकाराच्या अनुषंगाने मदत मिळवून देण्यात त्यांनी महत्त्वाचं काम केलं.
"संघर्षमय क्षेत्रांत शांतता आणण्याचा प्रयत्न करणं हा माझ्यासाठी मोठा गौरवाचा क्षण होता," असं त्या सांगतात.
'मला माझ्या मुलीचा अभिमान वाटतो'
कर्नल सोफियाचे वडील ताज मोहम्मद कुरेशी माध्यमांशी बोलताना म्हणाले, "आम्हाला फार अभिमान वाटतो आहे. माझ्या मुलीनं देशासाठी काही केलं याचा अभिमान आहे. आम्ही देशासाठी समर्पण दिलं आहे. आम्ही प्रथम भारतीय आहोत आणि मग हिंदू किंवा मुस्लीम."
कर्नल सोफिया पत्रकार परिषदेत 'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देत असताना त्यांची मान अभिमानानं उंचावली, असंही सोफिया यांचे वडील ताज मोहम्मद कुरेशींनी सांगितलं.
"भारतानं कारवाई करायला जरा उशीरच केला," असंही त्यांनी नमूद केलं.
कर्नल सोफिया यांना लहानपणापासून लष्करात जायचं होतं, असं त्यांच्या वडिलांनी सांगितलं.

फोटो स्रोत, EPA
"आपल्या कुटुंबातला कोणताही मुलगा लष्करात जायला तयार नाही. मी जाऊ का? असं तिने विचारलं तेव्हा पटकन 'हो' म्हणून टाकलं. तिची लष्करात नेमणूकही झाली", कर्नल सोफिया यांच्या आईने, हलिमा बीबी कुरेशी यांनी पुढे जोड दिली.
"तिची आजी तिला सांगायची की तिचे आजोबा, म्हणजे माझे वडील सैन्यात होते. तेव्हा माझ्या भावांपैकी कुणीच सैन्यात गेलं नाही, तर मी मोठी होऊन जाणार असं ती म्हणायची," आईनं नमूद केलं.
मुलगी सैन्यात असली तरी आम्हाला कसलीही भीती वाटत नाही, असं कर्नल सोफिया यांचे आई-वडील सांगत होते.
उलट, कर्नल सोफिया यांच्या मुलाचीही आता सैन्यात सामील होण्याची इच्छा आहे.

फोटो स्रोत, Hardik
कर्नल सोफिया यांचे भाऊ मोहम्मद कुरेशी म्हणाले, "पहलगामच्या घटनेसारखी निंदनीय घटना दुसरी नाही. तेव्हा देश कशी प्रतिक्रिया देत होता आणि आत्ता आमच्या कुुटुंबासह संपूर्ण देशासाठी हा अभिमानाचा क्षण आहे."
"धर्माच्या नावावर घाण आणि द्वेष पसरवण्याची इच्छा ठेवणारे लोक नष्ट व्हावेत, असंच सगळ्यांना वाटत होतं आणि तेच झालं."
कर्नल सोफियाबद्दल बोलताना ते म्हणाले, "आमचे आजोबा, वडील आणि आता सोफियाही भारतीय सैन्यात सेवा करत आहे. देशभक्ती आमच्या रक्तातच आहे."
बहिण सोफियानं लष्करी शाळा, केंद्रीय विद्यालयातून शिक्षण घेतलं. त्या वडोदरामध्येच शिकल्या, असं त्यांचे भाऊ सांगत होते.
पी.एच. डी. करत असताना त्या विद्यापीठात सहकारी प्राध्यापक म्हणून काम करत होत्या.
"भारतीय सैन्यात शॉर्ट सर्व्हिस कमिशनसाठी त्यांची निवड झाली. त्यांच्या पी.एच.डी.साठी एकच वर्ष राहिलं असताना देशाची सेवा करण्यासाठी त्यांनी स्वतःला सैन्यात पूर्णवेळ झोकून दिलं," ते पुढे म्हणाले.
सहकाऱ्याने काढली आठवण
विद्यालयातल्या जैवरसायनशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करणारे एम. एस. देवेश सुथार सोफिया यांचे माजी सहकारी.
बीबीसी गुजरातीशी बोलताना त्यांनी सोफिया यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला.
"सोफिया शिकत असताना अतिशय मनमिळाऊ होत्या. त्यांना लष्कराचा वारसा कुटुंबातूनच मिळाला होता. त्यांनी देश, वडोदरा आणि एम. एस. युनिवर्सिटीचं नाव मोठं केलं. आम्हाला त्याचा खूप अभिमान आहे."

फोटो स्रोत, Information Department, Gujarat
सोफिया यांना संशोधनात फार रस होता, असं सुथार पुढे सांगत होते. त्यांनी प्राध्यापक हरी कटारिया यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधनही केलं होतं.
"वर्गात आणि ग्रंथालयात आम्ही सोबत वाचत बसत असू. त्यावेळी इंटरनेट नव्हतं. ग्रंथालयातून पुस्तक घेण्यावरून आमच्यात वाद होत असे."
"त्यांचे आई-वडीलही असेच मनमिळाऊ स्वभावाचे होते. आम्ही हॉस्टेलला रहात असू. घरच्या जेवणाची आठवण आली, तर सोफियाच्या घरून डबा घेऊन येत असत."
ते एकत्र शिकत, शिकवत असताना सोफिया इतकी मोठी कामगिरी करतील, असं त्यांना कधीही वाटलं नव्हतं, असंही प्राध्यापक कटारिया सांगतात.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











